(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
- आदेश -
(पारित दि. 27 फेब्रुवारी, 2015)
तक्रारकर्तीचे पती सहसराम कारू नागपुरे यांच्या अपघाती मृत्युबद्दलचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष यांनी फेटाळल्यामुळे तक्रारकर्तीने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचे रू. 1,00,000/- मिळण्यासाठी सदरहू तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती सहसराम नागपुरे यांच्या मालकीची मौजे रेंगेपार, पोस्ट पांढरी, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 531 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्यात येणा-या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्तीचे पती दिनांक 03/02/2012 रोजी मित्राच्या मोटारसायकलवर मागे बसून जात असतांना मोटारसायकल घसरल्यामुळे अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यु झाला.
5. तक्रारकर्तीने दिनांक 13/07/2012 रोजी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतु विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 29/05/2013 रोजी तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या शेतीच्या मालकीबद्दल नमुना 6-क व 6-ड तसेच पोस्ट मार्टेम रिपोर्ट सादर न केल्याचे कारण दर्शवून तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज केला.
6. तक्रारकर्तीला कागदपत्रे मिळविण्याकरिता लागलेला वेळ तसेच तिची मानसिक अवस्था बघता कागदपत्रे दाखल करण्यासाठी लागलेला विलंब हा संयुक्तिक विलंब असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी सदरहू कारणाकरिता तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे ही सेवेतील त्रुटी आहे. करिता तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करून तिला व्याजासह नुकसानभरपाई देण्यात यावी म्हणून तक्रारकर्तीने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे.
7. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 16/09/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 25/09/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दिनांक 15/12/2014 रोजी दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, F.I.R. नुसार अपघाताच्या वेळेस 3 व्यक्ती मोटारसायकलवर बसून जात होत्या. त्यामुळे हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असल्यामुळे तसेच सदरहू अपघातास वाहन चालविणारा जबाबदार असल्यामुळे तक्रारकर्त्याचा अपघात हा Self inflicted injury या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत Exception Clause मध्ये मोडतो. तसेच तक्रारकर्तीने शेतीच्या मालकीसंबंधी Mutation व मृत्युसंबंधी P.M.Report वेळोवेळी मागणी करून सुध्दा न दिल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रुटी नाही. विरूध्द पक्ष 3 यांना सदरहू प्रकरणात मंचामार्फत बजाविण्यात आलेली नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचा लेखी जबाब देखील सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 20/02/2015 रोजी मंचाद्वारा पारित करण्यात आला.
8. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-2012 चा शासन निर्णय पृष्ठ क्र. 12 वर दाखल केला असून कबाल इन्शुरन्स कंपनी यांनी तक्रारकर्तीला पाठविलेले पत्र पृष्ठ क्र. 19 वर दाखल केले आहे. तसेच तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारल्याबाबतचे विरूध्द पक्ष 1 यांचे दिनांक 29/05/2013 रोजीचे पत्र पृष्ठ क्र. 17 वर, तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर केलेला दावा अर्ज पृष्ठ क्र. 18 ते 24 वर, तक्रारकर्तीच्या सास-यांच्या शेतीचा 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 25 वर, तक्रारकर्तीच्या पतीच्या शेतीचा 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 27 वर, गाव नमुना 8-अ पृष्ठ क्र. 28, 29 वर, F. I. R. पृष्ठ क्र. 30 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 35 वर, इन्क्वेस्ट पंचनामा पृष्ठ क्र. 38 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 41 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीने दिनांक 23/12/2014 रोजी पोस्ट मार्टेम रिपोर्ट व शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेबाबतचा शासन निर्णय, अटी व शर्ती ही कागदपत्रे दाखल केली असून ती अनुक्रमे पृष्ठ क्र. 55 व 56 वर आहेत. तसेच दिनांक 20/02/2015 रोजी तक्रारकर्तीच्या पतीच्या शेतीचे फेरफारपत्रक व गाव नमुना 6-क हे दस्तऐवज दाखल केले असून ते पृष्ठ क्र. 80 व 81 वर आहेत.
9. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट तसेच शेतीच्या मालकीबद्दलचे फेरफार पत्रक संबंधित कार्यालयातून उशीरा मिळाल्यामुळे दाखल केलेले आहेत. सदरहू दस्तऐवज तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणात दाखल केलेले असल्यामुळे तक्रारकर्तीचा दावा मंजूर करण्यात यावा.
10. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. श्रीमती इंदिरा बघेले यांनी असा युक्तिवाद केला की, Bear perusal of F.I.R. its crystal clear that at the time of accident there were three persons namely Shivlal Tarone, Sukhchand Hana & Shasram Karu Nagpure were riding on Motorcycle which not permitted by law against the M.V. Act those two persons are allowed to ride on Motorcycle, Thus the driver lost his control over his vehicle & caused the accident. It is respectfully submitted that the complaint is liable to be rejected on the face of contents of F.I.R. of Crime No. 16/2012. It is humbly submitted that the F.I.R. of Crime No. 10/2012 reveals that the alleged accident had accrued on dt. 3.2.2012 but it is registered with Police Station on dt. 04.02.2012. That thus the complaints seem to be a totally false & bogus based on false & fabricated documents.
It is submitted the O.P. No. 1 & 2 have rightly repudiated the claim of compensation as the requisite document Form 6D. Ferfar showing Date of entry into land record registered i.e. 7/12 & Form 6 C Most Mortem (Post Mortem report filed by the complainant at the stage of Argument) were not submitted. Moreover ‘document deficiency’ letter duly served on dt. 19.12.2012 giving them sufficient time to comply the requirement. However same is not complied by the complainant till date. It is submitted that there is not deficiency in service in part of O. P. No. 1. The O. P. No. 1 rightly rejected the claim as per reason mentioned as above.
11. तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष 1 व 2 यांचा लेखी जबाब तसेच दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत काय? | होय |
3. | तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय? | होय |
4. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
12. तक्रारकर्तीने दाखल केलेला पोलीस स्टेशन, गोंदीया येथील F. I. R., इन्क्वेस्ट पंचनामा तसेच पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट यावरून तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे ही बाब सिध्द होते.
13. पोलीस स्टेशन, गोंदीया यांनी मोटारसायकलचा चालक शिवलाल मेहतर तरोणे याच्याविरूध्द फिर्याद नोंदविलेली असून तक्रारकर्तीचे पती हे त्यांच्या मृत्युस स्वतः जबाबदार नाहीत हे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पोलीस स्टेशन गोंदीया येथील सकृतदर्शनी कागदपत्राच्या पुराव्यावरून सिध्द होते. त्यामुळे सदरहू घटना ही Self inflicted injury या Exceptional Clause मध्ये समाविष्ट होत नाही. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण Head injury दर्शविले असल्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे ह्यास Corroborative evidence असल्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु अपघाती मृत्यु असल्याचे सिध्द होते.
14. तक्रारकर्तीने तक्रारकर्तीचे पती व त्यानंतर तक्रारकर्ती व तिची मुले वारस असल्याबाबत फेरफार द्वारे गाव नमुना 7/12 मध्ये जोडण्यात आल्यामुळे व सदरहू दस्तऐवज तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणात दाखल केलेले असल्यामुळे तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी या नात्याने शेतकरी विमा योजनेचे लाभधारक म्हणून लाभ मिळण्यास पात्र आहेत.
15. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार व सादर केलेले कागदपत्र हे संबंधित कार्यालयातून मिळाल्यानंतर तसेच पतीच्या मृत्युनंतर तिची झालेली मानसिक अवस्था हे कागदपत्रे सादर करण्यासाठी झालेल्या विलंबाचे संयुक्तिक कारण असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तांत्रिक मुद्दयावर तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळणे म्हणजेच सेवेतील त्रुटी आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 16/09/2014 पासून ते संपूर्ण रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन संयुक्तरित्या अथवा व्यक्तिगतरित्या करावे.
7. विरूध्द पक्ष 3 यांचेविरूध्द कुठलाही आदेश नाही.