(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
- आदेश -
तक्रारकर्तीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही मौजा कट्टीपार, ता. आमगाव, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री. हौसेलाल कुंवरलाल शरणागत यांच्या मालकीची मौजा धामणगाव, तालुका आमगाव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 281 ही शेत जमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती श्री. हौसेलाल कुवरलाल शरणागत हे दिनांक 17/04/2012 रोजी मोटरसायकलने जात असतांना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिल्याने जागेवरच त्यांचा मृत्यु झाला.
5. तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्याने व अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याने तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 16/08/2012 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीच्या पतीच्या दाव्याबाबत सहा महिने उलटून गेले तरी तो मंजूर किंवा नामंजूर असे कळविले नाही.
6. विरूध्द पक्ष यांनी विमा पॉलीसीप्रमाणे तक्रारकर्तीला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याने तक्रारकर्तीने विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- मिळण्यासाठी तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 30,000/- व तक्रारीचा खर्च रू. 15,000/- असे एकूण रू. 1,45,000/- मिळण्यासाठी दिनांक 05/04/2014 रोजी न्याय मंचात तक्रार दाखल केली आहे.
7. तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 16/04/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 24/04/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 3 यांनी त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत. विरूध्द पक्ष 2 यांना नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब देखील दाखल केला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 2 यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18/10/2014 रोजी पारित करण्यात आला.
8. विरूध्द पक्ष 1 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दिनांक 25/08/2014 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले असून तिच्या पतीचा अपघात हा त्यांच्या स्वतःच्या निष्काळजीपणाने झाला असल्यामुळे ते स्वतःच्या निष्काळजीपणाच्या अपघात नुकसानभरपाईसाठी दावा करू शकत नाही असे त्यांनी पृष्ठ क्र. 64 वर दाखल केलेल्या आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे.
9. सदरहू प्रकरणात विरूध्द पक्ष 3 यांचा लेखी जबाब दिनांक 23/06/2014 रोजी पोस्टाद्वारे प्राप्त झाला असून तो पृष्ठ क्र. 61 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी आपल्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व त्यांची भूमापन क्रमांक 281 ही शेतजमीन मौजा धामणगाव, तालुका आमगाव, जिल्हा गोंदीया येथे आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 17/04/2012 रोजी मोटरसायकलने जात असतांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागेवरच मृत्यु झाला. त्यामुळे तक्रारकर्तीने आपल्या पतीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 24/09/2012 ला तालुका कृषि अधिकारी कार्यालय, आमगाव येथे सादर केला. नंतर तक्रारकर्तीने सादर केलेल्या कागदपत्रांची शहानिशा करून सर्व प्रस्ताव योग्य असल्याची खातरजमा करून विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे दाव्याचे भुगतान करण्याकरिता दिनांक 25/09/2012 रोजी सादर करण्यात आला. त्यांनी आपल्या स्तरावरून सदर दावा मंजूर करून तक्रारकर्तीस रू. 1,00,000/- देण्यात यावे व त्याबाबत विरूध्द पक्ष 3 यांना कोणताही आक्षेप नसल्याचे विरूध्द पक्ष 3 यांनी लेखी जबाबात म्हटले आहे.
10. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत शासन निर्णय 2011-2012 पृष्ठ क्र. 15 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजना क्लेम फॉर्म पृष्ठ क्र. 19 वर, 7/12 उतारा पृष्ठ क्र. 24, 25 वर, धारण जमिनीची नोंदवही पृष्ठ क्र. 26, 27 वर, फेरफार नोंदवही पृष्ठ क्र. 28, 29 वर, प्रथम खबरी रिपोर्ट पृष्ठ क्र. 30 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 49 वर, जन्म प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 50 वर, तक्रारकर्तीच्या वकिलांनी विरूध्द पक्षाला पाठविलेला नोटीस पृष्ठ क्र. 52 वर, पोस्ट मार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 41 वर, तक्रारकर्तीचे शपथपत्र पृष्ठ क्र. 67 वर, तक्रारकर्तीच्या वकिलांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 69 वर, विरूध्द पक्ष 1 चे शपथपत्र पृष्ठ क्र. 71 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
11. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला तसेच तोंडी युक्तिवाद देखील केला. त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, तक्रारकर्तीचा दावा विरूध्द पक्ष यांनी वर्षभरानंतरही मंजूर किंवा नामंजूर करण्यात आला असे तक्रारकर्तीला न कळविल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केली आहे आणि तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु रस्ते अपघातात झाला असून पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये मरणाचे कारण स्पष्ट नमूद केलेले आहे. तसेच तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व विरूध्द पक्ष यांनी आपल्या सेवेमध्ये त्रुटी दिल्यामुळे तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर करण्यात यावे.
12. विरूध्द पक्ष 1 यांच्यातर्फे ऍड. अनंत दिक्षीत यांनी युक्तिवादात वरील सर्व बाबींचे खंडन केले. तक्रारकर्तीची तक्रार ही खोटी व बनावट आहे आणि तिच्या पतीचा मृत्यु हा सर्वस्वी त्याच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे झालेला असून स्वतःच्या निष्काळजीपणाबद्दल तो कुठल्याही नुकसानभरपाईचा दावा करू शकत नाही. तक्रारकर्तीला बरेचदा विनंती करूनही तक्रारकर्तीने काही दस्तऐवजांची पूर्तता केलेली नाही. जसे फॉर्म नंबर 6 D (फेरफार), 7/12, Tri-Party Agreement, Insurance Cover Scheme, Village Annexure No. 6 D (फेरफार) हे आवश्यक दस्तऐवज सादर केले नाहीत. तसेच तक्रारकर्तीने मुदत संपल्यानंतर तक्रार दाखल केली असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी.
13. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
14. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 17/04/2012 रोजी झाला. तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज कागदपत्रांसह विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी तो दावा अर्ज मंजूर किंवा नामंजूर असे तक्रारकर्तीला कळविले नसल्यामुळे तक्रारकर्तीने विद्यमान मंचात आपली तक्रार दाखल केली. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असल्यामुळे व त्यांची मौजा धामणगांव, ता. आमगाव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 281 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत. म्हणून मुद्दा क्र. 1 होकारार्थी दर्शविण्यात येत आहे.
15. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीला नुकसानभरपाई द्यावी या मताशी विरूध्द पक्ष 3 हे सहमत आहेत आणि यांना कुठलाही आक्षेप नाही असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे. तसेच तक्रारकर्ती ही वारस या नात्याने शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे.
17. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबाबत पोस्टमार्टेम रिपोर्ट, प्रथम खबर, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सदर प्रकरणात दाखल केलेली आहेत. त्यामुळे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या संपूर्ण कागदपत्रांचा विचार करता तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे हे सिध्द होते आणि सर्व दस्तऐवज, पुरावे, शपथपत्र यांना ग्राह्य धरून तक्रारकर्ती ही महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असून विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढणे ही विरूध्द पक्ष 1 यांची सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचे सदरहू प्रकरण मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर विमा दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 16/08/2012 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2 व 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.