(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 21 एप्रिल, 2016)
तक्रारकर्तीचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतच्या विमा दाव्याबाबत विरूध्द पक्ष 1, 2 दि न्यू इंडिया ऍश्योरन्स कंपनी लिमिटेड यांनी काहीही न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण नुकसानभरपाई मिळण्याकरिता दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही राह. धामनेवाडा, तालुका व जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तिचे पती श्री. बळीराम सोमा नेताम यांच्या मालकीची मौजा धामनेवाडा, तालुका व जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 137 या वर्णनाची शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्यवसाय करीत होते व शेतीतील उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्याचे काम करतात.
4. दिनांक 20/09/2013 रोजी नाल्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला. तक्रारकर्तीचे पती व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युनंतर विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे दिनांक 10/12/2014 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. तसेच विरूध्द पक्ष यांनी वेळोवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता सुध्दा केली.
5. रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला तिच्या दाव्याबाबत काहीही कळविले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- व्याजासह मिळण्यासाठी तसेच तिला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रू. 30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू. 15,000/- मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 25/08/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 02/09/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
7. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 18/12/2015 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीने तिचा विमा दावा उशीराने दाखल केलेला असल्यामुळे दिनांक 14/03/2015 रोजी विरूध्द पक्ष यांचेद्वारा योग्यरित्या खारीज करण्यात आला. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही मुदतबाह्य असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यायोग्य आहे. तसेच मृतकाच्या मृत्युचे कारण हे Self Inflicted Injury असून विमा पॉलीसीअंतर्गत समाविष्ट होत नसल्यामुळे तक्रारकर्तीची सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी. त्याचप्रमाणे विमा सल्लागार कंपनी व विरूध्द पक्ष 3 यांनी कागदपत्रांची शहानिशा न करताच विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे पाठविला. विमा सल्लागार कंपनी आणि विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडलेली नसल्यामुळे सेवेतील त्रुटीकरिता विमा सल्लागार कंपनी व विरूध्द पक्ष 3 हे जबाबदार आहेत. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत कुठल्याही प्रकारे सेवेतील त्रुटी नाही म्हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी असे लेखी जबाबात म्हटले आहे.
8. सदरहू प्रकरणात विरूध्द पक्ष 3 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब देखील दाखल केलेला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 21/01/2016 रोजी मंचामार्फत पारित करण्यात आला.
9. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकूण 11 दस्तऐवज अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 09 ते 41 नुसार दाखल केलेले आहेत.
10. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने विमा दावा उशीराने दाखल केलेला असल्यामुळे दिनांक 14/03/2015 रोजी फेटाळण्यात आल्याचे विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या उत्तरात नमूद केले आहे. परंतु विरूध्द पक्ष 1, 2 यांनी तक्रारकर्तीचा सदर दावा फेटाळल्याबाबतचे पत्र रेकॉर्डवर दाखल केलेले नाही अथवा सदर पत्र तक्रारकर्तीला मिळाल्याबाबतची पोच देखील दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारीचे कारण सतत सुरू असून विरूध्द पक्ष 1, 2 यांनी तक्रारकर्तीला विलंबाबाबतचा कुठलाही खुलासा मागितलेला नाही. पतीच्या मृत्युनंतर तक्रारकर्ती ही शोकमग्न अवस्थेत होती व ती ग्रामीण भागातील असल्यामुळे तिला शेतकरी जनता अपघात विमा योजनेबाबतची कुठलीही माहिती नव्हती. शासकीय स्तरावरून सदर योजनेबाबतची माहिती मिळाल्यानंतर तक्रारकर्तीने सदर योजनेअंतर्गत कागदपत्रे मिळविण्यास सुरूवात केली. त्याकरिता वारंवार तालुक्याला येणे, अधिकारी जागेवर न सापडणे इत्यादी कारणांमुळे तक्रारकर्तील दावा सादर करण्यास विलंब लागला. परंतु दावा सादर करण्यास विलंब झाला ह्या कारणास्तव दावा नाकारता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले असल्यामुळे व अपघातामध्ये तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्याचे आणि अपघाताच्या वेळेस तो शेतकरी होता हे दस्तऐवजांवरून सिध्द होत असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात यावी.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. श्रीमती इंदिरा बघेले यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने तिचा विमा दावा उशीराने दाखल केलेला असल्यामुळे दिनांक 14/03/2015 रोजी विरूध्द पक्ष यांचेद्वारा योग्यरित्या खारीज करण्यात आला. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही मुदतबाह्य असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यायोग्य आहे. तसेच मृतकाच्या मृत्युचे कारण हे Self Inflicted Injury असून विमा पॉलीसीअंतर्गत समाविष्ट होत नसल्यामुळे तक्रारकर्तीची सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी. त्याचप्रमाणे विमा सल्लागार कंपनी व विरूध्द पक्ष 3 यांनी कागदपत्रांची शहानिशा न करताच विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे पाठविला. विमा सल्लागार कंपनी आणि विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडलेली नसल्यामुळे सेवेतील त्रुटीकरिता विमा सल्लागार कंपनी व विरूध्द पक्ष 3 हे जबाबदार आहेत. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत कुठल्याही प्रकारे सेवेतील त्रुटी नाही म्हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी
12. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्तीला तिच्या पतीच्या मृत्युनंतर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता लागलेला वेळ तसेच तक्रारकर्तीची शोकाकूल मनःस्थिती या बाबींचा विचार करता विमा दावा उशीरा दाखल करण्याचे संयुक्तिक कारण असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेला विमा दावा सक्षम कारणानुसार ग्राह्य धरण्यात येतो.
14. तक्रारकर्तीने पृष्ठ क्रमांक 17 वर दाखल केलेला 7/12 चा उतारा तसेच फेरफाराची नोंद यावरून तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात असे मंचाचे मत आहे.
15. तक्रारकर्तीने दाखल केलेला पोलीस स्टेशन, सालेकसा येथील घटनास्थळ पंचनामा व फौजदारी संहितेचे कलम 174 नुसार उप विभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या मरणान्वेषण प्रतिवृत्तानुसार तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु असल्याचे सिध्द होते.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल करून घेतल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 25/08/2015 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावेत.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3 व 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 3 यांचेविरोधात तक्रारकर्तीची प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात येते.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.