सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 115/2012.
तक्रार दाखल दि.21-09-2012.
तक्रार निकाली दि.20-07-2015.
श्री.नितीन विलास गवळी,
रा. मु.खानापूर स्टॉप,पो.ओझर्डे,
ता. वाई, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. दि न्यू इंडिया एश्योरन्स इन्शु.कं.लि.,
2396,धुमाळ बिल्डिंग,मेन पोष्टाजवळ,
पी.बी.नं.10, वाई – 412 803,
ता.वाई, जि.सातारा.
2. शाखाधिकारी,
दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि.,
2396,धुमाळ बिल्डिंग,मेन पोष्टाजवळ,
पी.बी.नं.10, वाई – 412 803,
ता.वाई, जि.सातारा .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.जे.एम.वाबळे
जाबदार 1 तर्फे– अँड.जी.एस.धनवडे.
अँड.के.आर.माने.
अँड.एन.डी.फडके.
-ः न्यायनिर्णय ः-
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे खानापूर, ता.वाई, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. ते एल.आय.सी.एजंटचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांची होंडा शाईन या कंपनीची मोटार सायकल होती त्या गाडीचा वापर तक्रारदार हे जाणेयेणेसाठी करत होते. प्रस्तुत मोटरसायकलचा जाबदार विमा कंपनीकडे विमा उतरविला होता त्याबाबत वर्णन पुढीलप्रमाणे,-
गाडीचे मॉडेल- होंडा शाईन
गाडीचा रजि.नं.- एम.एच.11ए.व्ही.2062
चॅसी नं.- 8000901
इंजिन नं.- 2001238
क्युबिक कपॅसिटी- 124
रंग- काळा,
पॉलीसी नंबर-15170431100100000094
विमा कालावधी- दि.8/4/2010 ते दि.7/4/2011
तक्रारदार हे वरील वर्णनाची मोटार सायकल दि.27/7/2010 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ इमारतीजवळ वाई,जि.सातारा येथे दुपारी 12.30 ते 13.00 या वेळेत लावली असता तक्रारदार हे त्यांचे काम आवरुन परत आले असता त्या जागेवर गाडी नव्हती. तक्रारदाराने सर्वत्र शोध घेतला असता गाडी चोरीला गेलेची खात्री झाली. प्रस्तुत गाडीची किंमत रक्कम रु.48,000/- एवढी होती व आहे. प्रस्तुत गाडीचे लॉक व्यवस्थीत चालत नव्हते त्यामुळे अज्ञात चोरटयाने डुप्लीकेट चावी वापरुन गाडीची चोरी केली होती व आहे. त्यामुळे तक्रारदाराने दि.3/8/2010 रोजी वाई पोलीस स्टेशनला गाडी चोरी झालेची फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरुन वाई पोलीसांनी अज्ञात चोरटाविरुध्द आय.पी.सी.कलम379 प्रमाणे गु.र.नं.69/2010 दाखल केला. परंतु, तपासाअंती सदरची गाडी मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत गाडीचा विमा उतरविला असलेने जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडे विमा क्लेम सादर केला व गाडीची विमा रक्कम रु.47,000/- ची मागणी जाबदारांकडे केली. गाडी चोरी झाली त्या काळात गाडीचा विमा चालू होता. परंतू तरीही जाबदार विमा कंपनीने प्रस्तुत तक्रारदाराचे गाडीचा विमा क्लेम दि.4/8/2010 रोजी नाकारला. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असलेने तक्रारदार यांनी प्रस्तुत जाबदार यांचेकडून गाडीचा विमा क्लेम रक्कम मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केलेला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून गाडीची विमा क्लेम रक्कम रु.47,000/- व्याजासह वसूल होवून मिळावेत, मानसिकत्रासापोटी रक्कम रु.25,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- जाबदार यांचेकडून मिळावा अशी विनंती केली आहे. एकूण रक्कम रु.77,000/- वर अर्ज दाखल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याज जाबदाराकडून वसूल होवून मिळावे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/4 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे मोटर सायकलची विमा पॉलीसीची झेरॉक्स प्रत, जाबदाराने तक्रारदाराचे गाडीचा विमा क्लेम नाकारलेचे पत्र, तक्रारदाराने गाडी चोरी झालेबाबत पोलीसस्टेशनलर दिलेला खबरी जबाब, सी.