द्वारा घोषित श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष - तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. दिनांक 17/7/2008 रोजी तक्रारदारानी टीव्हएस मोटार सायकल महेश ऑटो औरंगाबाद येथून रु 49,690/- ला खरेदी केली. त्या गाडीचा इंजिन नंबर OF6F81038468 Chassis No MD625BF6981F-37887 असा होता. गाडी खरेदी केल्यानंतर तक्रारदारानी गैरअर्जदाराकडून या गाडीची पॉलिसी घेतली. सदरील पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 18/7/2008 ते 17/7/2009 असा होता. गाडी घेतल्यानंतर दुस-याच दिवशी त्या गाडीमध्ये गिअरबॉक्सची समस्या निर्माण झाली व गाडी व्यवस्थीत चालत नव्हती. म्हणून तक्रारदारानी शोरुममध्ये जाऊन गाडी बदलून मागितली. महेश ऑटोने तक्रारदारास गाडी बदलून दिली. त्याच वेळेस महेश ऑटोने पावतीवर गाडीचा इंजिन नंबर व चेसीस नंबरही दुरुस्त करुन दिला. गैरअर्जदाराने गाडीमध्ये बदल झाल्यामुळे विमा सर्टिफिकेटवर त्याप्रमाणे बदल केला. दिनांक 5/2/2009 रोजी रात्री 11:15 वाजता तक्रारदारानी घरी गाडी लॉक करुन लावली असता दुस-या दिवशी सकाळी म्हणजे दिनांक 6/2/2009 रोजी त्यांना गाडी आढळून आली नाही. त्यांनी आजूबाजूस चौकशी केली परंतु गाडी आढळून आली नाही म्हणून तक्रारदाराने दिनांक 21/2/2009 रोजी पोलीस स्टेशन जिनसी येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारदारानी आरटीओ यांना गाडी चोरीस गेली म्हणून दिनांक 4/3/2009 रोजी कळविले. तक्रारदारानी गैरअर्जदाराकडे क्लेम फॉर्म पाठवून दिला. त्यानंतर गैरअर्जदाराने दिनांक 28/7/2009 च्या पत्रान्वये तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केल्याचे कळविले. नामंजूरीचे कारण पॉलिसीवर गाडीचा इंजिन नंबर आणि चेसीस नंबर बदलल्याचा दिनांक 11/2/2009 म्हणजेच गाडी चोरीला गेल्यानंतर कळविले. तक्रारदारास हे पत्र दिनांक 29/7/2009 रोजी मिळाले त्यामुळे सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून नविन मोटार सायकल किंवा रु 1 लाख व इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारानी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदाराने तक्रारदाराचा क्लेम गाडी बदलून घेतल्यामुळे त्या नविन गाडीचा चेसीस नंबर आणि इंजिन नंबर विमा कंपनीला दिनांक 11/2/2009 रोजी कळविला व त्यानंतर पॉलिसीमध्ये बदल करण्यात आला म्हणून नामंजूर केला आहे. दिनांक 11/2/2009 च्या पूर्वी तक्रारदाराची गाडी चोरीला गेली होती. पॉलिसीमध्ये पूर्वीच्या गाडीचा नंबर होता या कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे व तो योग्य आहे असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती ते करतात. गैरअर्जदाराने कागदपत्रे दाखल केली आहेत. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराने महेश ऑटो म्हणजेच ज्या दुकानातून गाडी खरेदी केली आहे त्याची पावती दाखल केली आहे. त्या पावतीवर नविन गाडीचा नंबर,चेसीस नंबर बदलून दिल्याचे दिसते. ही पावती दिनांक 17/7/2008 ची आहे. या नुसारच गैरअर्जदार म्हणजे विमा कंपनीने विमा पॉलिसीमध्ये सुध्दा बदल केलेला आहे हे तक्रारदाराने दाखल केलेल्या पॉलिसीच्या कागदपत्रावरुन दिसून येते. या कागदपत्रावर जी गाडी चोरीला गेली आहे त्याचा इंजिन नंबर OF6F81038468 Chassis No MD625BF6981F-37887 नमूद केलेले आहे. तसेच Effective date of commencement of Insuance for the purpose of the Act या मथळयाखाली From - 11:32 O clock on 18/07/2008 to Midnight of 17/07/2009 असे नमूद केलेले आहे. तक्रारदाराची गाडी दिनांक 5/2/2009 रोजी चोरीला गेली म्हणजेच तक्रारदाराची गाडीस पॉलिसीचे संरक्षण होते हे दिसून येते. गैरअर्जदाराने पॉलिसीची कागदपत्रे दाखल केली आहेत परंतु त्यावर कुठल्याही ऑफिसरची सही किंवा शिक्का नाही. पॉलिसीवर wef 11/9/2009 असे नमूद केलेल्या पॉलिसीचे कागदपत्रे दाखल केले आहेत. उलट तक्रारदाराने दाखल केलेंल्या पॉलिसीच्या कागदपत्रावर विमा कंपनीचा शिक्का व सही असल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारदारानी गाडी बदलून घेतली होती व तिचा चेसीस नंबर व इंजिन नंबर विमा कंपनीस लगेचच कळविले होते व त्यावरुनच गैरअर्जदारानी तक्रारदारास पॉलिसी दिली होती म्हणून तक्रारदाराच्या गाडीस विम्याचे संरक्षण होते हे स्पष्ट होते. गैरअर्जदाराने चुकीच्या कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच गैरअर्जदारास असा आदेश देतो की, त्यांनी दिनांक 28/7/2009 पासुन क्लेमची रक्कम 9 टक्के द.सा.द.शे. व्याजासह तसेच तक्रारीचा खर्च रु 1,000/- तक्रारदारास द्यावा. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अशंत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास क्लेमची रक्कम दिनांक 28/7/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत द्यावी. 3. गैरअर्जदार विमा कंपनीने उपरोक्त आदेश मुदतीत तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |