( मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलिंद केदार, सदस्य) //- आदेश -// (पारित दिनांक – 05/02/2011) 1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्रा.सं.कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, तिच्या पतीने गैरअर्जदार क्र. 2 कडे कार्यरत असतांना, गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून जनता पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी क्र.47/160202/0356 अन्वये दि.15.09.99 ते 14.03.2009 या कालावधीकरीता रु.5,00,000/- ची काढली होती. दि.04.01.2004 रोजी तक्रारकर्तीचे पतीचे निधन ते पाथरखेडा तवा माईन -1 येथे कार्यरत असतांना झोपेत आगीत पडल्याने व हाड मोडल्याने झाला. सदर निधनाची सुचना गैरअर्जदार क्र. 2 व नंतर गैरअर्जदार क्र. 1 यांना दिली. तक्रारकर्तीने सदर मृत्युचा विमा दाव्याचा अर्ज आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना दिला व विमा दाव्याची रक्कम देण्याची विनंती केली. परंतू तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम मिळाली नाही. म्हणून तिने कायदेशीर नोटीस गैरअर्जदारावर बजावला. परंतू गैरअर्जदाराने तिला विमा दाव्याची रक्कम दिली नाही, म्हणून तक्रारकर्तीने मंचासमोर तक्रार दाखल केली व मागणी केली की, विमा दाव्याची रक्कम रु.5,00,000/- ही 12 टक्के व्याजासह देण्यात यावी, मानसिक त्रासाबाबत रु.50,000/- व प्रकरणाचा खर्च रु.10,000/- मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. आपल्या म्हणण्यादाखल तक्रारकर्तीने अंतिम अहवालाची प्रत, विमा प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, शव परीक्षण अहवाल, गैरअर्जदारांमधील सामंजस्य करार, उच्च न्यायालयाचा निवाडा व सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाची प्रत ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपले लेखी उत्तर कागदपत्रांसह दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्तीचे मृतक पती श्री. इंदरसिंग संभुगोड हे विमाकृत होते या संदर्भात कोणताही पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही. तसेच झोपेत असतांना आगीत पडल्याने मृत्यू झाला ही बाबही पचनी पडू शकत नाही असे आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज भरुन दिलेला नाही व आवश्यक दस्तऐवज गैरअर्जदार क्र. 1 ह्यांना दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी कोणतीही त्रुटी दिलेली नसल्याने त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्याची मागणी गैरअर्जदार क्र. 1 ने केली आहे. 4. गैरअर्जदार क्र. 2 ने आपल्या उत्तरात तक्रारकर्तीचा मृतक पती हा त्यांचा कर्मचारी होता व तो समूह जनता पर्सनल अपघात पॉलिसी अंतर्गत विमाकृत होता. पुढे असे नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र. 2 हे मध्यस्थाची भुमिका बजावित होते. तक्रारकर्ती ही त्यांची ग्राहक नाही. तसेच त्यांच्याविरुध्द विमा दाव्याची रक्कम मागू शकत नाही. आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरात गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्तीच्या मृतक पतीचा रु.5,00,000/- चा विमा होता असे नमूद करुन पुढे असेही म्हटले आहे की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू अपघातामुळे झाल्याची कोणतीही सुचना दिलेली नाही. तसेच विमा रक्कम मिळण्याबाबत कोणतेही दस्तऐवज व कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 2 ला दिलेली नाही. त्यांनी आपल्या विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे वरीष्ठ अधिकारी व वरीष्ठ मजदूर संगठन यांचेमध्ये एक समझोता पत्र/करारनामा/MOU (सामंजस्य करार) झालेला होता, त्यानुसार गैरअर्जदार क्र. 2 चे कर्मचारी विमाकृत करण्यात आले होते. त्यांनी पुढे हे मान्य केले आहे की, 23.02.2004 रोजी तक्रारकर्तीच्या पतीचे नाव मस्टररोलवरुन मरणोपरांत काढण्यात आले. गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारीतील इतर कथने अमान्य करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली. 5. सदर प्रकरण मंचासमोर दि.27.01.2011 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र. 1 आणि 2 यांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे व उभय पक्षांच्या कथनांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्तीचे पती हे गैरअर्जदार क्र. 2 चे कर्मचारी होते ही बाब गैरअर्जदार क्र. 2 चे लेखी कथनावरुन स्पष्ट होते. तसेच जनता पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी अंतर्गत विमाकृत होते हे सुध्दा गैरअर्जदार क्र. 2 च्या लेखी उत्तरावरुन स्पष्ट होते व त्यांचा विमा गैरअर्जदार क्र. 1 कडे उतरविला होता ही बाबसुध्दा गैरअर्जदार क्र. 2 च्या उत्तरावरुन स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्ती ही मृतक इंदरसिंग गोंड यांची पत्नी असल्याने गैरअर्जदाराची ग्राहक ठरते. कारण गैरअर्जदार क्र. 1 ही विमा कंपनी आहे व त्यांना गैरअर्जदार क्र. 2 ने विमा राशी दिलेली आहे आणि गैरअर्जदार क्र. 2 च्या कथनानुसार त्यांनी मध्यस्थांची भुमिका घेतली होती. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी सेवा पुरविली असल्याने, तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्तीच्या पतीचा 04.01.2004 रोजी जळाल्याने मृत्यू झाला ही बाब सिध्द करण्याकरीता तक्रारकर्तीने दस्तऐवज क्र. 2 वर मृत्यु प्रमाणपत्र दाखल केले आहे. सदर प्रमाणपत्रामध्ये मृत्यु दि.03.01.2004 व रजिस्ट्रेशन दि.04.02.2004 ला झाल्याचे नमूद केले आहे. परंतू शव परीक्षा आवेदनावरुन दि.04.01.2004 ही तारीख नमूद आहे. इतर सर्व दस्तऐवजांवर म्हणजेच शव परीक्षण प्रतिवेदन व मर्ज रीपोर्टमध्ये सुध्दा मृत्यु दि.04.01.2004 नमूद आहे. यावरुन तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू दि.04.01.2004 रोजी झाला हे स्पष्ट होते. तक्रारकर्तीच्या पतीचे नाव मरणोपरांत मस्टर रोलवरुन काढण्यात आले ही बाबसुध्दा गैरअर्जदार क्र. 2 च्या कथनावरुन सिध्द होते. यावरुन गैरअर्जदार क्र. 2 यांना तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्यु संदर्भात माहिती होती हे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्युबद्दल कोणताही आक्षेप नाही. परंतू त्याबाबतची माहिती गैरअर्जदार क्र. 1 ला नसल्याचे गैरअर्जदार क्र. 1 चे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्र. 2 ला याबाबत सर्व माहिती असतांना व गैरअर्जदार क्र. 1 व विमाधारक यामध्ये गैरअर्जदार क्र. 2 मध्यस्थ असून, गैरअर्जदार क्र. 2 मार्फत पॉलिसी काढली गेली, म्हणून त्यांनी परत याबाबत तक्रारकर्तीकडून दस्तऐवज मागणे हे अनुचित आहे. तक्रारकर्ती ही अशिक्षीत आहे व तिला त्यांनी इंग्रजीमध्ये पत्र पाठविले आहे. त्यातील मजकूर तक्रारकर्तीला समजणे ही फार कठीण बाब आहे व सर्व दस्तऐवज गैरअर्जदार क्र. 2 कडे असतांना त्यांनी ते पाठविणे गरजेचे होते. याशिवाय सामंजस्य करारानुसार (MOU) तक्रारकर्तीचे पती हे विमाकृत होते व गैरअर्जदार क्र. 2 चे सर्व कर्मचारी/कामगार जनता पर्सनल एक्सीडेंट अंतर्गत विमाकृत आहेत ही बाबसुध्दा गैरअर्जदार क्र. 2 ने मान्य केलेली आहे. तसेच सदर विमा दावा निकाली काढीत असतांना आवश्यक कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत. त्यामध्ये शव विच्छेदन अहवाल, शव परीक्षण अहवाल, मृत्यु प्रमाणपत्र व पोलीस रीपोर्ट हे दस्तऐवज आहेत. त्यांचासुध्दा उपयोग करुन गैरअर्जदार क्र. 1 हे दावा निकाली काढू शकतात. फक्त दस्तऐवज मिळाले नाही, एवढे कारण सांगून ते टाळणे ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. कारण विमा दावा निकाली काढण्याकरीता आवश्यक दस्तऐवज जर यापूर्वी तक्रारकर्तीने दिले नाही हे गैरअर्जदार क्र. 1 चे म्हणणे न पटण्यासारखे आहे. कारण सदर विमा दावा दाखल करण्याकरीता सर्व दस्तऐवज तक्रारीमध्ये दाखल आहेत. त्या आधारावरसुध्दा ते विमा दावा निकाली काढू शकले असते. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारीसोबत दिलेले दस्तऐवज गैरअर्जदार क्र. 1 ला मिळाले आहेत. त्या आधारे व सदर दस्तऐवजांचे निरीक्षण केले असता मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ती ही विमा दाव्याची रक्कम रु.5,00,000/- मिळण्यास पात्र ठरते. तसेच शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र ठरते. . वरील सर्व निष्कर्षाच्या आधारे मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या विमा दाव्याची रक्कम रु.5,00,000/- ही आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावी अन्यथा सदर रकमेवर गैरअर्जदार क्र. 1 तक्रार दाखल दिनांकापासून 05.05.2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज रक्कम अदा होईपर्यंत देण्यास बाध्य राहील. 3) गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |