जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 97/2011 तक्रार दाखल तारीख – 02/07/2011
तक्रार निकाल तारीख– 18/04/2013
जिजाबाई रामभाऊ गोचडे
वय 50 वर्षे, धंदा घरकाम व शेती
रा.चनई ता.अंबाजोगाई जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
1) न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय क्र.153400
सावरकर भवन, शिवाजी नगर,
कॉग्रेस हाऊस रोड,पुणे
2) डेक्कन इन्शुरन्स अँन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
एन स्क्वेअर, ऑफिस क्र.13, तिसरा मजला,
संघवी नगर,परिहार चौकाजवळ,औंध, पुणे ...गैरअर्जदार
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.ए.एस.पावसे
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – अँड.एस.एल.वाघमारे
गैरअर्जदार क्र.2 तर्फे - कोणीही हजर नाही.
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराचे पती रामभाऊ गोचडे यांचा मृत्यू दि.14.09.2010 रोजी विहीरीत पडून झाला. मयत रामभाऊ हे शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत वर्ष 2010-11 या वर्षासाठी औरंगाबाद महसूल विभागाचा प्रिमियम न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी कडे जमा केलेला आहे. तक्रारदाराने मयत शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून 7/12,
8-अ,6-क चा उतारा ही कागदपत्रे तसेच मयत पाण्यात बूडून मरण पावले म्हणून प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, अशी कागदपत्रे यांच्यासह सामनेवाले क्र.2 यांचेकडे कृषी अधिकारी कार्यालया मार्फत विमा दावा मंजूर करण्यासाठी पाठविला.सामनेवाले क्र.1 व 2 यांनी वरील दावा आजपर्यत मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही. म्हणून तक्रारदार यां तक्रारी मार्फत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/- एवढया विमा रक्कमेची मागणी करीत आहेत.
सामनेवाले क्र.1 मंचासमोर हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे.सामनेवाले क्र.2 डेक्कन इन्शुरन्स कंपनी मंचासमोर हजर झाले नाहीत. सामनेवाले क्र.1 यांच्या लेखी जवाबाप्रमाणे तक्रारदाराने तक्रारीच्या वरील भागात न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीला गैरअर्जदार केले आहे. तर तक्रारी अंतर्गत परिच्छेद क्र.6 मध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला पार्टी केले आहे. तसेच शपथपत्रातही युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनीला पार्टी केले आहे. त्यामुळे सदर विमा दावा सामनेवाले क्र.1 विरुध्द चालू शकत नाही.
सामनेवाले क्र.1 यांचा लेखी जवाब आल्यावर तक्रारदाराने त्यांला दि.03.03.2012 रोजी लेखी उत्तर दिले. त्यानुसार तिची जबाबदारी योग्य ती कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेकडे देणे एवढीच होती. त्यानुसार तिने सर्व कागदपत्रे मुदतीत कृषी अधिकारी यांचेकडे जमा केली. न्यू इंडिया कंपनीकडे 2010 ते 2011 पर्यतचा प्रिमियम शासनाने भरला आहे. म्हणून सदरच्या सामनेवाले क्र.1 यांना सामनेवाले केलेले आहे.
अर्जदाराचे विद्वान वकील श्री.पावसे यांनी आपला लेखी युक्तीवाद व त्यासोबत दि.05.08.2011 रोजीचे सामनेवाले क्र.1 यांचे दावा नाकारल्याचे पत्र दाखल केले. त्यात अपघाताचे कारण वेडाच्या भरात बुडून मृत्यू असे असल्यामुळे सदरचा दावा नाकारलेला आहे. त्यांनी आपल्या लेखी युक्तीवादासोबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचा एक निर्णय दाखल केला आहे. त्यात मा. राज्य आयोगाच्या 2006 (3) सीपीआर पी. 320 नरेंद्र वि. नॅशनल इन्शुरन्स कंपनी या निकालाचा दाखला दिला आहे. ज्यात मा.राज्य आयोगाने
“Consumer Forum can not rely on statements recorded under section 161 of Cr.P.C. to arrive a finding on question of breach of condition of policy ”
असे म्हटले आहे. त्यांनी शेवटी आपल्या लेखी युक्तीवादात सदरचा अर्ज मंजूर करण्याची प्रार्थना केली आहे.
सामनेवाले क्र.1 तर्फे विद्वान वकील श्री. वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांनी आपल्या युक्तीवादात तक्रारदाराने तक्रारीच्या टायटल मध्ये सदरच्या सामनेवाला यांना समाविष्ट केले आहे. तर शपथपत्रात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला समाविष्ट केले आहे. यावर भर दिला. तसेच त्यांनी तक्रारदाराने दाखल केलेली फिर्याद, घटनास्थळ पंचनामा याकडे मंचाचे लक्ष वेधले. फिर्यादीत मयत वेडाच्या भरात गावात फिरत होते व त्यांना शोधत असताना ते विहीरीत पडलेले आढळून आले असे म्हटले आहे.घटनास्थळ पंचनाम्यात देखील वेडयाचे भरात गावातील सार्वजनिक बारवात पडून मृत्यू असा उल्लेख आहे. सामनेवाले क्र.1 च्या वकिलांनी जनता पर्सनल अँक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीच्या क्रमांक 4 (सी) या तरतूदीकडे मंचाचे लक्ष वेधले ज्यामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे वेडाच्या भरात जर मृत्यू आला असेल तर इन्शुरन्स कंपनी जबाबदार ठरत नाही असे म्हटले आहे. दाखल केलेला निकाल या घटनेशी मिळताजुळता नाही व सांगली मंचाचा निकाल या मंचावर बंधनकारक नाही असे सांगून त्यांनी तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केली आहे.
वरील विवेचनावरुन खालील मुददे विचारात घेतले.
मूददे उत्तर
1. तक्रारदाराची तक्रार योग्य प्रतिपक्ष नाही म्हणून
नामंजूर करण्यास पात्र आहे का नाही.
2. तक्रारदाराने ती शेतकरी अपघात विमा योजने
अंतर्गत विमा रक्कमेस पात्र आहे हे सिध्द केले
आहे का नाही.
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः-
तक्रारदाराने तक्रारीच्या टायटल मध्ये सामनेवाले क्र.1 यांचे नांव घातले आहे. जरी तक्रारीच्या परिच्छेद 6 मध्ये व शपथपत्रावर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे नांव आहे तरी देखील शासनाने 2010-11 साठीचा प्रिमियम सदरच्या सामनेवाले क्र.1 कडे भरला आहे व मयताचा मृत्यू दि.14.09.2010 रोजी झालेला आहे. सबब केवळ तक्रारीच्या अंतर्गत भागात व शपथपत्रावर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे नांव आहे म्हणून योग्य पार्टी नाही या कारणाने तक्रार नामंजूर करणे न्यायोचित ठरणार नाही असे मंचाचे मत आहे.
मूददा क्र.2 व 3ः-
तक्रारदार शेतकरी आहे ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत फिर्याद,घटनास्थळ पंचनामा, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये वेडाच्या भरात फिरत असताना बुडून मृत्यू असा उल्लेख आहे. तक्रारदाराने जरी राज्य आयोगाच्या निकालाचा दाखला दिला असला तरी त्यामध्ये मा. राज्य आयोगाने कलम 161 खालील जवाबाचा उल्लेख केलेला आहे. सदरच्या तक्रारीत फिर्याद व घटनास्थळ पंचनामा अशी कागदपत्रे आहेत. जी पुराव्याच्या दृष्टीने कलम 161 खालील जवाबापेक्षा जास्त महत्वाची आहेत. तसेच दाखल निकालातील घटना व या तक्रारीतील घटना संपूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळे वरील निकाल सदरच्या तक्रारीला लागू पडत नाही. त्यामुळे मयताचा मृत्यू वेडाच्या भरात फिरताना पाण्यात बूडून झाला आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे. महाराष्ट्र शासन निर्णयाच्या प्रपत्र (फ) च्या कलम 6 नुसार भ्रमिष्टपणामूळे झालेला मृत्यू विमा संरक्षणात येत नाही. त्यामुळे तक्रारदार विमा रक्कमेस पात्र नाही असे मंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड