(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
(पारित दि. 30 एप्रिल, 2015)
तक्रारकर्त्याचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्द पक्ष 1 यांनी मंजूर किंवा नामंजूर असे न कळविल्याने तक्रारकर्त्याने शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा राह. कटंगी (बु), तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून तक्रारकर्त्याचे वडील श्री. हुलकराम फकीर पटले यांच्या मालकीची मौजा कटंग्ी (बु), तालुका गोरेगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 185/1 या वर्णनाची शेतजमीन असल्यामुळे ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे लाभधारक आहेत.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्याचे काम करतात.
4. तक्रारकर्त्याचे वडील श्री. हुलकराम फकीर पटले हे दिनांक 06/01/2012 रोजी नातेवाईकाच्या मागे मोटारसायकलने बसून जात असतांना दुस-या मोटारसायकलने धडक दिल्याने खाली पडून जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला.
5. तक्रारकर्त्याचे वडील शेतकरी असल्याने व अपघातात त्यांचा मृत्यु झाल्याने तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 3 यांच्याकडे दिनांक 26/06/2012 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला व वेळोवेळी दस्तऐवजांची पूर्तता केली. परंतु आवश्यक ते दस्तऐवज दिल्यानंतरही विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याच्या वडिलांच्या दाव्याबाबत कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- मिळण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 30,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 10,000/- मिळण्यासाठी दिनांक 08/09/2014 रोजी मंचात तक्रार दाखल केली.
6. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 16/09/2014 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना दिनांक 25/09/2014 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष 1, 2, 3 यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
7. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा जबाब दिनांक 15/01/2015 रोजी दाखल केला व तो पृष्ठ क्र. 60 वर आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक असलेले 6-ड फेरफार, 7/12, वयाचा दाखला, इन्क्वेस्ट पंचनामा हे दस्तऐवज सदरहू प्रकरणात दाखल केले नाहीत म्हणून दिनांक 30/05/2013 रोजी पत्र पाठवून त्याचा दावा नामंजूर करण्यात आला. तसेच तक्रारकर्त्याचा विमा दावा हा मुदतीबाहेर आहे. त्रिस्तरीय करारानुसार विमा दावा हा मुदतीबाहेर असल्यामुळे तक्रारकर्त्याचा दावा फेटाळण्यात आला. तसेच विरूध्द पक्ष 3 यांनी आपल्या सेवेत कसूर केला असून विरूध्द पक्ष 1, 2 यांनी त्यांच्या सेवेत कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच तक्रारकर्त्याचे वडील हे त्यांचे नातेवाईक श्री. टेकेश्वर आनंदराव भागले यांच्यासोबत MH-35/U 0906 या मोटारसायकलने जात होते आणि अपघाताच्या वेळेस त्यांच्याजवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता व त्यांनी निष्काळजीपणाने वाहन चालविल्यामुळे सदर विमा पॉलीसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे.
8. विरूध्द पक्ष 3 यांनी सदरहू प्रकरणात त्यांचा लेखी जबाब दिनांक 22/10/2014 रोजी दाखल केला असून तो पृष्ठ क्र. 54 वर आहे. विरूध्द पक्ष 3 यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे की, तक्ररकर्त्याने त्याच्या वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर शासनाच्या अटी व शर्तीनुसार मंडळ कृषि अधिकारी, गोरेगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर केला व मंडळ कृषि अधिकारी यांचे पत्र क्रमांक 208, दिनांक 17/08/2012 रोजी तालुका कृषि अधिकारी, गोरेगांव यांना प्रस्ताव प्राप्त झाला. सदर प्रस्तावाची छाननी केली असता त्रुटींची पूर्तता करण्याविषयी संबंधितांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले व त्या अनुषंगाने परस्पर प्रस्ताव परत केला. संबंधिताद्वारे त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर तक्रारकर्त्याचा विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष 3 कार्यालयास आवक क्रमांक 1029, दिनांक 05/12/2012 रोजी प्राप्त झाला. विरूध्द पक्ष 3 यांनी सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गोंदीया यांना पत्र क्र. 12, दिनांक 04/01/2013 अन्वये सादर केला असे त्यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे.
9. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-12 बाबतचा शासन निर्णय पृष्ठ क्र. 12 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजना क्लेम फॉर्म भाग-1 पृष्ठ क्र. 16 वर, तलाठ्याचे प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 17 वर, 7/12 चा उतारा पृष्ठ क्र. 23 वर, F.I.R. पृष्ठ क्र. 28 वर, घटनास्थळ पंचनामा पृष्ठ क्र. 32 वर, मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 43 वर, तक्रारकर्त्यातर्फे विरूध्द पक्ष यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस पृष्ठ क्र. 44 वर, तक्रारकर्त्याचे शपथपत्र पृष्ठ क्र. 66 वर, शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-2010 मार्गदर्शक सूचना पृष्ठ क्र. 71 वर, तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 85 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
10. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी सदरहू प्रकरणात लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 85 वर दाखल केला असून तोंडी युक्तिवाद केला की, विरूध्द पक्ष यांनी तक्ररकर्त्याचा दावा मंजूर किंवा नामंजूर असे तक्रारकर्त्याला कळविले नाही. तक्रारकर्त्याने आवश्यक ते दस्तऐवज दाखल केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने 6-ड, वयाचा दाखला व इन्क्वेस्ट पंचनामा हे दस्तऐवज दिले नाही म्हणून विमा दावा नाकारला. परंतु शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार शेतक-याच्या अपघाताबद्दल केवळ अपघात झाला ह्या कारणास्तव दावा मंजूर करावा हे स्पष्ट नमूद केलेले आहे. तसेच पुढे त्यांनी आपल्या युक्तिवादात असे सांगितले की, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना त्याचे वडील शेतकरी असल्याबाबत सर्व दस्तऐवज दिले असून शासन निर्णयानुसार एखादे दस्तऐवज उपलब्ध नसल्यास पर्यायी दस्तऐवजानुसार दावा मंजूर करता येईल हे स्पष्ट नमूद केलेले आहे. विरूध्द पक्ष यांनी कुठलेही दस्तऐवज मागितले नाही वा दस्तऐवज मागितले याचा पुरावा मंचासमक्ष दाखल केलेला नाही. करिता तक्रारकर्त्याचे सदरहू प्रकरण मंजूर करण्यात यावे.
11. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकील ऍड. इंदिरा बघेले यांनी सदरहू प्रकरणात विरूध्द पक्ष यांना शपथपत्रावरील पुरावा दाखल करावयाचा नाही अशी पुरसिस पृष्ठ क्र. 87 वर दाखल केली. तसेच त्यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद पृष्ठ क्र. 88 वर दाखल केला असून तोंडी युक्तिवाद देखील केला. त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत आवश्यक असलेले फॉर्म 6-ड फेरफार, 7/12 उतारा, इन्क्वेस्ट पंचनामा हे दस्तऐवज दाखल केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतबाह्य असून त्रिस्तरीय करारानुसार दाव्यामधील अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. सदर प्रकरणात विरूध्द पक्ष 3 यांनी त्रुटी केलेली असून विरूध्द पक्ष 1 व 2 च्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नाही. तक्रारकर्त्याचा विमा दावा मुदतीबाहेर असल्यामुळे फेटाळण्यात आला व त्याकरिता विरूध्द पक्ष 1, 2 च्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
12. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, विरूध्द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्ही पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ता शेतकरी जनता अपघात विम्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
13. तक्रारकर्त्याच्या वडिलांचा मृत्यु दिनांक 06/11/2012 रोजी झाला. तक्रारकर्त्याने संपूर्ण कागदपत्रासह विमा दावा अर्ज विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर केला. तक्रारकर्त्याची त्यावेळची मानसिक स्थिती आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी त्याला लागलेला वेळ व घरातील एकमेव सज्ञान व्यक्ती या बाबींचा विचार करता तक्रारकर्त्याला विमा दावा अर्ज दाखल करण्यासाठी विलंब लागल्याचे संयुक्तिक कारण आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे 90 दिवसानंतर सुध्दा विमा दावा संयुक्तिक कारण असल्यास दाखल केल्या जाऊ शकतो व तो मंजूर होण्यास पात्र आहे.
14. विरूध्द पक्ष यांनी म्हटले आहे की, सदर विमा दावा मुदतीबाहेर आहे व त्यांच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी. परंतु सदरहू प्रकरणात विरूध्द पक्ष यांनी सदर दावा मुदतीबाहेर आहे याबद्दल कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. तसेच योग्य ते दस्तऐवज दाखल केले नाहीत असे विरूध्द पक्ष यांचे म्हणणे आहे. परंतु प्रपत्र – ड मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच विम्याची रक्कम अदा करावी. दुर्घटना सिध्द होत असेल व अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या कागदपत्राची पूर्तता होऊ शकत नसेल तर पर्यायी दाखल्याबाबत आयुक्त (कृषि)/जिल्हाधिकारी यांचेशी विचार-विनिमय करून पूर्तता करून घेऊन विम्याची रक्कम अदा करावी.
15. विरूध्द पक्षाच्या वकिलांनी सदरहू प्रकरणात त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ दाखल केलेला न्यायनिवाडा त्यांचे म्हणणे सिध्द करण्याकरिता समर्थनीय नाही.
16. तक्रारकर्त्याने सदर प्रकरणात सर्व दस्तऐवज व पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट दाखल केलेला असून सदरहू रिपोर्टमध्ये तक्रारकर्त्याच्या वडिलांचा मृत्यु हा डोक्याला मार लागल्याने अपघाती मृत्यु झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण कागदपत्रांचा विचार करता तक्रारकर्त्याच्या वडिलांचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे हे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्त्याचे सदरहू प्रकरण मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या मृतक वडिलांच्या अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द्यावी. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 08/09/2014 पासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 5,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी उपरोक्त आदेश क्र. 2, 3, 4 चे पालन संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या करावे.
6. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
7. विरूध्द पक्ष 3 यांच्याविरूध्द प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात येते.