तक्रार दाखल दिनांकः 03/12/2015
आदेश पारित दिनांकः 06/08/2016
तक्रार क्रमांक. : 104/2015
तक्रारकर्ता : श्रीमती संगिता इंद्रजित नारनवरे
वय – 35 वर्षे, धंदा – घरकाम
रा. जांभळी सडक, ता.साकोली, जि. भंडारा.
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी,
लिमीटेड तर्फे डिव्हीजनल मॅनेजर
डिव्हीजनल ऑफीस नं.130800
न्यु इंडिया सेंटर, 7 वा माळा
17-ए, कुपरेज रोड, मुंबई.
2) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी,
लिमीटेड तर्फे क्षेत्रीय मॅनेजर
एम.ई.सी.एल.कॉम्प्लेक्स, सेमीनरी
हिल्स, नागपुर.
3) तालुका कृषी अधिकारी, साकोली
ता.साकोली जि.भंडारा
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड. उदय क्षिरसागर.
वि.प.1,2 : अॅड. यु.के.खटी.
विप. 3 : स्वतः
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक - 06 ऑगस्ट, 2016)
तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
- . तक्रारकर्ती श्रीमती संगिता नारनवरे हिचे पती मयत इंद्रजित हिरामण नारनवरे हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा जांभळी(सडक), ता.साकोली जि.भंडारा येथे भुमापन क्र. 112 ही शेतजमीन होती.
महाराष्ट्र शासनाने नागपुर विभागातील सर्व शेतक-यांचा शेतकरी ‘जनता अपघाता विमा’ योजनेअंतर्गत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 दि. न्यु इंडिया अॅश्युअरन्स कं.कडे विमा उतरविला असल्याने तक्रारकर्तीचे पती सदर विमा योजनेचे लाभार्थी होते. विरुध्द पक्ष क्र.3 महाराष्ट्र शासनाचे स्थानिक कार्यालय असून त्यांचे मार्फत विमा प्रस्ताव मंजुरीसाठी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 कडे पाठवावयाचे होते.
तक्रारकर्तीचे पती इंद्रजित हिरामण नारनवारे हयांचा मृत्यु दिनांक 16/12/2012 रोजी विषारी साप चावल्याने झाला. तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्युबद्दल शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- मिळावी म्हणुन विरुध्द पक्ष क्र. 3 मार्फत सर्व कागदपत्रांसह विमा दावा विरुध्द पक्ष क्र.1 कडे दिनांक 8/2/2013 रोजी सादर केला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या विमा दावा मंजुरीबाबत काहीच न कळविल्याने तक्रारकर्तीने वकीलांतर्फे कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु आजपर्यंत विरुध्द पक्षाने विमा दावा मंजुर न करता विमा लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने सदर तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1. विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 8/2/2013 पासून
प्रत्यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 18% व्याजासह मिळावी.
2. शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रुपये 30,000/-
आणि तक्रारखर्च रुपये 15,000/- मिळावा.
तक्रारकर्तीने तक्रारीच्या पृष्ट्यर्थ शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-12 चे शासन निर्णय, विमा दावा, 7/12 उतारा, 6(क) उतारा, अकस्मात मृत्यु अहवाल, पोलीस दस्तऐवज, पी.एम.रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र, पो.स्टे,साकोली यांचे प्रमाणपत्र, उपविभागीय दंडाधिकारी, साकोली हयांचा रिपोर्ट, तक्रारकर्तीच्या पतीचा वयाचा दाखला, वि.प.यांना पाठविलेली नोटीस व पोच पावती सादर केलेली आहे.
- . वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, साकोली यांनी लेखी जबाब दाखल करुन कळविले की त्यांना दिनांक 9/4/2013 रोजी प्राप्त विमा दावा त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी, भंडारा यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी दिनांक 10/4/2013 रोजी सादर केला असल्याने त्यांच्या कडून सेवेत कोणताही न्युनतापुर्ण व्यवहार झाला नसल्याने त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करावी.
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 दि.न्यु इंडिया अॅश्युरन्स कं.लि. यांनी लेखी जबाबाव्दारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने ‘शेतकरी जनता अपघात विमा’ योजनेअंतर्गत विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे विमा काढला असल्याचे मान्य केले आहे. मात्र तक्रारकर्तीचे पती इंद्रजित नारनवरे हे सदर योजनेअंतर्गत विमीत शेतकरी होते आणि त्यांची विधवा म्हणुन तक्रारकर्ती सदर योजनेप्रमाणे रुपये 1,00,000/- विमा लाभ मिळण्यास पात्र असल्याचे नाकबुल केले आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यु दिनांक 16/11/2012 रोजी विषारी साप चावल्याने झाल्याचे विरुध्द पक्षाने नाकबुल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की इंद्रजित याचा मृत्यु नैसर्गिक होता. त्यांचे पुढे म्हणणे असे की, अपघातग्रस्ताच्या जुन्या फेरफाराची नोंद, घटनास्थळ पंचनाम्यात नमुद इंद्रजित लक्ष्मण नारनवरे या नावाबद्दल खुलासा तसेच अन्य कागदपत्रांची विरुध्द पक्ष क्र.1 ने मागणी करुनही तक्रारकर्तीने पुर्तता केली नाही म्हणुन तिचा दावा दिनांक 6/9/2014 रोजी बंद करण्यात आला. शवविच्छेदनाचे वेळी काढलेला व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी पाठविला होता. त्याच्या अहवालात ‘कोणतेही विष आढळून आले नाही’ असे नमुद आहे. यावरुन तक्रारकर्तीने तिच्या पतीचा सर्पदंशाने अपघाती मृत्यु झाल्याची तक्रारीत नमुद बाब खोटी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे खोटया कागदपत्रावर आधारित तक्रारकर्तीचा दावा नाकारण्याची विरुध्द पक्षाची कृती विमा योजनेच्या अटी व शर्तीस अनुसरुनच असल्याने त्याद्वारे सेवेत कोणताही न्युनतापुर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्द्तीचा अवलंब झालेला नसल्याने सदरची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
- . तक्रारकर्त्याचे व वि.प.क्र. 1,2 व 3 चे कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) | वि.प.ने सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला आहे काय ? | - | होय. |
2) | तक्रारकर्ती मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | - | अंशतः |
3) | अंतीम आदेश काय ? | - | अंतीम आदेशाप्रमाणे. |
.
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 बाबत – तक्रारकर्तीने तिचे पती इंद्रजित हिरामण नारनवरे यांचे नावाने मौजा जांभळी ता. साकोली जि.भंडारा येथे भुमापन क्र. 112 क्षेत्रफळ 0.82 हे शेती असल्याबाबतचा 7/12 चा उतारा दस्त क्र.3 वर दाखल केला आहे. त्यातील नोंदीवरुन हे स्पष्ट होते की इंद्रजितचे वडील हिरामण नारनवरे यांच्या मृत्युमुळे त्यांचे वारस म्हणुन सदर शेतजमीन इंद्रजित व इतरांचे नांवाने झाली असून त्याबाबत फेरफार क्र. 504 दिनांक 10/9/2007 रोजी घेण्यात आलेला आहे. सदर फेरफाराची नोंद देखिल अभिलेखावर पान क्र.22 वर आहे. इंद्रजितच्या मृत्यु नंतर घेण्यात आलेल्या फेरफाराबाबत वारसा प्रकरणाची नोंदवही नमुना सहा (क) दस्त क्र.4 वर दाखल आहे. त्याप्रमाणे मयताची विधवा तक्रारकर्ती संगिता आणि मुले व मुलींच्या नावाची वारस म्हणुन नोंद घेण्यात आली आहे. वरील दस्तऐवजांवरुन मयत इंद्रजित हिरामण नारनवरे हा शेतकरी होता व त्याच्या मालकीची तक्रारीत नमुद शेतजमीन होती हे सिध्द् होते.
तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री उदय क्षिरसागर यांनी त्यांच्या युक्तीवादात सांगितले की दस्त क्र.5 वर अकस्मात मृत्यु अहवाल सारांश दाखल केला आहे. त्यांत पोलीस निरीक्षक, साकोली यांनी हकीकत नमुद केली आहे की, ‘‘मृतक इंद्रजित हिरामण नारनवरे आपल्या शेतात धानाचे भारे बांधण्यास गेला असता त्याचे पायाचे डावे अंगठयाला सांप चावल्याने उपचाराकरीता घरी परत येत असता रस्त्यातील शिवराम मेश्रामचे बांधीत पडुन मरण पावल्याचे रिपोर्टवर मर्ग क्र.67/2012 कलम 174 फौ.प्र.सं. दिनांक 16/11/2012 रोजी दाखल केला होता. आम्ही तपास स्वतः कडे घेवून घटनास्थळी घटनास्थळ पंचनामा व प्रेताचा इन्क्वेस्ट पंचनामा करुन प्रेत पोस्टमार्टम साठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. इन्क्वेस्ट पंचनामा करतेवेळी प्रेत पाहिले असता मृतक इंद्रजित नारनवरे याचे डावे पायाचे अंगठयास साप चावल्याचे दाताचे निशान दिसत होते आणि त्यातुन रक्तस्त्राव झाला होता. तसेच मृतकाचे नातेवाईक व शेतात काम करणारे लोकांचे बयाण घेतले असता, ‘त्यांनी मृतकाला धानाच्या कळपामध्ये असलेला साप चावला असता उपचारासाठी घरी येत असतांना मरण पावल्याचे सांगितले’.
पोस्टमार्टम मध्ये मरणाबाबत, ‘‘The probable cause of death may be due to cardio respiratory failure due to poisonus snake bite’’, असे लिहीले आहे.
सदर मर्ग मधील मृतकाचे मरण विषारी साप चावल्याने झाल्याचे निष्पन्न होत असल्याने सदर मर्ग मध्ये अपघाती मृत्यु या सदराखाली मर्ग समरी तयार करुन मंजुरीकरीता मा. उपविभागीय अधिकारी, साकोली यांचेकडे सादर आहे’’.
तसेच शवविच्छेदन अहवाल (दस्त क्र.6) मध्ये देखिल मृत्युचे कारण विषारी सर्पदंश असेच नमुद केले आहे. उपविभागीय अधिकारी, साकोली यांनी देखील इंद्रजित हिरामण नारनवरे याच्या साप चावल्याने अप्राकृतिक मृत्युबाबतची, सहायक पोलीस अधिक्षक, साकोली यांनी मंजुरीसाठी पाठविलेली समरी मंजुर केली आहे. ती दस्त क्र.1 वर आहे.
वरील सर्व पुराव्यावरुन इंद्रजित हिरामण नारनवरे यांचा अपघाती मृत्यु विषारी ‘साप चावल्यानेच’ झाला हे निर्विवाद सिध्द् होवून देखिल केवळ व्हिसेरा रिपोर्ट मध्ये विष आढळून आले नाही असे कारण सांगून तक्रारकर्तीचा वाजवी विमा दावा मंजुर न करण्याची विरुध्द पक्ष क्र.1 ची कृती सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
याउलट विरुध्द पक्ष क्र.1 चे अधिवक्ता श्रीमती खटी यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले की विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला अपघातग्रस्ताच्या जुन्या फेरफाराची नोंद, घटनास्थळ पंचनामा, मृतकाचे नांव इंद्रजित लक्ष्मण नारनवरे असल्याने त्याबाबतचा खुलासा तसेच अन्य कागदपत्रांची मागणी करुनही तक्रारकर्तीने पुर्तता केली नाही म्हणुन सदर आवश्यक कागदपत्रांअभावी विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा दावा दिनांक 6/9/2014 रोजी बंद केला. यांत विरुध्द पक्षाचा कोणताही दोष नाही. याशिवाय त्यांचा युक्तीवाद असा की शवविच्छेदनामध्ये मृतक इंद्रजित याचा जो व्हिसेरा काढुन तपासणीसाठी पाठविला होता त्याच्या प्राप्त झालेल्या अहवालात, कोणतेही विष आढळून आले नाही, असे नमुद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा विषारी सर्पदंशामुळे झालेला अपघाती मृत्यु नसुन नैसर्गिक असल्याचे स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्ती कोणताही विमा लाभ मिळण्यास पात्र नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुर करण्याची विरुध्द पक्षाची कृती सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरत नाही.
