ग्राहक तक्रार क्र. 118/2013
अर्ज दाखल तारीख : 16/08/2013
अर्ज निकाल तारीख: 09/12/2014
कालावधी: 01 वर्षे03 महिने 24 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. नानासाहेब पि. योगीराज माने,
वय-70 वर्षे, धंदा – शेती,
रा.येडशी ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. दि.न्यु इंडिया अॅश्युरन्स कं. लि. पुणे व्दारा,
विभागीय कार्यालय, शाखाधिकारी दि. न्यु. इंडीया इन्शुरन्स कंपनी लि.
शिवाजी चौक, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.
2. शाखा अधिकारी,
डेक्कन इन्शुरन्स अॅन्ड डरिइन्शुरन्स ब्रोकरी प्रा. लि.
पारडे बिल्डींग, भानुदास नगर, बीग बाझारचे पाठीमागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद- 41001
3. तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
सेंटर बिल्डींग उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य..
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.एस.रितापुरे.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : श्री.स्वत:.
न्यायनिर्णय
मा. सदस्या श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार शेतकरी असून त्यांच्या नावे मौजे येडशी येथे गट नं.452 आहे. सदर जमीनीचे तक्रारदार हे कब्जेवहीवाटदार आहेत. दि.07/08/2012 रोजी तक्रारदार हे त्यांच्या शेतातून जनावरे चारुन सायंकाळी 7 वाजता त्यांच्या घराकडे येत असतांना पाठीमागून इंडीका गाडीने जोराची धडक दिल्याने अपघातात जखमी झाले. तक्रारदाराने दवाखाण्यात उपचार घेतले. सदर अपघातात तक्रारदारास 60 टक्के कायमस्वरुपीचे अपंगत्व आले. सदर अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शासकिय रुग्णालय, उस्मानाबाद यांनी दिलेले आहे. सदर प्रस्ताव विप क्र.3 यांच्याकडे फेबुवारी 2013 मध्ये उशीर माफ होण्यासाठी रु.100/- बँन्डवर शपथपत्रासह सादर केला. दि.17/07/2013 रोजी पत्राव्दारे विप क्र.3 यांनी सदर विमा दावा मुदत बाहय असल्याचे कळविले. म्हणून तक्रारदारास सदर तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले आहे असे नमूद केले आहे. तसेच तक्रारदारास सदरची विमा योजनेची रक्कम रु.50,000/- प्रकरण दाखल केल्यापासून 12 टक्के व्याजासह, मानसिक व आर्थीक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रु.5,000/- देण्याचा आदेश व्हावा. अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत कागदपत्रांची यादीवर शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव, प्रस्ताव नामंजूर केल्याचे पत्र ई. कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.09/12/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे
तक्रारदाराचे वय 80 असल्याचे पोलीस व वैद्यकीय रेकॉर्डवरुन दिसुन येईल. त्यामुळे तक्रारदारास शेतकरी जनता वैयक्तिक अपघात योजनेनुसार दावा करणेचा हक्क असू शकत नाही. केवळ रक्कम मिळावी म्हणुन तक्रारदाराने वय 70 असल्याचे खोटे नमूद केले आहे. तक्रारदाराने विमा दावा उशीरा दाखल केला असल्याचे दिसून येते. सदरचा विमा दावा विप क्र.1 यांच्याकडे कधी दाखलच झाला नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावा. असे नमूद केले आहे.
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.04/10/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
तक्रादाराची तक्रार अपु-या माहितीवर व गैरसमजाने आणि चुकीची आहे. विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी यांचेत मध्यस्थ म्हणुन काम करणे एव्हढेच मर्यादित काम संस्था करते. या नेमणुकीसाठी संस्थेने महाराष्ट्र शासनास कोणत्याही प्रकारीच फी अथवा आर्थिक मदत मागितलेली नाही, लागू केलेली नाही अथवा स्वीकारलेली नाही. दावेदार संस्थेवर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी संस्थेस जबाबदार धरण्यात येवू शकत नाही. सदर दाव्यातुन विरुध्द पक्षकार क्र.2 यांना मुक्त करण्यात यावे असे नमूद केले आहे
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.2 यांनी आपले पुरवणी कथन दि.03/01/2014 रोजी दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे.
मुदतीनंतर आलेले दावे आम्ही वेळोवळी जिल्हा कृषी कार्यालयांस पोष्टाव्दारे परत केलेले आहेत. आणि असे दावे जिल्हा कृषी कार्यालयास परत मिळालेले असल्यामुळे याबददल कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा विचारणा अथवा चौकशी आज पावेतो लेखी स्वरुपात कृषी कार्यालयाने कोणत्याही सभेत, कोणत्याही परिषदेत केलेली नाही यावरुन असे दावे जिल्हा कृषी कार्यालयास परत मिळाले आहेत हे अप्रत्यक्षपणे सिध्द होते. सबब तक्रारदाराचे आणि इतर प्रतिवादींचे कथन कि, त्यांचा दावा आमचे कडे आहे, हे आम्ही नाकारित आहोत. असे नमूद केले आहे
3) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार क्र.3 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.04/09/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले ते संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे.
सदरचा विमा दावा सन 2011-12 या कालावधीत असुन सदरील विमा प्रस्ताव दि.08/03/2013 रोजी दोन प्रतित प्राप्त झाला. सदर विमा प्रस्ताव मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे या कार्यालयाचे पत्र क्र.855/ दि.11/03/2013 अन्वये पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात आले. असे नमूद केले आहे.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुददे निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकारने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
मुददा क्र.1 ते 4:
5) अर्जदार यांनी अभिलेखावर दि.21/01/2013 रोजी General Hospital, Osmanabad यांचे जिल्हा शल्यचिकित्सक, (Civil surgeon) हाडांचे डॉक्टर (Orthopedic Surgeon) a medical officer (वैदयकिय अधिकारी) यांचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. त्या वैदयकिय प्रमाणपत्रच्या form-IV चे सुक्ष्म अवलोकन केले तर अर्जदाराचे नाव आणि वय - 70 असे स्पष्ट लिहीलेले आहे. त्याखाली रकाना आहे व रकान्यात permanent physical impairment / mental disability 60% अशी स्पष्ट नोंद केलेली आहे. जी कि ग्राहय धरावीच लागेल परंतु विमा कपंनीचे असे म्हणणे आहे की अर्जदाराचे वय 80 असल्याचे पोलिस पेपर्स वरुन दिसुन येते. परंतू वैदयकीय अधिकारी शल्यचिकित्सक हे जाणकार व्यक्ती आहे व ते तज्ञ आहे त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र हे ग्राहय धरणे योग्य होणार आहे.
6) तसेच शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारे जे लाभ आहेत त्यामध्ये प्रपत्र– अ मध्ये अपघातामुळे – 1 अवयव निकामी झाला असेल तर त्यासाठी रु.50,000/- (पन्नास हजार) रक्कम दयावी असे सांगितलेले आहे तसेच प्रपत्र ब-1 मध्ये राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदिनुसार असल्यास शेतकरी यांना सदरच्या योजनेचा लाभ देण्यात यावा असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले असतांना विमा कंपनीने तांत्रिक कारण पुढे करुन अर्जदारास विमारक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. व विमा रक्कम न देऊन सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे.
7) वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहेत कि, अर्जदार सदर शेतकरी अपघात विमा दाव्याचा लाभ मिळण्यास पात्र आहे म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 विमा कंपनीने अर्जदारास शेतकरी अपघात विमा रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) दि.04/09/2013 पासून 9 टक्के व्याजसह आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात दयावेत.
3) विप क्र.1 विमा कंपनीने अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात दयावेत.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.