(घोषित दि. 13.08.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती भाऊसाहेब मोहरीर हे चिंचखेड ता.अंबड जि.जालना येथील रहिवाशी होते. त्यांचे नावे चिंचखेड येथे शेत जमिन होती. महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार विमा कंपनीकडे महाष्ट्रातील शेतक-यांचा एकत्रित विमा उतरविलेला आहे. दिनांक 05.07.2011 रोजी मयत भाऊसाहेब यांना पिकअप व्हॅनने धडक दिल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला. सदर घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन पाचोड येथे नोंदविण्यात आली. मयताचे शव-विच्छेदन करण्यात आले. शव-विच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण अपघातात झालेल्या जखमांमुळे मृत्यू असे दिलेले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह गैरअर्जदार यांचेकडे दावा नोंदवला. दावा मुदतीत असताना तसेच कागदपत्रे परिपूर्ण असताना देखील गैरअर्जदार यांनी दावा रक्कम रुपये 1,00,000/- अर्जदारांना दिली नाही.
दिनांक 15.05.2012 रोजी पत्र पाठवून मयत भाऊसाहेब मोहरीर यांचे नाव गाव-नमुना 6-ड मध्ये नाही या कारणावरुन दावा फेटाळला आहे. हे कारण चुकीचे आहे. मयत भाऊसाहेब यांचे नावे फेरफार क्रमांक 49 नुसार 2 हेक्टर 73 आर इतकी शेतजमिन दिनांक 15.08.2010 रोजी देखील होती. गैरअर्जदारांच्या हलगर्जीपणामुळे अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रास झाला. त्यामुळे तक्रारदार 18 टक्के व्याजासह विमा रक्कम रुपये 1,00,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- इतकी रक्कम मागतात तसेच सदर तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- इतकी रक्कम मागतात.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत गैरअर्जदारांनी विमा प्रस्ताव नाकारल्याचे पत्र, मयताच्या नावे असलेल्या जमिनीचा 7/12 चा उतारा, 6-क चा उतारा तसेच चिंचखेड येथील तलाठयाचे मयताच्या नावाने जमिन असल्या बाबतचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार यांच्या लेखी जबाबानुसार त्यांना विमा प्रस्ताव मिळाल्या नंतर त्याची छाननी केली असता मयत भाऊसाहेब पांडूरंग मोहरीर यांचे नावे दिनांक 15.08.2010 रोजी म्हणजे विमा पॉलीसी अस्तित्वात आली त्या दिवशी गाव नमुना 6-ड च्या उता-यात तसेच 7/12 च्या उता-यात शेत जमिन नव्हती. पॉलीसीच्या अटीनुसार विमा धारकाच्या नावे शेतजमिन असेल तरच विमा प्रस्ताव मंजूर करण्यात येतो. तशा अर्थाचे पत्र तक्रारदाराला पाठवलेले होते. तक्रारदाराचा दावा योग्य कारणामुळेच नाकारला आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारे सेवेत कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.विपूल देशपांडे व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचे पती मयत भाऊसाहेब यांचा मृत्यू रस्ता अपघातात दिनांक 05.07.2011 रोजी झाला.
- गैरअर्जदारांनी दिनांक 15.05.2012 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून मयत भाऊसाहेब मोहरीर यांचे नाव पॉलीसी सुरु झाली तेव्हा म्हणजे दिनांक 15.08.2010 रोजी गाव नमुना 6-ड च्या उता-यात तसेच 7/12 च्या उता-यात शेतकरी म्हणून नव्हते या कारणाने त्यांचा विमा प्रस्ताव नामंजूर केला असे कळवले. गैरअर्जदारांनी केवळ या एकाच कारणामुळे तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नाकारला आहे हे त्यांच्या उपरोक्त पत्रावरुन स्पष्ट होते.
- तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांत चिंचखेड ता.अंबड जि.जालना चे गाव नमुना 6-क चा उतारा तसेच 7/12 चा उतारा इत्यादी कागदपत्रे आहेत. त्यावरुन मयत भाऊसाहेब यांचे नावे 1996 पासून शेतजमिन होती हे स्पष्ट होते. ती भाऊसाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसांचे नावाने झालेली आहे. त्यांच्या वारसांत पत्नी म्हणून सदरच्या तक्रारदाराचे नाव आहे. या सर्व गोष्टी गाव नमुना 6-क च्या उता-यावरुन स्पष्ट होतात.
वरील विवेचनावरुन तक्रारदारांनी मयत हा शेतकरी होता. त्यांचे नावे विमा पॉलीसी अस्तित्वात आली त्या दिवशी म्हणजे दिनांक 15.08.2010 रोजी शेतजमिन होती तसेच मयताचा मृत्यू रस्ता अपघातात झाला ही गोष्ट सिध्द केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार ही तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला म्हणून “शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत” विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्यास पात्र आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी आदेश प्राप्ती पासून साठ दिवसांचे आत तक्रारदारांना “शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत” विमा रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) द्यावी.
- गैरअर्जदार 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वरील मुदतीत रक्कम अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दाराने व्याज द्यावे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- (अक्षरी दोन हजार पाचशे फक्त) द्यावा.