(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 24 सप्टेंबर, 2015)
तक्रारकर्तीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी मंजूर किंवा नामंजूर केल्याचे न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही मौजा मुंडीपार, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. हरीप्रसाद कोंडू मानकर यांच्या मालकीची मौजा मुंडीपार, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 184, 186, 188 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. हरीप्रसाद कोंडू मानकर हे दिनांक 18/02/2013 रोजी श्री. कुरूंजेकर यांच्या शेतात असलेल्या अवैध विद्युत जोडणीमुळे विजेचा धक्का लागून जखमी होऊन मरण पावले.
5. तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने व अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 04/05/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला व वेळोवेळी दस्तऐवजांची पूर्तता केली. परंतु आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीला तिच्या पतीच्या दाव्याबाबत दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याचे न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.10,000/- मिळण्यासाठी दिनांक 20/02/2015 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 23/02/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 07/03/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 29/04/2015 रोजी दाखल केला व तो पृष्ठ क्र. 63 वर आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून विरूध्द पक्ष यांची सेवेत त्रुटी दर्शविणारे असे कुठलेही दस्तऐवज तक्रारकर्तीने सादर केलेले नसल्याचे म्हटले आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात पुढे असे म्हटले आहे की, विद्युत वायर पकडणे धोकादायक असल्याचे माहिती असतांनासुध्दा तक्रारकर्तीच्या पतीने विद्युत तार हाताने पकडली आणि विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यु झाला असे पोलीस पेपर्सवरून दिसून येते. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाताने झालेला नसून तो स्वतः ओढवून घेतलेला मृत्यु आहे. सदर विद्युत पुरवठा हा अवैध स्वरूपाचा होता आणि हे कायद्याने गुन्हा आहे. तसेच 7/12 उता-यामध्ये तक्रारकर्तीच्या पतीचे नाव वेगळे आहे आणि त्याबद्दल तक्रारकर्तीने कुठलेही कारण सांगितलेले नाही. तसेच विमा सल्लागार यांनी आपले कर्तव्य बरोबर बजावले नाही. विमा सल्लागार यांनी सर्व दस्तऐवजांची शहानिशा करून नंतरच विमा दावा विमा कंपनीकडे पाठवावयास पाहिजे होते. परंतु त्यांनी तसे न केल्यामुळे यासाठी विमा सल्लागार हे जबाबदार असून विमा कंपनी नाही आणि म्हणून विमा कंपनीने आपल्या सेवेत कुठल्याही प्रकारचा कसूर केलेला नाही. त्याचप्रमाणे तालुका कृषि अधिकारी यांनी देखील त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही. त्यांनी संपूर्ण दस्तऐवजांची शहानिशा न करताच तक्रारकर्तीचे दस्तऐवज आणि विमा दावा स्विकारला यासाठी विरूध्द पक्ष 3 हे जबाबदार आहेत असे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात नमूद केले असून विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी केलेली नसल्यामुळे तक्रारकर्तीची सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी असेही विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 09/04/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 61 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विमा योजना मिळण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 03/05/2013 रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर केला. त्यानंतर तक्रारकर्तीचा सदरहू प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास त्यांचे कार्यालयीन पत्र क्रमांकः 780/15, दिनांक 04/05/2013 नुसार सादर करण्यात आला. तक्रारकर्तीच्या प्रस्तावात त्रुट्या असल्याबाबत वेळोवेळी तक्रारकर्तीला पत्राद्वारे सूचित करण्यात आले. विरूध्द पक्ष 3 यांनी सेवेत कुठलीही त्रुटी केलेली नसून विरूध्द पक्ष 1 व 2 हे सर्वस्वी जबाबदार असल्याचे विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात म्हटले आहे.
9. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळल्याबाबतचे विरूध्द पक्ष 1 यांचे पत्र पृष्ठ क्र. 10 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-1 पृष्ठ क्र. 12 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-2 तलाठ्याचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 13 वर, प्रमाणपत्र 6-क पृष्ठ क्र. 16 वर, 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 20, 23 वर, गाव नमुना आठ-अ पृष्ठ क्र. 24 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 26 वर, पहिली खबर पृष्ठ क्र. 28 वर, इन्क्वेस्ट पंचनामा पृष्ठ क्र. 34 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 38 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 40 वर, तक्रारकर्तीचे शपथपत्र पृष्ठ क्र. 72 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-2010 मार्गदर्शक सूचना पृष्ठ क्र. 87 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 48 वर, विरूध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत पृष्ठ क्र. 51 वर, पोचपावती पृष्ठ क्र. 52 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
10. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 63 वर दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, सदर विद्युत पुरवठा अनधिकृत नव्हता व सदर घटना घडलेले शेत हे श्री. राजकुमार कुरूंजेकर ह्यांचे असून तक्रारकर्तीच्या पतीने व भावाने मिळून शेती करण्यासाठी भाड्याने वाहायला घेतले होते. तसेच सदरहू शेतीवर पाणी पुरवठा श्री. कुरूंजेकर यांनीच दिला व बोअरवेल देखील त्यांचीच असून विद्युत पुरवठा देखील त्यांनीच दिला होता व त्याबद्दल कुरूंजेकर हे तक्रारकर्तीच्या पतीला व भावाला मोबदला देत होते. सदर विद्युत पुरवठा अवैध होता हे तक्रारकर्तीच्या पतीला माहीत नव्हते. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा निष्काळजीपणाने झाला असा पोलीस दस्तऐवजात कुठेही नमूद नाही व त्याबाबत त्यांच्यावर पोलीसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही तसेच त्याबाबत कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसून तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु विद्युत वायरचा करंट लागून झालेला असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांचे वकील ऍड. ललित लिमये यांनी सदरहू प्रकरणात दाखल केलेल्या लेखी जबाबालाच शपथपत्र समजण्यात यावे अशा आशयाची पुरसिस दाखल केली असून ती पृष्ठ क्र. 75 वर आहे. तसेच पॉलीसीची प्रत पृष्ठ क्र. 82 वर आणि लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 76 वर दाखल केला आहे.
विरूध्द पक्ष 1 व 2 च्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाताने झालेला नसून तो त्यांच्या स्वतःच्या निष्काळजीपणाने ओढवून घेतलेला मृत्यु आहे. विरूध्द पक्ष यांची सेवेत त्रुटी असल्याबद्दलचे कुठलेही दस्तऐवज तक्रारकर्तीने दाखल केलेले नाहीत. तक्रारकर्तीचा पती सदर शेतजमीन पूर्वीपासून वाहात होता व श्री. कुरूंजेकर यांनी घेतलेला विद्युत पुरवठा हा अवैध असल्याची त्याला माहिती होती आणि ही बाब गुन्ह्यास पात्र आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या 7/12 उतारा-यामध्ये तिच्या पतीचे नाव वेगळे आहे आणि त्याबद्दल कुठलेही सबळ कारण नमूद करण्यात आलेले नाही. तसेच शासन निर्णयानुसार सर्व जबाबदारी विरूध्द पक्ष 3 यांची आहे. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत कुठलीही त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी असे आपल्या युक्तिवादात म्हटले आहे.
12. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 18/02/2013 रोजी विद्युत धक्का लागून झाला. तक्रारकर्तीने संपूर्ण कागदपत्रासह विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा दावा मंजूर किंवा नामंजूर केला याबद्दल तक्रारकर्तीला कळविले नसल्यामुळे व त्यांची मौजा मुंडीपार, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 184, 186, 188 ह्या वर्णनाची शेतजमीन नसल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
14. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला नुकसानभरपाई द्यावी या मताशी विरूध्द पक्ष 3 हे सहमत आहेत आणि त्यांना कुठलाही आक्षेप नाही असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे. तसेच तक्रारकर्ती ही वारस या नात्याने शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे.
15. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट, प्रथम खबर, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या संपूमर्ण कागदपत्रांचा विचार करता तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे हे सिध्द होते आणि सर्व दस्तऐवज, पुरावे, शपथपत्र तसेच 7/12 उता-यात मृतकाच्या वारसाची नावे आहेत. हे सर्व ग्राह्य धरून तक्रारकर्ती ही महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असून विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढणे ही विरूध्द पक्ष 1 व 2 यांची सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रारकर्तीची तक्रार दाखल करून घेतल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 23/02/2015 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.