द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 18 फेब्रुवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी त्यांच्या टाटा 1613 टर्बो ट्रक साठी जाबदेणार यांच्याकडून कॉम्प्रीहेन्सीव्ह विमा पॉलिसी दिनांक 18/6/2007 ते 17/6/2008 या कालावधीकरिता घेतली होती. दिनांक 2/4/2008 रोजी तक्रारदारांनी ट्रक मे. अंबीका गॅरेज येथे दुरुस्तीसाठी दिला होता. दिनांक 3/4/2008 रोजी गॅरेज मध्ये असलेल्या वाहन क्र.एम एच 12/सी टी 6826 चे डिझेल टँक एक्सप्लोड झाल्यामुळे आग लागली. आगीमध्ये तक्रारदारांच्या ट्रकचे केबिन, इंजीन, वायरिंग व इतर भागांचे मिळून पहिल्यांदा खर्च रुपये 1,80,000/- अपेक्षित होता नंतर खर्चाची अपेक्षित रक्कम रुपये 3,11,021/- पर्यन्त वाढली. दिनांक 8/4/2009 रोजी तक्रारदारांनी जाबदेणार यांना अपघाताची माहिती दिली. सर्व्हेअरनी साईट व्हिजीट करुन गॅरेजनी दिलेल्या दुरुस्तीच्या अंदाजित खर्चाचे विश्लेषण केले. सर्व्हेअरनी दिनांक 10-11/4/2008 रोजी अहवाल दिला. सर्व्हेअरनी गॅरेजला ट्रकची लाकडी केबिन डिस मेंटल करण्यास सांगितली. दुरुस्तीशिवाय ट्रक गॅरेजमधून काढताही येणार नव्हता व त्याचा वापरही करता येणार नव्हता. नंतर जाबदेणार यांच्या सर्व्हेअरनी प्लास्टीक, रबर पॉलिसीत कव्हर होत नसल्यामुळे परत रुपये 79,572/-चे रिव्हाईज्ड एस्टिमेट दिले. त्यामुळे सर्व्हेअरनी तक्रारदारांच्या ट्रकच्या नुकसानीचे मुल्यांकन रुपये 79,572/- केले. ट्रक परत वापरता येण्याजोगा होण्यासाठी तक्रारदारांना रुपये 1,25,000/- खर्च आला. तक्रारदारांना धंदयामध्ये नुकसान होऊन मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- पर्यन्तचे नुकसान झाले. तक्रारदारांनी दिनांक 12/9/2008 रोजी जाबदेणार यांच्याकडे कागदपत्रांसह क्लेम दाखल केला. जाबदेणार यांनी दिनांक 22/11/2009 च्या पत्रान्वये “Due to the loss does not arises under the scope of our policy, the file closed as No Claim” असे नमूद करुन क्लेम नाकारला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 1,50,000/- दिनांक 3/4/2008 पासून 18 टक्के व्याजासह तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. सर्व्हेअरनी रुपये 79,572/- चे रिव्हाईज्ड एस्टिमेट दिलेले नव्हते. सर्व्हेअर सतिश कुमार अॅन्ड कंपनी यांनी नुकसानीचे मुल्यांकन रुपये 55,285.87 केले होते. तक्रारदार रुपये 55,285.87 पेक्षा अधिक रकमेची मागणी करु शकत नाही. जाबदेणार यांनी यासंदर्भात 1986-2002 भाग 4, 2000 Vol. 10, पान 5269 नॅशनल इन्श्युरन्स कं. लि. विरुध्द श्री लक्ष्मी टेक्सटाईल इंडस्ट्रिज व इतर या निवाडयाचा आधार घेतला. जाबदेणार यांनी दिनांक 14/11/2008 रोजीचे दिलेले पत्र तक्रारदारांनी तक्रारी सोबत लावलेले नाही. तसेच त्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे पुर्तताही केलेली नाही. म्हणून तक्रारदारांची फाईल दिनांक 22/11/2008 रोजी बंद करण्यात आली. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम “Due to the loss does not arises under the scope of our policy, the file closed as No Claim” असे कळवून नामंजुर केला. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दोन पत्रे पाठविली होती. त्यापैकी तक्रारदारांनी फक्त एकच पत्र मंचात दाखल केलेले आहे. दुसरे पत्र दिनांक 14/11/2008 द्वारा जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून टॅक्स बुक, फायर ब्रिगेड अहवाल आणि स्पॉट सर्व्हे का तयार करण्यात आला नाही याबद्दलची माहिती मागविली होती. कारण फायर ब्रिगेडचा अहवाल महत्वाचा पुरावा होता. त्यानुसारच आग ही हेतुपुरस्सर लावण्यात आलेली होती का अपघात होता हे समजले असते. परंतू तक्रारदारांनी मुद्दामहून ही कागदपत्रे दाखल केली नाहीत. म्हणून तक्रारदारांची फाईल दिनांक 22/11/2008 रोजी बंद करण्यात आली होती. अग्निशमनाची गाडी आली आणि आग विझवण्यात आली होती. मंचाने श्री. व्ही.एच.शेख, पोलिस हवालदार, बॅच नं 1700, भारती विदयापीठ पोलिस स्टेशन यांचे दिनांक 3/4/2008 चे व श्री. चंद्रकांत परशुराम महाजन, वेल्डर यांचे दिनांक 4/4/2008 चे स्टेटमेंटचे अवलोकन केले असता दोघांचे स्टेटमेंट सारखेच असल्याचे दिसून येते. दोघांनी दिलेल्या स्टेटमेंटवरुन तक्रारदारांच्या ट्रकला लागलेली आग ही अपघाताने लागलेली होती, ती हेतुपूरस्पर लावण्यात आलेली नव्हती हे स्पष्ट होते. जरी तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार काही कागदपत्रे उदा. फायर ब्रिगेडचा अहवाल, पंचानामा मंचासमोर दाखल केलेला नसला तरीही या दोन्ही स्टेटमेंटवरुन तक्रारदारांच्या ट्रकला अपघाताने आग लागून नुकसान झाले ही बाब स्पष्ट होते.
तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या Exh. 24 - एस्टिमेटचे अवलोकन केले असता त्यात “Total Labor 39210/-, + Total parts 40362/-, 79572=00 Assessed w/o prejudice sub. to pol. Terms & conditions” असे हाताने लिहीण्यात आलेले असून त्याखाली स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. सदरहू स्वाक्षरीचे अवलोकन केले असता ती स्वाक्षरी जाबदेणार यांनी लेखी जबाबासोबत दाखल केलेल्या सर्व्हेअर - सतिश कुमार अॅन्ड कंपनी यांच्या रिइन्सपेक्शन अहवालाखाली फॉर सतिश कुमार अॅन्ड कंपनी असे नमूद करुन करण्यात आलेल्या स्वाक्षरीशी मिळती जुळती आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदार यांच्या ट्रकच्या नुकसानीचे मुल्यांकन जाबदेणार यांनी रुपये 79,572/- एवढे केले होते हे तक्रारदारांचे म्हणणे मंच मान्य करीत आहे. जाबदेणार यांच्या सर्व्हेअरनी नमूद केल्याप्रमाणे रक्कम रुपये 79,752/- तक्रारदारांना तक्रार दाखल दिनांक 18/11/2009 पासून 9 टक्के व्याजाने अदा करावी असा आदेश देण्यात येत आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांना दुरुस्तीसाठी रुपये 1,25,000/- खर्च आला, नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- सहन करावे लागले; म्हणून रुपये 1,50,000/- 18 टक्के व्याजासह मिळावेत अशी मागणी केलेली आहे. परंतु ही मागणी अवास्तव असल्यामुळे, तसेच त्यासंदर्भात पुरावा दाखल केलेला नसल्यामुळे ती मागणी अमान्य करण्यात येत आहेत.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 79,752/- दिनांक 18/11/2009 पासून 9 टक्के व्याजाने संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.