द्वारा- मा. अध्यक्ष, श्रीमती अंजली देशमुख
:- निकालपत्र :-
दिनांक 31 ऑक्टोबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांचे एसर मॉल येथे लॅपटॉप विक्रीचे व दुरुस्तीचे दुकान आहे. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून शॉपकिपर्स इन्श्युरन्स पॉलिसी घेतली होती. पॉलिसीचा कालावधी दिनांक 24/4/2007 ते 23/4/2008 असा होता. तक्रारदारांचे दुकान रोज सकाळी 10.30 वा. उघडून रात्री 8.30 वा. बंद होते. दिनांक 8/10/2007 रोजी तक्रारदारांच्या कर्मचा-यांनी रात्री 8.30 वा. दुकान बंद केले. दिनांक 9/10/2007 रोजी कर्मचा-यांनी दुकान उघडले असता ड्रॉवर्स उघडलेले व लॅपटॉप चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात इसमांनी शॉप मध्ये घुसून चोरी केली असावी किंवा डुप्लिकेट चावीने शटर उघडले असावे किंवा शटर वाकवून आत आले असावेत. ज्या शोकेसमध्ये लॅपटॉप ठेवलेले होते, त्या शोकेसच्या लॉकर सिस्टीमचा सिक्रेट कोड तोडून वेगवेगळया कंपन्यांचे 10 लॅपटॉप ची चोरी करण्यात आली होती. लॅपटॉपची किंमत 4,78,900/- होती. तक्रारदारांनी दिनांक 9/10/2007 रोजी डेक्क्न पोलिस स्टेशन मध्ये FIR नोंदविला. पोलिसांनी पंचनामा केला. कर्मचा-यांचे जबाब नोंदविले. नंतर तक्रारदारांनी जाबदेणारांकडे क्लेम केला. क्लेम करतांना सोबत आवश्यक कागदपत्रे सादर केली. जाबदेणारांनी सर्व्हेअर किंवा इन्व्हेस्टिगेटर नेमला किंवा नाही याबाबत तक्रारदारांना माहिती नाही. तक्रारदारांना याबाबत कुठलेही पत्र, नोटीस प्राप्त नाही. नंतर तक्रारदारांना श्री. राहूल एम. देवपुरकर यांची इन्व्हेस्टिगेटर म्हणून व जे.सी. भन्साळी अॅन्ड कंपनी यांना सर्व्हेअर म्हणून नेमण्यात आल्याचे कळले. त्यांच्याकडे तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे दिली. जाबदेणार यांनी दिनांक 30/6/2008 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांचा क्लेम नामंजुर केला. नामंजुरीचे कारण तक्रारदारांना पटत नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रुपये 4,78,900/- 18 टक्के व्याजासह, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार जाबदेणारांनी इन्व्हेस्टिगेटर व सर्व्हेअर यांच्या अहवालावरुन तक्रारदारांचा क्लेम नामंजुर केला. क्लेम नामंजुरीचे कारणे खालीलप्रमाणे-
1] चोरीला गेलेल्या वस्तूंची नोंद स्टॉक रजिस्टर किंवा अकाऊंट बुक मध्ये नाही.
2] लॅपटॉप जेथे ठेवतात त्या शोकेसची लॉकींग सिस्टीम तोडून आय.डी. कोड वापरुन लॅपटॉपची चोरी झाली असावी याबद्यलचा कुठलाही पुरावा नाही.
3] वॉचमनच्या स्टेटमेंट वरुन दिनांक 9/10/2007 रोजी सकाळी 7.30 पर्यन्त चोरी झाली नव्हती. दुकान सकाळी 10.00 वा. उघडण्यात आले होते. सकाळी 7.30 ते 10 या वेळेत शटर वाकवून अथवा बेंड करुन दुकानात प्रवेश करणे दुरापास्त आहे कारण त्यावेळेत पेपरवाले व दुधवाले यांची वर्दळ असते.
4] सर्व्हेअरच्या फोटोग्राफ वरुन छोटया जागेतून कुणाही व्यक्तीला दुकानात प्रवेश करणे कठीण आहे असे दिसून येते.
5] दुकानातील कर्मचा-यांच्या जबाबावरुन ते दुकानाचे लॉक उघडून आत गेले होते. जर शटर बेन्ट झाले असते तर किल्लीचा उपयोग करुन लॉक उघडून आत जाणे शक्य झाले नसते.
3. जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबात कुणीतरी अज्ञात इसमाने डुप्लीकेट किल्लीचा उपयोग करुन लॅपटॉपची चोरी केली, त्यात फोर्स चा वापर करण्यात आला नव्हता, त्यामुळे लॅपटॉपची झालेली चोरी “Burglary And/or Housebreaking ” या टर्म मध्ये येत नसल्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारांचा क्लेम नामंजुर करण्यात आला होता असे नमूद केलेले आहे. तक्रारदारांनी FIR मध्ये देखील कुणीतरी अज्ञात चोरटयाने डुप्लीकेट चावीने शटरचे कुलूप उघडून दुकानात प्रवेश केल्याचे व लॅपटॉपची चोरी केल्याचे नमूद केलेले आहे. तसेच तक्रारदारांच्या कर्मचा-यांनी देखील दुकानाचे लॉक किल्ली लावून उघडण्यात आले होते असे नमूद केलेले आहे. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारांचा क्लेम नामंजुर करण्यात आला. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार अर्ज नामंजुर करण्यात यावा, अशी जाबदेणार यांनी विनंती केली. जाबदेणार यांनी लेखी जबाबासोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे, सर्व्हेअरचा अहवाल दाखल केला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणारांनी दाखल केलेल्या सर्व्हेअर जे.सी. भन्साळी अॅन्ड कंपनी यांच्या दिनांक 12/3/2008 च्या सर्व्हे रिपोर्ट मध्ये FIR वरुन कुणीतरी अज्ञात चोरटयाने शटर बेन्ट करुन डुप्लीकेट किल्लीने कुलूप उघडून दुकानात प्रवेश केल्याचे व लॅपटॉपची चोरी केल्याचे नमूद केलेले आहे. सर्व्हे रिपोर्ट मध्ये Visit & Inspection मध्ये चोरांनी दुकानाचे शटर बेन्ट करुन आत प्रवेश केला असावा “It was observed that the culprits might have entered the premises by bending the shutter of insured premises. The shutter was observed bent” नमूद करण्यात आलेले आहे. पोलिसांनी ए समरी दाखल केलेली आहे. सर्व्हे रिपोर्ट मध्ये शेवटी “Hence, loss has taken place due to Burglary and/or House Breaking ” असे नमूद करण्यात आलेले आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार सदरची चोरी “Burglary And/or Housebreaking ” या टर्म मध्ये येत नसल्याने पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारांचा क्लेम नामंजुर करण्यात आला होता. परंतू जाबदेणारांनी दिनांक 30/6/2008 च्या क्लेम नामंजुरीच्या पत्रात पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे, सदरची चोरी “Burglary And/or Housebreaking ” या टर्म मध्ये येत नसल्याचा या शब्दांमध्ये क्लेम नामंजुर केलेला नाही. दाखल कागदपत्रांवरुन, सर्व्हेअरच्या अहवालावरुन शटर बेन्ट झालेले होते त्यामुळे ही फोर्सिबल एन्ट्री झालेली आहे म्हणून यालाच Burglary And/or Housebreaking म्हणता येईल असे सर्व्हेअरनी म्हटले आहे आणि मंचाचेही तसेच मत आहे. जाबदेणा-यांनी सर्व्हेअर नियुक्त केला होता व त्यांचा अहवाल जाबदेणा-यांवर बंधनकारक असतो. तो अहवाल मान्य नसेल तर योग्य ते स्पष्टीकरण देऊन दुसरा सर्व्हेअर नेमावा लागतो. जाबदेणा-यांनी यापैकी काहीही केलेले नाही. जाबदेणारांनी Burglary And/or Housebreaking झालेली नाही याबद्यल कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. पंचनाम्याच्या वेळी केवळ तक्रारदारांच्या दुकानातील कर्मचा-यांनी दुकान उघडून आत गेल्यानंतर ड्रॉवर उघडे होते तसेच दुकानातील लॅपटॉप दिसले नाहीत असे म्हटले होते. परंतू प्रथम दुकान उघडतांना फोर्सचा वापर करुन शटर बेन्ट करुन आत प्रवेश करण्यात आल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. म्हणून ही Burglary And/or Housebreaking आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार सर्व्हेअरनी दाखविलेली नुकसानीची किंमत रुपये 3,65,956/- व्याजासह मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार मान्य करण्यात येते.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 3,65,956/- दिनांक 30/6/2008 पासून 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- अदा करावी.
[4] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.