निकालपत्र :- (दि.12/08/2010) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 2 त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) तक्रारदाराचे मालकीची महिंद्रा जीप क्र.MH-09-S-2208 असून कोडोली अर्बन को-ऑप बँक लि.ब्रॅन्च कळे यांचा बोजा होता.त्यामुळे जीपचा विमा सदर बँक भरत होती व कर्जखातेवर विम्याचे हप्त्याची रक्कम खर्ची टाकून तक्रारदारां कडून वसुल करुन घेत होती. ब) नमुद वाहनाचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविला होता. त्याचा पॉलीसी क्र.152303/31/05/00209 असून कालावधी दि.12/05/2005 ते 11/05/2006 असा आहे व विमा हप्ता रक्कम रु.5,404/- तक्रारदाराचे कर्ज खातेवर खर्ची टाकले होते व हप्त्याचा चेक नमुद बँकेने सामनेवाला विमा कंपनीला दिला होता.
क) दि.12/05/2005 रोजी नमुद वाहनाचा गगनबावडा पोलीस स्टेशनचे हद्दीत अपघात झाला त्याची नोंद सदर पोलीस स्टेशनमध्ये पो.अ.द.नं.15/05नुसार झाली आहे.त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला कंपनीला कळवले व त्यानंतर जीप दुरुस्ती करुन घेतली त्याला एकंदर रक्कम रु.55,000/-खर्च आला. त्याची बीले सामनेवाला विमा कंपनीकडे सादर केली. दि.12/09/2005 रोजी ''विम्याचे हप्तेपोटी दिलेला चेक रद्द झालेने पॉलीसी रद्द झालेचे '' कारण देऊन सामनेवाला यांनी विमा क्लेम नाकारला आहे. ड) सामनेवालांनी वर नमुद पॉलीसी दिली असून ती पॉलीसी तक्रारदार यांना रक्कम न देता रद्द केली असून चुकीचे रद्द केली आहे व ती रद्द होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करुन सेवेत त्रुटी निर्माण केलेने सदरची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले. तसेच प्रस्तुत तक्रार दाखल करणेस दोन महिन्याचा विलंब झाला असून त्याकरिता रितसर अर्ज दिला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास क्लेम रक्कम रु.55,000/-दि.12/08/2005 पासून द.सा.द.शे.12 टक्के व्यासासह देणेविषयी हुकूम व्हावा. तसेच मुदतीत न दिलेने रक्कम रु.25,000/-दंडापोटी व खर्चापोटी रक्कम रु.5,000/-देणेविषयी हुकूम व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
(3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ क्लेम नाकारलेचे पत्र, पॉलीसी व पंचनाम्याची सत्यप्रत इत्यादी कागदपत्रे तसेच रिजॉइन्डर दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार व सामनेवालांचे दरम्यान कोणताही वैध करार नव्हता.सबब कायदयाचे दृष्टीकोनातून प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नसलेचे कारणास्तव फेटाळणेस पात्र आहे. सामनेवाला मान्य करतात की तक्रारदाराने पॉलीसी रिन्युअल स्वत: न करता ते कोडोली अर्बन को-ऑप बँक लि यांचमार्फत करणेत आले. मात्र सदर पॉलीसीपोटी दिलेला धनादेश हा " Drawers sigbnature incomplete, two to operate." यामुळे अनादर झाला आहे. तसेच नमुद बँकेस आवश्यक पक्षकार केलेले नाही. सामनेवाला विमा कपंनी नुकसानभरपाई देणेसाठी जबाबदार नसून सदर बँकच जबाबदार आहे. सदर बँकेस पक्षकार केले नसलेने तक्रार फेटाळणेस पात्र आहे. प्रस्तुतची पॉलीसी ही धनादेश वटलेच्या अटीवरच प्रभावीत होते (On realisation of cheque)सबब चेकच न वटल्याने सदर पॉलीसी प्रभावीत नसलेने सामनेवालांची जबाबदारी येत नाही. सबब सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळणेत यावी व तक्रारदाराकडून रक्कम रु.5,000/- कॉम्पेसेंटरी कॉस्ट सामनेवालांना देणेबाबत हुकूम व्हावा अशी विंनती केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (6) सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराचा अर्ज खोटा,लबाडीचा रचनात्मक असून तो त्यांना मान्य व कबूल नाही. सामनेवाला याचा स्पष्ट शब्दात इन्कार करतात. तक्रारदाराने सामनेवाला बॅंकेकडे त्यांचे झालेल्या नुकसानी संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार तसेच कसलीही मागणी केलेली नव्हती व नाही. तसेच सदर क्लेम देण्यास बँक कधीही जबाबदार नव्हती व नाही. तक्रारदाराचे मालकीचे महिंद्रा जीप क्र.MH-09-S-2208 चा विमा सामनेवालांकडे वेळेत उतरविलेला आहे. त्याच्या हप्तेचा चेक देखील वेळेत दिलेला आहे. नमुद चेक सामनेवाला बँकेने सामनेवाला क्र.1 कडे दि.10/05/2005 रोजी दिला. मात्र सदर चेक न वटल्याचे पत्र सामनेवाला विमा कंपनीने दि.22/07/2005 रोजी दिलेले आहे. सदर पत्रात " Drawers sigbnature incomplete, two to operate." असे नमुद केले आहे. मात्र प्रत्यक्ष चेक पाहिला असता चेकवर दोन्ही व्यक्तींच्या सहया केलेल्या आहेत तरी त्रुटी राहू नये म्हणून सामनेवालांनी पुढे दि.22/08/2005 रोजी चेक दिलेला असून तो सामनेवाला क्र.1 यांनी वटविलेला आहे. बँकेने कोणताही कसूर केलेला नाही. तक्रारदाराचे नमुद वाहनचा दि.12/05/2005 रोजी अपघात झाला त्याच दिवशी पॉलीसी सुरु असून ती सामनेवाला क्र.1 यांनी दिलेली आहे. नमुद दुसरा चेकची रक्कम स्विकारलेली आहे. परंतु सदर तारखेपूर्वी सदर वाहनाचा अपघात झालेची कल्पना सामनेवाला क्र.1 ला होती. सबब तक्रारदारास नुकसान भरपाई देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची आहे. परंतु अनादर झालेला धनादेश हा खातेवर रक्कम शिल्लक नाही या कारणास्तव परत आलेला नाही. सामनेवाला क्र.1 यांनी चेकमध्ये कोणताही दोष नसताना तो परत आलेला आहे व जाणीवपूर्वक क्लेम नाकारला आहे. सबब तक्रारदाराचा सामनेवाला क्र.2 विरुध्दचा अर्ज फेटाळणेत यावा अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे.
(7) सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
(8) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे व उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. तक्रार दाखल करणेस झालेला विलंब माफ करता येईला का ? --- होय. 2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने तक्रार दाखल करताना दि.16/11/2007रोजी विलंब माफीचा अर्ज दिलेला होता. सदर अर्जावर विलंब माफीचा मुद्दा अंतिम चौकशीच्या वेळेस विचारात घेणेत येईल असा आदेश मे.मंचाने पारीत केलेला होता. तक्रारीतील नमुद वाहनाचा अपघात दि.12/05/2005 रोजी झालेला आहे व सामनेवाला कंपनीने दि.12/09/2005 रोजी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला. तदनंतर प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करणेस झालेला विलंब हा तक्रारदार हे खेडेगावातील रहिवाशी असून क्लेम नाकारले नंतर क्लेम कोठे करण्याचा असतो याची कल्पना त्यांना नव्हती. तसेच नमुद वाहनावर ज्या बँकेचे कर्ज होते त्या बँकेने त्यांना काही सुचना अगर मदत केली नाही. तक्रारदारास मा. ग्राहक मंचात क्लेमबाबत तक्रार दाखल करता येते याची कल्पना आलेबरोबर ताबडतोब तक्रार दाखल केली आहे असे प्रतिपादन केले आहे. तक्रारीस कारण दि.12/09/2005 रोजी घडलेले असून प्रस्तुतची तक्रार दि.16/11/2007 रोजी दाखल केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे तक्रार उदभवलेपासून 2 वर्षाचे आत तक्रार दाखल करावयास हवी होती. सबब तक्रार दाखल करणेस फक्त दोन महिन्याचा विलंब झालेला असलेने नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता सदर विलंब माफ करणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मु्द्दा क्र.2 :- सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे मालकीचे वाहन महिंद्रा जीप क्र.MH-09-S-2208 चा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे न उतरविता सामनेवाला क्र.2 कोडोली अर्बन को-ऑप बँक शाखा-कळे यांचेमार्फत उतरविलेचे मान्य केले आहे. मात्र पॉलीसीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पाठविलेला धनादेश हा " Drawers sigbnature incomplete, two to operate." या कारणास्तव अनादर झालेने प्रस्तुत धनादेशाची रक्कम सामनेवाला क्र.1 यांना मिळालेली नाही. सदरची बाब सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या म्हणणेत मान्य केलेली आहे. याचा विचार करता प्रस्तुतचा धनादेश हा दि.10/05/2005 रोजी पाठवून तक्रारदाराचे कर्ज खातेस खर्ची टाकलेला होता व सदर धनादेश वटणेच्या अटीवर सामनेवाला क्र.1 यांनी पॉलीसी दिलेली होती व सदर पॉलीसीचा क्र.152303/31/05/ 00209 आहे व सदर पॉलीसीचा कालावधी हा दि.12/05/2005 ते 11/05/2006 असा होता. नमुद कालावधीत दि.12/05/2005 रोजी तक्रारदाराचे नमुद वाहनाचा गगनबावडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत होऊन त्याची नोंद अ.द.नं.15/05 ने पोलीस स्टेशनला झाली आहे. सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठी रक्कम रु.55,000/-इतका खर्च आला व योग्य त्या कागदपत्रांसह तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे मागणी केली. मात्र धनादेशाची रक्कम न मिळालेने सदर पॉलीसी प्रभावहीन झालेली आहे. सबब नमुद पॉलीसी अंतर्गत विमा रक्कम देणेस सामनेवाला क्र.1यांनी नकार दर्शविला व त्याप्रमाणे दि.12/09/2005रोजी तक्रारदारास चेक रद्द झालेने पॉलीसी रद्द झालेने दाव्याचा विचार करु शकत नाही असे कळवलेले आहे यामध्ये सामनेवाला यांची सेवात्रुटी दिसून येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.1 यांनी आपले म्हणणेमध्ये तक्रारदाराने नमुद वाहनापोटी कर्ज काढलेल्या बँकेस आवश्यक पक्षकार केलेले नाही. सबब तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे असे प्रतिपादन केले आहे व तदनंतर तक्रारदाराने दि.29/06/2009 रोजी तक्रार दुरुस्तीबाबत अर्ज देऊन नमुद बँकेस आवश्यक पक्षकार म्हणून सामिल करणेत यावे व तक्रार अर्जातील कलम3 नंतर 3 अ म्हणून नमुद अर्जातील मजकूर तसेच विनंतीमध्ये सबपॅरा अ नंतर अ(अ) म्हणून मजकूर समाविष्ट करणेस परवानगी मागितली व सदरचा अर्ज सदर मंचाने दि.10/08/2009 रोजी मंजूर केला. मात्र तक्रारदाराने नमुद बँकेस पक्षकार म्हणून दुरुस्ती करुन घेतली. मात्र 3 अ व विनंती मधील अ(अ) हा मजकूर दुरुस्ती करुन घेतला नसलेने त्याचा विचार करता येणार नाही. सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या म्हणणेनुसार तक्रारदाराचे नमुद वाहनापोटी सामनेवाला बँकेने विमा हप्त्याचा चेक दि.10/05/2005 रोजी सामनेवाला क्र.1 कडे दिलेला आहे. मात्र सदर चेक न वटल्याचे पत्र सामनेवाला क्र.1 यांनी दि.22/07/2005 रोजी सामनेवाला क्र.2 यांना दिलेले आहे व सदर पत्रानुसार " Drawers sigbnature incomplete असा शेरा नमुद केला आहे. मात्र नमुद चेक पाहिला असता सदर चेकवर दोन्ही व्यक्तींच्या सहया केलेल्या आहेत. तरीही त्रुटी राहू नये म्हणून पुन्हा दि.22/08/2005 रोजी चेक दिलेला आहे व तो सामनेवाला क्र.1 यांनी वटवलेला आहे व सदरचा चेक नमुद वाहनाचा अपघात झालेची कल्पना असतानाही सामनेवाला क्र.1 यांनी घेतला असलेने तक्रारदाराची नुकसान भरपाईची रक्कम देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची आहे. वस्तुत: सदर बाबींची कल्पना सामनेवाला क्र.1 यांनी वेळेत दिलेली नाही. तसेच प्रस्तुतचा चेक खातेवर रक्कम नसलेचे कारणावरुन न वटता परत आलेला नाही. सबब सदरची पॉलीसी रद्द करता येणार नाही व सामनेवाला क्र.1 यांनी जाणीवपूर्वक क्लेम नाकारला आहे. याचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी दि.20/03/2010 रोजी नमुद बाबीबाबतची सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र.2 यांनी हजर करणेत यावेत असा अर्ज दिला. सदर अर्जावर तक्रारदाराने म्हणणे दयावे असा आदेश पारीत केलेला होता. मात्र प्रस्तुत आदेशाप्रमाणे तक्रारदाराने म्हणणे दाखल न करता दि.05/04/2010रोजी तक्रारदाराने विनंती अर्ज देऊन सामनेवाला यांनी क्लेम फॉर्मसोबतचे सर्व कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणात दाखल करणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत असा अर्ज दिलेला होता. मात्र तदनंतर तक्रारदाराने दि.05/04/2010पासून ते प्रस्तुतचे काम निकाली होईपर्यंत नमुद कागदपत्रे व बँकेकडील कागदपत्रे तक्रार सिध्द होणेचे दृष्टीने दाखल होणे गरजेचे असलेने त्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही.सबब तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबतच नमुद कर्जाचा खातेउतारा चेक अनादर झालेबाबतचा मेमो व अन्य कागदपत्रे दाखल करणे गरजेचे होते ते दाखल केलेले नाहीत. सामनेवाला क्र.2 यांना फक्त पक्षकार केलेले असून त्याबाबत त्यांनी त्यांचेविरुंध्दची मागणीबाबतची दुरुस्तीही करुन घेतलेली नाही. सबब सामनेवाला क्र.2 यांनी सेवात्रुटी केलेची बाब तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत. सबब सामनेवाला क्र.2 यांनी सेवेत त्रुटी ठेवली असे म्हणता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3:- प्रस्तुत तक्रारदाराने मा. सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वाधार दिलेला आहे. 2009 (2) SCCR 691 - NATIONAL INSURANCE CO. LTD. Vs. PARVATHANENI & ANOTHER (Slp Civil No.22444 of 2009 decided on 31/08/2009 सदरचा पूर्वाधार सदर प्रकरणास लागू होत नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाविषयी कोणतेही आदेश नाहीत.
| | [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |