(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 26 फेब्रुवारी, 2016)
तक्रारकर्तीचे पती सुरजलाल कवडू टेकाम यांच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्ष 1, 2 दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी वारसाची नोंद तसेच मृतकाच्या नावात तफावत असल्याच्या कारणाने फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती सुरजलाल कवडू टेकाम हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या मालकीची मौजे खुळसंगटोला, तालुका देवरी, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 587 या वर्णनाची शेतजमीन आहे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्याचे काम करतात.
4. दिनांक 24/10/2012 रोजी तक्रारकर्तीचे पती सायकलने जात असतांना एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या सायकलला धडक दिल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यु झाला. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युनंतर विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे दिनांक 24/12/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. तसेच विरूध्द पक्ष यांनी वेळोवेळी मागणी केलेली कागदपत्रे सुध्दा सादर केली. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या दिनांक 04/03/2014 रोजीच्या पत्रान्वये ‘अपघातग्रस्ताची जुन्या फेरफाराची नोंदवही, 6-ड व वारसाची नोंदवही 6-क तसेच अपघातग्रस्ताच्या नावात असलेल्या फरकाबद्दलचा पुरावा दिला नाही’ असे कारण नमूद करून तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला.
5. तक्रारकर्तीने विमा दावा अर्जासोबत आवश्यक ते संपूर्ण कागदपत्र जोडलेले असतांनाही तसेच विरूध्द पक्ष यांनी मागणी केल्याप्रमाणे इतर तारखेला कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे ही सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्तीने न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- नुकसानभरपाईसह मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 23/03/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 01/04/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
7. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 25/06/2015 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीने नमुना 6-ड व 6-क हे दस्तऐवज वारंवार मागणी करूनही न दिल्यामुळे तसेच मृतकाच्या नावातील तफावत दूर न केल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रुटी नाही. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी असे लेखी जबाबात म्हटले आहे.
विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 27/04/2015 रोजी दाखल केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा दिनांक 26/12/2012 रोजी त्यांच्या कार्यालयात सादर केला. त्यानंतर दिनांक 17/01/2014 रोजी तालुका बीज गुणन प्रक्षेत्र, कारंजा, तालुका व जिल्हा गोंदीया येथील शिबीरात तक्रारकर्तीने 6-क व इन्क्वेस्ट पंचनामा यांची पूर्तता केली तसेच मृतकाच्या नावातील फरकाबद्दल पुरावा म्हणून पोलीस पाटील व ग्राम पंचायत सरपंच यांचे प्रमाणपत्र तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांना दिले व ते संपूर्ण कागदपत्र विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांची सेवेतील कुठलीही त्रुटी नाही.
8. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत विमा दावा फेटाळल्याबाबतचे विरूध्द पक्ष 1 यांचे पत्र पृष्ठ क्र. 10 वर दाखल केले असून तक्रारकर्तीच्या पतीच्या शेतीचा 7/12 उतारा पृष्ठ क्र. 11 ते 14 वर, धारण जमिनीची नोंदवही 8-अ पृष्ठ क्र. 15 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 16 वर, तक्रारकर्तीच्या पतीच्या शेताचा गाव नमुना 6-क चा उतारा पृष्ठ क्र. 17 वर, F.I.R. व इतर पोलीस दस्तऐवज पृष्ठ क्र. 18 ते 25 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 26 वर, पोलीस पाटील देवाटोला यांचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 27 वर, सरपंच, ग्राम पंचायत, देवाटोला यांचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 28 वर, शाळा सोडल्याचा दाखला पृष्ठ क्र. 29 वर, शिधा-पत्रिकेची प्रत पृष्ठ क्र. 30 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
9. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांना विमा दावा अर्जासोबत आवश्यक ती संपूर्ण कागदपत्रे दिलेली असतांनाही विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीच्या पतीच्या नावामध्ये फरक असल्याचे नमूद करून दावा फेटाळला. तक्रारकर्तीच्या पतीजवळ सदर जमीन वडिलांपासून आल्याबाबतचा योग्य पुरावा तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष यांच्याकडे दाखल केलेला असतांनाही आणि अपघाती मृत्यु सिध्द होत असेल व एखादे दस्तऐवज उपलब्ध नसेल तर पर्यायी दस्तऐवजावरून विमा दावा मंजूर करण्यात यावा असे शासन निर्णयात स्पष्ट केलेले असतांनाही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रुटी आहे.
10. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी असा युक्तिवाद केला की, मृतकाचे कायदेशीर वारस असल्याबाबत नमुना 6-ड व 6-क तक्रारकर्तीने दाखल न केल्यामुळे तसेच मृतकाचे नावे शेत जमीनीचा मालकीहक्क असल्याबाबत कुठलाही पुरावा दाखल न केल्यामुळे व मृतकाच्या नावातील फरकाचा पुरावा न दिल्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रुटी नाही.
11. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. तक्रारकर्तीने दाखल केलेला गाव नमुना 7-अ व दिनांक 22/02/2002 रोजीच्या फेरफारानुसार मृतकाच्या वारसांची नावे वारस म्हणून नोंदविण्यात आल्याचे सिध्द होते. शेतक-याच्या अपघाती मृत्युनंतर त्याचे वारस हे कायद्याने लाभार्थी ठरतात आणि तलाठी कार्यालय व सरकार दप्तरी वारस म्हणून नोंद होणे ही किरकोळ बाब असल्यामुळे मृतकाचे वारस हे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे.
13. तक्रारकर्तीने पृष्ठ क्रमांक 28 वर दस्तऐवज क्र. 9 नुसार दाखल केलेले सरपंच, ग्राम पंचायत, देवाटोला यांचे दिनांक 08/01/2015 रोजीचे प्रमाणपत्र तसेच पोलीस पाटील यांचे दिनांक 08/01/2015 रोजीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओवारा यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व शिधापत्रिका यामध्ये मृतकाचे नाव सुरजलाल कवडू टेकाम असे प्रमाणित केलेले असल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणामध्ये दाखल केलेला सरपंच तसेच पोलीस पाटील यांचा पुरावा मृतकाचे नाव सुरजलाल व सुरज हे एकाच व्यक्तीचे नाव असल्याचे सिध्द होते. करिता तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम खालील आदेशानुसार मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 23/03/2015 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2 ते 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द सदरहू तक्रार खारीज करण्यात येते.