(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
- आदेश -
(पारित दि. 22 मार्च, 2016)
तक्रारकर्तीचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्ष यांनी फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती रतीराम सदू बिसेन व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या मालकीची मौजे घुमर्रा, पो. मोहाडी, तालुका गोरेगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 233 या वर्णनाची शेतजमीन आहे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्याचे काम करतात.
4. दिनांक 10/05/2013 रोजी विद्युत धक्का लागल्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युनंतर विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे दिनांक 09/10/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. तसेच विरूध्द पक्ष यांनी वेळोवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता सुध्दा केली.
5. रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष यांनी दिनांक 20/09/2014 रोजीच्या पत्रान्वये "अपघातग्रस्ताचा 6-ड, घटनास्थळ पंचनामा, व्हिसेरा रिपोर्ट व पूर्ण शल्यविश्लेषक अहवाल न दिल्याने हा दावा नामंजूर करण्यात येत आहे" या शे-यासह फेटाळला. त्यामुळे तक्रारकर्तीला मानसिक त्रास व आर्थिक नुकसानभरपाई सहन करावी लागली. तक्रारकर्तीने वेळोवेळी कागदपत्रे देऊनही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्तीने न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- नुकसानभरपाईसह मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 18/03/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 01/04/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
7. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 11/05/2015 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु असल्याबद्दलचा पुरावा म्हणून स्पॉट पंचनामा व इतर कागदपत्रे दाखल न केल्यामुळे तसेच विमा दावा 90 दिवसांच्या आंत दाखल न केल्यामुळे व नमुना 6-ड, व्हिसेरा रिपोर्ट हे सदरहू प्रकरणात वेळोवेळी मागणी करूनही तक्रारकर्तीने दाखल न केल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळण्यात आला. तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळण्यात विरूध्द पक्ष 1, 2 यांची सेवेतील त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी असे लेखी जबाबात म्हटले आहे.
विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 23/04/2015 रोजी दाखल केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेबाबतचा दावा दिनांक 14/10/2013 रोजी त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रारकर्तीचा सदरहू दावा जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांच्याकडे दिनांक 19/10/2013 रोजी सादर केला. त्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सेवेतील त्रुटी झालेली नसल्यामुळे सदरहू तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी.
8. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकूण 11 दस्तऐवज अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 10 ते 37 नुसार दाखल केलेले आहेत.
9. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष यांनी मागणी केल्याप्रमाणे तक्रारकर्तीने वेळोवेळी कागदपत्रे देऊनही विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात यावी.
10. विरूध्द पक्ष 1 व 2 यांचे वकील ऍड. ललित लिमये यांनी असा युक्तिवाद केला की, अपघातासंबंधी व शेतीच्या मालकीसंबंधीच्या कागदपत्रांची तक्रारकर्तीकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. परंतु तक्रारकर्तीने ती कागदपत्रे न पुरविल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज करणे म्हणजे सेवेतील त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी
11. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. मृतकाची वारस म्हणून तक्रारकर्तीच्या नावाची सरकारी कार्यालयात दिनांक 08/10/2013 रोजी नोंद झालेली असून त्याबाबतचे फेरफार पत्रक सदरहू प्रकरणात पृष्ठ क्रमांक 24 वर दाखल केलेले आहे. तसेच 7/12 उता-यामध्ये तक्रारकर्तीच्या नावाची नोंद झाल्यामुळे तक्रारकर्ती ही शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ती ही वारस या नात्याने तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
13. तक्रारकर्तीने पृष्ठ क्रमांक 27 व 29 वर दाखल केलेले मर्ग खबरी आणि घटनास्थळ पंचनामा या दस्तऐवजांवरून तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, गोंदीया यांच्या पत्रानुसार तक्रारकर्तीच्या पतीचा झालेला मृत्यु हा विद्युत धक्का लागल्याने झाल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ती ही शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम खालील आदेशानुसार मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 18/03/2015 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2 ते 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द सदरहू तक्रार खारीज करण्यात येते.