(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 25 फेब्रुवारी, 2016)
तक्रारकर्त्याचा भाऊ मनीराम कोंडु मानकर यांच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्ष यांनी निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याचा भाऊ मनीराम कोंडु मानकर हा व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या मालकीची मौजे मुंडीपार, तालुका आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 184, 186, 188 या वर्णनाची शेतजमीन आहे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्याचे काम करतात.
4. दिनांक 18/02/2013 रोजी श्री. कुरूंजेकर यांच्या शेतात असलेल्या अवैध विद्युत जोडणीमुळे विजेचा धक्का लागून मृत्यु झाला. तक्रारकर्त्याने त्याच्या भावाच्या अपघाती मृत्युनंतर विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे दिनांक 04/05/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. तसेच विरूध्द पक्ष यांनी वेळोवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता सुध्दा केली.
5. रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या भावाच्या दाव्याबाबत मंजूर अथवा नामंजूर अशी कोणतीही सूचना न दिल्याने तक्रारकर्त्याने त्याच्या वकिलामार्फत विरूध्द पक्ष यांना दिनांक 03/02/2015 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीसला देखील विरूध्द पक्ष यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी दावा निकाली न काढणे ही सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्त्याने न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- नुकसानभरपाईसह मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
6. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 23/02/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 07/03/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
7. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 18/05/2015 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्त्याच्या भावाचा झालेला मृत्यु हा त्याच्या स्वतःच्या निष्काळजीपणाने व अवैध विद्युत जोडणी करीत असतांना विजेचा धक्का लागून झाल्याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारकर्ता हा मृतकाचा कायदेशीर वारस नसल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास पात्र नसल्याचे म्हटले आहे. शासन व विमा कंपनी यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असेही लेखी जबाबात म्हटले आहे.
विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 17/04/2015 रोजी दाखल केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा दिनांक 03/05/2013 रोजी त्यांच्या कार्यालयात सादर केला. विरूध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्याचा सदरहू विमा दावा दिनांक 04/05/2013 नुसार वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला. विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात व वरिष्ठ कार्यालयास सादर करतात. विमा दावा मंजुर करण्याचा वा नामंजूर करण्याचा अधिकार विमा कंपनीला असल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा निकाली न काढण्यात विरूध्द पक्ष 3 यांच्याकडून कोणत्याही प्रकारची त्रुटी झालेली नसल्यामुळे सदरहू तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी.
8. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत विमा दावा नामंजूर केल्याबाबतचे विरूध्द पक्ष 1 यांचे पत्र पृष्ठ क्र. 10 वर दाखल केले असून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 3 कडे सादर केलेला विमा दावा पृष्ठ क्र. 11 व 19 वर, तक्रारकर्त्याच्या भावाच्या शेतीचा 7/12 उतारा पृष्ठ क्र. 20 वर, धारण जमिनीची नोंदवही 8-अ पृष्ठ क्र. 21 वर, तक्रारकर्त्याच्या भावाच्या शेतीची अधिकार अभिलेख पंजी पृष्ठ क्र. 22, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 25 वर, तलाठी कार्यालय, सरकारटोला यांचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 26 वर, F. I. R. व इतर पोलीस दस्तऐवज पृष्ठ 27 ते 38 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 39 ते 46 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 47 वर, तक्रारकर्त्याचे शपथपत्र पृष्ठ क्र. 49 वर, वकिलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस पृष्ठ क्र. 52 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
9. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याच्या भावाचा व सदर अनधिकृत विद्युत पुरवठ्याचा कोणताही संबंध नसून सदर घटना घडलेले शेत हे श्री. राजकुमार कुरंजेकर यांच्या मालकीचे आहे. तक्रारकर्त्याच्या भावाने व त्याच्या इतर भावंडांनी मिळून शेती करण्यासाठी भाड्याने/मक्त्याने सदर शेत वहावयाला घेतले होते. सदर शेतीवर पाणीपुरवठा राजकुमार कुरंजेकर यांनीच दिला होता व त्याबदल्यात तक्रारकर्त्याचा भाऊ राजकुमार कुरंजेकर यांना मोबदला देत होता. सदर विद्युत पुरवठा अनधिकृत होता हे तक्रारकर्त्याच्या भावाला माहीत नव्हते. तक्रारकर्त्याच्या भावाचा स्वतःच्या निष्काळजीपणाने अपघात झाल्याचे पोलीस दस्तऐवजात कुठेही नमूद नसून कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. विरूध्द पक्ष यांनी कोणत्याही पुराव्याअभावी अकारण सदर दावा फेटाळल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर व्हावी.
10. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याच्या भावाचा झालेला मृत्यु हा त्याच्या स्वतःच्या निष्काळजीपणाने व अवैध विद्युत जोडणी करीत असतांना विजेचा धक्का लागून झालेला आहे. तसेच तक्रारकर्ता हा मृतकाचा कायदेशीर वारस नसल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यास पात्र नसून शासन व विमा कंपनी यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी
11. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | नाही |
2. | तक्रारकर्ता शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | नाही |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. तक्रारकर्त्याने त्याचा भाऊ मनीराम कोंडु मानकर ह्याचा अपघाती मृत्यु दिनांक 18/02/2013 रोजी शेतातील अवैध विद्युत जोडणी करीत असतांना झाल्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा दाखल केलेला आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी पृष्ठ क्रमांक 10 वर दाखल करण्यात आलेल्या दिनांक 27/11/2014 रोजीच्या पत्रानुसार अवैध विद्युत जोडणी करीत असतांना विजेचा धक्का लागल्यामुळे तक्रारकर्त्याच्या भावाचा मृत्यु झाला व हे कृत्य अनधिकृत असल्यामुळे विमा दावा फेटाळला आहे.
13. तक्रारकर्ता हा सज्ञान व्यक्ती असून तो मृतकावर अवलंबून नसल्यामुळे "लाभधारक वारस" या व्याख्येत तक्रारकर्ता समाविष्ट होत नाही. करिता पृष्ठ क्रमांक 81 वर दाखल केलेल्या दिनांक 12/08/2011 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद 10 नुसार शेतकरी जनता अपघात विमा योजनेत लाभधारक म्हणून मृतकाचे भाऊ समाविष्ट नसल्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नाही असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.