::: न्यायनिर्णय :::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार विमा दावा रक्कमेबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांचे पती श्री. शंकर मधुकर झाडे यांच्या मालकीची मौजा कोलगाव, ता. राजुरा, जि. चंद्रपूर येथे सर्व्हे क्र. २५० शेतजमीन आहे. सदर शेतजमीन ते करत होते. सामनेवाले क्र. १ यांनी सामनेवाले क्र. २ यांचे सहाय्य व सल्ल्याने व सामनेवाले क्र. ३ यांच्यामार्फत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ०९.०८.२०१२ मधील अटी व शर्ती प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजना जाहीर केली. तक्रारदार यांचे पती श्री. शंकर मधुकर झाडे यांचे दिनांक २५.१०.२०१३ रोजी अपघाती निधन झाल्याने तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा दावा दिनांक ११.०२.२०१४ रोजी सामनेवाले क्र. ३ यांच्याकडे सादर केला. परंतु सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदार यांचे पतीचा विमा दावा विलंबाने का दाखल केला या कारणामुळे नामंजुर करण्यात आला असे कळविले. त्याबाबतची संपूर्ण माहिती तक्रारदाराने सामनेवाले क्र. ३ यांच्याकडे सादर केली होती. त्याप्रमाणे सामनेवाले क्र. ३ यांनी सामनेवाले क्र. १ यांना सदर माहितीसह पाठवून देखील तसेच शासन
निर्णय ०९.०८.२०१२ मधील अटी व शर्ती प्रमाणे विहित कालावधी नंतर प्राप्त होणारे विमा दावे स्विकृत करावे, असे नमूद आहे. तरीदेखील सामनेवाले क्र. १ यांनी कोणत्याही न्यायोचित प्रयोजानाशिवाय तक्रारदाराचा विमा दावा दि. २८.०३.२०१४ रोजी अमान्य केला. तक्रारदाराने सामनेवाले क्र. १ यांना वकिलामार्फत दिनांक २९.०९.२०१५ रोजी नोटीस पाठवून विमा दावा मंजुर करणेची मागणी केली. परंतु सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदार यांचे पतीचा विमा दावा नामंजुर असे न कळविल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून सामनेवाले यांनी विम्याची रक्कम तसेच शारिरीक, मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
३. सामनेवाले क्र. १ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाची पुरशीस दाखल करून तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, तक्रारदार यांनी विहित मुदतीत तक्रार दाखल केली नाही. शासन निर्णय प्रमाणे दि. १४.०८.२०१३ पर्यंत तक्रारदार यांना विमा दावा दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नसल्याने त्यानंतर घडलेल्या कारणामुळे विमा दावा रक्कम मागणे नाय्य व उचित होणार नाही. तक्रारदार यांनी विहित मुदतीनंतर तक्रार दाखल केल्याने तसेच विलंब माफी अर्ज दाखल न केल्याने तक्रार अमान्य करणे न्याय्य व उचित आहे. सामनेवाले क्र. २ यांनी सामनेवाले क्र. ३ यांचाकडून विमा दावा मुदतीत प्राप्त न केल्याने व सामनेवाले क्र. १ यांच्याकडे न पाठविल्याने सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारास सेवा सुविधा देण्यास कसूर केला नसून, तक्रारदार यांनी विमा करारातील अटी व शर्तीचा भंग केला आहे. सदर आक्षेपामुळे विम्याची रक्कम अदा करणे न्यायोचित नसल्याने, तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र. १ यांनी केली आहे. सबब, सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केला नसून तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र. १ यांनी केली आहे.
४. सामनेवाले क्र. २ ते ४ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले क्र. २ ते ४ हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध तक्रार एकतर्फा चालविण्यात येते, असे आदेश दि. १४.११.२०१७ रोजी पारित करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
५. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले क्र. १ यांची कागदपत्रे, लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाची पुरशीस व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय
२. सामनेवाले तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
६. सामनेवाले क्र. १ यांनी लेखी म्हणणेमध्ये, तक्रारदाराने विहित मुदतीत विमा दावा सामनेवाले क्र. ३ यांच्याकडे सादर न केल्याने विमा कराराच्या अटी व शर्तीप्रमाणे विमा दावा अमान्य करणे न्याय्य व उचित असल्याने सामनेवाले क्र. १ यांनी विमा दावा अमान्य केला आहे, असे नमुद करून, तक्रारदाराने दिनांक १४.०८.२०१३ पर्यंत विमा दावा अर्ज सादर करणे आवश्यक असताना तक्रारदाराने सामनेवाले क्र. २ यांच्या मार्फत सामनेवाले क्र. १ यांच्याकडे दिनांक ११.०२.२०१४ रोजी विमा दावा अर्ज दाखल केला. त्यामुळे सामनेवाले क्र. १ यांनी विमा दावा अमान्य केल्याचे पत्र तक्रारदारास दिनांक २८.०३.२०१४ रोजी पाठविले. तसेच प्रस्तुत तक्रार दिनांक ०९.०१.