न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदयाचे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी त्यांचे वाहन क्र. एम.एच.46/बी.बी.-1293 या वाहनाचा विमा वि.प. यांचेकडे उतरविलेला होता. सदर विमा पॉलिसीचा क्र. 15120131180300007466 असा असून कालावधी दि. 23/03/2019 ते 23/03/2020 असा होता. सदर पॉलिसी घेत असताना तक्रारदार यांनी वि.प. यांचे एजंट श्री अमोल वसंत पाखरे यांचेकडे तक्रारदार यांचे गाडीचे रजिस्ट्रेशन रिसीट, रजिस्ट्रेशन दाखला, गाडीचे आर.सी.टी.सी. दिले होते. त्यावेळी वि.प. कंपनीने गाडीची तपासणी करुन गाडीचे फोटो घेवून तक्रारदार यांचे गाडीचा विमा उतरविलेला होता. गाडीचा फोटो काढला तसेच गाडीची तपासणी केली त्यावेळी वाहनास पिवळया रंगाची नंबरप्लेट होती. अशा पध्दतीने वाहनाचा विमा उतरवित असताना निष्काळजीपणाने वि.प. यांनी चुकीची पॉलिसी दिलेस तक्रारदार हे त्यास जबाबदार नाहीत. दि. 5/08/2019 रोजी तक्रारदार हे त्यांचे मामाकडे रा. चिखली ता. करवीर येथे वाहन घेवून गेले होते. परंतु त्यावेळी अचानक चिखली परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झालेने तक्रारदार यांचे वाहन पुराच्या पाण्यातून बाहेर काढणे अडचणीचे झाले. त्यामुळे तक्रारदारांचे वाहन 8 ते 10 दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने ते खराब झाले. सदरची बाब वि.प. यांना कळविलेनंतर त्यांनी वाहनाचा सर्व्हे केला. परंतु तक्रारदार यांनी वाहनाची पॉलिसी प्रायव्हेट कारसाठी काढली आहे, व्यावसायिक व्हेईकल पॉलिसी घेतली नाही असे कारण सांगून वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. तक्रारदारांच्या वाहनाच्या आर.सी. बुकमध्ये देखील तक्रारदार यांचे वाहन कमर्शियल असलेचे नमूद असून देखील वि.प. यांच्या एजंटच्या चुकीमुळे वि.प. यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 5,09,083/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 4 कडे अनुक्रमे क्लेम नाकारलेचे पत्र, पॉलिसी पेपर, कर भरल्याची पावती, आर.सी.बुक वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत विमा पॉलिसी, क्लेम नाकारलेचे पत्र, सर्व्हे रिपोर्ट व सर्व्हेअरचे शपथपत्र, वाहनाचे आर.सी. व परमिट इ. कागदपत्रे तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही.
iii) विमाधारक व विमा कंपनी यांच्यामध्ये करार होत असताना परस्परावरील विश्वास या तत्वानुसार होत असतो. तक्रारदार यांचे वाहन मोटार कॅब असताना वाहनाला विमा हप्ता कमीत कमी आकारावा हयासाठी सदरचे वाहन हे खाजगी वाहन असे दाखवून वि.प.ची दिशाभूल करुन सदरचे वाहनासाठी Private Car Enhancement policy ही पॉलिसी सुरुवातीपासून तक्रारदारांनी घेतली होती. त्यामुळे विमा हप्ता कमीत कमी भरुन तक्रारदाराने स्वतःचा सदोष फायदा करुन एका सार्वजनिक विमा कंपनीचे दोषपूर्ण नुकसान केलेले आहे व परस्परावरील विश्वास या तत्वाचा भंग केलेला आहे. त्यामुळे वि.प. यांनी पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार तक्रारदारांचा क्लेम कायदेशीररित्या नाकारला आहे.
iv) वि.प. यांच्या हक्कास कोणतीही बाधा न येता जर वि.प. यांना कोणते देणे द्यावे लागल्यास ते पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार असेल. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी त्यांचे वाहन क्र. एम.एच.46/बी.बी.-1293 या वाहनाचा विमा वि.प. यांचेकडे उतरविलेला होता. सदर विमा पॉलिसीचा क्र. 15120131180300007466 असा असून कालावधी दि. 23/03/2019 ते 23/03/2020 असा होता. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नाकारलेली नाही. पॉलिसीची प्रत याकामी उभय पक्षांनी दाखल केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदार यांचे वाहन मोटार कॅब असताना वाहनाला विमा हप्ता कमीत कमी आकारावा यासाठी सदरचे वाहन हे खाजगी वाहन असे दाखवून वि.प.ची दिशाभूल करुन सदरचे वाहनासाठी Private Car Enhancement policy ही पॉलिसी सुरुवातीपासून तक्रारदारांनी घेतली होती. त्यामुळे वि.प. यांनी पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार तक्रारदारांचा क्लेम कायदेशीररित्या नाकारला आहे असे कथन केले आहे.
8. याकामी तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता आर.सी.टी.सी. वर तक्रारदाराचे वाहन मोटर कॅब असलेचे नमूद आहे. पॉलिसी उतरविताना तक्रारदाराने वि.प. यांचे एजंटला गाडीचे रजिस्ट्रेशन रिसीट, रजिस्ट्रेशन दाखला, तसेच आर.सी.टी.सी. दिले होते तसेच वि.प. यांनी गाडीचे फोटो घेवून व गाडीची तपासणी करुनच विमा उतरविला होता असे तक्रारदाराने पुरावा शपथपत्रात शपथेवर कथन केले आहे. वाहनाचे आर.सी.टी.सी. बुकमध्ये तक्रारदाराचे वाहन कमर्शियल असलेची नोंद आहे. सदरची सर्व कागदपत्रे वि.प. यांचेकडे देवूनही वि.प. यांनी पॉलिसी ही कमर्शियल वाहनासाठी उतरविलेली नाही असे कारण देवून तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. वि.प. यांनी पॉलिसी देत असताना कागदपत्रांची व वाहनाची तपासणी करुन पॉलिसी द्यायला हवी होती. परंतु वि.प. यांनी तक्रारदारास खाजगी वाहनाची पॉलिसी दिल्याचे दिसून येते. यामध्ये वि.प. यांचाच निष्काळजीपणा दिसून येतो. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. वि.प. यांनी याकामी त्यांचे लेखी युक्तिवादामध्ये, वि.प. कंपनीची विमाक्लेमची दायित्वाची जबाबदारी ही नॉन-स्टँडर्ड बेसीसवर वाहनाच्या आय.डी.व्ही. रकमेच्या 75 टक्के म्हणजेच रु. 3,81,812/- पेक्षा जास्त असणार नाही असे कथन केले आहे. सदर कथनाचे पुष्ठयर्थ वि.प. यांनी मा. वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे याकामी दाखल केले आहेत. सदरचे निवाडयांचे अवलोकन करता तक्रारदाराचा विमादावा हा नॉन-स्टँडर्ड बेसीसवर वाहनाच्या आय.डी.व्ही. रकमेच्या 75 टक्के रकमेस मंजूर करणे उचित ठरेल असे या आयोगाचे मत आहे. वाहनाची आय.डी.व्ही. रक्कम ही रु. 5,09,083/- इतकी आहे. सबब, तक्रारदार हे नमूद विमा योजनेअंतर्गत सदर रकमेच्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रक्कम रु.3,81,812/- इतकी रक्कम वि.प. यांचेकडून मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्लेम नाकारले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्लेमपोटी रक्कम रु. 3,81,812/- अदा करावेत व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 15,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.