दोन्ही पक्षाच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद आणि अभिलेखावरील दाखल दस्तऐवजावरुन हे सिध्द् झालेले आहे की, तक्रारकर्तीचा पती इंद्रजित हिरामण नारनवरे हे शेतकरी होते आणि महाराष्ट्र शासनाने त्यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. तो दिनांक 16/11/2012 रोजी शेतावर धानाचे भारे बांधत असतांना साप चावल्याने त्याचा अपघाती मृत्यु झाल्याने पोलीसांनी तयार केलेला अकस्मात मृत्यु अहवाल सारांश दस्त क्र.5 तसेच इन्क्वेस्ट पंचनामा आणि शवविच्छेदन अहवाल यावरुन स्पष्ट होते. शवविच्छेदन अहवालाच्या वेळी मृतकाचा व्हिसेरा काढून तपासणीसाठी पाठविला होता. परंतु व्हिसेरा अहवालात कोणतेही विष आढळून आले नाही असे दर्शविणारा कोणताही अहवाल विरुध्द पक्षाने अभिलेखावर दाखल केला नाही. जरी व्हिसेरा अहवालात ‘‘कोणतेही विष आढळून आले नाही’’ असे नमुद केले असेल तरी त्याचा अर्थ तक्रारकर्तीचे पती इंद्रजित यांस विषारी सर्पदंश झाला नाही असा होत नाही. कारण सर्पदंशाचे विष तपासणीसाठी नव्हे तर बाहेरुन मृतकाने विष प्राशन केले किंवा नाही हे सिध्द् करण्यासाठी व्हिसेरा अहवाल सहायभुत ठरु शकतो. त्यामुळे केवळ व्हिसेरा अहवालात विष आढळून आले नाही यावरुन इंद्रजित नारनवरे याचा मृत्यु विषारी सर्पदंशाने झालेला नाही हा विरुध्द पक्षाचे वतीने करण्यात आलेला युक्तीवाद स्विकारता येणार नाही.
घटनास्थळ पंचनाम्यात घटनास्थळ दाखविणा-याचे नांव रेवनाथ लक्ष्मण नारनवरे असे नमुद आहे. परंतु पोलिसांनी रकाना क्र.5 मध्ये मृतकाचे नांव लिहतांना चुकीने इंद्रजित लक्ष्मण नारनवरे असे नमुद केले असल्याचे दिसून येते. कारण सदर घटनास्थळ पंचनामा रकाना क्र.8 मध्ये देखील मृतकाचे नांव इंद्रजित हिरामण नारनवरे असेच लिहीले आहे. म्हणुन तक्रारकर्तीचा पती इंद्रजित हिरामण नारनवरे याचाच सर्पदंशाने मृत्यु झाल्याचे सिध्द् होत असतांना विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याची कृती निश्चितच सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब ठरते. म्हणुन मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र.2 व 3 बाबत – मुद्दा क्र.1 वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजुर करुन सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने तक्रारकर्ती शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/-(एक लाख) तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला दिलेल्या नोटीसच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 9/11/2015 पासून द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. या शिवाय शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणुन मुद्दा क्र.2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
- आ दे श -
- तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी शेतकरी
अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (एक लाख) दिनांक
3/12/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह
दयावे.
- . विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक त्रासापोटी
नुकसान भरपाई रुपये 10,000/-(दहा हजार) दयावी.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये
5,000/-(पाच हजार) दयावे.
5. वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.
6) वि.प. क्र.3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
7) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
8) तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.