आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्षाने नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्यांचा मुलगा मंगेश नारायण नंदेश्वर यांच्या मालकीची मौजा सुरटोली, तालुका देवरी, जिल्हा गोंदीया येथे गट नंबर 215, क्षेत्रफळ 0.82 हेक्टर आणि गट नंबर 216/1-क क्षेत्रफळ 0.30 हेक्टर ही शेतजमीन होती आणि तो व्यवसायाने शेतकरी होता व त्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह सदर शेतीवर चालत होता.
3. महाराष्ट्र शासनाने सन 2012-13 करिता विरूध्द पक्ष क्रमांक 2 कडे नागपूर महसूल विभागातील सर्व शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विमा उतरविला असल्याने तक्रारकर्त्यांचा मुलगा मंगेश सदर योजनेअंतर्गत विमित शेतकरी होता.
शेतीपासून पुरेसे उत्पन्न होत नसल्याने तक्रारकर्त्यांचा मुलगा मजुरीचे कामासाठी अन्य लोकांबरोबर नागपूर येथे दिनांक 08/06/2013 रोजी गेला होता आणि दिनांक 10/06/2013 रोजी बाथरूममध्ये आंघोळीस गेला असतांना पाय घसरून पडला. त्याच्या सोबतच्या मित्राने त्याला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यावर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मयताचे प्रेत त्याच्या गांवी आणल्यावर मृतकाच्या वडिलाने पोलीस स्टेशन, देवरी येथे घटनेचा रिपोर्ट दिला. त्यावरून मर्ग क्रमांक 00/13 फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 174 अन्वये नोंदण्यात आला. शवविच्छेदन करणा-या डॉक्टरांनी विषप्रयोगाची शक्यता पडताळून पाहण्यासाठी विसेरा रासायनिक विश्लेषणासाठी पाठविला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून मयताने विष प्राशन केले नव्हते किंवा त्याचेवर विषप्रयोग झाला नव्हता असे अहवालात नमूद आहे.
4. तक्रारकर्त्यांनी आवश्यक दस्तावेजांसह शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 3 मार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे सादर केला. परंतु तक्रारकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची कोणतीही संधी न देता ‘विमा प्रस्ताव विलंबाने सादर केला’ असे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला. म्हणून तक्रारकर्त्यांनी तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1. शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- द. सा. द. शे. 12% व्याजासह देण्याचा विरूध्द पक्षाला आदेश व्हावा.
2. शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू.10,000/- मिळावी.
3. तक्रारीचा खर्च मिळावा.
6. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्यांनी 7/12 चा उतारा, शव विच्छेदन अहवाल, मरणान्वेषण प्रतिवृत्त, मर्ग समरी, मर्ग खबरी, घटनास्थळ पंचनामा, दावा नामंजुरीचे पत्र, आधार कार्ड आणि रासायनिक विश्लेषण अहवाल इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 1 दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्ते मयत मंगेश नंदेश्वर याचे आई-वडील असून शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे लाभार्थी असल्याचे विरूध्द पक्षाने नाकबूल केले आहे. तसेच मृतक मंगेश हा शेतकरी होता व शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमित शेतकरी असल्याचे देखील नाकबूल केले आहे.
दिनांक 08/06/2013 रोजी मयत मंगेश नागपूर येथे मजुरीचे कामासाठी गेला होता व दिनांक 10/06/2013 रोजी बाथरूममध्ये पाय घसरून झालेल्या अपघातामुळे मरण पावल्याचे देखील विरूध्द पक्षाने नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या दस्तावेजांवरून मंगेशचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे दिसून येते. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे स्पष्ट कारण दिलेले नाही. विसेरा रासायनिक विश्लेषणासाठी पाठविला होता मात्र त्याचा अहवाल तक्रारकर्त्यांनी सादर केलेला नाही. मृतकावर लता मंगेशकर हॉस्पीटलमध्ये कोणतेही उपचार केल्याचे दर्शविणारे कागदपत्र दाखल नाहीत. मृतकावर योग्य उपचार झाले नसल्यानेच त्याचा मृत्यू झाला असावा. मृतकाचा मृत्यू त्याने स्वतः करून घेतलेल्या दुखापतीमुळे किंवा अन्य कारणाने झाला असून तो अपघाती मृत्यू नाही. म्हणून तक्रारकर्ते कोणतीही नुकसानभरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
घटना नागपूर येथे घडली असतांना त्याबाबतची रिपोर्ट नागपूर येथे कां देण्यात आली नाही याचे स्पष्टीकरण तक्रारकर्त्यांनी दिलेले नाही. पोलीसांनी प्रत्यक्ष घटना घडली त्या ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला नाही. तसेच नागपूर येथे मृत्यु झाला असतांना देवरी येथे रिपोर्ट देणे व प्रेत नेऊन तेथे शवविच्छेदन करणे संशयास्पद आहे. तक्रारकर्त्यांनी आवश्यक सर्व दस्तावेजांसह विमा दावा दाखल केला असतांना तो विरूध्द पक्ष 1 ने बेकायदेशीर कारणांनी नामंजूर केल्याचे नाकबूल केले आहे. मंगेशचा मृत्यू दिनांक 10/06/2013 रोजी झाला असतांना विमा दावा दिनांक 11/12/2013 रोजी पाच महिन्यांनी दाखल केला. विमा दावा उशीराने दाखल केला असल्याने विमा योजनेच्या अटी व शर्तीस अधीन राहूनच तो नामंजूर करण्यात आल्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडला नसल्याने तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने आपल्या कथनाचे पुष्ठ्यर्थ खालील दस्तावेज दाखल केले आहेत.
1. पॉलीसी
2. दावा नामंजुरीचे पत्र.
3. कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेसचे पत्र
4. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे पत्र.
5. दावा अर्ज
8. विरूध्द पक्ष क्रमांक 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस यांना नोटीस मिळूनही ते सदर प्रकरणात गैरहजर राहिल्याने प्रकरण त्यांचेविरूध्द एकतर्फा चालविण्यात आले.
9. विरूध्द पक्ष क्रमांक 3 तालुका कृषि अधिकारी, देवरी यांनी लेखी जबाब दाखल केला असून तक्रारकर्त्यांकडून विमा प्रस्ताव आवक क्रमांक 1447 अन्वये दिनांक 11/12/2013 रोजी प्राप्त झाला तो दिनांक 13/12/2013 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांना सादर केला असल्याने त्यांचेकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नाही. म्हणून त्यांना तक्रारीतून मुक्त करावे अशी विनंती केली आहे.
10. तक्रारकर्ते व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ते मागणी केलेली दाद मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
11. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणात तक्रारकर्ती उर्मिला नारायण नंदेश्वर हिने शपथपत्रावर कथन केले आहे की, मृतक मंगेश नारायण नंदेश्वर हा तिचा मुलगा होता व त्याच्या मालकीची मौजा सुरटोली, ता. देवरी, जिल्हा गोंदीया येथे गट नंबर 216/क-1 क्षेत्रफळ 0.30 हेक्टर आणि गट नंबर 215 क्षेत्रफळ 0.82 हेक्टर शेतजमीन होती आणि तो शेतकरी होता. आपल्या कथनाचे पुष्ठ्यर्थ तिने वरील शेतजमिनीचा 7/12 चा उतारा दाखल केला आहे. सदरचे दस्तावेज खोटे असल्याचे विरूध्द पक्षाचे म्हणणे नाही. महाराष्ट्र शासनाने नागपूर महसूल विभागातील सर्व शेतक-यांचा शेतकरी जनता अपघात विमा विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे उतरविला होता याबाबत उभय पक्षात वाद नाही. म्हणून सदर विमा पॉलीसीअंतर्गत मयत मंगेश नारायण नंदेश्वर हा विमित शेतकरी होता. मंगेश हा अविवाहित मरण पावला म्हणून त्याचे आई-वडील तक्रारकर्ती श्रीमती उर्मिला व तिचे पती नारायण हेच त्याचे वारस आहेत हे तिचे शपथपत्रावरील म्हणणे खोटे ठरविणारा कोणताही पुरावा विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दाखल केलेला नाही.
विरूध्द पक्ष क्रमांक 1 चे अधिवक्ता श्री. लिमये यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, मंगेश याचा मृत्यू दिनांक 10/06/2013 रोजी नागपूर येथे बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने झाला असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याचेवर नागपूर येथे कोणतेही उपचार करण्यात आल्याबाबतचा पुरावा तक्रारकर्त्यांनी दाखल केला नाही. तसेच नागपूर येथे सदर घटनेचा रिपोर्ट दिला नाही आणि नागपूर येथे शवविच्छेदन न करता प्रेत देवरी येथे नेऊन पोस्ट मॉर्टेम केले ह्या सर्व बाबी संशयास्पद आहेत. तक्रारकर्त्यांनी पोलीस स्टेशन, एम. आय. डी. सी., नागपूर येथे दिनांक 24/03/2014 रोजी नोंदलेल्या मर्ग समरी क्रमांक 13/14 ची प्रत दस्तावेज क्रमांक 5 वर दाखल केली आहे. त्यात डॉक्टरांनी मयतांस लेखी मृत घोषित न करता तोंडी मृत घोषित केल्याने मित्राने प्रेत मूळ गांवी नेले, परंतु वडिलांनी मृत्युवर संशय व्यक्त केल्याने पोलीस स्टेशन, देवरी येथे मर्ग क्रमांक 0/13 दाखल करून ग्रामीण रूग्णालय, देवरी, जिल्हा गोंदीया येथे शवविच्छेदन करून संपूर्ण कागदपत्र एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन, नागपूरला पाठविल्यावरून मर्ग दाखल करून चौकशीत घेण्यात आल्याचे नमूद आहे. त्यांनी युक्तिवादात पुढे सांगितले की, पोस्ट मॉर्टेमचे वेळी विषप्रयोग किंवा विषप्राशनाची शक्यता पडताळून पाहण्यासाठी व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी पाठविल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. वरील सर्व बाबींवरून मंगेश याचा मृत्यू अपघाती नसून विषप्राशनाने किंवा अन्य कारणाने झाल्याचेच दिसून येते. मात्र शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा गैरफायदा घेण्यासाठी तक्रारकर्त्यांनी मुलाच्या अपघाती मृत्यूची खोटी कहानी रचली आहे.
याशिवाय विरूध्द पक्ष क्रमांक 1 चे अधिवक्ता श्री. लिमये यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, मंगेशचा मृत्यू दिनांक 10/06/2013 चा आहे. मात्र तक्रारकर्ता क्रमांक 2 नारायण नत्थू नंदेश्वर यांनी तालुका कृषि अधिकारी, देवरी यांच्याकडे विमा प्रस्ताव दिनांक 11/12/2013 रोजी पाठविल्याचे विरूध्द पक्षाने दाखल केलेल्या जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांचे पत्र दस्त क्रमांक 4 वरून स्पष्ट होते. शेतक-याच्या मृत्यूनंतर 90 दिवसांत विमा प्रस्ताव दाखल करणे आवश्यक असतांना विलंबाचे कोणतेही स्पष्टीकरण न देता 6 महिन्यानंतर प्रस्ताव दाखल केला असल्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 28/03/2014 चे पत्रान्वये "दिलेल्या कागदपत्रानुसार सदर दावा उशीरा कां दिला याचे सबळ कारण नमूद न केल्यामुळे" नामंजूर केल्याचे कळविले. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची सदर कृती विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसारच असल्यामुळे त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नाही.
सदरच्या प्रकरणाची वस्तुस्थिती लक्षात घेता मयत मंगेश मजुरी कामासाठी नागपूर येथे गेला होता व त्याचा मित्र जितेन्द्र दलसिंग परिहार याचेसोबत वाघदरा येथील बाबा विश्वविनायक नगर, प्लॉट नंबर 13 येथील राधेश्याम लख्खुजी कलपुरे यांचे घरातील एका खोलीत किरायाने राहात होता (घटनास्थळ पंचनामा दस्त क्रमांक 7). तो दिनांक 10/06/2013 रोजी सायंकाळी 5.30 वाजता कामावरून आल्यावर बाथरूममध्ये आंघोळ करीत असता घसरून पडल्याने त्यास मित्र जितेन्द्रने लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी तो मरण पावल्याचे सांगितल्यामुळे जितेन्द्रने मंगेशच्या वडिलांना फोन करून कळविले व त्यांच्या सूचनेवरून प्रेत मूळ गांवी सुरटोली येथे नेले. जितेन्द्रच्या वडिलांनी त्याबाबतची रिपोर्ट पोलीस स्टेशन, देवरी येथे दिल्यावर मर्ग क्रमांक 00/13 नोंदवून पोलीसांनी मरणान्वेषण प्रतिवृत्त दिनांक 11/06/2013 रोजी केले (दस्त क्रमांक 4) आणि शवविच्छेदनासाठी प्रेत ग्रामीण रूग्णालय, देवरी येथे पाठविले. दिनांक 11/06/2013 रोजी शवविच्छेदन करण्यात आले. त्यात मृत्यूचे कारण “Hypovolumic shock due to pulmonary Haemorrhage due to chest trauma” असे नमूद असून विषप्रयोगाची शक्यता पडताळून पाहण्यासाठी व्हिसेरा काढून ठेवल्याचे म्हटले आहे (दस्त क्र. 3). सदर विसे-याचा अहवाल तक्रारकर्त्यांनी दिनांक 19/08/2016 रोजी दाखल केला आहे. त्यांत-
“General and chemical testing does not reveal any poison in exhibit no. (1), (2) and (3)”
असे नमूद आहे. म्हणजेच मंगेश याचा मृत्यू विषप्राशन किंवा विष प्रयोगाने झाला नसून बाथरूम मध्ये घसरून पडल्याने छातीला मार लागून झालेल्या रक्तस्त्रावामुळे झालेला अपघाती मृत्यू असल्याचे सिध्द होते. अशा परिस्थितीत मंगेश नागपूर येथे मयत झाल्यानंतर त्याचे कुणीही नातेवाईक तेथे नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी प्रेत त्याच्या मूळ गांवी नेण्याची मित्र जितेन्द्र परिहार याची कृती नैसर्गिक असून केवळ नागपूर येथे औषधोपचार झाले नाही व नागपूर येथे रिपोर्ट दिला नाही एवढ्या कारणावरून मंगेशच्या अपघाती मृत्यूबाबत कोणताही संशय घेणे योग्य होणार नाही.
सदरच्या प्रकरणात मंगेश याचा मृत्यू नागपूर येथे झाला ज्याबाबतचा रिपोर्ट पोलीस स्टेशन, देवरी येथे देण्यात आला आणि घटनास्थळ नागपूर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे हद्दीत असल्याने देवरी पोलीस स्टेशनने तपासाशी संबंधित मर्ग पोलीस स्टेशन, एम.आय.डी.सी., नागपूर येथे पुढील कारवाईस्तव पाठविला. त्यावरून एम.आय.डी.सी., नागपूर पोलीसांनी दिनांक 13/06/2013 रोजी मर्ग क्रमांक 43/13 दाखल केला (दस्त क्र. 6) आणि तपास पोलीस हवालदार मोतीराम शिंदे यांचेकडे सोपविला. दिनांक 18/06/2013 रोजी घटनास्थळ पंचनामा तयार करण्यात आला (दस्त क्र. 7). एम.आय.डी.सी. पोलीसांनी तपास पूर्ण करून मर्ग समरी क्रमांक 13/14 दिनांक 24/03/2014 रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त, एम.आय.डी.सी. डिव्हीजन, नागपूर यांना मंजुरीसाठी सादर केली ती त्यांनी दिनांक 28/07/2014 रोजी मंजूर केली आहे. एकंदरीत एम.आय.डी.सी. पोलीसांनी मर्गचा तपास उशीरा पूर्ण केला तसेच व्हिसेरा अहवाल देखील प्राप्त होण्याची वाट पाहावी लागल्याने तक्रारकर्तीच्या पतीने तालुका कृषि अधिका-याकडे विमा प्रस्ताव सादर करण्यास जरी 90 दिवसांच्या मुदतीनंतर अधिकचा 3 महिने अवधी लागला असेल तरी सदर परिस्थितीत क्षम्य आहे आणि पॉलीसीच्या अटीमध्ये देखील केवळ अशा तांत्रिक कारणाने विमा दावा नाकारता येणार नाही अशी तरतूद आहे. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीच्या पतीने तिच्या मुलाच्या मृत्यूबाबत दाखल केलेला विमा दावा विलंबाबाबतचे स्पष्टीकरण देण्याची कोणतीही संधी न देता दावा 90 दिवसांच्या अवधीनंतर दाखल केला आहे असे तांत्रिक कारण सांगून नामंजूर करण्याची विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
12. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील विवेचनाप्रमाणे सदर प्रकरणातील विमित शेतकरी मंगेश नारायण नंदेश्वर याचा पॉलीसी कालावधीत अपघाती मृत्यु झाला असल्याने त्याचे वारस तक्रारकर्ते हे विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- विमा दावा नामंजूरीचे तारखेपासून म्हणजेच दिनांक 28/03/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना त्यांच्या मृतक मुलाच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 28/03/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 5,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. विरूध्द पक्ष 2 व 3 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यांना परत करावी.