(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 30 डिसेंबर, 2015)
तक्रारकर्तीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही मौजा तिगाव, ता. आमगाव, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. चैतराम सोमा बिसेन यांच्या मालकीची मौजा तिगाव, ता. आमगाव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 363 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. चैतराम सोमा बिसेन हे दिनांक 06/06/2013 रोजी त्यांच्या घराचे छत शिवत असतांना शिडीवरून घसरून पडल्याने जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावले.
5. तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने व त्यांचा अपघाती मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 07/10/2013 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा सदर विमा दावा ‘6-क’ खोडून ‘6-ड’ लिहिलेला दस्तऐवज आहे व त्यात भूमापन क्रमांक व सर्व्हे नंबर जुळत नाही याचा पुरावा न दिल्याने दावा नामंजूर करण्यात येत आहे ह्या शे-यासह फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने विमा दाव्याची रक्कम रू.1,00,000/- व्याजासह मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू.30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.10,000/- मिळण्यासाठी दिनांक 04/04/2015 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
6. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 17/04/2015 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 06/05/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 ते 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 25/06/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 68 वर आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीने आवश्यक असलेले दस्तऐवज सादर केलेले नाहीत आणि ‘6-क’ खोडून त्याऐवजी ‘6-ड’ लिहिलेला दस्तऐवज आहे व त्यात भूमापन क्रमांक व सर्व्हे नंबर जुळत नाही व त्याचा पुरावा देखील तक्रारकर्तीने दिलेला नाही असे म्हटले आहे. तसेच विरूध्द पक्ष 3 चे सल्लागार यांनी आपले कर्तव्य बरोबर बजावलेले नसून सर्व दस्तऐवजांची शहानिशा न करताच विरूध्द पक्ष 3 यांनी प्रस्ताव पाठविलेला असल्यामुळे त्याकरिता विरूध्द पक्ष 3 हेच जबाबदार आहेत. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या सेवेत कुठल्याही प्रकारची त्रुटी केलेली नसल्यामुळे तक्रारकर्तीची प्रस्तुत तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी जबाबात म्हटले आहे.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 26/05/2015 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 65 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीने तिचा शेतकरी जनता अपघात विमा दावा प्रस्ताव विरूध्द पक्ष 3 यांच्या कार्यालयास सादर केल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी जेव्हा जेव्हा प्रस्तावामध्ये त्रुट्या असल्याबाबतचे पत्र दिले ते पत्र वेळीच तक्रारकर्तीस विरूध्द पक्ष 3 कार्यालयाकडून देण्यात आले. तसेच तक्रारकर्तीकडून त्रुट्यांची पूर्तता होऊन आलेले कागदपत्र विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयास सादर केलेले आहेत. विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत दावा स्विकारतात व वरिष्ठ कार्यालयास सादर करतात. त्यामुळे त्यांच्या सेवेत कुठल्याही प्रकारची त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्तीची प्रस्तुत तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी असे विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात म्हटले आहे.
9. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दावा फेटाळल्याचे पत्र पृष्ठ क्र. 10 वर, कबाल इन्शुरन्स यांनी विरूध्द पक्ष 1 यांना पाठविलेले पत्र पृष्ठ क्र. 12 वर, विरूध्द पक्ष 3 यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना पाठविलेले पत्र पृष्ठ क्र. 13 वर, तलाठी कार्यालय, तिगांव यांनी दिलेले प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 15 वर, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-1 पृष्ठ क्र. 18 वर, शेतीचा 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 26 ते 29 वर, धारण जमिनीची नोंदवही पृष्ठ क्र. 30 ते 32 वर, वारसा प्रकरणाची नोंदवही पृष्ठ क्र. 33 ते 35 वर, फेरफार पत्रक पृष्ठ क्र. 36 व 37 वर, मर्ग खबरी पृष्ठ क्र. 38 वर, मरणान्वेषण प्रतिवृत्त पृष्ठ क्र. 39 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 43 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 50 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 58 वर, तक्रारकर्तीचे शपथपत्र पृष्ठ क्र. 72 वर, तक्रारकर्तीचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 75 वर तसेच तलाठी कार्यालय, तिगांव यांचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 79 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
10. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचा सदर दावा दिलेल्या कागदपत्रानुसार ‘6-क’ खोडून ‘6-ड’ लिहिलेला आहे व त्यातील सर्वे नंबर जुळत नाही हे कारण देऊन नामंजूर केल्याने तक्रारकर्तीने सदर दावा दाखल केलेला आहे. तसेच तक्रारकर्तीच्या पतीजवळ सदर जमीन वडिलांपासून आल्याबाबत योग्य पुरावा दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे तक्रारकतीच्या क्लेम फॉर्ममध्ये तलाठी यांनी तक्रारकर्तीच्या पतीजवळ अपघाताच्या वेळी शेती होती हे प्रमाणपत्र दिलेले आहे. सदर शेतीचा सर्व्हे नंबर चकबंदीनुसार बदलत असतो आणि जर अपघाती मृत्यु सिध्द होत असेल व एखादे दस्तऐवज उपलब्ध नसेल तर पर्यायी दस्तऐवजाच्या आधारे विमा दावा मंजूर करता येतो असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे. तसेच शेतक-याने अपघात झाल्यावर अनावश्यक धोका पत्करला ह्या कारणास्तव दावा नाकारता येणार नाही म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्यात यावी असा युक्तिवाद केला.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 81 वर दाखल केला असून त्यांनी आपल्या तोंडी युक्तिवादात म्हटले की, दिनांक 01.09.2014 रोजी विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीने आवश्यक ते दस्तऐवज सादर न केल्यामुळे तक्रारकर्तीचा दावा फेटाळला. तसेच ‘6-ड’ व 7/12 उतारा यातील नंबर जुळत नसून त्यावर खोडतोड करून लिहिण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे विमा नियमाप्रमाणे विरूध्द पक्ष 3 यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडलेले नसून संपूर्ण दस्तऐवज नसतांनाही विरूध्द पक्ष 3 यांनी प्रस्तावाची योग्य शहानिशा न करताच तक्रारकर्तीचा प्रस्ताव विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे पाठविला. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांच्या सेवेत कुठलीही त्रुटी नसून विरूध्द पक्ष 3 यांची सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार त्यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी.
12. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 06/06/2013 रोजी झाला. तक्रारकर्तीच्या दाव्याबाबत दिनांक 01/09/2014 रोजी विरूध्द पक्ष 1 यांनी पत्र पाठवून ‘दिलेल्या कागदपत्रानुसार ‘6-क’ ऐवजी ‘6-ड’ असे खोडतोड करून लिहिण्यात आलेले आहे व त्यात भूमापन क्रमांक व सर्व्हे क्रमांक जुळत नाही तसेच त्याबाबतचा पुरावा देखील दिलेला नाही’ असे नमूद करून तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला. परंतु तक्रारकर्तीने दाखल केलेल्या (पृष्ठ क्र. 14, 15 व 16 वरील विरूध्द पक्ष 3 यांनी विरूध्द पक्ष 1 यांना दिलेले पत्र) पर्यायी दस्तऐवजांवरून विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा दावा मंजूर करावयास हवा होता. तसेच शेतक-याने अपघात झाल्यावर अनावश्यक धोका पत्करला ह्या कारणास्तव दावा नाकारता येणार नाही असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आल्यामुळे तक्रारकर्तीचा दावा मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू.1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल करून घेतल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 17/04/2015 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू.5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.