निकाल
पारीत दिनांकः- 24/01/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी जाबदेणारांकडून टाटा ट्रकसाठी इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. दि. 17/08/2009 रोजी तक्रारदारांनी माधवराव गॅरेजजवळ, पुणे-सातारा रोडवर ट्रक किरकोळ कामासाठी लावला (Park) होता. त्यानंतर दि. 25/8/2009 रोजी 11.30 वाजता त्यांना त्यांच्या ड्रायव्हरने ट्रक क्र. MH-12, AR-2577 जागेवर नसल्याबद्दल कळविले. तक्रारदारांनी ट्रकचा शोध घेतला व त्यानंतर सहकारनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविली. तक्रारदारांनी ट्रकचा बराच शोध घेतल्यानंतर दि. 28/8/2009 रोजी एफ.आय.आर. दाखल केली. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणारांकडे ट्रकच्या चोरीचा क्लेम दाखल केला, तसेच जाबदेणारांनी वेळोवेळी मागितलेली सर्व कागदपत्रे दिली. दि. 7/4/2010 रोजी जाबदेणारांनी पॉलिसीच्या अट क्र. 5 चा भंग झाल्यामुळे तक्रारदाराचा क्लेम नाकारला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार ही अट तक्रारदाराच्या क्लेमला लागू नाही, म्हणून त्यांनी दि. 6/5/2010 रोजी जाबदेणारांना पत्र लिहिले, परंतु जाबदेणारांनी पुन्हा क्लेम नाकारला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या गॅरेजजवळ ट्रक पार्क केला होता, त्या गॅरेजमध्ये रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक होते, त्यामुळे ट्रक चोरीस जाणे शक्य नाही. परंतु जाबदेणारांनी मुद्दामपणे तक्रारदारांचा क्लेम चुकीच्या कारणास्तव नाकारलेला आहे, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 3,76,650/-, नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 50,000/- असे एकुण रक्कम रु. 4,26,650/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने, रक्कम रु. 10,000/- तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता ते मंचासमोर उपस्थित झाले व त्यांच्या लेखी म्हणण्याद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांचा क्लेम पॉलिसीच्या अट क्र. 5 चे उल्लंघन केल्यामुळे नाकारला. पॉलिसीच्या अट क्र. 5 नुसार विमाधारकाने विमा उतरविलेल्या वाहनाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जाबदेणारांनी श्री व्ही. एन. जावडे यांना इन्व्हेस्टीगेटर म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी गॅरेजचे मालक व मेकॅनिक, तक्रारदारांचा ड्रायव्हर आणि ट्रान्सपोर्टर यांचा जबाब नोंदविला. तपासणीच्या वेळी दि. 17/8/2009 रोजी ड्रायव्हरने ट्रक पब्लिक रोडवर पार्क केला होता व दि. 25/8/2009 पर्यंत तो तसाच होता. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, ट्रक जवळ-जवळ 8 दिवस रोडवर दुर्लक्षितपणे ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे जाबदेणारांनी दि. 7/4/2010 रोजी, तक्रारदारांनी ट्रक काळजीपूर्वक पार्क न करता रस्त्यावर पार्क केला या कारणास्तव नाकारला, ते योग्य आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रारदार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ शपथपत्र, कागदपत्रे व इन्व्हेस्टीगेटरचा अहवाल दाखल केला
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून त्यांच्या टाटा ट्रकसाठी पॉलिसी घेतली होती. त्यांचा ट्रक चोरीला गेल्यामुळे त्यांनी जाबदेणारांकडे क्लेम दाखल केला. परंतु जाबदेणारांनी दि. 7/4/2010 रोजी पॉलिसीच्या अट क्र. 5 चा भंग झाल्यामुळे तक्रारदारांचा क्लेम नाकारला. पॉलिसीची अट क्र. 5 खालीलप्रमाणे आहे.
“The insured shall take all reasonable steps to safeguard the
the vehicle insured from loss or damage and to maintain it
in efficient condition and the Company shall have as all
times free and full access to examine the vehicle insured
any part ………………………………., any extension of
damage or any further damage to the vehicle shall be
entirely at the insured’s own risk.”
