(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 30 डिसेंबर, 2015)
तक्रारकर्त्यांचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी फेटाळल्यामुळे तक्रारकर्त्यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ते हे मौजा मुरमाडी, ता. देवरी, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र.2 चे पती श्री. नवल उद्रास सोनकुकरा यांच्या मालकीची मौजा मुरमाडी, ता. देवरी, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 182 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र. 2 चे पती श्री. नवल उद्रास सोनकुकरा यांचा दिनांक 16/07/2013 रोजी नाला पार करण्याकरिता बांध्यावरून जात असतांना पाय घसरून नाल्यातील पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यु झाला.
5. तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र. 2 चे पती हे शेतकरी असल्याने व त्यांचा अपघाती मृत्यु झाल्याने तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 26/09/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्यांच्या दाव्याबाबत दिनांक 20/05/2014 रोजी पत्र पाठवून अपघातग्रस्ताच्या जुन्या फेरफाराची नोंदवही (फेरफारपत्रक) ‘6-ड’ त्वरित द्यावे असे कळविले आणि या कारणास्तव तक्रारकर्त्यांचा दावा फेटाळल्यामुळे तक्रारकर्त्यांनी विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- व्याजासह मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.10,000/- मिळण्यासाठी दिनांक 04/04/2015 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
6. तक्रारकर्त्यांची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 17/04/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 06/05/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 25/06/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 51 वर आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्त्यांनी आवश्यक असलेले दस्तऐवज सादर केलेले नाहीत ‘6-ड’ फॉर्म हा दस्तऐवज दिलेला नसल्यामुळे त्यांचा विमा दावा नाकारण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच विरूध्द पक्ष 3 यांनी आपले कर्तव्य बरोबर पार पाडलेले नसून सर्व दस्तऐवजांची शहानिशा न करताच विरूध्द पक्ष 3 यांनी प्रस्ताव पाठविलेला असल्यामुळे त्याकरिता विरूध्द पक्ष 3 हेच जबाबदार आहेत. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या सेवेत कुठल्याही प्रकारची त्रुटी केलेली नसल्यामुळे तक्रारकर्त्यांची प्रस्तुत तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी जबाबात म्हटले आहे.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 26/05/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 50 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्यांनी दाखल केलेला विमा दावा प्रस्ताव त्यांच्या कार्यालयाचे पत्र दिनांक 29/01/2014 नुसार दिनांक 17/01/2014 ला तालुका बीज गुणन प्रक्षेत्र कारंजा येथे आयेजित त्रुटी पूर्ती शिबीरात दि न्यू इंडिया ऍश्योरन्स कंपनी लिमिटेड च्या अधिका-यांनी मागणी केल्याप्रमाणे 1) वारसदाराच्या आईचे सहमतीपत्र, 2) फेरफार पत्रक, 3) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गोंदीया कार्यालयात सादर करण्यात आले. त्यामुळे प्रस्तुत तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात म्हटले आहे.
9. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत तक्रारकर्ता क्र. 1 ने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदीया यांना पाठविलेल्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 10 वर, विरूध्द पक्ष 3 यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदीया यांना पाठविलेल्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 11 वर, विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्ता क्र. 1 ला पाठविलेल्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 12 वर, विरूध्द पक्ष 3 यांनी तहसीलदार, देवरी यांना पाठविलेल्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 13 वर, विरूध्द पक्ष 3 यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदीया यांना पाठविलेल्या पत्राची प्रत पृष्ठ क्र. 14 वर, तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांचे प्रतिज्ञापत्राची प्रत पृष्ठ क्र. 15 ते 20 वर, तक्रारकर्ता क्र. 1 ने विरूध्द पक्ष 3 यांचेकडे सादर केलेला विमा दावा प्रस्ताव पृष्ठ क्र. 21 ते 29 वर, मृतकाच्या शेतीचा 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 30 वर, धारण जमिनीची नोंदवही (गाव नमुना आठ (अ)) पृष्ठ क्र. 31 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 32 ते 34 वर, मर्ग खबरी पृष्ठ क्र. 35 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 37 वर, मरणान्वेषण प्रतिवृत्त पृष्ठ क्र. 39 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 42 वर, गाव नमुना सात (7/12 उतारा) पृष्ठ क्र. 63 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 64 वर, तक्रारकर्ता क्र. 1 चे शपथपत्र पृष्ठ क्र. 55 वर, तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 57 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
10. तक्रारकर्त्यांचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्यांच्या दाव्याबाबत जुना 6-ड हे कगदपत्र मिळाले नसल्याचे नमूद केले आहे. परंतु तक्रारकर्त्याने दिनांक 29/01/2014 रोजी विरूध्द पक्ष 3 यांना सदर दस्तऐवज दिले व विरूध्द पक्ष 3 यांनी तसेच त्यांच्या पत्राद्वारे दिनांक 13/03/2015 रोजी विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे स्पष्ट केले की, तक्रारकर्त्यांच्या दाव्याबाबत विचार करण्यात यावा. परंतु तरीदेखील विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्यांचा दावा दिनांक 20/05/2014 रोजी जाणीवपूर्वक फेटाळल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तसेच तक्रारकर्त्यांनी सर्व दस्तऐवज देऊनही व शासन निर्णयानुसार अपवादात्मक परिस्थितीत पर्यायी दस्तऐवजावरून दावा मंजूर करावा व अपघात सिध्द होत असेल तर विमा कंपनी दावा नाकारू शकत नाही अशा मार्गदर्शक सूचना असतांनाही विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्यांचा दावा नाकारणे म्हणजे त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात यावी.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 60 वर दाखल केला असून त्यांनी आपल्या लेखी युक्तिवादात म्हटले आहे की, विमा दावा अर्जासोबत ‘6-ड’ हे दस्तऐवज नसल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी दिनांक 20.05.2014 रोजी तक्रारकर्त्यांचा दावा फेटाळला. त्याचप्रमाणे विमा नियमाप्रमाणे विरूध्द पक्ष 3 यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडलेले नसून संपूर्ण दस्तऐवज नसतांनाही विरूध्द पक्ष 3 यांनी प्रस्तावाची योग्य शहानिशा न करताच तक्रारकर्त्यांचा प्रस्ताव विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे पाठविला. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या सेवेत कुठलीही त्रुटी नसून विरूध्द पक्ष 3 यांची सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी.
12. तक्रारकर्त्यांचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ते शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहेत काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्ता क्र. 1 चे वडील व तक्रारकर्ती क्र. 2 चे पती यांचा मृत्यु दिनांक 16/07/2013 रोजी झाला. तक्रारकर्त्यांच्या दाव्याबाबत दिनांक 20/05/2014 रोजी विरूध्द पक्ष 1 यांनी पत्र पाठवून ‘6-ड’ हे दस्तऐवज प्रस्तावासोबत जोडले नाही असे नमूद करून तक्रारकर्त्यांचा विमा दावा फेटाळला. परंतु तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पृष्ठ क्र. 32, 33 व 34 वरील पर्यायी दस्तऐवजांवरून विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्यांचा दावा मंजूर करावयास हवा होता. तसेच शेतक-याने अपघात झाल्यावर अनावश्यक धोका पत्करला ह्या कारणास्तव दावा नाकारता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आल्यामुळे तक्रारकर्त्यांचा दावा मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत मृतकाच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल करून घेतल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 17/04/2015 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.5,000/- तक्रारकर्त्यांना द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यांना रू.5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.