विदयमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
यांचे न्यायालयासमोर
अखिल सभागृहाजवळ, गणेशपूर रोड, भंडारा
तक्रार क्र. CC/ 12/ 78 दाखल दि. 22.10.2012
आदेश दि. 15.07.2014
तक्रारकर्ते :- श्री कृपाशंकर वल्द शालीकराम पांडे
वय - वर्षे, धंदा—नोकरी
रा.प्लॉट क्र.16/1,सनप्लॅग कॉलोनी,
वरठी ता.मोहाडी, जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. न्यु इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमीटेड
तर्फे महाव्यवस्थापक,
2 रा माळा, जिवन दिप बिल्डींग, 8,
पॉर्लीयामेंट रोड, नवी दिल्ली-1
2. न्यु इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमीटेड
तर्फे विभागीय व्यवस्थापक,
विभाग क्र.3, गांधी बाग, नागपुर
3. मे.ऑटोमोटीव्ह मॅनुफॅक्चर प्रायव्हेट लिमीटेड
मार्फत महाव्यवस्थापक,
प्लॉट क्र.575, कामठी रोड, नागपुर
4. बँक ऑफ इंडिया,
मार्फत शाखा व्यवस्थापक,
शाखा – वरठी, ता.मोहाडी,
ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.यु.डी.तिडके
वि.प.तर्फे अॅड.निला नशिने
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 15 जुलै 2014)
1. तक्रारकर्त्याच्या गाडीला अपघात झाल्याने व त्याला त्याबद्दल विमा क्लेम न मिळाल्यामुळे त्याने विम्याचे पैसे व नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ता हा न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात राहत असून त्याने 2010 मध्ये नवीन अल्ट्रो कार नं.MH-36/H-1074 विरुध्द पक्ष क्र.3 यांचे कडून विकत घेतली. तक्रारकर्त्याने सदरहू गाडीचा विमा पॉलीसी क्र.900450583 दिनांक 14/9/2011 ते 13/9/2012 या कालावधीत विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडून काढला. विरुध्द पक्ष क्र.1 हे विरुध्द पक्ष क्र.2 यांचे वरिष्ठ कार्यालय आहे. तक्रारकर्त्याने विम्याची रककम रुपये 6,397/-बँक ऑफ इंडीया,शाखा वरठी म्हणजेच विरुध्द पक्ष क्र.4 यांचे मार्फत धनादेश क्र.19591 दिनांक 4/9/2011, गाडीचा विमा काढण्यासाठी दिला होता.
3. दिनांक 2/2/2012 ला वरठी जि.भंडारा येथील सनप्लॅग कंपनीचे आवारात तक्रारकर्त्याच्या गाडीला धडक लागल्याने गाडीचे नुकसान झाले. तक्रारकर्त्याची गाडी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडे दुरुस्तीकरीता पाठविण्यात आली. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याची गाडी जाणीवपुर्वक उशीरा दुरुस्ती केली व तक्रारकर्त्यास कळविले की सदरहू गाडीचा विमा काढण्यात आलेला नाही. कारण विम्याच्या हप्त्याची रक्कम धनादेशाचा अनादर झाल्यामुळे तक्रारकर्त्याला विम्याचे पैसे देता येवू शकत नाहीत. तक्रारकर्त्याने चौकशी केली असता तक्रारकर्त्याने विमा काढण्यासाठी दिलेला चेक न वटवता परत आल्याचे कळले. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्त्याचा धनादेश तक्रारकर्त्याच्या खात्यातून न वटविता दुस-याच कोणाच्यातरी खात्यातून वटविला. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या धनादेशाचा अनादर झाला. विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या चुकीमुळे व निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
4. तक्रारकर्त्याच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर तक्रारकर्त्याने अपघाताची माहिती विरुध्द पक्षास व विमा कंपनीस दिली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे क्लेम फॉर्म, संपुर्ण माहिती व अर्ज विमा दावा मिळण्यासाठी केला. परंतु तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्र.2 यांनी कळविले की तक्रारकर्त्याच्या धनादेशाचा अनादर झाल्यामुळे व तक्रारकर्त्याने पॉलीसी रद्द झाल्यामुळे तक्रारकर्त्यास विमा दावा मिळु शकत नाही.
5. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास धनादेश दिला तेव्हा त्याच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम होती. तक्रारकर्त्यास त्याच्या कारच्या दुरुस्तीसाठी 34,000/- खर्च आला. तसेच 18,000/- नागपुर येथे जाण्यायेण्यासाठी भाडयापोटी खर्च आला. अशाप्रकारे तक्रारकर्त्यास एकुण 60,000/- रुपये खर्च आला.
6. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडे चौकशी केली असता विरुध्द पक्ष क्र.4 यांनी चेक हा तक्रारकर्त्याच्या खात्यातून न वटविता दुस-याच कोणाच्या तरी खात्यातून वटविल्यामुळे तक्रारकर्त्याच्या धनादेशाचा अनादर झाला. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याच्य धनादेशाचा अनादर झाल्यामुळे गाडीची पॉलीसी रद्द झाल्याबद्दल कुठल्याही प्रकारे गाडीचा अपघात होईपर्यंत न कळविल्यामुळे विमा पॉलीसी चालु स्थितीत आहे असे गृहीत धरल्याने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांची तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आहे. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 31/8/2012 ला 60,000/- रुपये नुकसान भरपाई व 1,000/- रुपये तक्रारीचा खर्च मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
7. तक्रारकर्त्याची तक्रार दिनांक 22/10/2012 ला दाखल करुन विरुध्द पक्षांना नोटीस पाठविण्यात आली.
8. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी लेखी जबाबात दिनांक 28/1/2013 ला दाखल केला. त्यांनी आपले जबाबात तक्रारकर्त्याच्या म्हणण्याचे खंडन केले आहे. परिच्छेद क्र.2 मध्ये विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी असे म्हटले आहे की विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून 2010 मध्ये तक्रारकर्त्याने अल्ट्रो कार खरेदी केली व विमा विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांच्याकडून घेतला होता. परंतु धनादेशाद्वारे विम्याचे पैसे तक्रारकर्त्याकडून मिळाले नाही त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे कार विमाकृत नसल्यामुळे विमा रक्कम देण्यास बंधनकारक नाहीत. तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई देण्यास विरुध्द पक्ष जबाबदार नाहीत.
9. दिनांक 8/3/2013 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
10. तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरणात दिनांक 10/4/2013 ला दाखल केलेला जबाब व दिनांक 4/3/2014 चा लेखी युक्तीवाद वाचता येवू शकत नाही. कारण विरुध्द पक्ष क्र.3 हयांचे विरुध्द एकतर्फी आदेश दिनांक 8/3/2013 ला पारीत झाला आहे.
11. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी आपला जबाब दिनांक 27/12/2012 ला दाखल केला. त्यांनी आपले जबाबात असे म्हटले आहे की तक्रारकर्त्याच्या चेकवरचा बचत खाता नंबर पुसट असल्यामुळे तो Clerical Mistake मुळे दुस-याच कोणाच्या तरी खात्यातून वटविला गेला व तक्रारकर्त्याच्या खात्यामधून तो वटविल्या गेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा चेक न वटविता व सदरहू चेक विरुध्द पक्ष क्र.3 यांना परत पाठविण्यात आला. तसेच तक्रारकर्त्याची जबाबदारी आहे की त्याने आपला चेक वटविल्या गेला किंवा नाही हे बघणे त्याचे कर्तव्य आहे. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचा चेक विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या सर्व्हिस ब्रँच, बॅंक ऑफ इंडिया, नागपुर यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यातून न वटविता दुस-याच कोणाच्या तरी खात्यातून चेक वटविल्याची माहिती विरुध्द पक्ष क्र.4 यांना दिलेली नाही. जर अशाप्रकारची माहिती विरुध्द पक्ष क्र.4 यांना मिळाली असती तर विरुध्द पक्ष क्र.4 यांनी योग्य ती पावली उचलून तक्रारकर्त्यास नुकसान होण्यापासून वाचवले असते. त्यामुळे तक्रारकर्त्यास होणारी नुकसान भरपाई देण्याची विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ची जबाबदारी आहे.
12. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत विरुध्दपक्ष क्र.4 यांना पाठविलेली तक्रार दिनांक 22/5/2012, पान नं. 16 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्ष क्र.1,2 व 3 यांना वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसची प्रत पान नं.17 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्ष क्र.4 यांना दिनांक 10/6/2012 रोजी पाठविलेली नोटीस पान न.16 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी नोटीसला दिनांक 11/5/2012 रोजी दिलेले उत्तर पान नं.22 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याचा धनादेश व धनादेशाचा Check Return Memo पान नं.25 वर दाखल केला आहे.
13. तक्रारकर्त्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने दिनांक 5/9/2011 ला रुपये 6,397/- रुपयाचा धनादेश गाडीचा विमा काढण्यासाठी दिला होता व तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या खाते उता-यानुसार त्याचे खात्यामध्ये चेक वटविण्याकरीता पुरेशी रक्कम असून सुध्दा विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्त्याचा धनादेश चुकीच्या खात्यामध्ये वटवून तक्रारकर्त्याच्या धनादेशाचा अनादर केल्यामुळे तक्रारकर्त्याने दिलेला धनादेश विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या खात्यामध्ये जमा होवू शकला नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.4 हे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर त्यास त्याचा विमा दावा फेटाळण्यात आल्याबद्दल व त्याचे विमा पॉलीसी रद्द झाल्याबद्दल न कळविणे म्हणजेच तक्रारकर्त्याच्या गाडीची पॉलीसी चालु स्थितीत आहे असे गृहीत धरल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे तक्रारकर्त्याच्या गाडीच्या विम्याची रक्कम देण्यास तेवढेच जबाबदार आहेत.
14. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे वकील अॅड.नशीने यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने विमा काढण्यासाठी दिलेला धनादेश न वटविल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 16/7/2012 ला पॉलीसी रद्द झाल्याने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार नाहीत. त्यामुळे तक्रारकर्त्याविरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याने दिलेली पॉलीसी रद्द झाल्याबद्दल दिनांक 16/7/2012 ला कळविल्याचे पत्र पान नं. 89 वर व स्पीड पोस्टाची पावती पान नं.90 वर दाखल केली आहे.
15. विरुध्द पक्ष क्र.4 यांचे वकील अॅड.सक्सेना यांनी युक्तीवाद केला की विरुध्द पक्ष 4 यांची सर्व्हिस बँक जी नागपुर येथे आहे त्यांनी तक्रारकर्त्याचा Account Number अस्पष्ट असल्याने चुकीने तक्रारकर्त्याचा धनादेश हा दुस-याच कोणाच्या तरी खात्यातून वटविला. सदरहू घटना ही सर्व्हिस बँकेची Clerical Mistake असून त्यासाठी विरुध्द पक्ष क्र.4 हे जबाबदार नाहीत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 व तक्रारकर्ता यांनी तक्रारकर्त्याचा धनादेश चुकीच्या खात्यातुन वटविल्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.4 यांना माहिती असती तर विरुध्द पक्ष क्र.4 यांनी आवश्यक पावले उचलून कार्यवाही केली असती. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याच्या धनादेशाचा अनादर झाल्याबद्दल त्वरीत कळविणे बंधनकारक असल्यामुळे व त्याची सुचना तक्रारकर्त्यास त्वरीत न दिल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे नुकसान भरपाईसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.4 यांना सदरहू प्रकरणातून वगळण्यात यावे.
16. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज संबंधित कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचा जबाब व दोन्ही पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का? – होय
कारणमिमांसा
17. तक्रारकर्त्याने अल्ट्रो कार क्र.MH-36/H1074 ही विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून 2010 मध्ये विकत घेतली होती, हे विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला दिलेल्या उत्तरावरुन सिध्द् होते. तक्रारकर्त्याने गाडीचा विमा करण्यासाठी दिलेल्या दिनांक 5/9/11 च्या धनादेशाबद्दल विरुध्द पक्ष क्र.4 यांनी आपले जबाबात असे म्हटले आहे की विरुध्द पक्ष क्र.4 यांची सर्व्हिस बँक जी नागपुर येथे आहे त्यांनी धनादेशवरील धनादेश क्रमांक अस्पष्ट असल्यामुळे, Clerical Mistake झाल्यामुळे तक्रारकर्त्याचा धनादेश हा दुस-याच कोणाच्यातरी खात्यातुन वटविला गेला. धनादेश Online वटवितांना धनादेशावरील धनादेश क्रमांक व धनादेशावरील सही व Online Computer मध्ये सही Match झाल्यानंतरच धनादेश वटवितात. परंतु विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्त्याचा धनादेश वटवितांना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे व तक्रारकर्त्याचा धनादेश न वटविल्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानाबद्दल विरुध्द पक्ष क्र.4 हे निश्चितच जबाबदार आहेत.
18. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी दिनांक 5/9/2011 चा Check Return Memo जो पान क्र.25 वर दाखल केला आहे, त्यामध्ये तक्रारकर्त्याच्या धनादेश खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे परत पाठविण्यात आला असे दिनांक 8/9/2011 च्या Check Return Memo मध्ये नमुद केले आहे. सदरहू Check Return Memo मध्ये तक्रारकर्त्याचा Account No 920710110001015 आहे असा Reference Number म्हणून नमुद केला आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या बचत खात्याचा खातेउतारा सदरहू प्रकरणात दाखल केला आहे, त्यामध्ये त्याचा Account No 920710110001016 असा आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या खातेउता-यामध्ये दिनांक 5/9/2011 ला त्याचे खात्यामध्ये रुपये 1,93,999/-जमा होते. तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये दिनांक 30/8/2011 ते 4/10/2011 पर्यंत शिल्लक रक्कम रुपये एक लाखापेक्षा जास्त होती, असे पासबुक वरुन दिसून येते. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम असून सुध्दा चेक न वटविणे म्हणजे सेवेमधील त्रृटी होय. विरुध्द पक्ष क्र.4 यांची Principal Duty ही विविध प्रकारचे खाते सांभाळणे व धनादेश त्या-त्या खात्यामध्ये वटविणे अशी आहे. Banking Act प्रमाणे चेक वटविणे ही Principal Duty असून ती Subsidary duty नाही त्यामुळे Principal Duty मध्ये निश्चितच निष्काळजीपणा केलेला आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.4 हे तक्रारकर्त्यास झालेल्या नुकसानीस जबाबदार आहेत.
19. तक्रारकर्त्याने गाडीचा विमा काढण्यासाठी दिनांक 5/9/2011 चा धनादेश विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या मार्फत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना विमा काढण्यासाठी दिला. सदरहू चेक दिनांक 8/9/2011 ला परत आला व त्याची माहिती विरुध्द पक्ष क्र.4 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना दिली. तक्रारकर्त्याच्या गाडीचा विमा हा दिनांक 14/9/2011 ते 13/9/2012 या कालावधीकरीता काढलेला होता. तक्रारकर्त्याच्या गाडीचा अपघात दिनांक 2/2/2012 ला झाला. तक्रारकर्त्याची गाडी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडे दुरुस्ती करीता टाकली व त्यांनी ती दुरुस्त करुन दिली, हे विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्यास पाठविलेल्या दिनांक 11/5/2012 च्या नोटीसच्या उत्तरात कबुल केले आहे. सदरहू नोटीस चे उत्तर पान नं.22 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याची गाडी दिनांक 29/2/2012 ला दुरुस्त करुन दिली, असे त्यांनी आपले नोटीसच्या उत्तरात नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने त्याचे गाडीचा अपघात झाल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना अपघाताबद्दल सुचना दिली होती. तसेच Surveyor appoint करण्याबद्दल सुध्दा सुचना दिली होती. तक्रारकर्त्याने विमा दाव्यासंबंधी कागदपत्रे विमा दावा करण्याकरीता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकडे दिली असता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दिनांक 16/7/2012 च्या पत्रानुसार तक्रारकर्त्याचा विमा काढण्याकरीता दिलेला धनादेशाचा अनादर झाल्यामुळे तक्रारकर्त्याची पॉलीसी रद्द करण्यात आली आहे, असे पत्र रजिस्टर्ड पोस्टाने तक्रारकर्त्यास दिनांक 16/7/2012 ला पाठविले व त्यापुर्वी धनादेशाचा अनादर झाला व पॉलीसी रद्द करण्यात आली याबद्दल न कळविल्यामुळे तक्रारकर्त्याच्या गाडीची पॉलीसी Inforce आहे व Contract & Indeminty and Gaurantee हा Contract Inforce स्वरुपाचा आहे. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दिनांक 2/2/2012 ला अपघात झाल्यानंतर 5 महिन्यानंतर म्हणजेच दिनांक 16/7/2012 ला पॉलीसी रद्द केल्याची माहिती दिल्यामुळे सदरहू गाडीच्या विमा रक्कमेस विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे Contract & Indeminty and Gaurantee नुसार Insured ला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत, करीता तक्रारकर्त्यास होणा-या नुकसान भरपाई करीता विरुध्द पक्ष क्र.1, 2 व 4 हे संयुक्तिरित्या जबाबदार आहेत, असे मंचाचे मत आहे.
20. तक्रारकर्त्याच्या गाडी दुरुस्तीसाठी रुपये 34,000/- खर्च लागला व विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याची गाडी त्यांचे वर्कशॉप मध्ये दुरुस्त केली आहे, असे कबुल केले आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये व पुराव्यामध्ये दुरुस्तीसाठी 34,000/- रुपये खर्च आला, असे सांगितले आहे. विरुध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्यास गाडी दुरुस्तीकरीता 34,000/- रुपयापेक्षा कमी खर्च आला याबद्दल कुठलेही दस्तऐवज किंवा पुरावा तक्रारीमध्ये दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याच्या वकिलांनी युक्तीवादामध्ये असे म्हटले आहे की विरुध्द पक्ष क्र.3 व विरुध्द पक्ष क्र.1व 2 यांनी संगणमत करुन तक्रारकर्त्याच्या गाडीचे दुरुस्तीचे बील न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने ते बील सदरहू तक्रारीमध्ये दाखल केले नाही.. परंतु विरुध्द पक्ष्ा क्र.3 यांनी सदरहू बील तक्रारीमध्ये दाखल करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी ते तसे न केल्यामुळे व त्यासंबंधी बील हे विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या ताब्यात असल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.3 यांनी न्यायमंचासमोर आपली बाजु With Clean Hands मांडलेली नाही.
21. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडे दररोज विमा काढलेले चेक वटविले किंवा नाही याबद्दल Statement येत असते व त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या कडे दरदिवशी किती शिल्लक आहे याबद्दल Bank Statement येत असते व त्या संबंधीचे Account विरुध्द पक्ष यांचेकडे Maintain केले जातात. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या खात्यात चेक वटविला किंवा नाही याबद्दल त्वरीत माहिती उपलब्ध होत असते. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1व 2 यांनी न वटविल्या गेलेल्या चेकची त्वरीत माहिती घेवून चेक dishonour ची intimation मिळाल्याबरोबर लगेचच विमाधारकास कळविणे हे त्यांचे महत्त्वाचे कर्तव्य असल्यामुळे त्यानुसार विमा धारकाच्या चेकचा अनादर झाल्याची intimation न देवून करार संपुष्टात न आणणे व पॉलीसी रद्द न करणे म्हणजेच विमा धारकाची Liability Accept करणे किंवा Continue करणे यांस विमा कंपनी जबाबदार आहे. करीता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 सुध्दा तक्रारकर्त्याच्या नुकसान भरपाईस जबाबदार आहे.
22. तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीस व मानसिक त्रासासाठी विरुध्द पक्ष क्र.1, 2 व 4 हे जबाबदार आहेत, असे मंचाचे मत आहे करीता खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास अपघात विम्याचे रुपये 34,000/-
(चौतीस हजार) हे द.शा.द.शे. 7 टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल
झाल्यापासून म्हणजेच दिनांक 22/10/2012 पासून ते संपुर्ण पैसे मिळेपर्यंत
देण्यात यावे.
3. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारकर्त्याचा धनादेश तक्रारकर्त्याच्या खात्यात
पुरेशी रक्कम असून सुध्दा अनादरित केल्यामुळे नुकसान भरपाई व मानसिक
त्रासापोटी रुपये 10,000/- (दहा हजार) तक्रारकर्त्यास दयावे तसेच तक्रारीच्या
खर्चापोटी रुपये 5,000/-(पाच हजार) तक्रारकर्त्यास दयावे.
4. विरुध्द पक्ष क्र.3 यांचे विरुध्द कुठलेही आदेश नाहीत.
5. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत
प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची प्रत
नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.