(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 22 मार्च, 2016)
तक्रारकर्तीचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूद पक्ष 1, 2 दि न्यू इंडिया ऍश्योरन्स कंपनी लिमिटेड यांनी फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण नुकसानभरपाई मिळण्याकरिता दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती श्री. यादोराव सेगो कावळे हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या मालकीची मु. पो. दतोरा, तालुका व जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 719/1, 792 या वर्णनाची शेतजमीन आहे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्याचे काम करतात.
4. दिनांक 13/10/2012 रोजी आपल्या शेतात औषधाची फवारणी करीत असतांना सदर विषारी औषध चुकून नाका-तोंडात गेल्याने उपचारादरम्यान तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाला. तक्रारकर्तीचे पती व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युनंतर विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे दिनांक 27/09/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. तसेच विरूध्द पक्ष यांनी वेळोवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता सुध्दा केली.
5. रितसर अर्ज केल्यानंतर व आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 15/04/2014 रोजीच्या पत्रान्वये "दिलेल्या कागदपत्रानुसार सदर दावा आपण कां उशीरा दिला याचे सबळ कारण नमूद न केल्याने हा दावा नामंजूर करण्यात येत आहे" या शे-यासह फेटाळला. तक्रारकर्तीने वेळोवेळी कागदपत्रे व दावा दाखल करण्यास झालेला विलंब याचे कारण देऊनही विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्तीने न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- नुकसानभरपाईसह मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 18/03/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 01/04/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
7. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 11/05/2015 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु नसून ती Self inflicted injury असल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्तीने विमा दावा 1 वर्षाच्या कालावधीनंतर दाखल केल्यामुळे तो मुदतीत नाही करिता तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी असे लेखी जबाबात म्हटले आहे.
8. सदरहू प्रकरणात विरूध्द पक्ष 3 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब देखील दाखल केलेला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 28/05/2015 रोजी मंचामार्फत पारित करण्यात आला.
9. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकूण 10 दस्तऐवज अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 10 ते 41 नुसार दाखल केलेले आहेत.
10. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने विमा दावा मुदतीचे आंत दाखल केला असतांना व शासन निर्णयामध्ये दावा उशीरा दाखल केला म्हणून दावा नाकारता येणार नाही असे स्पष्ट केलेले असतांनाही विरूध्द पक्ष 1 यांनी दावा उशीरा दाखल केल्याचे नमूद करून तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात यावी.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांचे वकील ऍड. ललित लिमये यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्या पतीचा झालेला मृत्यु हा अपघाती मृत्यु नसून ती Self inflicted injury असल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्तीने विमा दावा 1 वर्षाच्या कालावधीनंतर दाखल केल्यामुळे व विलंबाचे समर्थनीय कारण न दिल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज करणे म्हणजे सेवेतील त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी
12. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्तीने पृष्ठ क्रमांक 9 वर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या यादीनुसार 7/12 च्या उता-यामधील नोंदी तसेच पृष्ठ क्रमांक 19, 20 व 23 वरील फेरफार पत्रकाच्या नोंदीवरून तक्रारकर्ती ही शेतकरी या व्याख्येमध्ये समाविष्ट होते.
14. तक्रारकर्तीने दाखल केलेला घटनास्थळ पंचनामा, मर्ग खबरी व F.I.R. नुसार तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा कीटकनाशकाची फवारणी करीत असतांना झालेला असून तो अपघाती मृत्यु आहे असे मंचाचे मत आहे.
15. तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीच्या समर्थनार्थ माननीय राज्य आयोग यांचे खालील न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत.
1) Order of State Commission, Maharashtra, Mumbai in appeal no. A/06/231 – Branch Manager, United India Insurance Co. Ltd. versus Smt. Subhadrabai Sahebrao Gaike & Anr.
2) Order of State Commission, Maharashtra, Nagpur Bench in appeal no. FA/12/169 – United India Insurance Co. Ltd. versus Rakesh Premlal Panchabudhe & Anr.
3) 2007 (3) 163 CPR (Mah) - Branch Manager, National Insurance Co. Ltd. versus Mr. Sardar Lachmansingh
उपरोक्त न्यायनिवाडे तक्रारकर्तीच्या तक्रारीशी सुसंगत असल्यामुळे तक्रारकर्ती ही खालील आदेशानुसार शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 18/03/2015 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 3 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी मंचात हजर राहण्याची व लेखी जबाब दाखल कस्न वस्तुस्थिती मंचासमक्ष आणण्याची तसदी घेतली नसल्यामुळे विरूध्द पक्ष 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- व या तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/- असे एकूण रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
5. विरूध्द पक्ष 3 यांनी उपरोक्त आदेश क्र. 3 चे पालन व्यक्तिशः करावे.
6. विरूध्द पक्ष 1, 2 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.