तक्रारदार : वकील हजर. सामनेवाले : वकील हजर. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. तक्रारदार ही भागीदारी संस्था असून त्यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले विमा कंपनी यांचेकडून आपले व्यवसायातील मालाचा तसेच फर्नीचर व संगणक यांचा विमा उतरविला होता. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे मुंबई येथे दिनांक 4 जुलै, 2006 रोजी झालेल्या पावसामध्ये तक्रारदारांचे दुकानातील इमारतीचे तळ मजल्यामध्ये पाणी साचले व तक्रारदारांच्या दुकानातील विक्रीचा माल तसेच इतर साहित्य साठलेल्या पाण्यामुळे खराब व निकामी झाले. तक्रारदारांनी सा.वाले विका कंपनीस या बद्दलची सूचना दिली व विमा कंपनीने मे.चेम्प्रो इनस्पेक्शन प्रा.लि. यांना तक्रारदारांचे नुकसानीचे तक्रारीबद्दल सर्व्हेक्षण करणेकामी नियुक्त केले. मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांनी सर्वेक्षण करुन व तक्रारदारांकडून आवश्यक ती कागदपत्र प्राप्त करुन घेऊन आपला अहवाल दि.22.11.2006 रोजी सा.वाले यांचेकडे दाखल केला. व नुकसानीचा आकडा रु.10,78,183/- असा ठरविला. 3. त्यानंतर सा.वाले यांनी अचानक व प्रथम सर्वेक्षक यांचा अहवाल रद्द न करता श्री. अनील फडके यांची दुसरे सर्वेक्षक म्हणून नेमणूक केली. तक्रारदारांनी श्री. अनील फडके यांना सर्वेक्षणकामी आवश्यक ते सहकार्य केले. त्यानंतर सा.वाले यांनी त्यांचे पत्र दि.26.6.2007 प्रमाणे तक्रारदारांना असे कळविले की, विमा कराराप्रमाणे काहीही रक्कम देय नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांकडे मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांचा अहवाल तसेच दुसरे सर्वेक्षक श्री.अनील फडके यांचा अहवाल तक्रारदारांकडे पाठविला. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांचे तक्रारदारांना विमा करारापोटी काहीही रक्कम न देण्याची कार्यवाही ही विमा कराराचे विरुध्द आहे. त्यानंतर तकारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व तक्रारदारांचे मालाचे नुकसानी बद्दल रु.10,78,183/- व फर्निचर व इतर साहित्य याचे नुकसानीपोटी रु,1,93,999/- सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे अदा करावेत अशी मागणी केली. 4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व तक्रारदारांनी सा.वाले यांचे बरोबर विम्याचा करार केला होता व विमा करार वैध तसेच अस्तीत्वात होता ही बाब मान्य केली. परंतु तक्रारदार यांनी सा.वाले यांचे सोबत केलेला विमा करार हा तक्रारदारांचे दुकानातील मालाचे साठयाबद्दल व इतर वस्तु बद्दल असल्याने वाणीज्य व्यवसायाकामी स्विकारलेली सुविधा आहे व ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार चालु शकत नाही असा आक्षेप घेतला. 5. सा.वाले यांनी असेही कथन केले की, मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांचे अहवालात काही त्रृटी दिसून आल्याने सा.वाले यांनी मे.अनील फडके यांना दुसरे सर्वेक्षक म्हणून नेमले व अनील फडके यांनी सर्वेक्षण करुन आपला अहवाल दिला. अनील फडके यांनी आपल्या अहवालात असे नमुद केले की, तक्रारदारांनी जो खराब झालेल्या मालाचा साठा प्रथम निरीक्षक मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांना दाखविला. तोच मालाचा साठा तक्रारदारांचे अन्य भागीदार जोतकुमार रुपानी हयांनी लालसाई क्रियेशन या दुकानामधील झालेल्या मालाच्या साठयाच्या नुकसानीबद्दल दाखविला. व नुकसान भरपाईची मागणी रॉयल सुंदरम या विमा कंपनीकडे केली. सा.वाले यांनी असेही कथन केले की, मे.अनील फडके सर्वेक्षक यांनी आपल्या अहवालात असे नमुद केले की, तक्रारदारांनी सर्वेक्षक यांना माल खरेदी रजिस्ट्रर, माल विक्री रजिस्ट्रर तसेच दुकानातील मालाच्या साठया बद्दलचे साठा रजिस्टर दाखविले नाही. त्याच प्रमाणे 4 जुलै, नंतर म्हणजे घटनेनंतर जो माल खरेदी केला त्याच्या पावत्या प्रथम सर्वेक्षक मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांना दाखविल्या. या प्रमाणे प्रथम सर्वेक्षक यांचा अहवाल वस्तुस्थितीवर आधारीत नव्हता असे कथन करुन सा.वाले यांनी तो अहवाल नाकारल्याचे आपल्या कैफीयत मध्ये समर्थन केले. या प्रमाणे तक्रारदारांना विमा कराराबद्द सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपास नकार दिला. 6. तकारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीस प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये इतर साहित्य व फर्नीचर या बद्दलची नुकसान भरपाईची मागणी रद्द करणे बद्दल सा.वाले यांनी कुठलेही समर्थन केले नाही असे कथन केले. तसेच प्रथम सर्वेक्षक यांचा अहवाल वस्तुस्थितीवर आधारीत होता व तो नाकारण्याचे सा.वाले यांना काही कारण नव्हते असे कथन केले. 7. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र, तसेच दोन्ही सर्वेक्षकांचा अहवाल दाखल केला. तर सा.वाले यांनी त्यांचे कैफीयतीचे पृष्टयर्थ काही कागदपत्र दाखल केले. सा.वाले यांनी सुदरे सर्वेक्षक श्री.अनील फडके यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, दोन्ही सर्वेक्षकांचा अहवाल व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. दोन्ही बाजुंचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले विमा कंपनी यांनी तक्रारदारांना दिनांक 26.7.2007 रोजी पत्र देवून विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय, अंशतः | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीतील मागणी प्रमाणे नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? | होय.रु.1,93,999/- 9 टक्के व्याजासह. . | 3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 8. तक्रारदारांनी सा.वाली विमा कंपनीकडे तक्रारदारांच्या मालाच्या साठयाचा व फर्नीचर व इतर वस्तु यांचा विमा उतरविला होता. व तो 2005-06 या वर्षाकरीता वैध होता व अस्तीत्वात होता. या बद्दल वाद नाही. 4 व 5 जुलै, 2006 चे दरम्यान मुंबई येथे अतिवृष्टी झाली व त्यामध्ये अनेक इमारतीमध्ये पाणी जमा झाले होते या बद्दलही वाद नाह. सा.वाले यांनी तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी ही तक्रारदारांचे नुकसान झाले नाही या कारणाकरीता नाकारली नसून तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी त्यांचे कागदपत्रावरुन सिध्द होत नाही या वरुन नाकारली आहे. 9. तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांचे अहवालाची प्रत तक्रारीसोबत निशाणी 6 वर दाखल केले आहे. त्यासोबतच जोडपृष्ट क्र.2 वर तक्रारदारांच्या दुकानातील विविध कपडयांचा साठा, नुकसान न झालेला साठा, नुकसान झालेला साठा व त्यांची किंमत यांची तालीका दिलली आहे. जी संचिकेचे पृष्ट क्र.66 वर आहे. त्या अहवालावरुन असे दिसते की, मे.चेम्प्रो सर्वेक्षक यानी तक्रारदाराच्या मालाच्या साठयामध्ये दुपट्टे, धागे, कच्चा माल, लेडीज गुरता, यांचे निरीक्षण केले. तंयार मालामध्ये तंयार कपडे यांचेही निरीक्षण केले. मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांचे अहवालाप्रमाणे तक्रारदारांना पावसाचे पाणी त्यांचे दुकानात घुसल्याने झालेल्या नुकसानीचा अंदाज रु.10,78,183/- असा होता. त्यानंतर मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांनी तक्रारदारांकडे काही कागदपत्रांची मागणी केली व काही मुद्यांवर खुलासा मागीतला जो तक्रारदारांनी त्यांचे पत्र दिनांक दिनांक 3.2.2007 प्रमाणे दिला. त्या पत्रामध्ये तक्रारदार यांनी असा खुलासा केला की खरेदी केलेल्या मालाची किंमत ही बहुतेक वेळेस रोखीनेच दिली जाते व काही वेळेस चेकने दिली जाते व त्याबद्दल खाते उता-याची प्रत तक्रारदारांनी मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांचे कडे दिली. त्याचप्रमाणे दि.31.3.2006 रोजीच्या ताळेबंधाची प्रत देखील सा.वाले यांचेकडे पाठविली. तक्रारदारांनी त्याच पत्रामध्ये असा खुलासा केला की, तक्रारदारांचे दुकान ज्या इमारातीमध्ये आहे ती इमारत तक्रारदार दारुमल रुपानी, त्यांचे बंधु ज्योतकुमार रुपानी व मयत बंधु लालकुमार रुपानी यांच्या मालकीची होती. दारुमल जमनादास म्हणजे तक्रारदार कंपनी ही भागीदारी असून त्यामध्ये दारुमल रुपानी व ज्योतकुमार रुपानी हे भागीदार आहेत. 10. सा.वाले यांचे कैफीयतीमधील कथनावरुन असे दिसते की, मे.चेम्प्रो सर्वेक्षक यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सा.वाले कंपनीला काही शंका निर्माण झाली व त्यांनी मे.अनील फडके यांनी सर्वेक्षक म्हणून नेमणूक केली. मे.अपील फडके यांनी तक्रारदारांच्या दुकानाला दिनांक 18.5.2007 रोजी भेट दिली व भेटीचे इतिवृत्त तंयार केले ज्यावर श्री.अनील फडके व तक्रारदार दारुमल रुपानी यांच्या सहया आहेत. त्याची प्रत तक्रारदारांनी निशाणी 11 वर दाखल केली आहे. इतिवृत्तावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी त्यांच्या खाते वहया हया त्यांच्या लेखापालाच्या ताब्यात आहेत. व लेखापाल 4.6.2007 रोजी रजेवरुन परत आल्यानंतर त्या दाखविण्यात येतील असे निवेदन केले. त्यानंतरचा पत्र व्यवहार असे दाखविते की, तक्रारदारांनी श्री.