(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 18 एप्रिल, 2015)
तक्रारकर्ते क्र. 1 ते 3 यांनी त्यांची आई श्रीमती शेवंताबाई भोजलाल कटरे यांच्या शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम विरूध्द पक्ष 1, 2 यांनी न दिल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्त्यांनी सदरहू तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्यांची आई श्रीमती शेवंताबाई भोजलाल कटरे यांच्या मालकीची मौजा म्हसगांव ता.गोरेगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 583/2, 575/2 तसेच 601/1 या वर्णनाच्या शेत जमीनी आहेत. तक्रारकर्त्यांची आई ही शेतकरी असून तक्रारकर्ते क्र. 1 ते 3 हे वारस या नात्याने शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट झालेले आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्त्यांच्या आईचा मृत्यु दिनांक 19/11/2011 रोजी ऑटो रिक्षामधून प्रवास करीत असतांना अपघात होऊन झाला. तक्रारकर्त्यांनी दिनांक 02/04/2012 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर केला. परंतु तक्रारकर्त्यांचा विमा दावा निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्त्यांनी दिनंक 30/08/2014 रोजी वकिलामार्फत विरूध्द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविली.
5. परंतु विरूध्द पक्ष 1, 2 यांनी नोटीस मिळूनही तक्रारकर्त्यांचा विमा दावा निकाली न काढल्यामुळे तसेच प्रस्तुत तक्रार दाखल करण्याकरिता तक्रारकर्त्यांना Continuous cause of action उद्भवल्यामुळे तक्रारकर्त्यांनी शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे रू. 1,00,000/- व्याजासह मिळण्यासाठी तसेच नुकसानभरपाई म्हणून रू. 30,000/- व तक्रारीचा खर्च रू. 15,000/- मिळावा म्हणून सदरहू तक्रार दाखल केली आहे.
6. तक्रारकर्त्यांची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 16/09/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 25/09/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 15/01/2015 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्यांना दिनांक 09 नोव्हेंबर 2012 रोजी शेतीविषयक कागदपत्र ‘6-ड’ व ‘6-क’ सादर करण्याविषयी कळविले होते. परंतु तक्रारकर्त्यांनी सदरहू कागदपत्र न दिल्यामुळे त्यांचा दावा दिनांक 27/05/2013 रोजी खारीज करण्यात आला. तसेच तक्रारकर्त्यांच्या नोटीसचे उत्तर देखील दिनांक 30/05/2014 रोजी पाठविण्यात आले होते. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरूध्द पक्ष 3 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दिनांक 22/10/2014 रोजी दाखल केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्यांनी त्यांचा विमा दावा विरूध्द पक्ष 3 यांचेकडे सादर न करता मंडळ कृषि अधिकारी, चोपा यांना सादर केला होता. मंडळ कृषि अधिकारी, चोपा यांनी सदर प्रस्ताव पत्र क्रमांक 234/2012, दिनांक 31/07/2012 नुसार विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर केला. तक्रारकर्त्यांचा सदर प्रस्ताव विरूध्द पक्ष 3 यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 3 यांनी तो प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदीया यांचेकडे दिनांक 23/08/2012 रोजी पुढील कार्यवाहीकरिता पाठविण्यात आला. त्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांची सेवेत कुठलीही त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द सदर प्रकरण खारीज करण्यात यावे.
7. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-2012 चा शासन निर्णय पृष्ठ क्र. 12 वर दाखल केला असून शेतकरी जनता अपघात विमा योजना क्लेम फॉर्म (भाग-1) पृष्ठ क्र. 17 वर दाखल केला आहे. तसेच तक्रारकर्त्यांच्या आईच्या शेतीचा 7/12 उतारा पृष्ठ क्र. 25 व 26 वर, गाव नमुना 8-अ धारण जमिनीची नोंदवही पृष्ठ क्र. 27 व 28 वर, गाव नमुना 6-क वारसा प्रकरणाची नोंदवही पृष्ठ क्र. 29 वर, गाव नमुना 6-ड हिस्से नोंदवही पृष्ठ क्र. 30 वर, तक्रारकर्त्यांच्या आईचे मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 32 वर, F.I.R. ची प्रत पृष्ठ क्र. 33 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 35 वर, मरणान्वेषण प्रतिवृत्त पृष्ठ क्र. 37 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 39 वर, वकिलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस पृष्ठ क्र. 50 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
8. तक्रारकर्त्यांचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्यांनी शेती विषयक 6-क व 6-ड हे कागदपत्र विरूध्द पक्ष यांना वेळोवेळी सादर केलेले आहेत तसेच ते सदरहू प्रकरणात सुध्दा दाखल केलेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्ते हे कायदेशीर वारस असून तक्रारकर्त्यांच्या शेती मालकीबद्दलचा 7/12 उतारा सुध्दा दाखल केलेला असल्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
9. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्यांना पत्र पाठवून सुध्दा त्यांनी वारसांचे फेरफार 6-क व 6-ड वेळेत सादर न केल्यामुळे तक्रारकर्त्यांचा विमा दावा दिनांक 27/05/2013 रोजी कागदपत्रांअभावी खारीज करण्यात आला. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द सदर प्रकरण खारीज करण्यात यावे.
10. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब हाच त्यांचा शपथपत्रावरील पुरावा व लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशा आशयाची पुरसिस दाखल केलेली असून ती पृष्ठ क्र. 64 वर आहे.
11. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचा लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ते शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या गाव नमुना 7-अ व 12 यामध्ये तक्रारकर्त्यांच्या नावाने भूमापन क्रमांक 583 मौजा म्हसगांव, तालुका गोरेगांव, जिल्हा गोंदीया येथे शेत जमीन असल्याचे तसेच गाव नमुना 8-अ व गाव नमुना 6-क यामध्ये तक्रारकर्त्यांच्या नावाने वारस म्हणून फेरफार घेण्यात आल्याचे दिसून येते. सदर फेरफाराची प्रत तक्रारकर्त्यांनी सदर प्रकरणात दाखल केलेली असल्यामुळे तक्रारकर्ते हे शेतकरी या नात्याने तक्रारकर्त्यांच्या मृतक आईचे वारस म्हणून शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास लाभधारक आहेत.
13. विरूध्द पक्ष 1, 2 यांनी तक्रारकर्त्यांना गाव नमुना 6-क व 6-ड सादर करण्याबाबत पाठविलेले पत्र व त्याची पोचपावती सदरहू प्रकरणात दाखल न केल्यामुळे तसेच संबंधित पुरावा विरूध्द पक्ष 1, 2 यांनी दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांना शेती संबंधीचे नमुना 6-क व 6-ड दिले नाही हे विरूध्द पक्ष 1, 2 यांचे म्हणणे सिध्द होत नाही असे मंचाचे मत आहे.
करिता तक्रारकर्त्यांची तक्रार खालील आदेशासह मंजूर करण्यात येते.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना त्यांच्या मृतक आईच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 16/09/2014 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्यांच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्त्यांना द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यांना रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.