निकाल
दिनांक- 04.09.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार श्री.विठठल रामभाऊ गोरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे, त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे भूमीहीन मागासवर्गीय आणि दारिद्रय रेषेखालील व्यक्ती आहे. तक्रारदार यांनी त्यांचे नातेवाईकांचे मदतीने मास फायनान्सीयल सर्व्हिसेस यांचेकडून रु.1,50,000/- कर्ज घेतले व तक्रारदाराचे उपजिवीकेसाठी नवीन अपेरिक्षा दि.12.08.2011 रोजी खरेदी केली. त्या अपेरिक्षाचा आर.टी.ओ.कडून तात्पुरता नोंदणी क्र. TEMP-MH-11/TC-141 असा होता त्या अपेरिक्षाचा नोंदणी क्रमांक एम.एच-23-एक्स-690 असा देण्यात आला.
तक्रारदार यांचे कथन की, दि.27.08.2011 रोजी ड्रायव्हर नामे नामदेव आश्रुबा मिरपगार हा सदरील रिक्षा ब-हाणपूरहून बीड कडे घेऊन येत असताना अंथरवनपिंप्री शिवारात बीड कडून एक लोडींग रिक्षा भरधाव वेगात आला व तक्रारदार यांच्या रिक्षेस जोरात धडक मारली. त्यामुळे तक्रारदार यांची रिक्षा पलटी झाली व रिक्षाचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील रिक्षा रिझवान अटो गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणली. तक्रारदार यांना जवळपास 40 ते 50 हजार रुपये दुरुस्ती खर्च आला. तक्रारदार यांची ऐपत नसतांनाही त्यांनी पाहूण्यांकडून उसनवारी पैसे घेऊन दुरुस्ती खर्च केला. अपघात झाल्याबरोबर लगेचच तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन पिंपळनेर व इन्शुरन्स कंपनीला कळवले. सदरील रिक्षाचा विमा सामनेवाला यांच्याकडे उतरविलेला आहे व तो अपघात झाला त्या दिवशी वैध होता. तक्रारदार यांनी रिक्षा दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चाचा प्रस्ताव संपूर्ण माहितीसह सामनेवाला यांच्याकडे दाखल केला. बीड शाखा कार्यालयाने तो प्रस्ताव औरंगाबाद प्रभा कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठविला.सामनेवाला यांनी त्यांचे अधिका-यामार्फत रिक्षाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व फोटो ही काढलेले आहे. सामनेवाला यांनी दि.24.01.2012 रोजी तक्रारदार यांचाक्लेम नामंजूर केला आहे असे कळविले आहे. तक्रारदार यांच्याक्लेम नामंजूर करण्याचे कोणतेही संयुक्तीक व वाजवी कारण नव्हते. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. सामनेवाला यांनी सेवा देण्यास त्रुटीठेवली आहे. तक्रारदार यांनी सदरील रिक्षाचा उपयोग व्यापारी उद्योगासाठी केलेला नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून रिक्षा दुरुस्तीच्या झालेल्याची खर्चाचीरक्कम रु.50,000/-,त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.40,000/-, व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळावे व त्यावर व्याज मिळावे अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला इन्शुरन्स कंपनी मंचासमोर हजर झाली व त्यांनी लेखी कैफियत दाखल केली.सामनेवाला यांचे कथन की, विमा पॉलीसीच्या शर्ती व अटीचे भंग केला आहे. त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. सामनेवाला यांचे कथन की, अपेरिक्षा ही काळया पिवळया रंगाची आहे, ती प्रवाशी वाहतूक करत होती, सदरील रिक्षा व्यापारी कारणासाठी वापरली. अपघाताच्यावेळेस रिक्षामध्ये प्रवाशी वाहतूक केल्या जात होती. सदरील रिक्षा ही वैयक्तिक कारणासाठी वापरावयाचीहोती व त्या कारणासाठीच त्याचा विमा काढण्यात आला होता. सदरील रिक्षा ही व्यापारी कारणासाठी वापर करण्यात आल्यामुळे तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे, जो संयुक्तिक व वाजवी कारणामूळे केला आहे. सबब सामनेवाला यांचे कथन तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री.मगर यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांच्यातर्फे वकील श्री.महाजन यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले.
न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांनी विमा पॉलीसीत दिलेल्या शर्ती व अटीचे भंग केला आहे, ही बाब सामनेवाला यांनी
सिध्द केली आहे काय? होय.
2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यास त्रुटी ठेवली आहे, ही बाब सिध्द केली आहे काय? होय.
3) तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई व इतर दाद मागण्यास पात्र आहे काय? होय. 4) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 4 ः- तक्रारदार व सामनेवाला वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन व सामनेवाला यांनी लेखी कैफियतमध्ये दिलेले कथन वकागदपत्राचे अवलोकन केले असता खालील बाबी तक्रारदार व सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेली रिक्षा घेतली आहे ही बाब मान्य आहे. सदरील रिक्षाचा विमा सामनेवाला यांच्याकडे काढलेला होता ही बाब ही मान्य आहे. रिक्षाचा अपघात झाला त्यावेळेस विमा पॉलीसीही वैध होती हेही मान्य केलेले आहे. सदर रिक्षाचा नं. एम.एच-23-एक्स-690 असा आहे ही बाब ही मान्य केली आहे. आर.टी.ओ.चे सदरील रिक्षाचे नोंदणी प्रमाणपत्र दाखल केले आहे व इन्शुरन्स कंपनीचे मुळ कव्हर नोट दाखल केली आहे, ते ही दोन्ही पार्टीना मान्य आहे.
सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, सदरील अपेरिक्षाचा रंग काळा पिवळा होता व सदरील अपेरिक्षा प्रवाशी वाहतूक करत होता. त्याचा उपयोग व्यापारी कारणासाठी केल्याजात होता. अपघात घडला त्यावेळेस सदरील अपेरिक्षामध्ये प्रवाशी वाहतूक केल्या जात होती. सदरील अपेरिक्षाचा विमा हा वैयक्तिक वाहन असा म्हणून केलेला होता व त्याचा उपयोग वैयक्तिक कारणासाठीच करावयाचा होता. तक्रारदार यांनी विमा पॉलीसीच्या शर्ती व अटीचाभंग केला आहे म्हणून तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.
तक्रारदार यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, सदरील अपेरिक्षाचा रंग काळा पिवळा आहे ही बाब सामनेवाला यांनी शाबीत केलेली नाही. अगर त्याचा उल्लेख पोलीस पेपरमध्ये तसेच वाहन नोंदणी क्रमांकामध्ये व इन्शुरन्सच्या पॉलीसीमध्ये नाही. सदरील वाहन हे तक्रारदार त्यांचे वैयक्तिक कारणासाठी वापरत होते.सदरील वाहनाची नोंद आर.टी.ओ. कडे केली होती, त्यामध्ये 3 + 1 व्यक्ती वाहून नेता येतात अशी नोंद केलेली आहे. तसेच सामनेवालायांनी जी कव्हर नोट दिलेली आहे,त्या कव्हर नोटमध्ये तीन पॅसेंजर वाहून नेण्याची स्पष्ट नोंद केलेली आहे. सबब सदरील वाहनामध्ये काही व्यक्ती बसून जात होत्या असे जरी गृहीत धरले तरी, रिक्षा व्यापारी कारणासाठी वापरली असे म्हणता येणार नाही. कारण सदरील रिक्षामध्ये तीन लोक बसून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे व त्या तीन लोकांसाठी इन्शुरन्सही भरलेला आहे असे कव्हर नोट मध्ये नोंद आहे. सबब तक्रारदार यांनी कोणत्याही अटीचा भंग केलेला नाही. सामनेवाला यांनी अनधिकृतपणे सदरील तक्रारदार यांचा क्लेम नाकारलेला आहे. सदरील अपेरिक्षा तक्रारदार हे स्वतःच्या उपजिवीका करीता वापरत होते, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यापारी कारणासाठी उपयोग केलेलानाही. तक्रारदार यांची अपेरिक्षा अपघातामध्ये सापडलीवत्याचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी रु.50,000/- दुरुस्ती खर्च केलेले आहे.तक्रारदार हे गरीब असून त्याचे उपजिवीकेचे साधन नष्ट झाले आहे. सबब तक्रारदाराच्या वकीलांनी विनंती केली की, तक्रार मंजूर करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी काळया पिवळया रंगाची रिक्षा खरेदी केलेली आहे व त्या रिक्षामध्ये तीन पॅसेंजर वाहून नेण्याचा अगर बसण्याचा परवाना आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे विमा उतरविलेला आहे व त्या विमा पॉलीसीमध्ये तीन पॅसेंजर वाहून नेण्याची नोंद आहे. तीन पॅसेंजर अधिक ड्रायव्हर असे सदरील वाहनात प्रवास करु शकतात व त्याचा हप्ता तक्रारदार यांनी भरला आहे. पोलीस पेपर याचे अवलोकनकेले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांची रिक्षा जात असताना समोरुन एक रिक्षा आली व त्यांनी तक्रारदार यांच्या रिक्षेस धडक दिली.त्यामुळे तक्रारदार यांची रिक्षा पलटी होऊन तिचे बरेच नुकसान झाले. तक्रारदार यांनी रिझवान अटो गॅरेज बीड येथे सदरील रिक्षाची दुरुस्तीकरुन घेतलेली आहे. त्या बिलानुसार एकूण रु.44,400/- दिसते. सामनेवाला यांनी एवढया खर्चाबाबत वाद उपस्थित केलेला नाही.
सामनेवाला यांनी मुख्यत्वेकरुन सदरील वाहनामध्ये प्रवाशी वाहतूक केल्या जात होती व तिचा उपयोग व्यापारी कारणासाठी केल्या जात होता. त्या कारणास्तव क्लेम नाकारला आहे. तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या वाहनामध्ये तीन प्रवाशी वाहून नेण्याची परवानगी होती परंतू ते पैसे देऊन प्रवास करत होते किंवा काय? याबाबत स्पष्ट पुरावा उपलब्ध नाही. सामनेवाला यांनी त्या कारणास्तव तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे ते संयुक्तीक व वाजवी नाही असे या मंचाचे मत पडले आहे.
तक्रारदार यांनी स्वतःची उपजिवीका करण्यासाठी सदरील अपेरिक्षा विकत घेतली आहे व तिचा विमा सामनेवाला यांच्याकडे उतरविलेला आहे. अपघातात झालेले नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. सामनेवाला यांच्याकडे तक्रारदार यांनी क्लेम दाखल केला असता तो कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय नाकारला आहे असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी सदरील वाहन हे व्यापारी कारणासाठी वापरल्या जात होते. ही बाब सिध्द केली नाही. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब सिध्द केली आहे. तक्रारदार यांनी दुरुस्तीसाठी केलेला खर्च व कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार हे त्यांनी रिक्षा दुरुस्तीसाठी केलेला खर्चरु.44,400/- मिळण्यास पात्र आहे, तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- मिळण्यास पात्र आहे. तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब हा मंच मुददा क्र.1 ते 4 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार
यांना वाहन दुरुस्तीसाठी केलेला खर्च रक्कम रु.44,400/- हा आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
3) वरील रक्कम मुदतीत अदा न केल्यास तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज, रक्कम वसूल होईपावेतो द्यावे. 4) सामनेवाला यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- द्यावे.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड