(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 06 मार्च 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ताचे वाहन अशोक लेलॅन्ड 2004, ज्याचा नोंदणी क्रमांक MH 31 CB 1845 असून, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडून वाहनाचा विमा केलेला होता, ज्याचे प्रिमीयम रुपये 16,057/- देवून वाहन विमाकृत केले होते. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला पॉलिसी प्रधान करुन त्याचा पॉलिसी क्रमांक 160100/31/06/01/00003387 असून पॉलिसीची अवधी दिनांक 27.7.2006 ते 26.7.2007 पर्यंत होती. या कालावधी करीता रुपये 8,50,000/- विमा घोषीत केला. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्त्याचा वाहन दिनांक 12.1.2007 रोजी नॅशनल हायवे क्र.6 वर सिंगोरी या गावा नजिक जवळपास 0.30 मि. वाजता आगीच्या भक्षस्थानी पडले. सदर वाहन हे अॅल्युमिनीयम ठोकळे घेऊन कोरबा ते नागपूर घेवून जात असतांना डाव्या बाजुचा टायर फुटला. ड्रायव्हरने वाहन नियंञीत करण्याचा प्रयत्न केला आणि रस्त्यावर इतर वाहनांना अडचण होऊन रस्ता जाम होऊ नये म्हणून वाहन रत्याच्या डाव्या बाजुला उभे केले. परंतु, त्यावेळेस वाहन आगीच्या भक्षस्थानी पडले होते, त्यामुळे तक्रारकर्त्याचा वाहनाचा अतिशय नुकसान झाले आणि वाहन संपूर्ण क्षतीग्रस्त झाले होते. पोलीस स्टेशन भंडारा यांना दिनांक 12.1.2007 रोजी सुचना करण्यात आली होती व त्यादिवशी घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. सदर घटनेची माहिती विरुध्दपक्ष क्र.1 ला देण्यात आली, त्यांनी स्पॉट सर्व्हेअरची स्थळ निरिक्षणाची नियुक्ती केली. स्पॉट सर्व्हेअरने घटनास्थळाला भेट देवून वाहनांचे सर्व बाजुने छायाचिञ आणि दस्ताऐवजाची तपासणी केली व त्याच्या प्रती सोबत घेतल्या आणि नंतर तक्रारकर्त्याला वाहन गॅरेजमध्ये तपासणीकरीता दुस-या वाहनाला जोडून/ टो करुन सदर अपघातग्रस्त वाहन मे.साई बाबा मेकॅनिकल अॅंन्ड बॉडी वर्क्स, लाल गोडाऊन, टेका नागपूर येथे आणण्यात आले, त्याकरीता लागणारा खर्च रुपये 2,500/- तक्रारकर्त्याला आला. त्यानंतर, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 ला सर्व दाव्याचे कागदपञांची पुर्तता करुन व दावा प्रपञ हे रुपये 5,69,125/- या दुरुस्तीच्या अंदाजीत खर्चासह व सोबत नोंदणी प्रमाणपञ, विमा पॉलिस, कारच्या पावत्या, परवाना, सक्षमता इत्यादी छाणनीकरीता दाखल केले. विरुध्दपक्ष क्र.1 ला नुकसान भरपाई आकलनाकरीता अंतिम सर्वेअर नियुक्त करण्यास सांगितले. विरुध्दपक्ष क्र.1 ने त्यांचे सर्वेअर पॅनेल नियुक्त केले आणि त्यांनी दिनांक 25.1.2007 रोजी वाहनाची तपासणी करुन सर्व बाजुने वाहनाची छायाचिञ व सर्व मुळ दस्ताऐवजाची तपासणी करण्यात आली. परंतु, वाहन हे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने ते दुरुस्ती करण्याजोगे नव्हते व दुरुस्त करुन रोडवर आणण्यालायक नव्हते. त्यामुळे, वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च हा वाहनाच्या किंमतीवर जाण्यालायक होता व गॅरेज मालक दुरुस्तीनंतर सुध्दा वाहनाच्या क्षमतेबद्दल गॅरंटी देण्यास तयार नव्हता. वाहनाची स्थिती पाहून तक्रारकर्त्याने सर्वेअरशी बोलणीकरुन वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च हा वाहनाच्या किंमतीपेक्षा वर होत आहे असे सांगितले. सर्वेअर याबाबत चुप राहीला व वाहनाच्या दुरुस्तीसाठी आग्रह करीत राहीला. तक्रारकर्तीचे पती यांनी विरुध्दपक्ष क्र.1 कडे जावून डिव्हीजनल मॅनेजर यांची भेट घेवून वाहनाचे प्रत्यक्ष स्थितीबाबत महिती दिली. या मुद्यावर तक्रारकर्त्यास डिव्हीजनल मॅनेज यांनी मॅकॅनिक व सर्वेअर यांचेशी चर्चा करतील असे सांगितले. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, दिनांक 29.11.2007 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 यांनी 11 महिन्याचे कालावधीनंतर एक पञ पाठवून वाहनासंबंधी सर्व मुळ कागदपञांची झेरॉक्स प्रती व मुळ दस्ताऐवज दाखल करण्यास सांगितले व तक्रारकर्त्याला भेटावयास सांगितले. दिनांक 4.12.2007 रोजी तक्रारकर्त्याने भेट दिली असता, सर्व्हेअरच्या म्हणण्याप्रमाणे दुरुस्ती करणे शक्य आहे तर ते दुरुस्त करता येईल व पूर्ववत करण्यात येईल. त्यानंतर, तक्रारकर्ता वारंवार विरुध्दपक्ष यांचेकडे भेट देत राहीला, परंतु विरुध्दपक्ष यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी तक्रारकर्त्याला 5 वर्षापर्यंत विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्याचा दावा निकाली न काढून फक्त ञास देण्यात आला. मुख्य म्हणजे तक्रारकर्त्याला सदर वाहनापासून उदरनिर्वाह कसा करावा याचा विचार पडला व विरुध्दपक्ष यांनी कोणतीही भूमिका न दाखविल्यामुळे तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागला व त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यावर असलेले कर्ज फेडण्याकरीता तिला आपले दाग-दागिने विकून कर्जाची पुर्तता करावी लागली. यासर्व कारणांमुळे तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक, मानकिस व आर्थिक ञास होऊन, सरते शेवटी सदरची तक्रार न्यायमंचासमक्ष दाखल करावी लागली. तक्रारकर्तीने खालील प्रमाणे मागणी केलेली आहे.
1) विरुध्दपक्ष यांचे सदरचे कृत्य हे सेवेत ञुटी व तक्राकर्त्याशी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे असे घोषीत करावे.
2) तसेच, विमा घोषीत मुल्य निर्धारीत करुन त्यावर 12 टक्के व्याजासह वाहनाच्या अपघाताचे दिनांकापासून अंतिम रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. व्याज देण्याचे आदेशीत करावे.
3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. त्यावर विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारीला आपले उत्तर सादर करुन त्यात नमूद केले व प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ही दिनांक 12.1.2007 रोजी तक्रारकर्त्याच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यानंतर बराचसा कालावधी लोटल्यानंतर म्हणजे दिनांक 8.9.2011 रोजी सदरची तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतबाह्य आहे. तसेच, सदर तक्रारीत चीफ रिजनल मॅनेजर यांना विनाकारण या प्रकरणात गोवलेले आहे. तक्रारकर्त्याने स्वतः वाहनाच्या दस्ताऐवजांची पुर्तता केली नाही व त्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा निकाली काढण्यात आला नाही. त्यात तक्रारकर्त्याची स्वतःची चुक असल्या करणास्तव ते स्वतः जबाबदार आहेत, करीता तक्रारकर्त्याची सदरची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. पुढे विरुध्दपक्ष यांनी ही बाब मान्य केली आहे की, विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून वाहनाचा विमा उतरविला होता, ज्याचा क्रमांक 160100/31/06/01/00003387 असून त्याचा कालावधी दिनांक 27.7.2006 ते 26.7.2007 पर्यंत होता व तक्रारकर्त्याचा वाहन क्रमांक MH 31 CB 1845 होता. तक्रारकर्त्याच्या वाहनाचे निरिक्षक व्दारा निरिक्षण करण्यात आले, त्यानुसार निरिक्षण करुन आपला अहवाल सुध्दा सादर केला. परंतु, तक्रारकर्ता हे वाहनाच्या नुकसानीबद्दल पूर्ण नुकसान झाले व वाहनाचा सॉल्व्हेज असे एकूण वाहनाच्या मुळ किंमतीपेक्षा जास्त रकमेची मागणी विरुध्दपक्षाकडून घेण्याची इच्छा दर्शवीत होते. तसेच, तक्रारकर्ता हे सत्यता लपवून गैरकायदेशिर अतिरिक्त पैशाची मागणी करीत आहे. यासर्व एकंदरीत तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व बिनबुडाची असून विनाकारण विरुध्दपक्षाकडून पैस उकडण्याकरीता मंचात खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. विरुध्दपक्ष पुढे नमूद करतो की, विरुध्दपक्ष यांनी पुरविलेल्या सेवेत कोणतीही ञुटी व कमतरता नाही व सदरची तक्रार ही गुणवत्ताहीन आहे. तक्रारकर्त्याने अनुचित लाभ मिळविण्यासाठी जाणुन-बुजून विरुध्दपक्षाचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
4. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर 1 ते 11 दस्ताऐवज दाखल केले असून त्यात प्रामुख्याने इंशुरन्स पॉलिसी, घटनास्स्थळ पंचनामा, टॅक्सेशन सर्टीफीकेट, फीटनवेस सर्टीफीकेट, नॅशनल परमीट, गुडस् गॅरेज परमीट, लोड चालॉन, रजीस्ट्रेशन सर्टीफीकेट, वाहनाच्या दुरुस्तीला लागणारा खर्चाचा अहवाल, व विरुध्दपक्ष यांना पाठविलेल्या विनंती पञाच्या प्रती इत्यादी दस्ताऐवज दाखल केले. विरुध्दपक्ष यांनी सुध्दा आपल्या उत्तराबरोबर श्री पाटील यांचा सर्वे रिपोर्ट, दिनांक 9.6.2008 रोजी तक्रारकर्त्याला पाठविलेल्या पञाची प्रत दाखल केलेली आहे.
5. सदरच्या प्रकरणात दोन्ही पक्षाने लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच, दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होते काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्याचे सेवेत ञुटी किंवा : होय
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याची सदची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्त्याचे वाहन हे रस्त्यावर चालत असतांना हायवे क्रमांक 6 वर माल घेवून जात असतांना अचानक वाहनाचे टायर फुटून वाहनाला आग लागली व थोळ्याचवेळात तक्रारकर्त्याचे वाहन आगीत भस्मसात झाले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचेकडे वाहनाचा विमा उतरविला होता, संपूर्ण दस्ताऐवज व वाहनासंबंधी विमा मिळण्याकरीता विरुध्दपक्ष यांचेकडे पुर्तता केली. परंतु, विरुध्दपक्ष यांनी दुर्लक्ष केले व तक्रारकर्त्याच्या वाहनाचा विमा मंजूर अथवा नामंजूर केला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, मानसिक ञास सोसावा लागला. विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्ती ही वाहनाचा टोटल लॉस झाला करीता वाहनाच्या विम्याची रक्कम देण्याची मागणी करीत आहे, परंतु विरुध्दपक्ष यांनी पाठविलेल्या सर्वेअरच्या अहवालाप्रमाणे वाहन हे रिपेअर/ दुरुस्त होण्या सारखे असून तक्रारकर्ती ही विनाकारण विमा कंपनीकडून जास्त पैसे उकडण्याचा प्रयत्न करीत सदरचा दावा दाखल केला आहे. तसेच, तक्रारकर्ती हिला विरुध्दपक्ष कंपनीकडून वाहनाच्या विम्या दाव्यासंबंधी दस्ताऐवजांची मागणी केली आहे, परंतु त्याची पुर्तता आजपर्यंत केली नाही, करीता ते स्वतः जबाबदार आहे.
7. दोन्ही पक्षाचे म्हणणे व दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकण्यात आला, तसेच, तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेल्या दसताऐवजांचे अवलोकन करण्यात आले त्यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या वाहनाच्या विम्याची जी मुळ IDV व्हॅल्यु रुपये 6,00,000/- दाखविली आहे, तसेच पंचनाम्याचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याचे वाहन हे पूर्णपणे जळालेले आहे व तसेच दुरस्ती खर्चाच्या अहवालाचे अवलेाकन केले असता असे दिसून येते की, जवळपास 80 % टक्के IDV मुल्यांकनाच्या 80 % टक्के रक्कम वाहनाच्या दुरुस्तीकरीता लागत आहे. अशापरिस्थिती मध्ये असे गृहीत धरता येते की, IDV मुल्यांकनाच्या 75 % टक्के खर्च एखाद्या वाहनाचे दुरुस्तीकरीता येत असेल तर ते वाहन टोटल लॉस या संज्ञेत माडते. करीता, तक्रारकर्ती ही टोटल IDV व्हॅल्यु रुपये 6,00,000/- पैकी 75 % टक्के रक्कम वाहनाच्या टोटल लॉसमुळे घेण्यास पाञ आहे, असे मंचाला वाटते. करीता, सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्तीचे जळालेले वाहन हे टोटल लॉस घोषीत करुन विमा पॉलिसीमध्ये IDV व्हॅल्युची दर्शविलेली रक्कम रुपये 6,00,000/- प्रमाणे त्यामधील 75 % टक्के रक्कम तक्रारकर्त्याला द्यावी.
(3) तसेच विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 15,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 5,000/- असे एकूण रुपये 20,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 06/03/2017