२०१४ पासून २ वर्षाच्या आत दाखल न केल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, असे नमूद करून अर्जदाराने असत्य कथनाच्या आधारे तक्रार दाखल केली असल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. सामनेवाले क्र. २ ते ४ यांनी लेखी म्हणणे दाखल न केल्याने अर्जदाराची वादकथने सत्यापित असल्याची बाब सिद्ध होते. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन केले असता सामनेवाले क्र. ३ यांनी सामनेवाले क्र. १ यांच्याकडे विमा दावा विहित मुदतीत सादर केल्याबाबत कागदपत्रे तक्रारदार यांनी दाखल केली आहेत. त्याप्रमाणे दिनांक ११.०२.२०१४ रोजी सामनेवाले क्र. १ यांचाकडे विमा दावा प्राप्त आहे. महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ०९.०८.२०१२ मधील अटी व शर्ती प्रमाणे शेतकरी अपघात योजने अंतर्गत विमा दावा केवळ विलंबाने सादर केला, या तांत्रिक बाबीमुळे नामंजूर करता येणार नाही, असे नमुद केले आहे. तसेच तक्रारदार यांचे मयत पती यांचा अपघाती मृत्यु झाला असल्याने, केवळ विमा दावा विहित मुदतीत नसल्याने विमा दावा नामंजूर करणे न्याय्य व उचित नाही. तसेच, त्यामुळे विमा करारातील अटी व शर्तीचा भंग होतो, या तांत्रिक बाबीमुळे सामनेवाले क्र. १ यांनी विमा दावा नामंजूर केल्याचे कागदोपत्री नमूद असले तरी, शेतकरी अपघात विमा योजना विशेष विमा संरक्षण असून व्यक्तिगत विमा दावा सामनेवाले क्र. ३ यांनी सामनेवाले क्र. २ यांच्याकडे पाठविल्यानंतर विहित मुदतीत सामनेवाले क्र. १ यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे. शासन निर्णयाप्रमाणे, विमा दावा सामनेवाले क्र. ३ यांच्याकडे सादर केल्याचा दिनांक सामनेवाले क्र. १ यांना विमा दावा प्राप्त झाल्याचा दिनांक समजण्यात यावा, असे नमूद आहे. जर अपघाती मृत्यु झाला तर केवळ अपघात झाला या कारणास्तव विमा दावा मान्य करावा, असेही नमूद आहे. सामनेवाले क्र. ४ हे सामनेवाले क्र. १ ते ३ यांना विनामोबदला सल्ला व सहाय्य देणारी संस्था असून सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदार यांच्या पतीकडून कोणतेही शुल्क न आकारल्याने, तक्रारदार यांच्या पतीचा विमा, सामनेवाले क्र. १ यांना महाराष्ट्र शासनाने विमा हप्ता रक्कम अदा करुन, घेतल्याची बाब सिद्ध होते. तसेच, सामनेवाले क्र. १ यांनी महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ०९.०८.२०१२ मधील अटी व शर्ती प्रमाणे, न्यायोचीत कारणाशिवाय, तक्रारदार यांच्या पतीचा विमा दावा अमान्य केल्याची बाब सिद्ध होते. सामनेवाले क्र. १ यांनी, न्यायोचित आक्षेपाशिवाय, करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याची बाब तक्रारदार यांनी सिद्ध केली आहे. सामनेवाले क्र. १ यांनी विमा दावा मंजुर न केल्याने तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते. सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदारास विमा दावा सेवेबाबत हेतुतः निष्काळजीपणा करुन, अटी व शर्तीचे पालन न केल्याची बाब सिद्ध होते. सदर तांत्रिक स्वरूपाचा बचाव प्रस्तुत तक्रारीतील वादकथनास लागू होत नसल्याने अमान्य करण्यात येतो. तक्रारदारांनी लेखी आक्षेप सादर व दस्तावेजाची पूर्तता करूनही सामनेवाले यांनी विमा दावा रक्कम अदा करण्याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ओ) अन्वये “सेवा” या संज्ञेची व्याप्ती पाहता वैध विमा दावा करार सेवेबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येते, असे न्यायतत्व आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून, तक्रारदारांनी, सदर तक्रार विमा दावा करार सेवेतील त्रुटीबाबत दाखल केल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द झाल्याने, सामनेवाले क्र. १ यांनी, तक्रारदारास, विमा दावा कराराबाबत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे, ही बाबही सिध्द झाल्याने मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ३ :
७. मुद्दा क्र. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ०६/२०१६ अंशतः मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले क्र. १ यांनी, तक्रारदार यांना शेतकरी अपघात विमा दावा कराराप्रमाणे, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. सामनेवाले क्र.१ यांनी शेतकरी अपघात विमा दावा रक्कम रुपये १,००,०००/- दिनांक २८.०३.२०१४ पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. १२% व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी.
४. सामनेवाले क्र.१ यांनी शेतकरी अपघात विमा दावा कराराबाबत सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन तक्रारदार यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १५,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदार यांना अदा करावे.
५. सामनेवाले क्र. २ ते ४ यांचे विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
६. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
कल्पना जांगडे(कुटे) किर्ती वैद्य(गाडगीळ) उमेश वि. जावळीकर
सदस्या सदस्या अध्यक्ष