आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
-- आदेश --
( पारित दि. 30 एप्रिल, 2014)
तक्रारकर्तीने तिचे मृतक पती अशोक देवाजी औरासे यांच्या अपघाती विम्याचे पैसे विरूध्द पक्ष यांनी न दिल्यामुळे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- व्याजासह मिळण्यासाठी तसेच मानसिक त्रासापोटी रू. 20,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- च्या मागणीसाठी तिने सदरहू प्रकरण मंचासमक्ष दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती ही मौजा झुकुरटोला, ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तिच्या पतीच्या नावाने मौजे पाटेकुर्रा, ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदीया येथे सर्व्हे नं. 451 ही शेतजमीन होती. तक्ररकर्तीचे पती हे शेतकरी असल्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीने रू. 1,00,000/- चा विमा महाराष्ट्र शासनातर्फे काढला होता. विरूध्द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 2 ही विमा सल्लागार कंपनी असून मध्यस्थ म्हणून काम करते तसेच विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे अपघात विम्याचा दावा सर्वप्रथम दाखल केल्या जातो.
3. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दिनांक 22/08/2011 रोजी शेतामध्ये काम करीत असतांना विषारी साप चावल्यामुळे विषबाधेने झाला. तक्रारकर्तीने अपघाती मृत्यु झाल्यामुळे विम्याचे पैसे मिळण्याकरिता विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 02/11/2011 रोजी संपूर्ण दस्तावेजांसह रितसर अर्ज दिला. विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याची सूचना तक्रारकर्तीस न दिल्यामुळे तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष 1 यांना दिनांक 24/01/2013 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. नोटीस पाठविल्यानंतरही विरूध्द पक्ष यांनी विम्याचे पैसे न दिल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार न्याय मंचात दिनांक 25/02/2013 रोजी दाखल केली.
4. सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल झाल्यावर दिनांक 26/02/2013 विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
विरूध्द पक्ष 1 यांनी आपला जबाब दिनांक 25/04/2013 रोजी मंचात दाखल केला. विरूध्द पक्ष 1 यांनी आपल्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, तक्रारीमधील मजकूर खोटा असून तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा कुठल्या कारणामुळे झाला याबद्दल कुठलाही पुरावा विमा दाव्यासोबत दाखल केलेला नाही. तसेच Chemical Analyzer कडून कुठलाही अहवाल प्राप्त न झाल्यामुळे मृत्युचे कारण न कळल्यामुळे व दिनांक 09/11/2012 रोजीच्या पत्रानुसार Chemical Analyzer चा अहवाल सादर करण्याबाबत तक्रारकर्तीस सांगण्यात आले होते. परंतु तो सादर न केल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी आपला जबाब दाखल केला असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, विरूध्द पक्ष 2 हे मध्यस्थ सल्लागार कंपनी म्हणून शासन व विमा कंपनी यांना सेवा देतात व त्याकरिता ते कुठलेही शुल्क आकारत नाहीत. त्यामुळे त्यांना सदरहू प्रकरणातून वगळण्यात यावे.
विरूध्द पक्ष 3 यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली होती. परंतु ते सदर प्रकरणात हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्या विरूध्द प्रकरण विना जबाब चालविण्यात यावे असा आदेश दिनांक 20/03/2014 रोजी पारित करण्यात आला.
5. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दिनांक 17/10/2011 रोजी विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे विमा दावा दाखल केल्याबाबतचे पत्र पृष्ठ क्र. 13 व 14 वर दाखल केले आहे. तसेच मर्ग सूचना पृष्ठ क्र. 20, इन्क्वेस्ट पंचनामा पृष्ठ क्र. 22, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 24, पोस्टमार्टेम रिपोर्ट पृष्ठ क्र. 26, मृतकाच्या नावाने असलेला 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 36, मृतकाच्या नावाने असलेली फेरफार नोंद पृष्ठ क्र. 40 तसेच विरूध्द पक्ष यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पृष्ठ क्र. 43 वर दाखल केलेली आहे.
6. विरूध्द पक्ष 2 यांनी शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-12 चे परिपत्रक पृष्ठ क्र. 59 वर दाखल केले आहे.
7. तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा दिनांक 22/08/2011 रोजी झाला असून विम्याची रक्कम मिळण्याबाबतचा दावा विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 17/10/2011 रोजी म्हणजेच 90 दिवसांच्या आत दाखल केल्यामुळे तो मुदतीत दाखल केलेला आहे. फेरफार व 7/12 चे कागदपत्र यांच्या नोंदी तिच्या पतीच्या नावाने केलेल्या असल्यामुळे तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते हे सिध्द होते. तक्रारकर्तीच्या वकिलांनी असाही युक्तिवाद केला की, उप विभागीय अधिकारी, देवरी यांनी चौकशी केली असता सकृतदर्शनी त्यांना असे आढळले की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा सर्पदंशाने झालेला आहे. तसेच इन्क्वेस्ट पंचनामा कलम 174 CR.P.C. यामध्ये सुध्दा तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु साप चावल्याने झाला असावा असे पोलीस स्टेशन अधिकारी, पोलीस स्टेशन गोंदीया यांनी प्रमाणित केले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा सर्पदंशाने झालेला असून तक्रारकर्ती अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे.
8. विरूध्द पक्ष 1 च्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्या पतीच्या मृत्युबद्दल Chemical Analyzer यांचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे व विरूध्द पक्ष 1 यांनी वेळोवेळी मागणी करूनही तक्रारकर्तीने तो सादर न केल्यामुळे तिचा विमा दावा प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ही त्यांच्या सेवेतील त्रुटी नाही म्हणून सदरहू तक्रार विरूध्द पक्ष 1 यांच्याविरूध्द खारीज करण्यात यावी.
9. तक्रारीतील आशय, विरूध्द पक्ष यांचे जबाब तसेच तक्रारकर्तीने सदरहू तक्रारीमध्ये दाखल केलेली कागदपत्रे व दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा सर्पदंशाने झालेला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते ही बाब फेरफार नोंद व 7/12 चा उतारा यावरून सिध्द होते. दिनांक 30/11/2011 ची मर्ग सूचना तसेच इन्क्वेस्ट पंचनामा यावरून सकृतदर्शनी असा अनुमान काढता येतो की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा सर्पदंशाने झालेला आहे. तसेच पंचासमक्ष तयार करण्यात आलेल्या घटनास्थळ पंचनाम्यामध्ये मृतकाच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला नखाचे वर विषारी साप चावल्याची खुण दिसून येते असे नमूद केले आहे. त्यावरूनही असा अनुमान काढता येतो की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा साप चावल्यामुळे झाला. दिनांक 23/08/2011 रोजीच्या पोस्टमार्टेम रिपोर्टप्रमाणे ज्या ठिकाणी साप चावला त्याबद्दलचे skin sample घेतल्याबद्दलची नोंद पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये आढळते. Chemical Analyzer यांचा रिपोर्ट मिळणे हे तक्रारकर्तीच्या आवाक्यात किंवा अधिकारक्षेत्रात नसल्यामुळे तो न मिळणे व विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर न करणे याकरिता तक्रारकर्तीला जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्याच्या व त्यासंबंधातील Corroborative Evidence च्या आधारे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा विषारी सापाच्या दंशामुळे झालेला आहे असे मंचाचे मत आहे.
11. तक्रारकर्ती ही अपघाती विम्याचे पैसे मिळण्यास पात्र असल्यामुळे विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी व या रकमेवर मृत्युच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 22/08/2011 पासून ते संपूर्ण पैसे मिळेपर्यंत द.सा.द.शे. 10% दराने व्याज द्यावे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रू. 2,000/- विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीला द्यावे असे देखील मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर मृत्युच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 22/08/2011 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 10% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्तीला रू. 2,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2 व 3 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.