::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 23/10/2015 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ता हा बार्शिटाकळी येथील रहीवासी असून, उदरनिर्वाहाकरिता दुग्ध व्यवसाय करतो. सदरहू व्यवसायाकरिता तक्रारकर्त्याने म्हैस विकत घेतली होती, त्या म्हशीचा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून रु. 30,000/- चा विमा, प्रिमियम रक्कम रु. 1440/- विरुध्दपक्षाकडे भरुन काढला होता. त्या विमा पॉलिसीचा, क्रमांक 16100047120400000345 असा होता व पॉलिसीची मुदत दि. 10/10/2012 ते 09/10/2015 पर्यंत होती. त्यावेळी सदरहू म्हशीला टॅग नं. एनआयए/0174 सा विरुध्दपक्षाने दिला होता. तक्रारकर्त्याची म्हैस दि. 26/03/2013 रोजी मरण पावली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सदरहू म्हशीच्या मृत्यूचा दावा मिळण्याकरिता पॉलिसीनुसार अर्ज केला, त्यानंतर विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास आवश्यक ते कागदपत्रे मागीतले होते व त्या प्रमाणे तक्रारकर्त्याने दि. 13/09/2013 रोजी विरुध्दपक्ष यांना सदरहू कागदपत्रे जसे की, बिल्ला क्र. 174, क्लेम फॉर्म, फोटो, शव विच्छेदन अहवाल, किंमतीचा दाखला, पंचनामा इत्यदी सर्व कागदपत्रे मुळ प्रतीत दिलेली होती व त्याची पोहच सुध्दा विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दिलेली आहे. तरी सुध्दा विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याचा दावा रु. 30,000/- मंजुर केला नाही. तक्रारकर्त्याने दावा मिळण्याकरिता विरुध्दपक्षाकडे चकरा मारल्या व दि. 19/06/2014 रोजी क्लेम मिळण्याबाबत पुन्हा पत्र दिले. परंतु त्याची दखल विरुध्दपक्ष यांनी घेतली नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने दि. 14/05/2015 रोजी वकीलामार्फत विरुध्दपक्षास नोटीस पाठविली. सदर नोटीस विरुध्दपक्षाला दि. 15/05/2015 रोजी मिळाली. तरी सुध्दा विरुध्दपक्ष यांनी विम्याची रक्कम दिली नाही, तसेच नोटीसला उत्तर सुध्दा दिले नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवा देण्यात न्युनता, निष्काळजीपणा, हलगर्जीपणा दर्शविला व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रास तसेच आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला विमा दावा रु. 30,000/- दि. 26/03/2013 पासून तर रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे 18 टक्के दराने व्याजासह, तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 10 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2 . विरुध्दपक्ष यांना सदर प्रकरणाची नोटीस बजावणी झाल्यानंतर देखील विरुध्दपक्ष प्रकरणात गैरहजर राहील्यामुळे, सदर प्रकरण विरुध्दपक्षाविरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात विरुध्दपक्षाला मंचातर्फे नोटीस बजावल्यानंतर देखील विरुध्दपक्ष या प्रकरणात गैरहजर राहीला, त्यामुळे विरुध्दपक्षाविरुध्द सदर प्रकरण “एकतर्फी” चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला. सबब तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त व केलेला तोंडी युक्तीवाद ऐकुन, सदर प्रकरणात खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून म्हशीचा रु. 30,000/- चा विमा काढला आहे व त्याच्या प्रिमियम ची रक्कम रु. 1440/- असून पॉलिसी क्र. 16100047120400000345 असा आहे. सदर पॉलिसीचा कालावधी दि. 10/10/2012 ते 09/10/2015 पर्यंत होता. सदरहू म्हशीला टॅग नं. एनआयए/0174 असा विरुध्दपक्षाने दिला होता. सदर पॉलिसीचे दस्त तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेले आहेत, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा “ग्राहक होतो, असे ग्राह्य धरण्यात येते.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन, दि. 26/03/2013 रोजी तक्रारकर्त्याची म्हैस मरण पावली. त्यामुळे विमा पॉलिसी अंतर्गत म्हशीच्या मृत्यूचा दावा मिळण्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे अर्ज केला. त्यासोबत विरुध्दपक्षाने मागीतलेले आवश्यक कागदपत्रे तक्रारकर्त्याने दि. 13/09/2013 रोजी विरुध्दपक्षाला दिले, त्यामध्ये बिल्ला क्र. 174, क्लेम फॉर्म, फोटो तिन प्रतित, शवविच्छेदन अहवाल, किंमतीचा दाखला, पशुवैद्यकीय पावती, सरपंच, पोलीस पाटील यांचा दाखला, पंचनामा, मुळ प्रतीत दिले होते. तरी सुध्दा विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा क्लेम मंजुर केला नाही. तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्षाकडे क्लेमची मागणी केलेली आहे.
तक्रारकर्त्याने दि. 26/03/2013 चे Valuation Certificate प्रकरणात दाखल केलेले आहे. त्यानंतर Veterinary Health Certificate सुध्दा प्रकरणात दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून काढलेल्या विमा पॉलिसीनुसार तक्रारकर्त्याचे पुर्ण नुकसान झालेले आहे व सदर विमाकृत म्हशीचा मृत्यू हा विमा कालावधीत झालेला आहे. तक्रारकर्त्याने दि. 19/06/2014 ला विरुध्दपक्षाला क्लेम मिळण्यासाठी लेखी पत्र सुध्दा दिलेले आहे, त्या पत्राला विरुध्दपक्षाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. सदर पत्र तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेले आहे. एकंदरीत असे लक्षात येते की, तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे क्लेम रकमेची मागणी केल्यावरही व संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता केल्यावरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची दावा रक्कम दिली नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या कुठल्याच मागणीची पुर्तता न केल्याने तक्रारकर्त्यास सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करावी लागली. त्यानंतर मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीस विरुध्दपक्षास बजावल्यानंतर देखील विरुध्दपक्ष प्रकरणात गैरहजर राहीला, यावरुन विरुध्दपक्षाची नकारात्मक मानसिकता दिसून येते.
उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता, तक्रारकर्ता पॉलिसीनुसार देय विमा रक्कम रु. 30,000/- दि. 26/3/2013 पासून व्याजासह मिळण्यास पात्र ठरतो. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास सेवा देण्यास न्युनता, हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केलेला आहे, या निष्कर्षापत सदर मंच आले आहे, त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई रु. 5000/- व प्रकरणाचा खर्च रु. 3000/- मिळण्यास पात्र ठरतो.
सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास विमा रक्कम रु. 30,000/- ( रुपये तिस हजार फक्त ) दि. 26/03/2013 पासून प्रत्यक्ष अदाई पर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के व्याजासह द्यावेत
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या न्यायिक खर्चापोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावे
- विरुध्दपक्षाने सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.