श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 17 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून त्यांच्या क्लिनिक मधील प्लान्ट मशिनरी, जनरेटर सेट, सी टी स्कॅनर व इतर डायग्नोस्टिक इक्विपमेंट्स साठी ‘Standard Fire and Special Perils Policy’ दिनांक 25/11/2009 ते 24/11/2010 या कालावधीसाठी घेतली होती. दिनांक 29/9/2010 रोजी प्रचंड पावसामुळे तक्रारदारांच्या एरंडवणे येथील हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले आणि तिथे ठेवलेल्या वर नमूद केलेल्या मालाचे नुकसान झाले. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे क्लेम अर्ज पाठविला. अर्ज पाठवून 100 दिवस होऊनही जाबदेणार कंपनीकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 8,77,800/-, नुकसान भरपाईपोटी रुपये 2,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 75,000/- मागतात. तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून ‘Standard Fire and Special Perils Policy’ दिनांक 25/11/2009 ते 24/11/2010 या कालावधीसाठी घेतली होती हे जाबदेणार मान्य करतात. तक्रारदारांचा क्लेम अर्ज प्राप्त झाल्यानंतर जाबदेणारांनी श्री. मिलींद भाटवडेकर यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली. दिनांक 5/1/20011 रोजी सर्व्हेअरनी अहवाल सादर केला आणि तक्रारदारांच्या सामानाच्या नुकसानीचे मुल्यांकन रुपये 2,84,372/- केले. जाबदेणार यांनी दिनांक 9/2/2011 रोजीच्या पत्राद्वारे नुकसानीचे मुल्यांकन रुपये 2,84,372/- करण्यात आल्याचे कळविले व सदरहू रकमेचा चेक घेऊ जा असेही तक्रारदारांना कळविले होते. पत्रासोबत सर्व्हेअरच्या अहवालाची प्रतही पाठविण्यात आली होती कारण तक्रारदारांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागविली होती. जाबदेणार यांच्या पत्रास तक्रारदारांनी कुठलेही उत्तर दिले नाही किंवा चेकही घेऊन गेले नाहीत. म्हणून जाबदेणार यांनी दिनांक 25/2/2011 रोजीच्या पत्रा सोबत रक्कम रुपये 2,84,372/- चा चेक तक्रारदारांकडे पाठवून दिला होता. चेक प्राप्त झाला किंवा नाही याबद्दल तक्रारदारांनी जाबदेणार यांना कळविले नाही. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतरच तक्रारदारांना चेक प्राप्त झाला होता हे जाबदेणार यांना कळले. जाबदेणार यांनी सर्व्हेअरची नियुक्ती केली होती व त्यांच्या अहवालानुसार तक्रारदारांना नुकसान भरपाईचा चेक पाठविण्यात आला होता. जाबदेणार यांच्या सेवेत कुठलीही त्रुटी राहिलेली नाही. म्हणून तक्रारदारांची तक्रार अमान्य करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी लेखी जबाबासोबत मा. वरिष्ठ न्यायालयांचे अनेक निकाल नमूद केलेले आहेत. तसेच सर्व्हेअरचा अहवाल व इतर कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत नुकसान भरपाई पोटी रुपये 8,77,800/- ची मागणी केलेली आहे. सर्व्हेअर श्री. मिलींद भाटवडेकर यांच्या दिनांक 5/1/20011 रोजीच्या अहवालामध्ये डी.जी सेट व ए.सी युनिट दुरूस्ती करण्यालायक आहेत असा अहवाल दिलेला आहे. Siemens PET CT चे मुल्यांकन रुपये 2,07,224/-, फर्निचर व फिक्सर्चस चे मुल्यांकन रुपये 20,801/-, जनरेटर चे मुल्यांकन रुपये 63,751/-, ए.सी चे मुल्यांकन रुपये 7562/- करण्यात आलेले आहे. संगणक व प्रिंटरचे नुकसान झालेले नसल्यामुळे नुकसानीच्या मुल्यांकनात त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. अशा रितीने सर्व्हेअरनी रुपये 2,99,339/- केलेले आहे. त्यातून पॉलिसी प्रमाणे 5 टक्के एक्सेस रक्कम रुपये 14,967/- वजा करुन उर्वरित रक्कम रुपये 2,84,372/- नुकसानीचे मुल्यांकन करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी कुठल्या आधारावर रुपये 8,77,800/- ची मागणी केली याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. केवळ तक्रारदारांच्या वस्तूंचे नुकसान झाले म्हणून वस्तू विकत घेतलेली किंमत इन्श्युरन्स कंपनीकडून मागतात, हे चुकीचे आहे असे मंचाचे मत आहे. कारण इन्श्युरन्स कंपनी indemnify ची किंमत देत असते, वस्तूची किंमत देत नाही. सर्व्हेअर ही अधिकृत authentic व्यक्ती/संस्था असल्यामुळे त्यांनी केलेले नुकसानाचे मुल्यांकन नाकारता येत नाही. नाकारण्यासाठी तक्रारदारांनी कुठलेही कारण दिलेले नाही. म्हणून मंच तक्रारदारांना पुर्वी दिलेली नुकसान भरपाईची किंमत 2,84,372/- योग्य आहे असे समजून तक्रारदारांची तक्रार नामंजुर करीत आहे. तक्रारदारांना चेक प्राप्त झाला किंवा नाही याबद्दल त्यांनी तक्रारीत नमूद केलेले नाही.
मंचाने मा. वरिष्ठ न्यायालयांच्या खालील निकालांचा आधार घेतला-
1. मा. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, 1986-2002 Consumer Cases (Part IV)] 2000 Vol. X, page 5269, नॅशनल इन्श्युरन्स कं.लि. विरुध्द श्री लक्ष्मी टेक्सटाईल इंडस्ट्रिज व इतर
2. मा. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, XI XII 1992 (2) CPR 716 [N.C.] युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कं.लि. विरुध्द श्री. हसन सुल्तान नदाफ.
वरील निकाल प्रस्तूत प्रकरणी तंतोतंत लागू पडतात असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन, दाखल कागदपत्रांवरुन व मा. वरिष्ठ न्यायालयांच्या निकालांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्दल आदेश नाही.
[3] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.