अनील फडके यांना खातेवहया दाखविल्या नाहीत. तथापी तक्रारदारांनी दि.25.6.2007 रोजी निशाणी 12 प्रमाणे श्री.अनील फडके यांना असे कळविले की, खरेदी विक्री रजिस्टर तसेच खरेदीची पंजी ठेवल्या जात नाहीत. व त्यासाठी सर्व व्यवहार रोखीने होतात व त्यांच्या नोंदी संगणकावर असतात असा खुलासा केला. श्री.अनील फडके यांनी त्यानंतर चौकशी करुन आपला अहवाल सा.वाले यांचेकडे दि.28.6.2007 रोजी पाठविला. श्री.अनील फडके यांचे तक्रारदारांना दि.28.6.2007 रोजी दिलेल्या पत्रावरुन असे दिसते की, श्री.अनील फडके यांनी तक्रारदार हे खरेदी विक्रीचे रजिस्टर लिहीत नाहीत. या बाबीस जास्तच महत्व दिले. त्याच पत्रामध्ये श्री.अनील फडके यांनी असा खुलासा केला की, घटनेच्या दिवशी शिल्लक माल किती होता याची पडताळणी घेणेकामी खरेदी विक्री रजिस्टर आवश्यक आहे. तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्रासोबत दि.31.3.2006 रोजीच्या ताळेबंदाची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये शेवटचा साठयाची किंमत रु.26,76,343/- अशी नोंदविलेली आहे. तथापी ताळेबंधातील साठयाचे किंमतीवरुन प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी म्हणजे 4 जुलै, 2006 रोजी तक्रारदारांचे दुकानामध्ये चेंप्रो सर्व्हेक्षक यांनी गृहीत धरलेला साठा उपलब्ध होता व त्या व्यतिरिक्त त्या साठयातील बराचसा मालाचा साठा खराब झाला होता हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारांची आहे. विम्याचा करार व त्या करारापोटी मागणी केलेली नुकसान भरपाईची मागणी यात पारदर्शकता असणे व प्रामाणीकपणा आवश्यक आहे. सा.वाले यांचे असे स्पष्ट कथन आहे की, दोन दुकानामधील विशेषतः लालसी क्रियेशनमध्ये नुकसान झालेला साठा तक्रारदारांचे दुकानामध्ये दाखविण्यात आला व नुकसान भरपाईचीमागणी करण्यात आली. त्या व्यतिरिक्त सर्व्हेक्षकाला खरेदी रजिस्ट्रर, विक्री रजिस्ट्रर, बिले, दाखविण्यात आली नाहीत व काही बिले ही घटनेनंतरची होती. त्या व्यतिरिक्त माल पुरवठा करणारी कंपनी ज्या प्रकारचा माल पुरवठा करीत नाही तो माल त्या कंपनीचे नांवे बिलामध्ये दाखविण्यात आला होता. या प्रकारे तक्रारदारांच्या मागणीपत्रातील दावा संशयास्पद होता व ही बाब श्री.फडके सर्व्हेक्षक यांनी आपल्या अहवालात दाखवून दिली असे सा.वाले यांचे कथन आहे. 11. श्री.फडके यांच्या अहवालाच्या परिच्छेद 5.4 मध्ये अशी नोंद आहे की, तक्रारदारांच्या भागीदारीचे अन्य भागीदार ज्योतकुमार रुपानी यांचा देखील कपडयांचा व्यापार लालसाई क्रियेशन या नावाचा असून तो अंधेरी (पश्चिम) याच भागात आहे. तक्रारदारांचे दुकान देखील अंधेरी (पश्चिम) भागात आहे. श्री.फडके यांनी असा अभिप्राय नोंदविला की, तक्रारदारांनी फडके यांना दाखविलेली बरीच बिले ही लालसी क्रियेशनची असून तक्रारदारांनी ती बाब फडके यांचेपासून लपवून ठेवली. फडके यांनी आपल्या अहवालाचे परिच्छेद क्र.5.5 मध्ये असे नमुद केले की, लालसाई क्रियेशन यांनी रॉयल सुंदरम या विमा कंपनीकडून विमा घेतला होता व लालसाई क्रियेशन यांचे देखील त्याच घटनेबद्दल नुकसान भरपाईची मागणी होती व रॉयल सुंदरम यांनी श्री.