याचा अर्थ विमाधारकाने त्याच्या विमा उतरविलेल्या वाहनाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
जाबदेणारांनी इन्व्हेस्टीगेटरच्या अहवालासोबत तक्रारदाराच्या ड्रायव्हरचा जबाब, तसेच गॅरेजमधील मेकॅनिक आणि गॅरेजच्या मालकाचाही जबाबाची प्रत दाखल केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ट्रकच्या किरकोळ कामासाठी ट्रक गॅरेजमध्ये लावला होता. तोंडी युक्तीवादाच्या वेळी, गॅरेजमध्ये जागा नव्हती म्हणून ट्रक बाहेर लावला असे तक्रारदारांनी सांगितले. परंतु गॅरेजचे मालक श्री लोखंडे यांनी त्यांच्या जबाबामध्ये खालीलप्रमाणे नमुद केले आहे,
“माझ्या अनेक ग्राहकांच्या ट्रक्स रिपेअरिंग करण्यासाठी येतात,
तसेच काहे मित्र परिवारातील ग्राहक हे त्यांच्याकदे ट्रक पार्किंग
ची व्यवस्था नसल्यामुळे माझे गॅरेजचे बाजूच्या रोडसाईडला
त्यांची वाहने पार्क करुन ठेवतात..... श्री चंद्रकांत महाजन हे
माझे मित्र परिवारातील असल्यामुळे, त्यांचा ट्रक क्र. MH-12,
AR-2577 चे ड्रायव्हर त्यांचे गावी सुट्टीवर जायचे असल्यामुळे
श्री चंद्रकांत महाजन यांनी त्यांचा वरील क्रमांकाचा ट्रक माझे
गॅरेजचे समोरील रोड साईडला पार्किंग करुन ठेवण्याबाबत
मला विचारणा केली, मी त्यांना रोडच्या बाजूला पार्किंग
करण्यास माझी काही हरकत नाही, असे सांगितल्यानंतर
त्यांचे ड्रायव्हर शिवाजे लाड यांनी त्यांचा ट्रक क्र. MH-12,
AR-2577 हा माझे गॅरेजचे बाजूला पार्क करुन योग्यरित्या
लॉक करुन ठेवला. त्यानंतर त्यांने गाडीची चावी त्यांचे
मालक चंद्रकांत महाजन यांना नेऊन दिली............”
वरील जबाबावरुन, तक्रारदारांनी त्यांचा ट्रक हा कामासाठी नव्हे, तर ड्रायव्हर गावी
जात असल्यामुळे फक्त पार्किंगसाठी ठेवला होता, हे सिद्ध होते. तसेच श्री लोखंडे यांनी त्यांच्या जबाबामध्ये असे नमुद केले आहे की, ड्रायव्हरने ट्रक लॉक करुन चावी मालक चंद्रकांत महाजन यांना नेऊन दिली. जर कामासाठी ट्रक गॅरेजमध्ये लावला असता, तर चावी ही मेकॅनिक/गॅरेज मालकांकडे असायला हवी होती. यावरुन तक्रारदारांनी त्यांची गाडी किरकोळ कामासाठी गॅरेजमध्ये पार्क केली होती, हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांचा ट्रक जवळ-जवळ आठ दिवस दुर्लक्षितरित्या पुणे-सातारा रोडवर पार्क करुन ठेवली होती, हे सिद्ध होते. या प्रकरणात, पॉलिसीच्या अट क्र. 5 चे उल्लंघन झालेले दिसून, म्हणून जाबदेणारांनी योग्य कारणास्तव तक्रारदाराचा क्लेम नाकारला, त्यामध्ये त्यांची कोणतीही सेवेतेल त्रुटी नाही, असे मंचाचे मत आहे. तक्रारदार त्यांचा क्लेम मिळण्यास पात्र नाहीत, म्हणून मंच प्रस्तुतची तक्रार नामंजूर करते.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.