(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 27 नोव्हेंबर, 2015)
तक्रारकर्त्याचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी प्रलंबित ठेवल्यामुळे तक्रारकर्त्याने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा मौजा मुल्ला, ता. देवरी, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्त्याची आई श्रीमती फुलनबाई ताराचंद भुते यांच्या मालकीची मौजा धानोली, ता. सालेकसा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 73 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्त्याची आई श्रीमती फुलनबाई ताराचंद भुते हिचा दिनांक 20/09/2013 रोजी शेतात काम करीत असतांना विषारी सापाने चावा घेतल्यामुळे मृत्यु झाला.
5. तक्रारकर्त्याची आई शेतकरी असल्याने व विषारी साप चावून तिचा मृत्यु झाल्याने तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 03/12/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याचा सदर विमा दावा अकारण प्रलंबित ठेवला. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- व्याजासह मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.15,000/- मिळण्यासाठी दिनांक 04/04/2015 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
6. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 23/03/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 01/04/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 25/06/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 42 वर आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्त्याने मृतकाच्या वारसदारांचे ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही अशा आशयाचे पत्र दिनंक 16/04/2014 ला तक्रारकर्त्यास पाठविल्याचे नमूद केले आहे. सदर दस्तऐवज दावा निकाली काढण्याकरिता आवश्यक असून ते तक्रारकर्त्याने सादर न केल्यामुळे तक्रारकर्त्याची प्रस्तुत तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी जबाबात म्हटले आहे.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 27/04/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 40 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने त्याचा विमा प्रस्ताव दिनांक 09/12/2013 रोजी विरूध्द पक्ष 3 यांच्या कार्यालयास सादर केल्यानंतर विरूध्द पक्ष 3 यांनी सदरहू प्रस्ताव दिनांक 13/12/2013 रोजीच्या पत्रानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गोंदीया यांचेकडे सादर केला. तसेच विरूध्द पक्ष 1, 2 यांच्या दिनांक 16/04/2014 नुसार वारसदारांकडून वारसाची नोंदवही 6-क व नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आल्यानंतर विरूध्द पक्ष 3 यांचे कार्यालयाकडून सदरहू दस्तऐवजांची पूर्तता करून दिनांक 13/03/2015 रोजीच्या पत्रानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गोंदीया यांचेकडे पुनश्च सादर करण्यात आली. त्यानंतर सदरहू दस्तऐवज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गोंदीया यांनी त्यांचे पत्र क्रमांकः ता/शेजअवि/767/2015, दिनांक 19/03/2015 नुसार विरूध्द पक्ष 1,2 व कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस, पुणे यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे जबाबात म्हटले आहे.
9. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत शेतकरी अपघात विमा योजना दावा त्रुटी पत्र पृष्ठ क्र. 10 वर, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-1 पृष्ठ क्र. 11 वर, शेतीचा 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 16 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 17 वर, धारण जमिनीची नोंदवही पृष्ठ क्र. 18 वर, मर्ग खबरी पृष्ठ क्र. 20 वर, मरणान्वेषण प्रतिवृत्त पृष्ठ क्र. 22 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 24 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 26 वर, तक्रारकर्त्याचे शपथपत्र पृष्ठ क्र. 46 वर, तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 48 वर तसेच शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेबाबतचा शासन निर्णय पृष्ठ क्र. 54 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
10. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, क्लेम फॉर्मसोबत तलाठी, मुल्ला, ता. देवरी यांचे वारसान प्रमाणपत्र दिलेले आहे. तसेच तक्ररकर्त हा शेतकरी जनता अपघात विमा पॉलीसीच्या शासन निर्णयानुसार एकमेव लाभधारक आहे. इतर वारस मुली विवाहित असल्याने त्यांना लाभ मिळू शकत नसल्यामुळे त्यांच्या संमतीची गरज नाही. तसेच तक्रारकर्त्याने संपूर्ण दस्तऐवज दिलेले असून शासन निर्णयानुसार अपवादात्मक परिस्थितीत पर्यायी दस्तऐवजांवरून दावा मंजूर करावा तसेच अपघात सिध्द होत असेल तर विमा कंपनी दावा नाकारू शकत नाही अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याचा सदरहू विमा दावा नाकारून विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी केली असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी असा युक्तिवाद केला.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 51 वर दाखल केला असून त्यांनी आपल्या तोंडी युक्तिवादात म्हटले की, विरूध्द पक्ष यांनी आवश्यक असलेल्या दस्तऐवजाची मागणी दिनांक 16/04/2014 रोजी तक्रारकर्त्याला पत्र पाठवून करण्यात आली. परंतु आवश्यक ते दस्तऐवज तक्रारकर्त्याने सादर केलेले नाहीत तसेच वारसानांचे ना-हरकत प्रमाणपत्र दाखल केलेले नसल्यामुळे तक्रारकर्त्याची सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी असे त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले.
12. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्त्याच्या आईचा मृत्यु दिनांक 20/09/2013 रोजी झाला. तक्रारकर्त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. विरूध्द पक्ष 1, 2 यांनी असे म्हटले आहे की, सदर वारसानांचे ना-हरकत प्रमाणपत्र तक्ररकर्त्याने दाखल करणे आवश्यक आहे. परंतु तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरणात बाकी वारसदारांना पक्षकार केलेले नसल्यामुळे त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच सर्व दस्तऐवज देऊनही व शासन निर्णयानुसार अपवादात्मक परिस्थितीत पर्यायी दस्तऐवज देता येतात. त्यामुळे तक्रारकर्त्याचे सदरहू प्रकरण मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या मृतक आईच्या अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल करून घेतल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 23/03/2015 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू.5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.