जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :21/04/2010 आदेश पारित दिनांक :02/02/2011 तक्रार क्रमांक :- 264/2010 तक्रारकर्ता :– ग्यानचंद कुन्दनलाल जैन, वय अंदाजेः वर्षे, व्यवसायः मे.रहतुमल ग्यानचंद जैन फर्मचे मालक, राह. अनाज बजार, इतवारी, नागपूर. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. दि न्यु इंडिया अश्युअरंन्स कंपनी मर्यादीत, दि न्यु इंडिया अश्युअरंन्सबिल्डींग, 87, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई. 2. वरिष्ठ व्यवस्थापकीय प्रबंधक, दि न्यु इंडिया अश्युअरंन्स कंपनी मर्यादीत, ‘उदयम’, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, नागपूर. तक्रारकर्त्याचे वकील :– श्री. ए.एस. मेहाडीया. गैरअर्जदाराचे वकील :– श्री. एस.एम. पाळधीकर. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 02/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 21.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने त्याच्या गोदामातील मालाचा विमा गैरअर्जदारांकडे उतरविला होता त्याचा पॉलिसी क्रमांक 160200/46/07/04/00000255 हा असुन कालावधी दि.21.01.2008 ते 21.01.2009 पर्यंतचा होता. दि.11.10.2008 रोजी तक्रारकर्त्याचे प्रतिनिधीने गोदामाला भेट दिली असता त्यातील 65 ते 70 चन्याची पोती चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याने गैरअर्जदारांकडे त्याबाबतचा विमा दावा दाखल केला आहे. 3. गैरअर्जदारांतर्फे श्री. संतोष कुलकर्णी, यांची सर्वेअर म्हणून नेमणूक केली होती व त्यांनी मागीतलेली सर्व कागदपत्रे तक्रारकर्त्याने पुरविली होती. परंतु गैरअर्जदारांनी एक वर्ष पर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही व एक वर्ष झाल्यानंतर पॉलिसींच्या शर्तींचा भंग केला असा आरोप लावून दावा नाकारला. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदारांनी त्याला पॉलिसीच्या अटी व शर्तींचे पत्र कधीही दिले नव्हते. त्यामुळे अटी व शर्तींचा भंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना नोटीस दिली होती, परंतु त्यांनी नोटीस मिळूनही उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केलेली असुन त्याव्दारे रु.1,70,000/- द.सा.द.शे. 15% व्याजासह मिळावे. तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च देण्याबाबत मंचास विनंती केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारांवर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 5. गैरअर्जदारांनी तक्रारीतील सर्व विपरीत विधाने अमान्य केली व पॉलिसीची बाब मान्य केली आहे व असा उजर घेतला आहे की, तक्रारकर्त्याचे गोदाम दि. 29.09.2008 ते 10.10.2008 या कालावधीत सुरक्षेविना कुलूपबंद होते. पॉलिसीच्या शर्तीप्रमाणे 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधीत अशी परिस्थिती राहिल्यास ते विम्याची रक्कम देणे लागत नाही. त्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्याचा दावा नाकारलेला आहे, तसेच सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 6. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत फर्मचे नोंदणीकृत प्रमाणपत्र, पॉलिसीची कव्हरनोट पावतीसह, पहिली खबर रिपोर्ट, सर्वेअरने तक्रारकर्त्यास पाठविलेले पत्र, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2 ला पाठविलेले पत्र, सर्वेअरने दि.14.11.2008 रोजी तक्रारकर्त्यास पाठविलेले पत्र, तक्रारकर्त्याने सर्वेअरला दि.03.10.2009 रोजी पाठविलेले पत्र, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचा दावा नामंजूर केल्याचे पत्र, गैरअर्जदारांना पाठविलेल्या नोटीसची प्रत पावतीसह व मंचात इंग्रजीत दाखल केलेली तक्रार इत्यादी दस्तावेज दाखल केलेले आहेत. तर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीला दिलेल्या उत्तरासोबत विम्याची छायांकीत प्रत दाखल केलेली आहे. 7. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.21.01.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 8. यातील गैरअर्जदारांचा बचाव पाहता तक्रारकर्त्यास पॉलिसीसोबत त्यातील अटी व शर्तींची प्रत मिळणे गरजेचे होते, ती बाब तक्रारकर्त्याने स्पष्टपणे नाकारलेली आहे. त्यामुळे अशा अटी व शर्तींची प्रत तक्रारकर्त्यास पॉलिसीसोबत दिली हे सिध्द करण्याची जबाबदारी गैरअर्जदार विमा कंपनीची आहे. तसेच तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना नोटीस दिली होती त्यामध्ये सदर बाब स्पष्टपणे नमुद केली होती, परंतु गैरअर्जदारांनी नोटीसला उत्तर देऊन ती नाकारली नाही. 9. गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रतिंवर अटी व शर्तीं जोडलेल्या आहेत असा कोठेही उल्लेख नाही. तसेच अटी व शर्तीं तक्रारकर्त्यास पाठविल्या होत्या व त्यांना त्या मिळाल्या होत्या हे दर्शविणारी पोच पावती नाही. त्यामुळे पॉलिसीवर अटी व शर्ती नमुद केलेल्या नसल्यामुळे गैरअर्जदार त्या कारणावरुन तक्रारकर्त्यांचा दावा नाकारु शकत नाही. आणि तक्रारकर्त्यांचा विमा गैरअर्जदारांनी एक वर्ष प्रलंबीत ठेवुन अशा कारणासाठी नाकारला ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. 10. तक्रारकर्त्यांनी त्याचे नुकसानीसंबंधी ते कीती आहे हे दर्शविणारा कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही. गैरअर्जदारांनी सुध्दा यासंबंधीचा कोणताही अहवाल सर्वेअरकडून घेऊन दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याचे चन्याची 65 ते 70 पोती होती असे FIR मध्ये नमुद आहे. त्यामुळे 65 पोते चना प्रति क्विंटल रु.2,000/- या भावाने गृहीत धरल्यास रु.1,30,000/- इतकी नुकसान भरपाई तक्रारकर्ते मिळण्यांस पात्र आहे. 11. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांस रु.1,30,000/- एवढी रक्कम 65 पोती चना चोरी गेल्याबद्दल नुकसानीची व तीवर नुकसानीदाखल रक्कम नाकारल्याची तारीख 19.11.2009 पासुन द.सा.द.शे.9% व्याजासह अदा होईपर्यंत अदा करावी. 3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा देय रकमेवर द.सा.द.शे. 9% ऐवजी द.सा.द.शे.12% दंडनीय व्याज देय राहील. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |