नि. 31
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
मा.सदस्या – श्रीमती मनिषा कुलकर्णी – रजेवर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2106/2009
तक्रार नोंद तारीख : 15/09/2009
तक्रार दाखल तारीख : 22/09/2009
निकाल तारीख : 07/04/2011
फेरचौकशीची तारीख : 17/01/2013
फेरनिकाल तारीख : 31/07/2013
---------------------------------------------------
संभाजी केशव चव्हाण
व.व.51, धंदा- ट्रान्सपोर्ट
रा.घोगांव, ता.पलूस, जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कं.लि.
कामगार भवन बिल्डिंग, इचलकरंजी,
जि.कोल्हापूर तर्फे शाखा माता बिल्डिंग, आंबेडकर रोड, सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे अॅड. : श्री एम.एन.शेटे
जाबदार तर्फे अॅड. : श्रीमती एम.एम.दुबे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, वर नमूद तक्रारदाराने, ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 12 खाली, दाखल केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी आपल्या मालकीच्या टेम्पो या वाहनाचा विमा जाबदार यांच्याकडे उतरवला होता. सदर विम्याची मुदत ही दि.03/01/2008 ते दि.02/01/2009 अशी होती. विमा मुदतीत दि.25/09/2008 रोजी सदर वाहनास अपघात झाला. सदर अपघातामुळे वाहनाचे झालेले नुकसान भरपाई मिळणेबाबत जाबदार यांच्याकडे विमा दावा दाखल केला. परंतु जाबदार यांनी दि.04/06/2009 रोजी ड्रायव्हिंग लायसन्स बाबतचा योग्य तो परवाना वाहनचालकाकडे नसल्याने पॉलिसीमधील अटी व शर्तीचा भंग होतो, या चुकीच्या कारणास्तव तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेला खर्च तसेच इतर तदअनुषंगिक मागण्यासाठी दाखल केला आहे.
3. तक्रारअर्जाचे पुष्ठयर्थ तक्रारदार यांनी नि.3 ला शपथपत्र व नि.5 च्या यादीने एकूण 7 कागद दाखल केले आहेत.
4. जाबदार यांनी नि.15 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील बहुंताश मजकूर नाकारला आहे. तक्रारदारच्या वाहनाचा जाबदार यांच्याकडे विमा उतरविला होता ही गोष्ट जाबदार यांनी मान्य केली आहे. तक्रारदार यांचा टेम्पो हा ट्रान्सपोर्ट व्हेइकल या प्रकारचा होता व अपघाताचे वेळी वाहनचालक संदीप चांदोले यांच्याकडे असलेले लायसन्स हे लाइट मोटार व्हेइकल या प्रकारचे होते. त्यामुळे अपघाताच्या वेळेस वाहनचालकाकडे वैध परवाना नव्हता, त्यामुळे पॉलिसीमधील अटी व शर्तीचा भंग झालेने तक्रारदार यांचा विमा दावा नाकारण्यात आला आहे. यामध्ये जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी जाबदार यांनी मागणी केली आहे.
5. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ नि.16 ला शपथपञ दाखल केले आहे.
6. तक्रारदार यांनी नि.17 वर तर जाबदार यांनी नि.18 वर लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
7. सुरुवातीला या मंचाने उभय पक्षकारांचे पक्षकथन व युक्तिवाद आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करुन जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमादावा नामंजूर करण्यात कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही असा निष्कर्ष काढला. तो निष्कर्ष काढण्याकरिता तक्रारदाराचे ड्रायव्हर संदीप चांदोले याचेजवळ अपघातसमयी Light Motor Vehicle (N.T.) या प्रकारचा परवाना होता. तथापि अपघातग्रस्त वाहन हे Goods Carrying Vehicle होते व त्याचे gross weight 11900 kg.होते. यावरुन ते वाहन Light Motor Vehicle या सदरात मोडत नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी पॉलिसीमधील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारला, त्यामध्ये तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही अशा निष्कर्षावरुन प्रस्तुतची तक्रार दि.7/4/11 च्या न्यायनिर्णयाने नामंजूर करण्यात आली (नि.25). तक्रारदाराने नि.21 वर तक्रार दुरुस्त करण्याचा अर्ज सादर करुन नि.24 सोबत काही कागदपत्रे दाखल करण्यात आली. त्या कागदपत्रांमध्ये अपघातावेळी संबंधीत वाहन चालकाजवळ Heavy goods vehicle चालविण्याचा शिकाऊ परवाना होता, असे जरी तक्रारदारतर्फे प्रतिपादन करण्यात आले असले तरी तक्रारदार यांनी फक्त झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या दिसतात व कथित Heavy goods vehicle परवान्याच्या एकाच कागदाची प्रत सादर केलेली असल्याने कोणताही निष्कर्ष काढता येणे शक्य नाही तसेच सदर कागदपत्रे विमा कंपनीला वेळेत दिलेली होती असा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे त्या कागदपत्रांचा विचार करता येत नाही असे या मंचाने आपल्या न्यायनिर्णयात नमूद केले. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमादावा नाकारुन कोणतीही सदोष सेवा दिलेली नसल्याने तक्रारदार हा मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र नाही, सबब प्रस्तुतची तक्रार खारीज करावी या निष्कर्षाला हे मंच आले आणि त्याप्रमाणे प्रस्तुत तक्रार दि.7/4/11 रोजी नामंजूर करण्यात आली.
8. सदर न्यायनिर्णयावर तक्रारदाराने मा.राज्य आयोग यांचेसमोर First Appeal No. A/11/531 दाखल केले. त्या अपिलाचा निकाल दि.10/12/2012 रोजी लागला आणि त्याद्वारे या मंचाचा दि.7/4/2011 चा या मंचाचा निर्णय रद्दबातल ठरविण्यात आला व संपूर्ण तक्रार या मंचाकडे फेरचौकशीकरीता पाठविण्यात आली व दोन्ही पक्षांना त्यांचे पक्षकथन दुरुस्त करण्याची संधी देवून व अतिरिक्त पुरावा देण्याची संधी देवून पुन्हा कायद्याप्रमाणे तक्रारअर्जाचा निर्णय करावा असा आदेश मा.राज्य आयोगाने दिला. मा. राज्य आयोगाचे मत असे होते की, तक्रारदाराचा स्पष्टीकरण देणारा दुरुस्ती अर्ज नाकारुन तक्रारदारास आपली केस शाबीत करण्याची संधी नाकारण्यात आली. तसेच तक्रारदाराचा विमादावा नाकारण्यासंबंधी जाबदार विमा कंपनीने जी कारणे दिली होती, त्यासंबंधीच्या पुराव्याचा विचार दि.7/4/2011 च्या न्यायनिर्णयात केलेला नाही. तसेच ज्या वेळेला सकृतदर्शनी तक्रारदाराने हे दाखविले होते की, घटनेच्या समयी त्याचे वाहन चालविणा-या वाहन चालकाजवळ वैध व योग्य वाहन चालविण्याचा परवाना होता असे दाखविणारा काहीतरी कागद तक्रारदाराने दाखल केला असता तर तक्रारदारास तो पुरावा देण्याची संधी देण्याची आवश्यकता होती व ती न दिल्याने सदरचा न्यायनिर्णय रद्दबातल करण्यास पात्र आहे अशा मुद्यावरुन वर नमूद केलेप्रमाणे या मंचाचा दि.7/4/2011 चा न्यायनिर्णय रद्दबातल करण्यात आला व प्रस्तुत प्रकरण फेरचौकशीकरीता या मंचाकडे पाठविण्यात आले.
9. मा. राज्य आयोगाने आपल्या न्यायनिर्णयात नमूद केले तारखेस तक्रारदार या मंचासमोर उपस्थित झाले व त्यांनी आपली हजेरी पुरसिस नि.25 ला दाखल करुन या मंचासमोर मांडली. जाबदार विमा कंपनी दि.26/3/13 रोजी या मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपली Reappearance pursisनि.27 ला दाखल केली. तक्रारदाराने आपणास अधिक पुरावा द्यावयाचा नाही अशी पुरसिस नि.28 ला दाखल केली, तर जाबदार विमा कंपनीतर्फे नि.30 चे फेरिस्तसोबत घटनेच्या वेळेला वादातील वाहन चालविणा-या वाहन चालकाजवळील मोटार वाहन परवान्याचा दाखला, जो उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी दिला, तो दाखल केला आहे. त्याशिवाय उभय पक्षांनी इतर कोणताही नवीन पुरावा या मंचासमोर दिलेला नाही. या ठिकाणी हे आवर्जून नमूद करावे लागेल की, तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जात दुरुस्ती करण्याच्या अर्जावर (नि.17) वर कसलाही वाद अथवा विवाद उपस्थित केलेला नाही. जरी मा. राज्य आयोगाने आपल्या आदेशामध्ये या मंचास उभय पक्षकारांना आपल्या पक्षकथनात आवश्यक ती दुरुस्ती करण्यास परवानगी देण्याचा आदेश दिला होता, तरीही त्या आदेशानुरुप तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जात काही एक दुरुस्ती करण्याचे प्रयत्न केले नाही. वर नमूद केलेप्रमाणे कोणताही नवीन पुरावा या प्रकरणात सादर केलेला नाही. सबब या मंचास प्रस्तुत प्रकरण आहे त्या पुराव्यावर निर्णीत करणे भाग पडत आहे.
10. प्रस्तुत प्रकरण या मंचासमोर फेरचौकशीकरिता आलेनंतर आम्ही उभय पक्षकारांचे विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्या युक्तिवादावरुन व सादर करण्यात आलेल्या पुराव्यावरुन आणि उभय पक्षांच्या पक्षकथनांवरुन खालील मुद्दे आमच्या निर्णयाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक होतो काय ? होय.
2. तक्रारदाराचा विमादावा फेटाळून जाबदार विमा कंपनीने नाही.
त्यास दूषित सेवा दिली आहे काय ?
3. तक्रारदाराच्या तक्रारअर्जातील मागण्या मंजूर होण्यास पात्र आहेत काय ? नाही.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
11. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1
11. जाबदार विमा कंपनीने आपल्या लेखी कैफियतीमध्ये तक्रारदार हा तक्रारअर्जात नमूद केलेल्या वाहनाचा मालक होता व त्या वाहनासंबंधी तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडून दि.3/1/08 ते 2/1/09 या कालावधीकरिता विमा उतरविला आहे ही बाब जाबदार विमा कंपनीने मान्य केली आहे. तसेच दि.25/9/08 रोजी सदर वाहनास अपघात झाला ही बाब जाबदार विमा कंपनीने अमान्य केलेली नाही. सदर अपघातात नादुरुस्त झालेल्या वाहनाच्या नुकसान भरपाईकरिता तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला होता व तो विमा दावा जाबदार विमा कंपनीने नाकारला ही बाब देखील जाबदार विमा कंपनीने नाकारलेली नाही. या बाबींवरुन ही गोष्ट सिध्द होते की, जाबदार आणि तक्रारदार यांचेमध्ये सेवा देणार आणि ग्राहक असे नाते होते त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक होतो. जाबदार विमा कंपनीनेदेखील आपल्या कैफियतीमध्ये तक्रारदार हा ग्राहक होत नाही असे कथन केलेले नाही. त्याहीमुळे वरील मुद्दा क्र.1 चे उत्तर हे होकारार्थी द्यावे लागेल आणि तसे ते आम्ही दिलेले आहे.
मुद्दा क्र.2
12. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराचा विमादावा जाबदार विमा कंपनीने नाकारला. तो नाकारताना जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केला म्हणून विमा दावा नाकारला असे नमूद केले आहे. जाबदार विमा कंपनीचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराचा वाहनचालक, जो अपघातसमयी सदर वाहन चालवित होता, त्याचे जवळ ट्रान्स्पोर्ट व्हेईकल या प्रकारचे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता त्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग झाला आणि त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा नाकारलेला आहे. सबब जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे सदर वाहन चालकाजवळ Light Motor Vehicleया प्रकारचे वाहन चालविण्याचा वैध परवाना होता. अपघातातील वाहन हे Light Motor Vehicle या श्रेणीतील वाहन होते. Motor Vehicles Act, 1994मधील तरतुदीनुसार Light Motor Vehicle या श्रेणीतील वाहन परवाना धारकास ज्या ज्या वाहनांचे unladen weight 7500 kg पेक्षा जास्त नसेल अशा प्रकारची वाहने, मग त्यात व्यापारी वाहने असली तरी ती चालवता येऊ शकतात. अपघातग्रस्त वाहनाचे भाररहित वजन हे 3305 किलोग्रॅम इतके होते त्यामुळे ते Light Motor Vehicle (Transport vehicle) अशा श्रेणीतील होते आणि तक्रारदाराचे वाहन चालक ते वाहन चालविण्यास सक्षम होते आणि म्हणून तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केलेला नाही, सबब, त्याचा विमादावा फेटाळता येत नव्हता.
13. प्रस्तुतचे प्रकरणात फेरिस्त नि.5 ला अनुक्रमांक 3 वर सदर वाहनाचे आर.बी.बुक व अनुक्रम 4 वर संबंधीत कालावधीतील विमा पॉलिसी दाखल केली आहे. या मंचाने आपल्या दि.7/4/11 च्या न्यायनिर्णयात या बाबींची नोंद घेतली. सदर वाहनाचे आर.सी.बुकावरुन अपघातग्रस्त वाहन हे टेम्पो या प्रकारातून टँकरमध्ये बदलून घेतल्याचे दिसते आणि सदर वाहन हे Goods Carrierवाहन या प्रकारचे आहे याची नोंद घेण्यात आली आहे. दाखल केलेली पॉलिसी ही Goods Carrying vehicleया प्रकारची पॉलिसी आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम 2(21) मध्ये Light Motor Vehicle ची व्याख्या अशी करण्यात आली आहे की, हलके मोटार वाहन (Light Motor Vehicle) म्हणजे एखादे वाहतूक करणारे वाहन किंवा ओम्नी बस, ज्याचे एकूण वजन (Gross weight) किंवा मोटर कार किंवा ट्रॅक्टर किंवा रोड रोलर यांचे भाररहित वजन (unladen weight) हे 7500 किलोग्रॅम पेक्षा जास्त नाही. या प्रकरणातील वाहन हे ट्रान्स्पोर्ट व्हेईकल असल्याने त्याचे एकूण वजन (Gross weight) विचारात घेणे आवश्यक आहे. जरी सदरचे वाहन हे टेम्पो प्रकारातून टॅंकरमध्ये बदलून घेतले आणि त्यानंतर पुन्हा टेम्पो या प्रकारात बदलून घेतल्याचे दिसते आणि जरी या बदलानंतर सदर वाहनाचे भाररहित वजन (unladen weight) हे 3305 कि.ग्रॅम/4760 कि.ग्रॅम/3305 कि.ग्रॅम इतके दर्शविण्यात आले असले तरी, सदर वाहनाचे एकूण वजन हे 11900 किलोग्रॅम एवढे राहिले आहे. त्यामुळे आणि सदरचे वाहन हे Goods Carrying vehicle असल्यामुळे मोटार वाहन कायद्याच्या कलम 2(21) अन्वये ते हलके व्यापारी वाहन आहे की नाही हे ठरविण्याकरिता त्याचे एकूण वजन (Gross weight) हे विचारता घ्यावे लागेल आणि ते बघता सदरचे वाहन हे हलके मोटार वाहन (व्यापारी) असे होऊ शकते. त्या वाहनाचे मूळ स्वरुप हे मध्यम मोटार वाहन असेच राहते आणि राहिलेले असल्याचे आर.सी.बुकावरुन दिसते. मोटारवाहन कायद्याच्या कलम 2(16) मध्ये भारी वाहतूक वाहन (Heavy Goods vehicle) याचा अर्थ असे कोणतेही माल वाहतूक वाहन की ज्याचे एकूण वजन किंवा एखादा ट्रॅक्टर किंवा रोड रोलर ज्यांचे भाररहित वजन 12000 किलोग्रॅम पेक्षा जास्त आहे असे वाहन. त्याच कायद्याच्या कलम 2(21) अन्वये हलके मोटार वाहन म्हणजे असे वाहतूक करणारे वाहन किंवा ओम्नी बस ज्याचे एकूण वजन किंवा एखादी मोटार कार किंवा ट्रॅक्टर किंवा रोड रोलर, ज्याचे भाररहित वजन हे 7500 किलोग्रॅम पेक्षा जास्त नाही, तर कलम 2(23) अन्वये मध्यम वाहतूक वाहन म्हणजे असे माल वाहतूक करणारे वाहन की जे हलके मोटार वाहन किंवा भारी माल वाहतुक करणारे वाहन नाही. मोटार वाहन कायद्याच्या कलम 3 अनुसार कोणताही इसम कोणत्याही सार्वजनिक जागी त्याच्याजवळ मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्यास कोणतेही वाहन चालवू शकत नाही. असा कोणताही इसम मालवाहतूक मोटार वाहन, एखादी मोटार कॅब किंवा मोटार सायकल, जी त्याच्या व्यक्तीगत उपयोगाकरिता भाडयाने घेतली आहे, अशी वगळता त्याचे मोटार चालविण्याच्या अनुज्ञप्तीवर व्यापारी वाहन अशी नोंद असल्याशिवाय चालवू शकतो. केंद्रीय सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 पारीत केलेला असून त्यामध्ये मोटार वाहन परवाना मिळण्याकरिता विहीत केलेला फॉर्म नं.4 नमूद केला आहे. मोटार वाहन कायदा 1988 व तत्संबंधीचे अधिनियम यांच्यात दि.28/3/2001 रोजी करण्यात आलेल्या सुधारणांपूर्वी मोटार वाहन परवाना मिळविण्याकरिता मोटार वाहने एकूण 4 प्रकारात विभागली आहेत. (1) मोटार व्हेईकल (2) मध्यम माल वाहतूक वाहन (3) भारी माल वाहतूक वाहन (4) त्या उपकलमात नमूद केलेली इतर वाहने. 2001 साली झालेल्या सुधारणांनंतर संबंधीत फॉर्म मध्ये (1) हलके मोटार वाहन (2) वाहतूक करणारे वाहन (3) त्या उपकलमात नमूद केलेली इतर प्रकारची मोटार वाहने एवढेच प्रकार नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, आता मोटार वाहन कायद्यामध्ये मध्यम माल वाहतूक वाहने आणि भारी माल वाहतूक वाहने असे प्रकार नसून एकाच प्रकारचे व्यापारी वाहन असा ठरविण्यात आला आहे.
14. मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्र.4834/13 S. Iyyapan Vs. M/s United India Insurance Co.Ltd. या अपिलातील अनरिपोर्टेड न्यायनिर्णयात मोटार वाहन कायद्यातील या सुधारणांचा उल्लेख करुन असे नमूद केले आहे की, असा मोटार वाहन चालक की, ज्याचेजवळ हलके मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना आहे, असा वाहन चालक हलके माल वाहतूक करणारे वाहन देखील चालवू शकतो. याकरिता मा. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या National Insurance Co.Ltd. Vs. Annappa Irrappa Nesaria 2008(3) SCC 464 मधील न्यायनिर्णयांचा आधार घेतला. सदर न्यायनिर्णयात देखील मा. सर्वोच्च न्यायालयाने मोटार वाहन कायद्यातील सुधारणांचा परिपूर्ण विचार करुन असा दंडक घालून दिलेला आहे की, मध्यम माल वाहतूक वाहन आणि भारी माल वाहतूक वाहन याकरिता वाहतूक करणारे वाहन हा शब्द कायद्यात आता नमूद करण्यात आलेला असून हलके मोटार वाहन या संज्ञेत हलके प्रवासी वाहतूक करणारे वाहन आणि हलके माल वाहतूक करणारे वाहन हे दोन्ही समाविष्ट होतात. त्यामुळे ज्या वाहन चालकाजवळ हलके मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना आहे, त्यास हलके माल वाहतूक वाहन चालविण्याचा देखील अधिकार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे वरील न्यायनिर्णयावर अवलंबून राहून तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरण फेरचौकशीला या मंचाकडे प्राप्त झालेनंतर आपली केस केवळ याच मुद्यावर सीमीत केली की, संबंधीत वाहन हे हलके माल वाहतूक करणारे वाहन होते आणि ज्याअर्थी तक्रारदाराचे त्यावेळच्या चालकाजवळ हलके मोटार वाहन चालविण्याचा वैध परवाना होता, त्याअर्थी त्यास अपघातातील संबंधीत वाहन चालविता येत होते आणि म्हणून तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तींचा भंग केलेला नव्हता. सबब विमा कंपनीस त्याचा विमा दावा नाकारता येत नव्हता. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने प्रकरण चालू असताना आणि न्यायनिर्णय होण्याकरिता प्रलंबित असताना प्रस्तुत प्रकरणात दुरुस्ती करुन संबंधीत वाहन चालकाजवळ अपघाताचे समयी भारी माल वाहतूक वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना होता आणि अपघातसमयी तो वाहन चालक सर्व कायदेशीर नियमांचे पालन करुन संबंधीत वाहन चालवित होता म्हणून देखील तक्रारदाराने कोणत्याही अटी व शर्तींचा भंग केलेला नव्हता अशी केस मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदाराचा तो दुरुस्तीचा अर्ज तत्कालीन मंचाने फेटाळला होता. अपिलामध्ये मा. राज्य आयोगाने तक्रारदारास सदरची बाब शाबीत करण्याची संधी देण्याकरिता म्हणून प्रकरण फेरचौकशीकरिता या मंचाकडे पाठविले होते. तथापि ज्यावेळेला प्रस्तुत प्रकरण फेरचौकशीकरता घेण्यात आले, त्यावेळेला तक्रारदाराचे विद्वान वकील श्री एम.एन.शेटे यांनी या मंचासमोर आपल्याला नवीन कोणताही पुरावा द्यावयाचा नाही, आहे त्या पुराव्यावर मंचाने प्रस्तुत प्रकरण न्यायनिर्णीत करावे आणि मा. सर्वोच्च न्यायालयाच्या S. Iyyapan Vs. M/s United India Insurance Co.Ltd. या प्रकरणातील दंडकावर अवलंबून राहून प्रस्तुत प्रकरणाचा निकाल करावा असे प्रतिपादन केले. आम्ही हे वर नमूद केलेच आहे की, प्रस्तुत प्रकरण फेरचौकशीला आल्यानंतर उभय पक्षकारांनी कोणताही नवीन पुरावा दिलेला नाही. जरी तक्रारदाराने काही कागदपत्रे, जी असे दर्शवितात की, संबंधीत वाहन चालकाजवळ अपघाताचे समयी भारी माल वाहतूक करणारे वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना होता, तरी तक्रारदारांचे विद्वान वकीलांच्या वर नमूद केलेल्या विधानामुळे त्या कागदपत्रांचा विचार करण्याची आवश्यकता आम्हांस भासत नाही. मा.राज्य आयोगाने आणि या मंचाने तक्रारदारास संधी देवून देखील तक्रारदाराने त्या संधीचा उपयोग केलेला नाही आणि नि.28 ला पुरसीस देवून त्याला तोंडी अथवा लेखी पुरावा मंचाकडे द्यावयाचा नाही असे प्रतिपादन केले आहे.
15. हे जरुर आहे की, तक्रारदाराने फेरिस्त 5 सोबत संबंधीत वाहन चालक संदिप रामचंद्र चांदोले याचा वाहन परवाना दाखल केलेला आहे व त्यातून असे दिसते की, सदर संदीप चांदोले जवळ अपघातसमयी दि.14/5/02 ते 13/5/22 या कालावधीकरिता Light Motor Vehicle (NT) चालविण्याचा वैध परवाना होता. प्रस्तुत प्रकरणात हा प्रश्न उद्भवतो की, तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहन हे हलके वाहन होते की भारी वाहन होते. संबंधीत वाहनाचे आर.सी.बुक बघीतलेनंतर त्याचे एकूण वजन (gross unladen weight) हे 11900 कि.ग्रॅम इतके होते व आहे. त्यामुळे सदरचे वाहन कोणत्याही दृष्टीने हलके मोटार वाहन या प्रकारात मोडत नाही. सदरचे वाहन माल वाहतूक करणारे वाहन होते ही बाब दोन्ही पक्षकारांना कबूल आहे. किंबहुना जर असे असेल तर तक्रारदारास मा.सर्वोच्च न्यायालयाचे वर नमूद न्यायनिर्णयाचा कसलाही फायदा करुन घेता येत नाही. सदर वाहन चालकाजवळ भारी माल वाहतूक करणारे मोटार वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना होता आणि त्यामुळे तो अपघातग्रस्त वाहन चालविण्यास सक्षम होता ही केस तक्रारदारास संधी देवून देखील त्याने शाबीत केलेली नाही किंवा त्याचे कृत्यातून ती सोडून दिलेची दिसते. सबब तक्रारदार हे सिध्द करु शकले नाहीत की, अपघातसमयी त्याचे वाहन चालकाजवळ अपघातग्रस्त वाहन चालविण्याचा वैध परवाना होता आणि त्यायोगे त्याने विमा पॉलिसीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग केलेला नाही. मा.राज्य आयोगाने व या मंचाने तक्रारदारास संधी देवूनदेखील त्याने ती केस शाबीत केली न केल्याने त्यांचा विमा दावा योग्य व वैध कारणाकरिता जाबदार विमा कंपनीने फेटाळला असेच ठरवावे लागेल आणि त्यायोगे तक्रारदाराचा दावा फेटाळून त्यास कोणतीही दूषित सेवा दिल्याचे दिसून येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच आलेले आहे. करिता आम्ही वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी दिलेले आहे.
मुद्दा क्र.3 व 4
16. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी दिल्याने तक्रारदाराने केलेल्या मागण्या मान्य होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्याचा विमादावा हा योग्य आणि वैध कारणाकरिता जाबदार विमा कंपनीने फेटाळला आहे, त्यास कोणतीही दूषित सेवा किंवा सेवेतील त्रुटी जाबदार विमा कंपनीने दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची कोणतीही मागणी मान्य करता येत नाही. सबब प्रस्तुतची तक्रार ही खारीज करावी लागेल या निर्णयास हे मंच आलेले असून आम्ही मुद्दा क्र.3 चे उत्तर नकारार्थी दिलेले आहे.
17. जाबदार विमा कंपनीचे विद्वान वकील सौ एम.एम.दुबे यांनी तक्रारदाराची तक्रार ही खोटी असून ती जाबदार विमा कंपनीस त्रास देण्याकरिता म्हणून दाखल केलेली असल्याने तक्रारदारावर नुकसान भरपाई म्हणून खर्च बसवून प्रस्तुतची तक्रार खारीज करावी अशी मागणी केली. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदाराने योग्य त्या दिशेने पाऊल टाकले होते तथापि आपल्याच कृत्याने ते पाऊल मागे घेतले आणि मा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि तो करीत असताना त्यास सहजरित्या शाबीत करण्याजोगी गोष्ट त्याने सिध्द करण्याचे नाकारले. या कारणावरुन त्याची तक्रार ही खारीज होत आहे तथापि ही तक्रार तद्दन खोटी आहे किंवा जाबदार विमा कंनीस त्रास देण्याकरिता म्हणून दाखल केली आहे असे म्हणता येत नाही. सबब जाबदार विमा कंपनीची ही मागणी मान्य करता येत नाही. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
सांगली
दि. 31/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष