(घोषित दि. 23.09.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदारांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार शेतकरी आहे. त्याने सन 2009 मध्ये एक जे सी बी एक्स कॅव्हेटर थ्री डिक्स हे जे सी बी मशीन स्वत:च्या व्यवसायासाठी घेतले होते. सदर वाहनाचा क्रमांक एम.एच 21 डी 3771 असा असून वाहनाचा विमा गैरअर्जदार कंपनीकडे उतरवलेला होता. दिनांक 07.05.2012 रोजी मारोती सर्जेराव टकले वाहन चालवत होते. त्यांचेकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना होता. उपरोक्त जे सी बी द्वारे विहीर खोदण्याचे काम सुरु असताना वाहन कच्ची माती ढासळल्यामुळे विहीरीत पडले व वाहनाचे नुकसान झाले.
गैरअर्जदारांच्या सर्वेअरने वाहनाचे निरीक्षण केले. त्यानंतर तक्रारदारांनी वाहन मे.रत्नप्रभा मोटर्स, औरंगाबाद येथे दुरुस्त केले दुरुस्तीची बिले व इतर कागदपत्रांसह गैरअर्जदार यांचेकडे क्लेम फॉर्म भरला. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव वाहन चालवण्याचा परवाना वैध नव्हता या कारणाने दिनांक 25.10.2012 रोजी फेटाळला म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. त्या अंतर्गत तक्रारदार जे सी बी दुरुस्तीचा खर्च रुपये 5,88,378/-, मानसिक त्रासा बद्दल रुपये 25,000/-, औरंगाबाद येथे जाण्या-येण्याचा खर्च रुपये 10,000/- अशी मागणी करत आहेत. त्यांनी आपल्या तक्रारी सोबत रत्नप्रभा मोटर्स, औरंगाबाद यांची बिले, घटनास्थळ पंचनामा, मारोती टकले यांचा वाहन चालवण्याचा परवाना (अनुज्ञाप्ती), वाहनाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र, गैरअर्जदार कंपनीचे दावा नाकारल्याचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली.
गैरअर्जदार विमा कंपनी मंचासमोर हजर झाली. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार चालक मारोती टकले यांचा वाहन परवाना एल एम व्ही ट्रान्सपोर्ट चालवण्याचा होता. वादग्रस्त वाहन जे सी बी एक्स कॅव्हेटर हे विशिष्ट संवर्गात मोडणारे वाहन आहे. त्यासाठी “LDR X CV – OTH – LODR/ X CVTR” या प्रकारचा वेगळा परवाना लागतो. तो चालक मारोती टकले यांचेकडे नव्हता. त्यामुळे तक्रारदारांकडून विमा अटीचे उल्लंघन झालेले आहे. गैरअर्जदार कंपनीने विमा अटीचे उल्लंघन झाल्यामुळे विमा प्रस्ताव नाकारला यात त्यांचेकडून सेवेत कमतरता झालेली नाही. सबब तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी. त्यांनी आपल्या जबाबासोबत सर्वे रिपोर्ट दाखल केला आहे.
तक्रारदारांच्या वकीलांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत ‘मोटार वाहन निरीक्षक जालना’ यांचेकडून काही माहिती मागवली होती त्याचे त्यांना आलेले उत्तर नि.21/1 वर दाखल केले आहे. तक्रारदारांच्या विद्वान वकीलांनी उप प्रादशिक परिवहन अधिकारी यांना साक्षीसाठी बोलावण्याचा अर्ज केला तो मंजूर करण्यात आला. त्यानुसार श्री.गोपाल तुळशीराम वरोकर यांची शपथेवर तपासणी करण्यात आली ती निशाणी 22 वर आहे.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.सोनोने यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदारांतर्फे विद्वान वकील श्री.पोळ यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. दाखल कागदपत्रांचा सखोल अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे मंचाने विचारत घेतले.