आर.पी.सी 173 प्रमाणे अंतिम अहवाल नमुना, नि.19 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि.21 चे कागदयादीसोबत नि. 21/1 कडे तक्रारदाराने एल.आय.सी.चे घेतलेले कर्ज नील झालेबाबत एल.आय.सी. चा दाखला, नि. 25 कडे तक्रारदाराचे जादा पुराव्याचे शपथपत्र, नि.26 कडे साक्षीदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 27 कडे साक्षीदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 28 ला तक्रारदाराचा पुरावा संपलेची पुरसीस, नि.29 तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, नि.31/1 कडे स्मार्ट कार्डची झेरॉक्स प्रत वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. जाबदार यांनी याकामी नि.11 कडे कैफियत/म्हणणे, नि.12 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.13 चे कागदयादीसोबत नि.13/1 ते 13/7 कडे अनुक्रमे विमापॉलीसी अटी व शर्थीसह, तक्रारदाराने जाबदार यांना चोरीसंदर्भात पाठवलेले पत्र तक्रारदाराने वाई पोलीस स्टेशनला दिलेला खबरी जबाब, घटनास्थळ पंचनामा, तक्रारदाराने दोन्ही चाव्या हरवल्याबाबत दिलेले पत्र, मोटर क्लेम फॉर्म, जाबदाराने तक्रारदाराला दिलेले क्लेम नाकारलेचे पत्र, नि. 24 कडे जाबदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि.23 कडे जाबदाराचा लेखी युक्तीवाद तसेच मे. इंटरनॅशनी कमिशन, नवी दिल्ली यांचेकडील रिव्हीजन पिटीशन नं. 4749/2013 Shriram General Insurance Co. Ltd., Majendra Jat हा न्यायनिवाडा यासाठी दाखल केला आहे. जाबदार यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन नाकारलेले आहे. त्यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
I तक्रारदाराचा अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने जाबदाराचे विमा रकमेची मागणी केली. जाबदाराने रक्कम देणेस टाळाटाळ केली. दि.4/8/2011 रोजी विमा क्लेम नाकारला त्यामुळे तक्रार दाखल वगैरे मजकूर मान्य नाही. जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही.
ii तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीचे हिरोहोंडा शाईन मोटर सायकलची विमा पॉलीसी उतरविली होती. पॉलीसी क्र. 15170431100100000094 त्याचा कालावधी दि.6/4/2010 ते दि.7/4/2011 असा होता. प्रस्तुत पॉलीसी देताना त्यातील अटी व शर्थी व सर्व नियमांची माहिती वाहनासंदर्भातील घ्यावयाची काळजी चोरी वगैरे सविस्तर माहिती तक्रारदारास दिली होती व त्याचे शंकांचे निरसन करुनच तदनंतरच विमापॉलीसी तक्रारदाराला दिली आहे. मालक या नात्याने तक्रारदाराने वाहनाची सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. विमापॉलीसीतील नियम अटी शर्थी व अपवाद तक्रारदार यांचेवर बंधनकारक आहेत. जर विमेधारकाने विमाकृत वाहनाची कोणतीच काळजी (सुरक्षिततेबाबत) घेतली नाही तर विमा पॉलीसीतील शर्थी अटींचा भंग केलेने विमा कंपनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारु शकते. त्यामुळे जर विमा कंपनीने क्लेम नामंजूर केला तर ती सेवेतील त्रुटी होत नाही.
Iii तक्रारदाराचे क्लेमफॉर्ममध्ये गाडी कधी किती तारखेस खरेदी केली? इंजिन नंबर, चॅसी नंबर, रजिस्ट्रेशन नंबर यांचा तसेच वाहन रजिस्ट्रेशन केलेची तारीख यांचा उल्लेख नाही. मोटर वाहन कायद्यानुसार कोणतेही वाहन आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन झालेशिवाय सार्वजनिक ठिकाणी वापरु नये. अशा वाहनाचा वापर करणे नियमबाहय आहे व शिक्षेस पात्र आहे. गाडी चोरीस गेली त्यादिवशी त्याची माहिती जाबदार विमा कंपनीस कळविली त्यातपण वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर नमूद नाही. तसेच वाहनाची चोरी दि.27/7/2010 रोजी झाली असतानाही पोलीस स्टेशनला दि.3/8/2010 रोजी म्हणजे उशीराने तक्रार दिली. ती ताबडतोब दिलेली नाही. त्यामध्ये सुध्दा गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर व चॅसी नंबर नमूद नाही. त्यामध्ये नंतर चॅसी नंबर व रजिस्ट्रेशन नंबर घातलेचे दिसून येते. त्यामुळे नोंदणीशिवाय गाडी वापरलेमुळे तक्रारदाराने पॉलीसीतील अटी व शर्थींचा भंग केलेला आहे. तसेच तक्रारदाराने दि.11/3/2013 रोजी जाबदार यांना अर्जाव्दारे कळविले आहे की, गाडीच्या दोन्ही चाव्या तक्रारदाराकडून हरवल्या आहेत. म्हणजेच एक चावी फारपूर्वी हरवली आहे. तर दुसरी चावी गाडी चोरी झालेनंतर घरातच हरवली आहे याचा विचार करता तक्रारदाराने मोटरसायकलची अजिबात काळजी घेतलेली नाही. गाडीची लॉक न लावता तक्रारदाराने निष्काळजीपणा केलेने तक्रारदाराकडून पॉलीसीचे अटी व शर्थींचा भंग झालेला आहे. त्यामुळे तक्रारदाराचा विमा क्लेम जाबदार कंपनीने नामंजूर केला आहे. सबब जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सदोष सेवा पुरविलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार विमा कंपनीने सदर कामी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान ग्राहक व
सेवापुरवठादार असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदारांस सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. तक्रारदार त्याचे मोटारसायकलचा विमा क्लेमची
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी त्याचे हिरोहोंडा शाईन मोटर सायकल नं. एम.एच.11 ए.व्ही.2062 चा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता. त्याचा कालावधी दि.8/4/2010 ते दि.7/4/2011 असा होता. प्रस्तुत बाब जाबदाराने मान्य केली आहे. तसेच जाबदाराने नि.13/1 कडे मुळ विमा पॉलीसी दाखल केली आहे. म्हणजेच तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान विमा करार झालेला आहे हे निर्विवाद सत्य आहे. सबब तक्रारदार हे जाबदार यांचेदरम्यान विमा करार झालेला आहे हे निर्विवाद सत्य आहे. सबब तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असून जाबदार हे सेवा पुरवठादार आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
त्याचप्रमाणे तक्रारदाराचे गाडीचा विमा चालू असतानाच दरम्यानच्या काळात म्हणजे दि.27/7/2010 रोजी तक्रारदार हे प्रस्तुत मोटार सायकल भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या इमारतीजवळ वाई जिल्हा सातारा येथे लावली व कामाकरीता गेलेनंतर काम आवरुन आलेनंतर पाहिले असता गाडी जागेवर नव्हती, त्यावेळी गाडी चोरीला गेलेचे त्यांचे लक्षात आले तक्रारदाराने वाई पोलीस स्टेशन येथे तक्रार देणेसाठी गेले असता पोलीसांनी तक्रार ताबडतोब नोंदवून घेतली नाही. अगोदर तक्रारदारास गाडी शोधून घ्या नंतर आम्ही फिर्याद नोंदवून घेतो असे सांगितलेने तक्रारदाराने फिर्याद नोंदवणेस वेळ झाला तो पोलीसांचेमुळेच झाला आहे. तक्रारदाराने फिर्याद नोंदवणेस वेळ झाला तो पोलीसांचेमुळेच झाला आहे यात तक्रारदाराचा कोणताही दोष नव्हता व नाही ही बाब तक्रारदाराने नि. 26 व 27 कडे दाखल साक्षीदार, जे फिर्यादी दाखल करणेस तक्रारदारसोबत गेले होते व गाडी चोरीसाठी त्यावेळी एकत्रात होते त्यामुळे पोलीसांमुळे उशीर झालेचे कथन त्यांनी त्यांचे अॅफीडेव्हीमध्ये कथन केले आहे तसेच प्रस्तुत गाडी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या इमारतीजवळ पार्क केली. त्यावेळी सदर साक्षीदार तक्रारदारासोबत होते व तक्रारदाराने त्यावेळी गाडी व्यवस्थित लॉक करुन पार्क केलेचे प्रस्तुत साक्षीदारांनी त्यांचे अँफीडेव्हीटमध्ये कथन केले आहे. प्रस्तुत साक्षीदारांच्या अॅफीडेव्हीटला क्रॉस अँफिडेव्हीट जाबदाराने दाखल केले नाही अथवा तक्रारदाराने जाणूनबुजून फिर्याद देणेस उशिर केलेचे तसेच गाडी लॉक न करता तक्रारदार कामासाठी गेलेचे जाबदार सिध्द करु शकलेले नाहीत. तसेच प्रस्तुत तक्रारदाराचे मोटर सायकलचे स्मार्ट कार्ड तक्रारदाराने याकामी नि.31/1 कडे दाखल केले आहे. त्यावरची गाडीची रजिस्टेशन केलेची तारीख पाहता दि.21/4/2010 आहे. परंतु तक्रारदाराचे गाडीची चोरी ही दि. 27/7/2010 रोजी झालेचे दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. म्हणजेच वाहनाचे रजिस्ट्रेशन करुन नंतरच वाहनाचा वापर तक्रारदाराने केलेचे स्पष्ट सिध्द होत आहे. तसेच जाबदाराने नि. 13/5 कडे दाखल केले तक्रारदाराने जाबदाराला केलेल्या अर्जाचे काळजीपूर्वक अवलोकन करता प्रस्तुत अर्जावरील सही तक्रारदाराची नाही व प्रस्तुत अर्ज तक्रारदाराने केलेला नाही असे तक्रारदाराने त्यांच्या पुराव्यात स्पष्ट केले आहे. प्रस्तुत अर्जावरील सही व तक्रारदाराची मुळ तक्रार अर्ज व अॅफीडेव्हीट, वकीलपत्र वगैरे सहया यांची तुलना करुन मे. मंचाने पाहीली असता प्रस्तुत अर्जावरील सही ही वेगवेगळी भिन्न स्वरुपाची असून दोन्ही सहयांमध्ये बरीच तफावत मे मंचास दिसून आली आहे. प्रस्तुतची सही तक्रारदाराची आहे हे जाबदार विरुध्द करु शकलेले नाहीत. तसेच तक्रारदाराने स्पष्ट म्हटले आहे की, गाडीचे लॉक व्यवस्थीत चालत नव्हते. कुणीतरी अज्ञात इसमाने डुप्लीकेट चावी वापरुन, मोटार सायकल चोरुन नेली असावी. आणि प्रस्तुत पंचनामा हा पोलीसांनी लिहीलेला आहे. त्यामुळे तसेच सदर पंचनाम्यातील सर्व कथन जाबदाराने सिध्द केले नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार यांना जाबदार विमा कंपनीने त्यांचे गाडीच्या विमा क्लेमची रक्कम देणे योग्य व न्याय असतानाही जाबदाराने विमा क्लेम चुकीची कारणे देवून नामंजुर केला याचाच सरळ अर्थ जाबदाराने तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे हे निर्विवादपणे स्पष्ट सिध्द होत आहे. आणि प्रस्तुत सर्व कारणांचा, विवेचनाचा,युक्तीवाद, पुरावे कागदपत्रे यांचे सखोल अवलोकन केले असता तक्रारदार हे मोटारसायकल विमाक्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
-ः आदेश ः-
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र. 1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना त्याचे हिरोहोंडा शाईन
मोटर सायकल नं.एम.एच.11-ए.व्ही.2062 या गाडीची विमा पॉलीसीची
रक्कम रु.47,000/- (रुपये सत्तेचाळीस हजार फक्त) अदा करावी. प्रस्तुत
विमा क्लेम रकमेवर विमा क्लेम फेटाळले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती
पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला अदा
करावे.
3. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे
खर्चापोटी रक्कम रु. 15,000/- (रु.पंधरा हजार मात्र) जाबदारांनी तक्रारदाराला
अदा करावेत.
4. वरील नमूद सर्व आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात
करावेत.
5. वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदाराना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 20-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.