( मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलिंद केदार, सदस्य) //- आदेश -// (पारित दिनांक – 05/02/2011) 1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्रा.सं.कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, तिच्या पतीने गैरअर्जदार क्र. 2 कडे कार्यरत असतांना, गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून जनता पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी क्र.47/160202/0356 अन्वये, विमा प्रमाणपत्र क्र.23357 असून दि.15.09.99 ते 14.03.2009 या कालावधीकरीता रु.5,00,000/- ची काढली होती. दि.10.06.2000 रोजी तक्रारकर्तीचे पतीचे निधन ते पाथरखेडा शोभापूर माईन -II येथे कार्यरत असतांना श्वास गुदमरुन झाला. सदर निधनाची सुचना गैरअर्जदार क्र. 2 व गैरअर्जदार क्र. 1 यांना दिली. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे तिने यापूर्वी मंचासमोर तक्रार क्र. 567/2008 दाखल केली होती व त्याद्वारे मंचाने आदेश पारित करुन विमा दाव्याची आवश्यक कागदपत्रे गैरअजदाराकडे दाखल करावी व 30 दिवसाचे आत दावा निकाली काढावा असे निर्देश दिले. तक्रारकर्तीने सदर मृत्युचा विमा दाव्याचा अर्ज आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार यांना दिला व विमा दाव्याची रक्कम देण्याची विनंती केली. परंतू तक्रारकर्तीचा विमा दावा हा पॉलिसी नियमात बसत नसल्याच्या कारणावरुन नाकारला. गैरअर्जदाराने मृतकाचे शरीरात ईथाई अल्कोहोलची मात्रा आढळून आल्याने दावा फेटाळला. तक्रारकर्तीच्या मते तिच्या पतीचा मृत्युचे कारण शव विच्छेदन अहवालामध्ये श्वास गुदमरुन झाल्याचे नमूद आहे. परंतू गैरअर्जदाराने त्याची दखल न घेता तक्रारकर्तीच्या मृतक पतीचा विमा दावा फेटाळला आहे, म्हणून तक्रारकर्तीने मंचासमोर तक्रार दाखल केली व मागणी केली की, विमा दाव्याची रक्कम रु.5,00,000/- ही 12 टक्के व्याजासह देण्यात यावी, मानसिक त्रासाबाबत रु.50,000/- व प्रकरणाचा खर्च रु.10,000/- मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. आपल्या म्हणण्यादाखल तक्रारकर्तीने दावा नाकारल्याचे पत्र, विमा प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, शव परीक्षण अहवाल, गैरअर्जदारांमधील सामंजस्य करार, उच्च न्यायालयाचा निवाडा व सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाची प्रत ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपले लेखी उत्तर कागदपत्रांसह दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्तीचे मृतक पती श्री. झिल्लु भादा तुमडाम गोंड हे विमाकृत होते हे मान्य केले आहे.. पुढे असे म्हटले आहे की, मृतकाचे शव विच्छेदन अहवाल (पी.एम.रीपोर्ट) व व्हिसेरा रीपोर्टप्रमाणे ईथाईल अल्कोहोल 181 एम.एल./एम.जी. आढळून आलेले आहे, म्हणजे झिल्लु भादा तुमडाम गोंड यांचा मृत्यु अधिक अल्कोहोल सेवन केल्याने उल्टी होऊन व ती श्वसन मार्गाने लॅरींक्समध्ये गेली व श्वास गुदमरल्याने झाला व सदर बाब ही अटी व शर्तीचे उल्लंघन करणारी आहे मृतकाचे भावाने मृतकाला अत्याधिक दारु पीण्याची सवय होती असे म्हटले आहे. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू हा अत्याधिक अल्कोहोलच्या सेवनाने झालेला असल्याने दावा नाकारल्याचे गैरअर्जदाराने म्हटले आहे. म्हणून त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्याची मागणी गैरअर्जदार क्र. 1 ने केली आहे. 4. गैरअर्जदार क्र. 2 ने आपल्या उत्तरात यापूर्वी मंचाने सदर प्रकारच्या तक्रारीवर आदेश पारित केला असल्यामुळे ही तक्रार मंचासमोर परत res judicata च्या तत्वाप्रमाणे चालू शकत नाही. तसेच विमा दावा देणे किंवा नाकारणे ही बाब गैरअर्जदार क्र. 1 च्या कार्यक्षेत्रात येते. त्याच्या सेवेत कुठलीही त्रुटी नाही. गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारीतील इतर कथने अमान्य करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली. 5. सदर प्रकरण मंचासमोर दि.27.01.2011 रोजी आले असता मंचाने तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र. 1 आणि 2 यांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे व उभय पक्षांच्या कथनांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्तीचे पती हे गैरअर्जदार क्र. 2 चे कर्मचारी होते व जनता पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी अंतर्गत विमाकृत होते हे गैरअर्जदार क्र. 2 च्या लेखी उत्तरावरुन स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्ती ही मृतक झिल्लु भादा तुमडाम गोंड यांची पत्नी असल्याने गैरअर्जदाराची ग्राहक ठरते. कारण गैरअर्जदार क्र. 1 ही विमा कंपनी आहे व त्यांना गैरअर्जदार क्र. 2 ने विमा राशी दिलेली आहे आणि गैरअर्जदार क्र. 2 च्या कथनानुसार त्यांनी मध्यस्थांची भुमिका घेतली होती. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी सेवा पुरविली असल्याने, तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्तीने यापूर्वी तक्रार क्र. 567/2008 मंचासमक्ष दाखल केली होती. त्यामध्ये मंचाने तक्रारकर्तीकडून दस्तऐवज प्राप्त झाल्यावर गैरअर्जदाराने 30 दिवसाचे आत दावा निकाली काढण्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना दस्तऐवज पूरवून गैरअर्जदार क्र. 2 ने प्राथमिक आक्षेप घेतला की, यापूर्वी तक्रारकर्तीने तक्रार दाखल केली असल्यामुळे तिला नंतर तक्रार दाखल करण्याचा अधिकार पोहोचत नाही. परंतू मंचाचे असे मत आहे की, तक्रार क्र. 567/08 आणि या तक्रारीतील तथ्य जरीही सारखे असले तरीही आक्षेप हे वेगवेगळे आहेत. मंचाने दिलेल्या आदेशानुसार तक्रारकर्तीने दस्तऐवज गैरअर्जदारांना दिले व त्यानंतर त्यांना विमा दावा निकाली काढला व तो नाकारला आहे आणि त्या नाकारण्याच्या कारणावरुन सदर तक्रार दाखल केलेली असल्यामुळे तक्रारीचे कारण सुध्दा वेगवेगळे आहे. त्यामुळेres judicataचे तत्व लागत नाही असे मंचाचे मत आहे. 8. गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्तीच्या पतीचा विमा दावा हा नाकारतांना मृतकाने अत्याधिक अल्कोहोल सेवन केल्याने उल्टी होऊन ती श्वसन मार्गाने लॅरींक्समध्ये गेली व श्वसन मार्ग अवरुध्द होऊन गुदमरल्याने मृत्यु झाला असे कारण नमूद केले आहे. परंतू ही बाब गैरअर्जदार क्र. 1 ने नाकारतांना कोणत्याही विशेष तज्ञांचा अहवाल किंवा वैद्यकीय तज्ञांचे मत दाखल केले नाही. फक्त व्हिसेरा रीपोर्टचा आधार घेऊन तक्रारकर्तीच्या मृतक पतीचे हृदय, फुप्फुस, यकृत, स्प्लीन आणि किडनी यामध्ये ईथाईल अल्कोहोल सापडल्याचे म्हटले आहे. परंतू रक्तामध्ये किती प्रमाणात अल्कोहोल होते ही बाब त्यावरुन स्पष्ट होत नाही. रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कळल्याशिवाय मृतक व्यक्ती हा अल्कोहोलच्या अधिपत्याखाली Influence of alcohol असा निष्कर्ष काढू शकत नाही. तसेच भूतकाळात झालेल्या उलटीला अल्कोहोल कारणीभूत आहे असे कोणतेही दस्तऐवज गैरअर्जदार क्र. 1 ने दाखल केलेले नाही. जरीही मृतकाचे भावाने मृतक हा अल्कोहोल घेत असल्याचे म्हटले आहे, तरीही मृत्यूस अल्कोहोल कारणीभूत असल्याचे ठरल्याशिवाय दावा नाकारणे चुकीचे आहे असे मंचाचे मत आहे. तसेच ज्या कारणासाठी दावा नाकारला ते कारण सिध्द करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते असे अनेक न्याय निवाडयातून मा. राष्ट्रीय आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारीत असतांना गैरअर्जदार क्र. 1 ने सेवेत त्रुटी केलेली आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ती विमा दाव्याची रक्कम रु.5,00,000/- मिळण्यास पात्र ठरते व सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांकापासून दि.05.05.2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याज मिळण्यास पात्र ठरते असे मंचाचे मत आहे. 9. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- ची व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ती न्यायोचितदृष्टया शारिरीक व मानसिक त्रासाकरीता क्षतिपूर्तीबाबत रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत 2,000/- मिळण्यास पात्र ठरते असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. वरील सर्व निष्कर्षाच्या आधारे मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या विमा दाव्याची रक्कम रु.5,00,000/- तक्रार दाखल दिनांकापासून 05.05.2010 पासून तर प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |