(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 30 जून, 2015)
तक्रारकर्तीचे पती चैनलाल चंदू माने यांच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्ष 1, 2 दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती चैनलाल माने हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या मालकीची मौजे मरारटोला, तालुका व जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 57, 140 व 505 या वर्णनाची शेतजमीन आहे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्याचे काम करतात.
4. दिनांक 11/09/2012 रोजी तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु नाल्याच्या डोहात पाय घसरून पडल्याने झाला. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युनंतर विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे 90 दिवसांच्या आंत म्हणजेच दिनांक 03/03/2012 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. परंतु वारंवार विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांना दिनांक 22/10/2014 रोजी वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्या नोटीसची देखील पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्तीने न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात व मुदतीत विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- नुकसानभरपाईसह मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
5. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 23/12/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 05/01/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 26/02/2015 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीने शेती संबंधी फेरफार नमुना 6-ड व मृतकाच्या वयाचा दाखला सादर न केल्यामुळे तसेच तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्युचे कारण Self inflected injury असल्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्ती विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र नसल्याने तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळण्यात आला व त्यासंबंधीची माहिती तक्रारकर्तीला दिली होती. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असे लेखी जबाबात म्हटले आहे.
विरूध्द पक्ष 3 यांना सदरहू प्रकरणात मंचामार्फत बजावण्यात आलेली नोटीस मिळूनही ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब सुध्दा दाखल केला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 19/05/2015 रोजी मंचाद्वारा पारित करण्यात आला.
6. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी जनता अपघात विमा योजना 2012-2013 चा शासन निर्णय पृष्ठ क्र. 10 वर दाखल केला असून विरूध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्तीला पाठविलेले पत्र पृष्ठ क्र. 14 वर दाखल केले आहे. तसेच तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांचेकडे सादर केलेला विमा दावा पृष्ठ क्र. 15 वर, तक्रारकर्तीच्या पतीच्या शेतीचा 7/12 उतारा पृष्ठ क्र. 22 ते 24 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 25 वर, गाव नमुना 6-क-वारसा प्रकरणाची नोंदवही पृष्ठ क्र. 26 वर, तक्रारकर्तीच्या पतीच्या आधारकार्डची प्रत पृष्ठ क्र. 27 वर, तक्रारकर्तीच्या पतीच्या अपघाताबाबतचा रिपोर्ट व इतर पोलीस दस्तऐवज पृष्ठ क्र. 28 ते 34 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 35 ते 42 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 43 वर, तक्रारकर्तीच्या पतीचे रेशनकार्ड पृष्ठ क्र. 44 वर, वकिलामार्फत पाठविण्यात आलेली कायदेशीर नोटीस पृष्ठ क्र. 46 ते 48 वर, नोटीस पाठविल्याच्या पोस्टाच्या पावत्या व पोचपावत्या पृष्ठ क्र. 49 ते 51 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
7. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने 90 दिवसांच्या आंत संपूर्ण कागदपत्रांसह विमा दावा विरूध्द पक्ष यांच्याकडे दाखल केला होता. तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणात शेतीसंबंधी फेरफार नमुना 6-ड व तक्रारकर्तीच्या पतीचे आधारकार्ड दाखल केलेले आहे. तक्रारकर्तीने भूमापन क्रमांक व शेतीच्या मालकीसंबंधाने तलाठ्याचे प्रमाणपत्र सुध्दा सदर प्रकरणात दाखल केलेले असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रुटी आहे.
8. विरूध्द पक्ष 1 व 2 यांचे वकील ऍड. ललित लिमये यांनी असा युक्तिवाद केला की, वेळोवेळी मागणी करूनही तक्रारकर्तीने फेरफार व शेतीच्या मालकीबद्दल योग्य कागदपत्र तसेच मृतकाच्या वयाचा दाखला न दिल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रुटी नाही. तक्रारकर्तीला तिचा विमा दावा फेटाळल्याबद्दलचे पत्र पाठविले असल्यामुळे तक्रारकर्तीची सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
9. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष 1 व 2 यांचा लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्तीने पोलीस स्टेशन रावणवाडी, तालुका जिल्हा गोंदीया येथील घटनास्थळ पंचनामा, मर्ग खबरी व उप विभागीय दंडाधिकारी, गोंदीया यांना सादर केलेला इन्क्वेस्ट पंचनामा यावरून तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा नाल्याच्या पाण्यात आंघोळ करीत असतांना डोहात पडल्यामुळे झाला हे म्हणणे सकृतदर्शनी सिध्द होते.
11. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या आधारकार्डनुसार तक्रारकर्तीच्या पतीचा जन्म हा 1946 मध्ये झाला असल्यामुळे तक्रारकर्तीचे पती हे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वयाच्या तरतुदीनुसार 75 वर्षे वयोगटात समाविष्ट होत असल्यामुळे ते लाभार्थी आहेत.
12. तक्रारकर्तीने सरपंच, ग्राम पंचायत काटी यांचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 77 वर दाखल केले असून त्या प्रमाणपत्रानुसार तक्रारकर्तीचे पती चैनलाल माने व चैन माने हे एकच व्यक्ती असल्याचे म्हणणे सिध्द होते. तसेच तलाठी कार्यालय, काटी, तालुका व जिल्हा गोंदीया यांच्या प्रमाणपत्रानुसार तक्ररकर्तीच्या पतीची शेत जमीन ही मौजा मरारटोला येथे असून चकबंदीप्रमाणे जुना सर्व्हे नंबर 197 मध्ये 1985-86 ला बदल करून नव्याने भूमापन क्रमांक 506 देण्यात आला. त्यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या फेरफार पत्रकानुसार तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात व तक्रारकर्ती ही लाभार्थी या व्याख्येमध्ये समाविष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ती ही शेतकरी जनता अपघात विमा योजनेची रक्कम मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता तक्रारकर्तीची तक्रार खालील आदेशासह मंजूर करण्यात येते.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 23/12/2014 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 3 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2 व 3 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 3 यांनी उपरोक्त आदेश क्र. 4 चे पालन वैयक्तिकरित्या करावे.
7. विरूध्द पक्ष 1 ते 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.