फडके यांनाच सर्वेक्षक म्हणून नेमले होते. श्री. फडके यांच्या अहवालावरुन असे दिसून येते की, लालसाई क्रियेशनचे मालाच्या साठयाची तपासणी श्री.अनिल फडके यांनी दि.8.7.2006 मध्ये त्या विमा कंपनीचे सर्वेक्षक म्हणून केली होती. व त्या बाबतचे इतिवृत्त तंयार करण्यात आले होते. त्या इतिवृत्ताची प्रत सा.वाले यांनी आपल्या कैफीयत सोबत हजर केलेली आहे. जी मुळची निशाणी IV आहे. त्या इतिवृत्तावरुन असे दिसते की,श्री.फडके यांनी विमा कंपनीचे सर्व्हेक्षक म्हणून लालसाई क्रियेशन या दुकानाच्या खराब झालेल्या मालाची तपासणी केली होती. श्री.फडके यांनी लालसाई क्रियेशन यांचे मालाचे साठयाचे झालेल्या नुकसानी बद्दल दिलेल्या अहवालाची संपूर्ण प्रत सा.वाले यांनी कैफीयत सोबत हजर केलेली आहे. त्या अहवालाचे जोडपृष्ट क्र.4 वर लालसाई क्रियेशन या दुकानामध्ये असेलेल्या कपडे व धागे यांचे साठयाचे वर्णन व त्याची किंमत, खराब न झालेला साठा व त्याची किंमत तसेच खराब झालेला साठा व त्याची किंमत या बद्दलची तालीका तंयार केलेली आहे. ती तालीका संचिकेचे पृष्ट क्र.161 वर आहे. श्री.फडके यांच्या अहवालामध्ये लालसाई क्रियेशन यांनी खराब झालेल्या मालाची खरेदी बिले, विक्री बिले यावरुन तंयार केलेली तालीका जोडलेली आहे. थोडक्यात ती तालीका लालसाई क्रियेशन या दुकानातील नुकसान झालेल्या मालाबद्दल आहे तर चेप्रो सर्व्हेक्षक यांनी त्यांच्या अहवालासोबत (निशाणी 6) तक्रारदारांचे दुकानातील खराब झालेल्या मालाच्या वर्णणाची यादी तक्रारदारांनी चेप्रो सर्व्हेक्षक यांच्या अहवालासोबत जोडलेली आहे. त्या तालीकेत दोन्ही तालीकेच्या नोंदीची प्रस्तुत मंचाने पडताळणी व तुलना केली आहे. त्यावरुन असे दिसते की, दोन्ही तालीकेतील दुपंटयांची संख्या,धाग्यांच्या गंठयांची संख्या, व तालीकेतील कपडयांचा प्रकार यात सारखेपणा आहे. प्रस्तुत मंचाने अधिक बारकाईने पडताळणी केली असता असे दिसून आले की, तक्रारदारांच्या तालीकेतील दुपंटयांच्या प्रकारामध्ये 6 प्रकार असून त्याच 6 प्रकारचे दुपंटटे लालसाई क्रियेशन यांच्या तालीकेत दिसून येतात. त्या दुपंटयांचे ब्रॅन्ड सारखेच आहेत फक्त नगांच्या संखेमध्ये फरक आहे. तक्रारदारांच्या तालीकेमध्ये फॅब्रिक या पथळयाखाली 7 ते 18 म्हणजे एकूण 12 प्रकारचे नगांचे वर्णन दिलेले आहे. तर लालसाई क्रियेशन यांच्या तालीकेमध्ये त्याच 12 प्रकारांपैकी 10 प्रकार समाविष्ट आहेत. याच प्रकारची पुनरावृत्ती कुरते व रेडी ड्रेसेस यांचे बाबतीतही दिसून येते. दोन्ही तालीकेमधील कुरतीचे ब्रॅन्ड व प्रकार सारखेच आहेत फक्त नगांच्या संखेमध्ये फरक आहेत. त्याच प्रकारची पुनरावृत्ती रेडी ड्रेसेस यांचे बाबतीतही दिसून येते. या प्रमाणे दोन्हीही तालीकेमध्ये कपडयांचे प्रकार,त्यांचे ब्रॅन्ड व ब्रॅन्डचे क्रमांक सारखेच आहेत. फक्त मोजमाप म्हणजे मिटरचे संख्येमध्ये फरक आहे. लालसाई क्रियेशनमध्ये कापडाच्या मिटरची संख्या जास्त दिसून येते. तर तक्रारदारांच्या तालीकेमध्ये ती कमी दिसून येते. तक्रारदारांच्या दुकानातील खराब मालाचे सर्व्हेक्षण करुन चेप्रो सर्व्हेक्षक यांनी नुकसान झालेल्या मालाची किंमत रु.10,78,183/- तर श्री.फडके यांनी लालसाई क्रियेशन यांच्या दुकानातील नुकसान झालेल्या मालाची किंमत रु.12,71,553/- आकारली. लालसाई क्रियेशन यांच्या दुकानातील झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षणासंबंधी जो अहवाल विमा कंपनीकडे पाठविण्यात आला त्यामध्ये असा अभिप्राय नोंदविला आहे की, लालसाई क्रियेशन यांनी त्यांचे दुकानातील माल अन्यत्र हलविला होता. 12. श्री.फडके सर्व्हेक्षक यांनी आपल्या अहवालामध्ये या सारखेपणाची नोंद घेतली असून श्री.फडके यांच्या अहवालाचे परिच्छेद क्र.5.10 मध्ये अशीही नोंद आहे की, तक्रारदार भागीदारीचे एक भागीदार श्री.ज्योती रुपानी यांचा गोरेगांव येथे देखील कापडाचा व्यवसाय असून त्या व्यवसायाबद्दल विमा पॉलीसी प्रस्तुतचे सा.वाले म्हणज न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांचेकडून घेतली होती. त्या दुकानातील मालाचे नुकसानी बद्दल देखील लालसाई क्रियेशनचे मालक श्री. ज्योती रुपवानी यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. व विमा कंपनीने सुधीर टंडण आणि कंपानी यांना सर्व्हेक्षक नेमले होते. श्री.फडके आपल्या अहवालात असे म्हणतात की, लालसाई क्रियेशन यानी अंधेरी येथील दुकानातील मालाच्या साठयाचे झालेल्या नुकसानी बद्दल मालाची जी यादी दिली होती. त्याच प्रकारची यादी व कागदपत्र गोरेगांव येथील दुकानाबद्दल सुधीर टंडण, सर्व्हेक्षक यांचेकडे देखील दिली होती. यावरुन असे दिसते की, तक्रारदार दारुमल आणि कंपनी त्यांचे बंधु लालसाई क्रियेशन यांचे असलेले दोन ठिकाणचे व्यवसाय या तिन व्यवसायाकामी त्याच प्रकारची कागदपत्रे,बिले, दाखविण्यात आली व नुकसान भरपाई मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. 13. सा.वाले यांनी आपल्या कथनाचे पृष्टयर्थ श्री.फडके यांचे शपथपत्र दाखल केले. श्री.फडके यांना तक्रारदार कंपनीचे विरुध्द अहवाल देण्याचे सकृतदर्शनीतरी काही कारण दिसून येत नाही. 14. श्री.फडके यांच्या अहवालाचे पृष्ट क्र.2 परिच्छेद क्र.4.2 यामध्ये अशी नोंद आहे की, प्रथम सर्व्हेक्षक श्री.चेंप्रो यांचे अहवालामध्ये एकूण 1454810 यापैकी रु.6,54,417/- या किंमतीचे मालाबद्दल चुकीची माहिती पुरविण्यात आली व चुकीची देयके गृहीत धरण्यात आली. ती माहिती येणेप्रमाणे. पुरवठा करणारी कंपनी | रक्कम रु. | शेरा | लालसाई क्रियेशन | 3,54,254 | खरेदी नुकसानीचे घटनेनंतर झालेली आहे. | श्री.गारमेंटस् | 95,300 | पुरवठा करणारे हे ब्रेशियर व निकर यांचे उत्पादक आहेत. व बिलावरील वर्णन या उत्पादनाशी जुळत नाही. | विष्णू टेक्टाईल | 1,01,940 | दाखल बिले ही तंयार माला संबंधीची आहेत. परंतु भिवंडी येथील उत्पादक हे फक्त कच्च धागे विकतात. | मोहन टेक्टाईल | 14,468 | वरील प्रमाणे. | कृष्णा टेक्टाईल | 18,255 | वरील प्रमाणे | एकूण बेरीज | 6,54,417 | |
15. वर चर्चा केल्याप्रमाणे श्री.अनंत फडके सर्व्हेक्षक यांच्या अहवालातील मुद्दे व तपशिल सा.वाले यांच्या कैफीयतीमधील कथनास पुष्टी देतात. अनंत फडके, सर्व्हेक्षक यांच्या अहवालावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी त्यांचे बंधु लालसाई क्रियेशनचे मालक यांनी त्यांच्या दुकानातील मालाचे झालेल्या नुकसानीबद्दल जे कागदपत्र व जो माल सर्व्हेक्षकांना दाखविला तोच माल तक्रारदारांनी आपल्या दुकानात दाखविला. व बिलावरुन चेंप्रो सर्व्हेक्षक यांनी अहवाल तंयार केला. त्याच प्रमाणे नुकसानीचे घटने नंतर खरेदी केलेल्या मालाची बिले मागणी पत्रकामध्ये घुसविण्यात आली. व नुकसानीचा आकडा फुगविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूणच तक्रारदारांनी कपडयांचे किंवा धाग्यांचे नुकसानीबद्दल सा.वाले यांचेकडे दाखल केलेल्या नुकसान भरपाईच्या मागणीचे पृष्टयर्थ विमा सर्व्हेक्षकाकडे चुकीची व खोटी माहिती पुरविली व त्यावरुन नुकसान भरपाईची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला असे दिसून येते. तक्रारदारांनी चेंप्रो सर्व्हेक्षक यांना दाखविलेली व तक्रारीसोबत दाखल केलेली बिले ही नमुना बिले होती. व मुळची बिले नव्हती. तशी नोंद बिलावर दिसून येते. या प्रमाणे तंयार कपडे, धागे, या बद्दलच्या नुकसान भरपाईची मागणी नाकारण्याची सा.वाले यांची कृती योग्य व समर्थनीय दिसते. 16. तक्रारदारांनी कपडे व धागे यांचे व्यतिरिक्त फर्नीचर व संगणक यांचे झालेले नुकसान या बद्दल नुकसान भरपाई रु.1,93,999/- ची मागणी केलेली आहे. या संदर्भात चेंप्रो सर्व्हेक्षक यांनी तक्रारदारांना काही माहिती विचारली होती व त्यानंतर चेंप्रो सर्व्हेक्षक यांनी फर्निचर व इतर वस्तु यांचे सदर्भात दि.24.3.2007 रोजी सा.वाले कंपनीकडे आपला अहवाल पाठविला. त्या अहवालात असे नमुद करण्यात आले की, फर्नीचर व इतर वस्तु हया तक्रारदारांचे मालकीच्या होत्या. व अन्य कंपनीचे मालकीच्या नव्हत्या. दुसरे सर्व्हेक्षक श्री.अनंत फडके यांच्या अहवालात या बद्दल वेगळा अभिप्राय नोंदविण्यात आलेला नाही. यावरुन सा.वाले यांनी फर्निचर व इतर वस्तुंच्या संबंधात तक्रारदारांची असलेली नुकसान भरपाईची मागणी रु.1,93,999/- मान्य करणे आवश्यक होते. त्या मर्यादेत सा.वाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते. 17. वरील निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 356/2008 अंशतः मान्य करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांचे दुकानातील फर्निचर व इतर वस्तु यांचे नुकसानी बद्दल विमा कराराप्रमाणे रक्कम रु.1,93,999/- त्यावर 26.6.2007 पासून 9 टक्के दराने व्याज या प्रमाणे न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत अदा करावी. 3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रक्कम रु.10,000/- अदा करावेत. 5 आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |