तक्रार दाखल दिनांकः 11/03/2016
आदेश पारित दिनांकः 12/08/2016
तक्रार क्रमांक. : 28/2016
तक्रारकर्ता : श्रीमती गिता रामकृष्ण निंबार्ते
वय – 40 वर्षे, धंदा – घरकाम
रा. माटोरा, ता.जि. भंडारा.
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी,
लिमीटेड तर्फे डिव्हीजनल मॅनेजर
डिव्हीजनल ऑफीस नं.130800
न्यु इंडिया सेंटर, 7 वा माळा
17-ए, कुपरेज रोड, मुंबई.
2) द न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी,
लिमीटेड तर्फे क्षेत्रीय मॅनेजर
एम.ई.सी.एल.कॉम्प्लेक्स, सेमीनरी
हिल्स, नागपुर.
3) तालुका कृषी अधिकारी, भंडारा
ता.जि.भंडारा
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड. उदय क्षिरसागर.
वि.प.1,2 : अॅड. निला नशीने.
विप. 3 : स्वतः
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. हेमंतकुमार पटेरिया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक - 12 ऑगस्ट, 2016)
तक्रारकर्तीचे पती रामकृष्ण वासुदेव निंबार्ते यांच्या अपघाताचे शेतकरी अपघात विमा दाव्याचे रुपये 1,00,000/- विरुध्द पक्षाने न दिल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
- . तक्रारकर्ती श्रीमती गिता निंबार्ते हिचे पती मयत रामकृष्ण वासुदेव निंबार्ते हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा मटोरा, ता.भंडारा जि.भंडारा येथे भुमापन क्र.520 ही शेतजमीन होती.
महाराष्ट्र शासनाने नागपुर विभागातील सर्व शेतक-यांचा शेतकरी ‘जनता अपघाता विमा’ योजनेअंतर्गत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 दि. न्यु इंडिया अॅश्युअरन्स कं.कडे विमा उतरविला असल्याने तक्रारकर्तीचे पती सदर विमा योजनेचे लाभार्थी होते. विरुध्द पक्ष क्र.3 महाराष्ट्र शासनाचे स्थानिक कार्यालय असून त्यांचे मार्फत विमा प्रस्ताव मंजुरीसाठी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 कडे पाठवावयाचे होते.
तक्रारकर्तीचे पती रामकृष्ण वासुदेव निंबार्ते हयांचा मृत्यु दिनांक 12/08/2012 रोजी विजेचा धक्का लागुन जखमी होवून झाला. तक्रारकर्तीने पतीच्या अपघाती मृत्युबद्दल शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रुपये 1,00,000/- मिळावी म्हणुन विरुध्द पक्ष क्र. 3 मार्फत सर्व कागदपत्रांसह विमा दावा विरुध्द पक्ष क्र.1 कडे दिनांक 4/10/2012 रोजी सादर केला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या विमा दावा मंजुरीबाबत काहीच न कळविल्याने तक्रारकर्तीने वकीलांतर्फे कायदेशीर नोटीस दिनांक 3/10/2015 रोजी पाठविली. परंतु आजपर्यंत विरुध्द पक्षाने विमा दावा मंजुर न करता विमा लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने सदर तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1. विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 4/10/2012
पासून प्रत्यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 18% व्याजासह मिळावी.
2. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रुपये
30,000/-आणि तक्रारखर्च रुपये 15,000/- मिळावा.
तक्रारकर्तीने तक्रारीच्या पृष्ट्यर्थ शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-12 चे शासन निर्णय, विमा दावा, 7/12 उतारा, गांव नमुना आठ अ, फेरफाराची नोंदवही, अकस्मात मृत्यु अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, पोलीस दस्तऐवज, पी.एम.रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र, तलाठी माटोरा हयांचे तहसीलदार भंडारा यांना पाठविलेले पत्र, तक्रारकर्तीच्या पतीचा वयाचा दाखला, वि.प.यांना पाठविलेली नोटीस व पोच पावती सादर केलेली आहे.
- . वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, साकोली यांनी लेखी जबाब दाखल करुन कळविले की त्यांना दिनांक 4/10/2012 रोजी प्राप्त विमा दावा त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी, भंडारा यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी दिनांक 17/10/2012 रोजी सादर केला असल्याने त्यांच्या कडून सेवेत कोणताही न्युनतापुर्ण व्यवहार झाला नसल्याने त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करावी.
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 दि.न्यु इंडिया अॅश्युरन्स कं.लि. यांनी दिनांक 4/5/2016 रोजी लेखी जबाबाव्दारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यु दिनांक 12/8/2012 ला विजेच्या धक्याने झाला हे मान्य नाही. पोस्टमार्टम रिर्पोट प्रमाणे Viscera preserve for chemical analysis cause of death can be given after chemical analysis report. त्यामुळे तक्रारकर्ती सदर योजनेप्रमाणे विमा लाभ मिळण्यास अपात्र आहे. म्हणुन तक्रारकर्तीचा सदर दावा खारीज करावा, अशी विनंती केली आहे.
- . तक्रारकर्त्याचे व वि.प.क्र. 1,2 व 3 चे कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) | वि.प.ने सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला आहे काय ? | - | होय. |
2) | तक्रारकर्ती मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? | - | अंशतः |
3) | अंतीम आदेश काय ? | - | अंतीम आदेशाप्रमाणे. |
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 बाबत – तक्रारकर्तीने तिचे पती रामकृष्ण वासुदेव निंबार्ते यांचे नावाने माटोरा ता.जि.भंडारा येथे भुमापन क्र.520 क्षेत्रफळ 0.33 ही शेती असल्याबाबतचा 7/12 चा उतारा दस्त क्र.3 वर दाखल केला आहे. त्यातील नोंदीवरुन हे स्पष्ट होते की रामकृष्णचे वडील वासुदेव गोपाळा निंबार्ते यांच्या मृत्युमुळे त्यांचे वारस म्हणुन सदर शेतजमीन रामकृष्ण व इतरांचे नांवाने झाली असून त्याबाबत फेरफार क्र. 406 दिनांक 24/9/2007 रोजी घेण्यात आलेला आहे. सदर फेरफाराची नोंद देखिल अभिलेखावर पान क्र.22 वर आहे. यावरुन स्पष्ट होते की मयत रामकृष्ण वासुदेव निंबार्ते हा शेतकरी होता व त्याच्या मालकीची तक्रारीत नमुद शेतजमीन होती हे सिध्द् होते.
तक्रारकर्तीने सादर केलेले घटनास्थळ पंचनामा प्रमाणे बाळकृष्ण काशीराम निंबार्ते रा.माटोरा यांचे शेतातील विहीरीवरील विदयुत पंप स्टार्टर पेटी पासून दक्षिणेस अंदाजे 7 फुट अंतरावरील असून सदर ठिकाणी अंदाजे 20 – 20 फुट पडीत असलेल्या जागेतील आहे. घटना तारीख 12/8/2012 दुपारी 12 वाजता मृतक रामकृष्ण हा मजुर नामे गुरुदत्त देवाजी रेहपाडे वय 37 वर्ष रा.माटोरा चे सोबत शेतावर रासायनिक युरिया, कृषी संजीवनी नावाचे खत बैलगाडीने नेत असता शेतात बैलगाडी जात नसल्याने रोडापासून अंदाजे ½ km अंतरावर खताच्या अर्ध्या चुंगडया तयार करुन डोक्यावर वाहून शेतात पायी पायी मजुरासोबत 3 ते 4 फे-या केल्या. शेवटच्या फेरीमध्ये मजुर गुरुदत्त व मृतकाचा भाऊ सुभाष वासुदेव निंबार्ते हे दोघेही अर्ध्या-अर्ध्या खताचे चुंगडया आणण्यास गेले. विहीरीजवळ विदयुत मोटर पंप सुरु होती. मजुर गुरुदत्त व मृतकाचा भाऊ यांनी चुंगडी मृतकाजवळ आणे पर्यंत मृतक रामकृष्ण हा चित्त अवस्थेत पेटी पासुन 7 फुट अंतरावर बेशुध्द अवस्थेत पडलेला होता. मृतकाला आवाज दिले असता तो बोलला नाही. तसेच वॉटरपंप सुरु असलेल्या ठिकाणावरुन पाणी पाजले व मजुर, मृतकाचा भाऊ व मजुर गुरुदत्त यांनी मिळून त्याला सार्वजनिक रुग्णालय, भंडारा येथे उपचारासाठी नेले. सदर परिस्थितीजन्य पुराव्यावरुन हे स्पष्ट होते की मजुर व मृतकाचा भाऊ सुभाष हे खताच्या चुंगडया आणेपर्यंतच्या काळात मृतक विदयुत पंप बंद करण्यास गेला असावा व अनवधनाने त्यांस विजेचा शॉक लागून स्टार्टर पेटी पासून दुर फेकल्या गेल्याने अपघाताने मरण पावला. शवविच्छेदनात मृत्युचे स्पष्ट कारण दिले नसले तर सदरचा मृत्यु नैसर्गिक किंवा आत्महत्या आहे हे सुचविणारा कोणताही पुरावा विरुध्द पक्षाने सादर केलेला नाही. विदयुत शॉकने मरण पावला हे सिध्द् करण्यासाठी व्हिसेरा अहवाल उपयोगी नाही. म्हणुन तो सादर न केल्याने कोणताही फरक पडत नाही. तलाठी माटोरा यांनी देखिल त्यांचे अहवालात रामकृष्ण वासुदेव निंबार्ते यांचा मृत्यु वीजप्रवाह लागुन झाला आहे असे प्रमाणपत्रात नमुद केले आहे. यावरुन स्पष्ट होते की रामकृष्ण वासुदेव निंबार्ते यांचा मृत्यु विदयुतप्रवाहाचा धक्का लागुन झाल्याचे सिध्द् होते. म्हणुन मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र.2 व 3 बाबत – मुद्दा क्र.1 वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्तीचा पती रामकृष्ण निंबार्ते याचा विजेचा शॉक लागून अपघाती मृत्यु झाला असतांना तिचा वाजवी विमा दावा नामंजुर करुन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सेवेत न्युनतापुर्ण व्यवहार केला असल्याने तक्रारकर्ती शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/-(एक लाख) व तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला दिलेल्या नोटीसच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 3/10/2015 पासून द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. या शिवाय शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- मिळण्यास देखील पात्र आहे. म्हणुन मुद्दा क्र.2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
- आ दे श -
- तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार वि.प. क्र.1 व 2 विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजुर करण्यात येत
आहे.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी शेतकरी
अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (एक लाख) दिनांक
11/03/2016 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह
दयावे.
- . विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक त्रासापोटी
नुकसान भरपाई रुपये 10,000/-(दहा हजार) दयावी.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये
5,000/-(पाच हजार) दयावे.
5. वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.
6. वि.प. क्र.3 विरुध्द कोणताही आदेश नाही.
7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
8. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.