Maharashtra

Gondia

CC/15/34

PRAMILABAI UMESH IIALPACHE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD., THROUGH ITS DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

MR.UDAY KSHIRSAGAR

26 Jul 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/15/34
 
1. PRAMILABAI UMESH IIALPACHE
R/O.POST-TIMEZARI, TAH.GOREGAON
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD., THROUGH ITS DIVISIONAL MANAGER
R/O.DIVISIONAL OFFICE NO.130800, NEW INDIA CENTER, 7 TH FLOOR, 17-A, KUPREJ ROAD, MUMBAI-400001
MUMBAI
MAHARASHTRA
2. THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD., THROUGH ITS REGIONAL MANAGER
R/O.DR.AMBEDKAR BHAWAN, M.E.C.L. COMPLEX, SEMINARY HILLS, NAGPUR-440018
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI, GOREGAON
R/O.GOREGAON
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M. G. CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 
For the Complainant:MR.UDAY KSHIRSAGAR, Advocate
For the Opp. Party: MR. LALIT LIMAYE, Advocate
Dated : 26 Jul 2016
Final Order / Judgement

(आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले)

(पारित दि. 26 जुलै, 2016)

       तक्रारकर्तीचे पती उमेश फुलचंद इलपाचे यांच्‍या अपघाती मृत्‍युबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्‍याबाबतचा विमा दावा विरूध्‍द पक्ष यांनी निकाली न काढल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण दाखल केले आहे.   तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.    तक्रारकर्ती प्रमिला हिचे पती उमेश फुलचंद ईलपाचे हे व्‍यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा तिमेझरी, ता. गोरेगांव, जिल्‍हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 279 ही शेतजमीन होती.     

3.    विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 दि न्‍यू इंडिया ऍश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड ही विमा व्‍यवसाय करणारी कंपनी आहे.  विरूध्‍द पक्ष 3 मार्फत महाराष्‍ट्र शासनाने तक्रारकर्तीचे पती उमेश ईलपाचे यांचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- चा अपघात विमा उतरविला होता.

4.    दिनांक 07/11/2012 रोजी तक्रारकर्तीचे पती कोठ्याच्या पारणीवर (धाब्‍यावर) शिडी लावून चढले असता उतरतांना शिडी तुटल्‍याने खाली असलेल्या विहिरीत पडले आणि विहिरीच्या पाण्‍यात बुडून त्यांचा अपघाती मृत्‍यु झाला.

5.    तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्‍युबाबत शेतकरी अपघात विम्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- मिळावी म्‍हणून सर्व कागदपत्रांसह विरूध्द पक्ष क्रमांक 3 कडे दिनांक 29/09/2013 रोजी अर्ज केला.  आवश्‍यक सर्व दस्‍तावेजांची पूर्तता करूनही विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 08/10/2014 रोजी तक्रारकर्तीस "शल्‍य विच्‍छेदन अहवाल, व्हिसेरा रिपोर्ट, मृत्‍युचे कारण दिलेले नाही.  तर शल्‍य विश्‍लेषण ज्‍या दवाखान्‍यात केले त्‍याच्‍याकडून मृत्‍युचे कारण लिहून देणे व पाठविणे" असे दिनांक 28/03/2014 च्‍या पत्राप्रमाणे कळवूनही आवश्‍यक कागदपत्रे न दिल्‍यामुळे दावा बंद करण्‍यात येत असल्‍याचे कळविले.  वास्‍तवात तक्ररकर्तीने विरूध्‍द पक्ष क्रमांक 3 कडे विमा दाव्‍यासोबत वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्‍णालय, कु-हाडी, ता. गोरेगांव, जिल्‍हा गोंदीया यांनी मयताच्या मृत्‍युचे कारण स्‍पष्‍टपणे नमूद केलेले प्रमाणपत्र सादर केले होते.  असे असतांनाही तक्रारकर्तीचा वाजवी विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्‍द पक्ष यांची कृती सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब असल्‍याने तक्रारीत खालील मागणी केलेली आहे.

      1.     शेतकरी अपघात विम्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- दिनांक 29/09/2013 पासून द. सा. द. शे. 18% व्‍याजासह देण्याचा विरूध्‍द पक्षाला                        आदेश व्‍हावा.

      2.    शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 30,000/-   आणि तक्रार खर्च रू. 15,000/- मिळावा.

6.    तक्रारकर्तीने तक्रारीचे पुष्‍ठ्यर्थ विरूध्द पक्ष 1 ने दावा फेटाळल्याबाबत तक्रारकर्तीला लिहिलेले पत्र, विरूध्द पक्ष 3 कडे सादर केलेला दावा, 7/12 चा उतारा, 6-क उतारा, 8-अ उतारा, मर्ग खबरी व इतर पोलीस दस्‍तावेज, पोस्‍ट-मार्टेम रिपोर्ट, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, कु-हाडी यांचे प्रमाणपत्र, तक्रारकर्तीच्या पतीचे मृत्‍यु प्रमाणपत्र. तक्रारकर्तीच्या पतीचा वयाचा दाखला इत्यादी  दस्‍तावेज दाखल केले आहेत.

7.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी लेखी जबा‍ब दाखल करून तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे.  तक्रारकर्तीचे पती उमेश हे शेतकरी होते व तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे त्यांच्या मालकीची शेती होती व महाराष्‍ट्र शासनाने त्‍यांचा विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 कडे विमा काढला होता हे विरूध्द पक्षांनी नाकबूल केले आहे.

      त्‍यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, अपघातग्रस्त शेतक-यांच्या मृत्‍युबाबतचे विमा प्रस्‍ताव विरूध्‍द पक्ष क्रमांक 3 कडे सादर झल्यावर ते इन्‍शुरन्‍स ऍडव्‍हायझर कडे पाठवितात आणि इन्‍शुरन्‍स ऍडव्‍हायझरने त्‍याची छाननी करून प्रस्‍ताव संपूर्ण कागदपत्रांच्‍या पूर्ततेनंतर विमा कंपनीकडे पाठविण्‍याबाबत सदर योजनेच्या परिपत्रकात नमूद आहे.  मात्र सदर प्रकरणात तक्रारकर्तीने इन्‍शुरन्‍स ऍडव्‍हायझरला हेतूपुरस्‍सर विरूध्‍द पक्ष म्हणून जोडलेले नसल्‍याने आवश्‍यक पक्षाअभावी (Non-joinder of necessary parties) तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.  विरूध्‍द पक्ष 3 ने आपली जबाबदारी पार न पाडता आवश्‍यक दस्‍तावेजांशिवाय विमा प्रस्‍ताव विरूध्‍द पक्ष 1 व 2 कडे मंजुरीसाठी पाठविला आहे. 

      दिनांक 07/11/2012 रोजी तक्रारकर्तीच्‍या पतीचा विहीरीत बुडून अपघाती मृत्‍यु झाल्‍याचे विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 ने नाकबूल केले आहे.  तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मृतक योग्‍य काळजी न घेता विहीरीजवळ शिडी लावून धाब्‍यावर चढला असल्याने त्‍याचा निष्‍काळजीपणा मृत्‍युस कारणीभूत ठरला.  त्‍यास अपघाती मृत्‍यु म्‍हणता येत नाही व त्‍याबाबत नुकसानभरपाई देण्‍यास विमा कंपनी जबाबदार नाही. 

      शवविच्‍छेदन अहवालात देखील मृत्‍युचे कारण स्‍पष्‍टपणे नमूद केलेले नाही.  व्हिसेरा रिपोर्ट तक्रारकर्तीने हेतुपुरस्‍सर दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्‍युचे स्‍पष्‍ट कारण दर्शविणारा पुरावा नसल्याने मृत्‍युचे कारण संशयास्‍पद आहे व म्‍हणून सदरचा मृत्‍यु हा अपघात नसून अन्‍य कारणाने झालेला अनैसर्गिक मृत्‍यु असल्‍याने तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

      तक्रारकर्तीने अपघाती मृत्‍यु सिध्‍द करण्यासाठी व्हिसेरा रिपोर्ट व मृत्‍युचे कारण दर्शविणारे प्रमाणपत्र इत्‍यादी आवश्‍यक दस्‍तावेजांची पूर्तता केली नाही म्‍हणून दिनांक 08/10/2014 रोजीच्या पत्राप्रमाणे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला असून विरूध्‍द पक्ष यांची सदरची कृती पॉलीसीच्‍या अटी व शर्तीस अनुसरून असल्‍याने त्‍याद्वारे सेवेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार घडला नाही.  तसेच तक्रारकर्तीचा पती दिनांक 07/11/2012 रोजी मरण पावला असतांना विमा दावा दिनांक 26/09/2013 रोजी 11 महिन्‍यांनी विलंबाचे कोणतेही संयुक्तिक कारण न देता दाखल केला असल्‍याने तो स्विकारण्‍यायोग्‍य नाही.  म्‍हणून तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 ने विनंती केली आहे. 

8.    विरूध्‍द पक्ष क्रमांक 3 ने लेखी जबाब दाखल करून त्यांना प्राप्‍त झालेला विमा दावा नियमाप्रमाणे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असतांना विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तो नाकारला यांत त्‍यांचा कोणताही दोष नसल्‍याने त्‍यांना तक्रारीतून मुक्‍त करावे अशी विनंती केली आहे.    

9.    तक्रारकर्ती व विरूध्‍द पक्ष यांच्या परस्‍पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्‍या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.  त्‍यावरील निष्‍कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केला आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र आहे काय?

अंशतः

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

अंतिम आदेशाप्रमाणे

- कारणमिमांसा

10.   मुद्दा क्रमांक 1 बाबतः-          सदर प्रकरणातील तक्रारकर्ती श्रीमती प्रमिला हिचे पती उमेश फुलचंद ईलपाचे हे शेतकरी होते व महाराष्‍ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र होते हे दर्शविण्यासाठी तक्रारकर्तीने दस्‍त क्रमांक 3 वर 7/12 चा उतारा, दस्त क्रमांक 4 वर वारस पंजीतील नोंद आणि दस्त क्रमांक 5 वर गांव नमुना आठ (अ) ची प्रत तसेच दस्त क्र. 6 वर फेरफाराची नोंद दाखल केली आहे.  सदर नोंदीवरून हे स्पष्ट होते की, कमलाबाई फुलीचंद ईलपाचे यांचे मृत्‍युनंतर फेरफार क्रमांक 406, दिनांक 20/08/2005 प्रमाणे मौजा तिमेझरी, ता. गोरेगांव, जिल्‍हा गोंदीया येथील गट नंबर 279, 252, 362, 719, 720, 721 संबंधाने तिचे वारस मुलगा उमेश फुलीचंद ईलपाचे व मुली आणि पतीचे नाव वारस पंजीत तसेच गांव नमुना 8-अ मध्ये नोंदण्यात आले व त्यावरून 7/12 मध्ये उमेश फुलीचंद ईलपाचे याच नांव नोंदण्यात आले.  त्यामुळे दिनांक 07/11/2012 रोजी मृत्‍यु झाला तेव्हा उमेश फुलीचंद ईलपाचे ह्याचे नांव 7/12 मध्ये आणि गांव नमुना 8-अ मध्ये वरील गट क्रमांकाचा मालक म्हणून नोंदले होते.  सदर उमेश ईलपाचे याचा दिनांक 07/11/2012 रोजी मृत्‍यु झाल्यावर फेरफार क्रमांक 374, दिनांक 01/08/2013 प्रमाणे त्याचे वारस म्हणून विधवा प्रमिला आणि अज्ञान मुले अनमोल व अनिकेत यांच्या नांवाने फेरफार घेण्यात आला व गांव नमुना 8-अ आणि 7/12 मध्ये त्यांची नांवे वरील जमिनीचे मालक म्हणून इतरांबरोबर समाविष्ट करण्यात आली.   वरील कारणांमुळे मयत उमेश फुलचंद ईलपाचे हा दिनांक 07/11/2012 रोजी मरण पावला तेव्हा त्याचे नांव 7/12 मध्ये असल्याने तो महाराष्‍ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभ मिळण्यास पात्र होता.

11.         विरूध्द पक्षाचे अधिवक्ता श्री. लिमये यांचा युक्तिवाद असा की, उमेश याचा मृत्‍यु दिनांक 07/11/2012 रोजी झाल्यानंतर तक्रारकर्तीने विमा प्रस्ताव 3 महिन्यांत सादर करावयास पाहिजे होता, परंतु सदर प्रकरणात विमा प्रस्ताव अत्यंत उशीराने दिनांक 26/09/2013 रोजी 11 महिन्यांनी सादर केला आणि सदर विलंबाचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसल्याने सदरचा प्रस्ताव मंजूर होण्यास पात्र नाही.

            या ठिकाणी हे नमूद करणे आवश्यक आहे की, विमा प्रस्ताव बंद करण्याची (नामंजुरीची) जी कारणे विरूध्द पक्षाने दिनांक 08/10/2014 रोजीचे पत्र दस्त क्रमांक 1 मध्ये नमूद केली आहेत, त्‍याप्रमाणे आवश्‍यक दस्तावेजांची पूर्तता केली नाही म्हणून तिचा दावा मंजूर करता येत नाही असे नमूद केले आहे.  विमा दावा विलंबाने सादर केल्याचे कारण सदर पत्रात नमूद नाही.  पती निधनानंतर ग्रामीण स्त्रीला आवश्‍यक दस्तावेज प्राप्त करणे अत्‍यंत कठीण काम आहे व म्हणून केवळ विमा प्रस्ताव दाखल करण्यास उशीर झाला या एकमेव कारणाने विमा दावा नामंजूरीचे समर्थन होऊ शकत नाही. 

            श्री. लिमये यांचा पुढे युक्तिवाद असा की, मयत उमेश याने विहीरीजवळ शिडी लावतांना ती बरोबर असल्याची खात्री केली नाही म्हणून तो शिडीवरून उतरत असतांना ती तुटून खाली पडला.  उमेश याचा निष्काळजीपणा हेच त्याच्या मृत्युचे कारण असल्याने त्यास अपघात म्हणता येत नाही व म्हणून अपघात विम्याचे कोणतेही लाभ मिळण्यास तक्रारकर्ती पात्र नाही. 

            सदरच्या प्रकरणात मयत उमेश हा आत्‍महत्या करण्याचे हेतूने शिडीवरून विहीरीत पडला असे विरूध्द पक्षाचे देखील म्हणणे नाही.  नेहमी वापराची शिडी घटनेच्या वेळी तुटली असेल आणि त्यामुळे उमेश खाली विहीरीत पडला असेल तर सदर घटना सहेतूक केली नसल्याने ती ‘अपघात’ च ठरते, तिला Self inflicted injuries असे म्हणता येणार नाही.

            विमा कंपनीचे अधिवक्ता श्री. लिमये यांचा युक्तिवाद असा की, उमेश याचा मृत्‍यु अपघाताने विहीरीत पडून बुडाल्याने झाला हे सिध्द करण्यची जबाबदारी तक्रारकर्तीची आहे.  सदरच्या प्रकरणात उमेश याच्या मृत्‍युनंतर त्याच दिवशी दिनांक 07/11/2012 रोजी K. T. S. General Hospital, Gondia येथे शव विच्छेदन करण्यात आले.  त्याचा अहवाल तक्रारकर्तीने दस्त क्रमांक 8 वर दाखल केला आहे.   त्यात रासायनिक विश्लेषणासाठी व्हिसेरा काढून ठेवला असून त्‍याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत मृत्‍युचे कारणाबाबतचा अभिप्राय राखून ठेवला असल्याचे नमूद केले आहे.  तक्रारकर्तीने मंचासमोर व्हिसे-याचा रासायनिक विश्लेषण अहवाल तसेच सदर व्हिसेरा अहवालावरून मृत्‍युच्या निश्चित कारणाबाबत शव विच्छेदन करणा-या डॉक्‍टरांचा अभिप्राय दाखल केला नसल्याने उमेशचा मृत्‍यु अपघाताने विहीरीत पडून झाल्याचे सिध्द करणारा निश्चित पुरावा नाही व म्हणून उमेशचा मृत्यु हा अपघाती मृत्यु होता हे तक्रारकर्ती सिध्द करू न शकल्याने शेतकरी अपघात विम्याचा कोणताही लाभ मिळण्यास तक्रारकर्ती पात्र नाही.  मृत्युचे अपघाती कारण सिध्द करण्यासाठी शल्य विश्लेषण ज्या दवाखान्यात केले त्यांच्याकडून मृत्युचे कारण दर्शविणारा अहवाल/अभिप्राय प्राप्त करून सादर करावा असे विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस दिनांक 28/03/2014 च्या पत्रान्वये कळविले होते.  परंतु तक्रारकर्तीने सदर कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने विरूध्द पक्षाने दिनांक 08/10/2014 रोजी दस्त क्रमांक 1 प्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा बंद करीत असल्याचे पत्र दिले.  विरूध्द पक्षाची कृती पूर्णतः कायदेशीर असून त्याद्वारे सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नाही.

12.         याउलट तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री. उदय क्षीरसागर यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, घटनेच्या दिवशी मयत उमेश कोठ्याच्या धाब्याला शिडी लावून धाब्यावर चढला व उतरत असता शिडीचा पाय तुटून तो खाली लागून असलेल्या विहीरीत पडला आणि बुडून मरण पावला.  त्यास विहीरीतून काढून प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, कु-हाडी, ता. गोरेगांव येथे उपचारासाठी नेले होते. त्यांनी प्राथमिक उपचार करून K. T. S. General Hospital, Gondia येथे पाठविले असल्याने तेथे नेले असता उपचारास प्रतिसाद न देता मरण पावला.  त्याबाबत पोलीस स्टेशन, गोंदीया (शहर) येथे मर्ग क्रमांक 00/12 फौ. प्र. सं. कलम 174 प्रमाणे दाखल झाला.  मरणान्‍वेषण प्रतिवृत्ताची प्रत तक्रारकर्तीने दाखल केली आहे. प्रेताच्या स्थितीबाबत त्यात खालीलप्रमाणे नमूद आहेः-

      "पंचाचे व आमचे मतानुसार मृतकाचा मृत्यु विहीरीच्या पाण्यात पडल्याने उपचारादरम्यान घडला असावा असे वाटते"

      त्यानंतर प्रेत शव विच्छेदनासाठी K. T. S. General Hospital, Gondia येथे पाठविले.

      शव विच्छेदन अहवालात रकाना क्रमांक 5 मध्ये Suspected cause of death or reason for examination – “As per police inquest”  असे नमूद केले आहे.  याचा अर्थ असा की, मृत्‍युचे सकृत दर्शनी कारण विहीरीच्या पाण्यात पडल्याने असे शव विच्छेदन अहवालात देखील नमूद केले आहे.   रकाना क्रमांक 8 मध्ये Condition of the cloths मध्ये “wet with water” असे नमूद आहे.  तसेच रकाना क्रमांक 15 मध्‍ये No obvious external genital injury आणि रकाना क्रमांक 17 मध्ये No surface wounds असे नमूद आहे.

                        शवविच्छेदनाचे वेळी व्हिसेरा काढून तो रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आल्यामुळे व्हिसेरा अहवाल प्राप्त होईपर्यंत मृत्‍युचे निश्चित कारणाबाबतचा अभिप्राय राखून ठेवल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद असले तरी रासायनिक विश्लेषणाचा अहवाल प्राप्त करण्याची जबाबदारी तक्रारकर्तीची नाही व त्यामुळे शवविच्छेदन करणा-या डॉक्टरांनी मृत्‍युच्या कारणाचा राखून ठेवलेला अहवाल पोलीसांना दिला नसेल तर त्यासाठी तक्रारकर्ती जबाबदार नाही.

            घटनास्थळ गोरेगांव पोलीस स्‍टेशनच्या हद्दीत असल्याने गोंदीया (शहर) पोलीस स्टेशन मध्ये नोंदलल्या मर्ग खबरी वरून गोरेगांव पोलीस स्टेशन मध्ये मर्ग खबरी क्रमांक 17/12 दिनांक 17/11/2012 रोजी दाखल करण्यात आली.  तिची प्रत दस्त क्रमांक 7 वर आहे.  त्यात फिर्यादी पोलीस नायक मासरकर यांनी नमूद केले आहे की, "मृतक उमेश फुलीचंद ईलपाचे राह. तिमेझरी हा विहीरीचे पाण्यात पडून त्याला उपचारासाठी दिनांक 07/11/2012 रोजी के. टी. एस. हॉस्पिटल, गोंदीया येथे 9.30 वाजता दाखल केले होते.  तो 10.00 वाजता उपचाराचे दरम्‍यान मरण पावला.  गोरेगांव पोलीसांनी दिनांक 17/11/2012 रोजी घटनास्थळ पंचनामा तयार केला".  त्‍यात नमूद आहे की, घटनास्थळ मयताची पत्नी प्रमिला (फिर्यादी) हिने दाखविले.  ते मृतकाचे राहते घर आहे.  मध्यभागी अंगण असून त्‍यास लागून उत्तरेस विहीर आहे.  याच विहीरीवर बाजूला धाबे आहे.  विहीरीवर दोन्ही बाजूला लाकडे लावली असून मध्यभागी पाणी काढण्यासाठी खुली जागा आहे.  विहीरीवर शिडी लावून मृतक धाब्यावर चढला व साफसफाई करून उतरत असतांना शिडीचा पाय तुटल्‍याने विहीरीत पडला.  मोहल्ल्यातील लोकांनी त्यास दोराच्या सहाय्याने बेशुध्द अवस्थेत बाहेर काढले व प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, कु-हाडी येथे व नंतर के. टी. एस. हॉस्पिटल, गोंदीया येथे नेले असता दवाखान्‍यात मरण पावल्याचे सांगत आहे.  याशिवाय प्राथमिक स्‍वास्थ्य केंद्र, कु-हाडी येथे अपघातग्रस्त उमेश यांस दिनांक 07/11/2012 रोजी तपासून प्राथमिक उपचार करणा-या डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रात अपघातात डोक्याला जबर जखम झाल्याने अति रक्तस्त्राव होऊन उमेशचा मृत्‍यु झाल्याचे दस्त क्रमांक 9 मध्ये नमूद केले आहे.

            वरील सर्व बाबींवरून हे स्पष्ट आहे की, उमेश फुलीचंद ईलपाचे याचा अपघाती मृत्‍यु शिडीवरून विहीरीत पडल्याने विहीरीच्या पाण्यात बुडाल्याने झाला आहे.  मात्र वरील सर्व पुरावा सादर केला असतांना केवळ व्हिसेरा अहवाल नाही एवढ्या कारणासाठी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्ष विमा कंपनीची कृती निश्चितच सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.  आपल्या युक्तिवादाचे पुष्ठयर्थ त्यांनी खालील न्याय निर्णयाचा दाखला दिला आहे. 

i)          II (2008) CPJ 371 (N.C.)

            New India Insurance Co. Ltd.  v/s  State of Haryana & Ors.

            यांत खालीलप्रमाणे अभिप्राय व्यक्त केला आहे.

      “Insurer can not discount and reject reports and statement of Govt. Hospital Authorities, Gram Panchayat and other Govt. Authorities without evidence to the contrary.  Denial of benefit under Government scheme due to non production of F.I.R. & Post-mortem report – Repudiation is unjustified.

ii)         2011 (3) CPR 107 (Mah. State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai) -  New India Assurance Co. Ltd.  v/s  Sau. Chanda Sunil Sawant  ह्या प्रकरणात मा. राज्य आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय व्यक्त केला आहे.

      “Death certificate issued by local authority shows death due to accident.  Such death covered by the insurance policy.  Repudiation of insurance claim on ground that complainant did not file any evidence to prove that deceased died by accident and no F.I.R., Police Panchanama or Hospital certificate has been filed.  It is deficiency in service on the part of Insurance Co.”

                        सदर प्रकरणात उभय पक्षांनी सादर केलेले दस्तावेज आणि त्यांच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद लक्षात घेता असे स्पष्ट होते की, उमेश फुलचंद ईलपाचे हा दिनांक 07/11/2012 रोजी विहीरीजवळ शिडी लावून कोठ्याच्या धाब्यावर दिवाळीची साफसफाई करण्यास चढला व उतरतांना शिडीचा पाय तुटल्याने शिडीस लागून असलेल्या विहीरीत पडला आणि पाण्यात बुडाला.  त्यास प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, कु-हाडी येथे व नंतर K. T. S. General Hospital, Gondia येथे उपचारासाठी नेण्यात आले.  परंतु उपचारास प्रतिसाद न देता त्याचा मृत्‍यु झाला.  याबाबतची हकीकत गोंदीया शहर पोलीसांनी मर्ग क्रमांक 102 दिनांक 07/11/2012 मधील मरणान्‍वेषण प्रतिवृत्तात (दस्त क्र. 7 चा भाग) नमूद केली आहे आणि मृत्‍युचे कारण विहीरीच्या पाण्यात पडल्याने उपचारादरम्यान असे नमूद केले आहे.  तसेच शव विच्छेदन अहवालात देखील मृत्‍युचे सकृतदर्शनी कारण पोलीस अहवालात नमूद केल्याप्रमाणे म्हणजेच "पाण्यात बुडाल्याने मृत्‍यु" असेच नमूद आहे.  व्हिसेरा अहवाल प्राप्त करण्याचे काम पोलीसांचे आहे.  तो त्यांनी प्राप्त केल्याचे दिसत नाही व त्यासाठी तक्रारकर्तीस दोष देता येत नाही.  तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्‍यु पोलीसांनी नोंदलेल्या मर्ग, मरणान्वेषण अहवाल, घटनास्थळ पंचनामा तसेच शवविच्छेदन अहवाल (रकाना क्र. 5 मध्ये) यात नमूद केल्याप्रमाणे विहीरीच्या पाण्यात बुडून झाला नाही तर अन्य कारणांमुळे झाला हे दर्शविणारा कोणताही पुरावा किंवा व्हिसेरा अहवाल विमा कंपनीने दाखल केला नसल्याने सकृतदर्शनी पुराव्यावरून उमेश फुलचंद ईलपाचे याचा मृत्‍यु विहीरीच्या पाण्यात पडून बुडाल्याने झालेला अपघाती मृत्‍यु असल्याचाच निष्कर्ष निघतो.  म्‍हणून वरीलप्रमाणे अपघाती मृत्‍युच्या कारणाबाबत सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध असतांना अपघाती मृत्‍यु सिध्द करण्यासाठी व्हिसेरा अहवाल दाखल केला नाही असे कारण दर्शवून तक्रारकर्तीचा वाजवी विमा दावा नामंजूर करण्याची विमा कंपनीची कृती निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरते.  म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे. 

13.   मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः-     मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्तीचा वाजवी विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्द पक्ष 1 व 2 ची कृती असमर्थनीय असून तक्रारकर्ती तिचे पती उमेश फुलचंद ईलपाचे यांच्या अपघाती मृत्‍युबाबत शेतकरी अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- विरूध्द पक्षाने विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 08/10/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहे.  याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे.  म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.

      वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.  

-// अंतिम आदेश //-

            1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    विरूध्द पक्ष 1, 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 08/10/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्‍याजासह द्यावी.

3.    विरूध्द पक्ष 1, 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 5,000/- द्यावे.

4.    विरूध्द पक्ष 1, 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.

5.    विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.  

 
 
[HON'BLE MR. M. G. CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.