तक्रारदार : स्वत हजर.
सामनेवाले : गैर हजर..
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी आहे तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले कंपनीचे प्रतिनिधी आहेत. यापुढे दोन्ही सा.वाले यांना केवळ सा.वाले असे संबोधिले जाईल. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून विमा पॉलीसी घेतली होती. त्यामध्ये वैद्यकीय इलाज व सुश्रृषा या बद्दलच्या खर्चाची तरतुद होती. तक्रारदार हे मार्च 2007 मध्ये आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले व त्यांचेवर पाच दिवस रुग्णालयात इलाज करण्यात आला. त्या बद्दल तक्रारदारांनी संबंधीत रुग्णालयाचे रु.12,756/- अदा केले. त्यानंतर तक्रारदारांनी वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मिळणेकामी सा.वाले यांचेकडे मागणीपत्र सादर केले. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांचे मागणी पत्राप्रमाणे कार्यवाही करण्यास उशिर केला व ब-याच पत्र व्यवहारानंतर तक्रारदारांना रु.8,157/- चा धनादेश पाठविला. त्यांनतर तक्रारदारांनी बाकी येणे रक्कम रु.4,599/- वसुल होणेकामी सा.वाले यांचेकडे तगादा लावला परंतु सा.वाले यांनी बाकी रक्कम रु.4,599/- तक्रारदारांना देय केलेली नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले यांनी विमा कराराचे संदर्भात सेवा सुसविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला. तक्रारदारांनी उशिराने देय केलेली रक्कम रु.8,157/- यावर 18 टक्के दराने व्याज मागीतले व शिल्लक रक्कम रु.4,599/- त्यावर 18 टक्के व्याज सा.वाले यांचेकडून वसुल होऊन मिळावे अशी दाद मागीतली.
2. सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदार यांचेवर रुग्णालयात मार्च 2007 मध्ये इलाज करण्यात आला परंतु तक्रारदारांनी आपले मागणीपत्र जून 2007 मध्ये म्हणजे ब-याच उशिराने दाखल केले. त्यातही तक्रारदारांनी केवळ रु.8,157/- मुळचे बिल हजर केलेले होते तर रु.4,599/- रक्कमेचे मुळचे बिल हजर केलेले नव्हते. त्या बद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांकडे बराच पत्र व्यवहार केला व तक्रारदारांनी खुलासा केला की, रु.4,599/- चे बिल गहाळ झालेले आहे. तक्रारदार ते हजर करु शकत नाहीत. त्यानंतर तक्रारदारांना रु.8,157/- धनादेशाव्दारे देय करण्यात आले.
3. सा.वाले यांनी पुढे असे कथन केले की, तक्रारदार हे विद्यार्थी असल्याने त्यांच्या मागणीचा सहानुभूतिपुर्वक विचार करुन त्यांना रु.4,599/- येवढी रक्कम मुळची बिले हजर केली नसतांना देखील तक्रारदारांना हमी पत्रावर ती रक्कम देय करण्यात आली. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
4. तक्रारदार व सा.वाले यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे हजर केली. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. सा.वाले युक्तीवादाकामी गैरहजर होते. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.8,157/- अदा करण्यास उशिर केला व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? |
होय. |
2 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.4,599/- = 4,600/- अदा करण्यास नकार देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? |
नाही.
|
3. |
अंतीम आदेश |
तक्रार अशतः मंजूर. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केले आहे की, सा.वाले यांचेकडे जून 2007 मध्ये मागणीपत्र सादर केल्यानंतर सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना रु.8,157/- दिनांक 23.12.2008 रोजी प्राप्त झाले. म्हणजे ही रक्कम अदा करण्यास सा.वाले यांनी जवळ पास 500 दिवस घेतले. जून, 2007 ते डिसेंबर 2008 हा कालावधी जवळपास 18 महिन्याचा होता. तक्रारदारांनी रु.8,157/- ची मुळ देयके हजर केली होती. ही बाब सा.वाले यांनी मान्य केली. तरी देखील मुळचे देयका प्रमाणे अंशतः रक्कम म्हणजे रु.8,157/- सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना अदा करण्यास का उशिर झाला याचा खुलासा सा.वाले यांचे कैफीयत व कागदपत्रावरुन दिसून येत नाही.
7. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सा.वाले यांचेकडून प्राप्त झालेला ई-मेल दिनांक 12.1.2008 व दिनांक 21.11.2008 च्या प्रती हजर केलेल्या आहेत. त्यातील मजकूरा वरुन असे दिसते की, सा.वाले यांनी तक्रारदारांना देयक क्रमांक 21072 म्हणजे रु.4,600/- येवढया रक्कमेचे मुळ देयक मागीतले होते. तसेच विमा पॉलीशीवर तक्रारदारांच्या वया बद्दल नोंद करुन मागीतली होती. तक्रारदारांनी जून 2007 मध्ये आपले मागणीपत्र सादर केलेले असल्याने सा.वाले यांनी जानेवारी, 2008 म्हणजे 6 महिन्यानंतर तक्रारदारांकडून रु.4,600/- च्या मुळच्या देयकाची मागणी करणे हा निष्काळजीपणा, दिरंगाई, व गलथानपणा दिसून येतो. तक्रारदारांनी सा.वाले यांना ई-मेल दिनांक 7.2.2009 पाठविला व त्यामध्ये सा.वाले यांचेकडून रु.8,157/- धनादेशाव्दारे प्राप्त झाल्याचे मान्य केले.
8. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत तक्रारदारांकडून प्राप्त झालेल्या ई-मेलच्या प्रती हजर केलेल्या आहेत. त्यामध्ये ई-मेल दिनांक 10.3.2008, 19.3.2008, च्या प्रती हजर आहेत. त्यामध्ये तक्रारदारांनी रु.4,600/- चे मुळचे देयक गहाळ झालेले आहे असा खुलासा केलेला होता. वरील पत्र व्यवहार रु.4,600/- च्या मुळचे देयका बद्दल आहे. परंतु मुळातच तक्रारदारांनी एकूण मागणी रु.12,756/- सा.वाले यांचेकडे जून,2007 मध्ये सादर केलेली होती. व त्यामध्ये रु.8,157/- चे मुळचे देयक हजर केलेले होते. ती मागणी सा.वाले यांनी योग्य त्या कालावधीमध्ये तपासणी करुन मंजूर करणे आवश्यक होते. परंतु प्रकरणातील पुराव्यावरुन असे दिसून येते की, जून, 2007 नंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना जानेवारी, 2008 मध्ये ई-मेल पाठविला. व त्यामध्ये रु.4,600/- चे देयक क्रमांक 21072 च्या मुळचे देयकाची मागणी केली. त्यापूर्वी सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना कुठल्याही कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली नव्हती. तसेच उपलब्ध कागदपत्रामध्ये सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना रु.8,157/- उशिराने अदा केल्या बद्दल कुठलेही समर्थन दिसून येत नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रु.4,600/- मुळची देयके हजर केली नव्हती ही बाब मान्य केली तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.8,157/- ज्याचे मुळचे देयक तक्रारदारांनी मागणीपत्रासोबत हजर केलेले होते. ती रक्कम उशिराने अदा केल्याबद्दल कुठलेही समर्थनीय कारण, खुलासा दिसून येत नाही. वर नमुद केल्याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना मागणीपत्र सादर केल्यानंतर 18 महिन्याने म्हणजे डिसेंबर,2008 मध्ये रु.8,157/- अदा केले. या प्रकारे अंशतः मागणी मान्य करण्यास खूपच दिरंगाई केली व उशिर केला. ज्यावरुन सा.वाले यांचा निष्काळजीपणा दिसून येतो. या संदर्भात सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात असुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
9. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून बाकी रक्कम रु 4,600/- ची मागणी केलेली आहे. परंतु तक्रार प्रलंबीत असतांना सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.4,600/- अदा केलेले आहेत. व तक्रारदारांनी ही बाब मान्य केलेली आहे. वास्तविक पहाता तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रु.4,600/- चे मुळ देयक हजर केलेले नव्हते. तरी देखील देयक क्र.21072 दिनांक 28.8.2007 ची दुय्यम प्रत हजर केलेली होती. सा.वाले यांच्या कथना प्रमाणे विमा कराराप्रमाणे मुळचे देयक हजर केले नसतील तर विमा कंपनी रक्कम अदा करण्यास जबाबदार नव्हती. तरी देखील तक्रारदार हे विद्यार्थी असल्याने व सहानुभुतिपूर्वक दृष्टीकोन ठेवून सा.वाले यांनी तक्रारदारांना
रु. 4,600/- अदा केले आहेत. या प्रकारे तक्रारदारांचा मुद्दा क्र.2 अंतर्गतची मागणी शिल्लक रहात नाही.
10. तक्रारदारांनी मुद्दा क्र.2 अंतर्गत उशिरा देय केलेली रक्कम रु.8,157/- वर जून,2007 ते डिसेंबर, 2007 पर्यत म्हणजे 18 महीन्याकरीता 18 टक्के व्याजाची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चीत करीत असतांना प्रस्तुत मंचाने ही बाब विचारात घेतली की, सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.4,600/- चे मुळचे देयक हजर केले नसतांना देखील अदा केलेले आहे. ज्या वरुन सा.वाले यांचा उदार व सहानुभुतिपुर्वक दृष्टीकोन दिसून येतो. सा.वाले हे तक्रारदारांनी मागणी सहजपणे फेटाळू शकले असते व विमा करारातील तरतुदीचे आधारे त्या कृतीचे समर्थनही करु शकले असते. परंतु सा.वाले यांनी या प्रकारे अडवणूकीची भुमिका न घेता तक्रारदार हे टाटा इस्टीटयुट चे विद्यार्थी असल्याने त्यांचे हमी पत्रावर रु.4,600/- तक्रारदारांना अदा केलेले आहेत. ही बाब नुकसान भरपाई निश्चीत करीत असतांना मंचाने विचारात घेतली आहे.
11. वरील सर्व बाबींचा विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.8,157/- अदा करण्यास झालेल्या उशिरा बद्दल व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.3000/- अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
12. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 179/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेंवाले यांनी तक्रारदारांना रु.8,157/- अदा करण्यास झालेल्या उशिरा बद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च असे एकूण रु.3,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
3. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून दोन महिन्याचे आत करावी. अन्यथा नुकसान भरपाईच्या रक्कमेवर विहीत मुदत संपल्यापासून 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.