मुद्दा निष्कर्ष
1.अपघात घडला त्यावेळी वादग्रस्त वाहना संबंधी
विमा पॉलीसी अस्तित्वात होती का ? होय
2.अपघातग्रस्त वाहनाच्या चालका जवळ वाहन
चालवण्याचा योग्य व वैध परवाना होता हे
तक्रारदारांनी सिध्द केले आहे का ? नाही
3.गैरअर्जदार यांनी सेवेत कमतरता केली आहे हे
तक्रारदारांनी सिध्द केले आहे का ? नाही
4.काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी –अपघातग्रस्त वाहनाची एम.एच.21 डी. 3771 (JCB-Excavator 3 DX)विमा पॉलीसी दिनांक 31.05.2011 ते 30.05.2012 या कालावधीसाठी गैरअर्जदार यांचेकडे काढलेली होती ही गोष्ट तक्रारदारांनी दाखल केलेल्या विमा पॉलीसीच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. तसेच वाहनाला दिनांक 07.05.2012 रोजी अपघात झाला ही गोष्ट देखील घटनास्थळ पंचनामा (नि.3/4) वरुन स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी देखील त्यांच्या दावा नाकारल्याच्या पत्रात ही बाब मान्य केलेली आहे. त्यामुळे मंच वरील मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 साठी –विमाकृत वाहन हे JCB-Excavator 3 DXअसे होते. मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 2 (ca)नुसार Excavator हे वाहन Construction equipment vehicleया वाहन प्रकारात मोडते. वाहनाचा चालक मारोती सर्जेराव टकले याचा वाहन चालवण्याचा परवाना बघितला असता (नि.23) त्याला LMV-TR and Transया प्रकारातील वाहन चालवण्याचा परवाना (अनुज्ञाप्ती) होती. सदर अनुज्ञाप्ती (नि.23) च्या अनुक्रमांक 6 वर नमूद केलेली आहे. तर गैरअर्जदार यांच्या दावा नाकारल्याच्या पत्राप्रमाणे (नि.3/8) JCB Excavatorहे विशिष्ट संवर्गात येते व त्यासाठी LDR XCV-OTH-LOAD/XCVTRया प्रकारची अनुज्ञाप्ती लागते. अशा अनुज्ञाप्तीचे विवरण अनुक्रमांक 18 वर केलेले आहे. मारोती टकले यांचा परवाना बघता त्याला फक्त ‘LMV-TR and TRANSहीच अनुज्ञाप्ती होती LDR XCV-OTH-LOAD/XCVTR’ या प्रकारची अनुज्ञाप्ती नव्हती असे दिसते.
नि.22 वर तक्रारदारांनी उप प्रादेशिक वाहन निरीक्षक यांची शपथेवर तपासणी घेतली. त्यात देखील त्यांनी स्पष्टपणे मारोती टकले यांच्या दाखवल्या गेलेल्या अनुज्ञाप्तीवर (नि.23) Excavatorहे वाहन चालवता येणार नाही त्यासाठी “Other-loaders/excavator”अशी अनुज्ञाप्ती लागते असे सांगितले आहे. मोटार वाहन कायद्याच्या क्रलम 10 प्रमाणे वाहन चालकाच्या अनुज्ञाप्तीवर त्याला कोणते वाहन चालवता येईल तो वर्ग नमूद करावा अशी तरतूद आहे. त्यातील (J) या संवर्गात “Motor vehicle of a specified description”असे म्हटले आहे. या संवर्गा अंतर्गत मारोती टकले यांच्या अनुज्ञाप्तीवर Excavatorया वाहनाची नोंद केलेली दिसत नाही (नि.23). त्यामुळे चालक मारोती टकले यांचेकडे वरील वाहन चालवण्याचा वैध परवाना (अनुज्ञाप्ती) नव्हता असा निष्कर्ष मंच काढीत आहे व मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नकारार्थी देत आहे.
विमा करारातील अटींप्रमाणे वाहन चालवताना वाहन चालकाकडे ते वाहन चालवण्याचा वैध परवाना (अनुज्ञाप्ती) असणे आवश्यक आहे. तशी वैध अनुज्ञाप्ती वाहन चालक मारोती टकले यांचेकडे नव्हती. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचा विमा दावा विमा पॉलीसीतील अटींचा भंग झाला आहे या कारणाने नाकारला ही त्यांचेकडून झालेली सेवेतील कमतरता नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे व मुद्दा क्रमांक 3 चे ही उत्तर नकारार्थी देत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बद्दल आदेश नाही.