(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 24 सप्टेंबर, 2015)
तक्रारकर्तीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी मंजूर किंवा नामंजूर केल्याचे न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही मौजा परसवाडा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. राजू भादू उईके यांच्या मालकीची मौजा परसवाडा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 1073, 281 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. राजू भादू उईके हे दिनांक 14/09/2013 रोजी आपल्या शेतात काम करीत असतांना आकाशातून वीज अंगावर पडल्याने जखमी होऊन मरण पावले.
5. तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने व अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 07/10/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला व वेळोवेळी दस्तऐवजांची पूर्तता केली. परंतु आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला तिच्या पतीच्या दाव्याबाबत 1 वर्ष उलटून गेले तरी दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याचे न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.20,000/- मिळण्यासाठी दिनांक 20/02/2015 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 23/02/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 07/03/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 18/05/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 57 वर आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून त्रिपक्षीय कराराप्रमाणे तक्रारकर्तीने तिचा विमा दावा दिनांक 14/11/2013 च्या रात्रीपर्यंत विमा कंपनीकडे दाखल करावयास पाहिजे होता. परंतु तक्रारकर्तीने तिचा विमा दावा दिनांक 01/04/2014 रोजी दाखल केला आणि दावा दाखल करण्यास विलंब कां झाला याबद्दल कुठलेही संयुक्तिक कारण दिले नसल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक 04/04/2014 रोजी पत्र पाठवून नामंजूर करण्यात आल्याचे तक्रारकर्तीला कळविण्यात आले. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांची सेवेत कुठलीही त्रुटी नाही असे नमूद केले आहे.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 06/04/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 54 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीचे पती दिनांक 13/09/2013 रोजी मयत झाले असून तक्रारकर्तीचा दावा दिनांक 17/10/2013 रोजी त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाला व पडताळणी करून दिनांक 30/12/2013 रोजी उपविभागीय कृषि अधिकारी, गोंदीया यांच्याकडे पत्र क्रमांक 2105/30.12.2013 अन्वये सादर करण्यात आला. तालुका कृषि अधिकारी हे कार्यालय फक्त शेतक-यांचे जनता अपघात विम्याचे प्रस्ताव स्विकारते व पडताळणी करून पुढील कार्यवाहीस्तव उपविभागीय कृषि अधिकारी, गोंदीया कार्यालयास सादर करते. त्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांचेकडून सेवेमध्ये कुठलीही त्रुटी झालेली नाही असे विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात म्हटले आहे.
9. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी जनता अपघात विमा योजना 2012-13 चा शासन निर्णय पृष्ठ क्र. 10 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-1 पृष्ठ क्र. 12 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-2 तलाठ्याचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 13 वर, 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 18 ते 23 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 24 ते 27 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 28 वर, इन्क्वेस्ट पंचनामा पृष्ठ क्र. 30 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 32 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 40 वर, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 42 वर, वारसान प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 43 वर, तक्रारकर्तीने वकिलामार्फत पाठविलेला कायदेशीर नोटीस पृष्ठ क्र. 44 वर, तक्रारकर्तीचे शपथपत्र पृष्ठ क्र. 62 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
10. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 64 वर दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 14/09/2013 रोजी झाल्यानंतर दिनांक 17/10/2013 रोजी म्हणजेच मुदतीच्या आधीच दावा दाखल केला व विरूध्द पक्ष 3 तालुका कृषि अधिकारी यांनी त्यांच्या उत्तरात हे मान्य केले आहे. तक्रारकर्तीने सर्व दस्तऐवज देऊन सुध्दा विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 04/04/2014 रोजी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला. अशाप्रकारे त्यांनी आपल्या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. करिता तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात यावी असे त्यांनी आपल्या तोंडी युक्तिवादात म्हटले.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी सदरहू प्रकरणात शपथपत्रावरील पुरावा दाखल करावयाचा नाही अशा आशयाची पुरसिस दाखल केली असून ती पृष्ठ क्र. 66 वर आहे. तसेच त्यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 67 वर दाखल केला असून त्यांनी आपल्या तोंडी युक्तिवादात म्हटले की, त्रिपक्षीय कराराप्रमाणे विमा दावा दस्तऐवज दिनांक 14/11/2013 च्या रात्रीपर्यंत विमा कंपनीकडे सादर करावयास पाहिजे होता. परंतु तक्रारकर्तीने दिनांक 01/04/2014 रोजी कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय दाखल केलेला आहे आणि दावा उशीरा कां दाखल केला याबद्दलचे कुठलेही सबळ कारण दिलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
12. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 14/09/2013 रोजी अंगावर वीज पडून झाला. तक्रारकर्तीने संपूर्ण कागदपत्रासह विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर केला. तक्रारकर्तीची त्यावेळची मानसिक स्थिती आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तिला लागलेला वेळ व घरातील एकमेव सज्ञान व्यक्ती या बाबींचा विचार करता तक्रारकर्तीस विमा दावा अर्ज दाखल करण्यासाठी विलंब लागल्याचे संयुक्तिक कारण आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे 90 दिवसानंतर सुध्दा विमा दावा संयुक्तिक कारण असल्यास दाखल केल्या जाऊ शकतो व तो मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रारकर्तीची तक्रार दाखल करून घेतल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 23/02/2015 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू.5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.