:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा मा.सदस्या श्रीमती स्मिता निळकंठ चांदेकर)
(पारीत दिनांक–24 ऑगस्ट, 2018)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी आणि इतर विरुध्द तिचे मृतक पतीच्या मृत्यू पःश्चात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्या संबधी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून मृतक श्री सावजी सदाशिव बगमारे हा तिचा पती होता आणि तो व्यवसायाने शेतकरी होता, त्याचे मालकीची मौजा धर्मापुरी, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-461 ही शेत जमीन होती. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) ही कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस नावाची नोडल एजन्सी आहे. विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी लाखांदुर, जिल्हा भंडारा आहेत. महाराष्ट्र शासनाचे वतीने विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे संबधित लाभार्थ्यां कडून स्विकारतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला होता आणि तक्रारकर्ती ही सदर विमा योजने अंतर्गत वारसदार पत्नी म्हणून “लाभार्थी” आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिच्या पतीचा दिनांक-26/04/2012 रोजी मोटर-सायकलने जात असताना एका ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन वैद्दकीय उपचारा दरम्यान दिनांक-04/05/2012 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर तिने दिनांक-25/07/2012 रोजी विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिका-यांकडे विमा दाव्या संबधी रितसर प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांच्या प्रतींसह सादर केला. पुढे विशेष शिबीरात तक्रारकर्तीच्या विम्या दाव्या संबधात दिनांक-22/01/2014 रोजी विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिका-यांचे मार्फतीने आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता करण्यात आली परंतु पुढे चार वर्ष उलटून गेल्या नंतरही तिला विमा दावा प्रस्तावा संबधाने विरुध्दपक्षां तर्फे काहीही कळविण्यात आले नाही, म्हणून तिने दिनांक-22/12/2016 रोजीची कायदेशीर नोटीस विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी व विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांना पाठविली परंतु त्यावरही विरुध्दपक्षां कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही वा उत्तरही देण्यात आले नाही, विरुध्दपक्षांच्या सेवेतील ही कमतरता आहे, या आरोपा वरुन तिने या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-25/07/2012 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून तिला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर एकत्रित सादर करुन तक्रारकर्तीचे पतीचे नावाची शेती असून त्यावरच त्यांचा व कुटूंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून होता ही बाब नाकबुल केली. तक्रारकर्तीचे पतीचा दिनांक-26/04/2012 रोजीचा अपघात व वैद्दकीय उपचार घेत असताना दिनांक-04/05/2012 रोजी त्यांचा झालेला मृत्यू या बाबी सुध्दा नाकबुल केल्यात. विशेष कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे पती पोलीस स्टेशन अडयाळ येथे पोलीस म्हणून नौकरीला होते, त्यामुळे ते शेतकरी असल्या बाबत केलेले विधान खोटे आहे. मोटर अपघातात मृत्यू झाल्या नंतर तिने विमा दावा हा मोटर अपघात प्राधिकरणा समोर दाखल करणे आवश्यक असताना ग्राहक मंचा समक्ष तक्रार दाखल केली आहे. तिने दिनांक-25/07/2012 रोजी विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिका-या कडे अर्ज केला होता हा एक दस्तऐवजाचा भाग असल्याचे नमुद केले. तिने विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीकडे संपूर्ण दस्तऐवजाची पुर्तता केल्याची बाब त्याच प्रमाणे दिनांक-22/01/2014 रोजीचे विशेष शिबिरात विरुध्दपक्ष क्रं-4) कडे कागदपत्रांची पुर्तता केल्याची बाब नाकबुल केली. तिने विरुध्दपक्षांना नोटीस पाठवूनही तिला उत्तर मिळाले नव्हते ही बाब सुध्दा नाकबुल केली.
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीला दिनांक-26/12/2012 रोजीचे पत्र पाठवून त्याव्दारे आवश्यक दस्तऐवज म्हणजे नमुना-6(ड) फेरफार पंजी, मृतकाचा वाहन चालविण्याचे परवान्याची प्रत दाखल करण्यास सुचित केले होते परंतु तिने 30 दिवसांचे आत कागदपत्र न पुरविल्याने तिचा विमा दावा बंद करण्यात आला व विमा दावा बंद केल्या बद्दलचे दिनांक-27/05/2013 रोजीचे लेखी पत्र तक्रारकर्तीसह विरुध्दपक्ष क्रं-3) आणि विरुध्दपक्ष क्रं-4) यांचेकडे पाठविले होते. तिचा विमा दावा दिनांक-27/05/2013 रोजी नामंजूर केला होता, तेंव्हा पासून दोन वर्षाचे आत तक्रार मंचा समक्ष दाखल करणे आवश्यक होते त्यामुळे सदर तक्रार ही मुदतबाहय असल्याचा आक्षेप घेतला. तक्रारकर्ती तर्फे विमा दावा विमा योजना संपल्याचा दिनांक-14/08/2012 पासून 90 दिवसांच्या आत विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे दाखल करणे आवश्यक होते परंतु तिने तसे केले नाही. त्यांच्या सेवेत कुठलीही कमतरता होती ही बाब नाकबुल करुन तक्रार मुदतबाहय असल्याने ती खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात पारीत करण्यात आला.
05. विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिका-यानीं आपल्या लेखी जबाबा मध्ये नमुद केले की, मृतक शेतकरी श्री सावजी सदाशिव बगमारे यांचे मालकीची मौजा धर्मापुरी, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-461 ही शेती होती व त्यांचा मोटर सायकलने जात असताना ट्रकने धडक दिल्याने दिनांक-04/05/2012 रोजी अपघाती मृत्यू झाला होता या बाबी मान्य केल्यात. तक्रारकर्तीने विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-25/07/2012 रोजी दाखल केल्या नंतर त्यांनी तो विमा दावा त्यांचे कार्यालयीन पत्र जावक क्रं-935 अन्वये दिनांक-26/07/2012 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दाखल केला होता. कृषी अधिकारी यांनी शेतकरी अपघात विमा योजने बाबत दिनांक-15/01/2014 रोजी भंडारा येथे विशेष शिबिराचे आयोजन केले होते व शिबिरामधील चर्चे नुसार तक्रारकर्तीने कागदपत्रांची पुर्तता केली असल्याने त्यांनी कार्यालयीन पत्र क्रं-ताकृअ/सां/शेअवियो/59/14, दिनांक-22/01/2014 अन्वये विरुध्दपक्ष कं-3) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचेकडे सदर कागदपत्रे पाठविलीत. सबब तक्रारकर्तीचे विमा दावा प्रस्तावावर योग्य विचार करुन दावा निकाली काढण्यास विनंती केली.
06. तक्रारकर्तीने तिचे तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-11 नुसार एकूण-12 दस्तऐवज दाखल केले आहेत. पृष्ट क्रं-82 वर तिचे शपथपत्र दाखल केले असून, पृष्ट क्रं-85 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
07. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी शपथपत्र दाखल केले नाही.विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी पृष्ट क्रं-88 वर लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
08. विरुध्दपक्ष क्रं-4) यांनी त्यांचे लेखी उत्तरा सोबत दिनांक-22/01/2014 चे विरुध्दपक्ष क्रं-3) ला पाठविलेले पत्र अभिलेखावर दाखल केले आहे. विरुध्दपक्ष क्रं-4) यांनी त्यांचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला नाही.
09. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर, विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्तर आणि उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे वकील सौ. यु.के.खटी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
10. मृतक शेतकरी श्री सावजी सदाशिव बगमारे यांचे मालकीची मौजा धर्मापुरी, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-461 ही शेती होती ही बाब दाखल वर्ष-2011-12 चा गाव नमुना 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6-क, फेरफार नोंदवही याचे प्रती वरुन सिध्द होते. मृतक श्री सावजी बगमारे यांचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी श्रीमती सरिता आणि मुलगी प्रगती हिचे नावाची फेरफार नोंद दिनांक-04.07.2012 रोजी झाल्याची बाब दाखल फेरफार पत्रका वरुन सिध्द होते. दाखल एफ.आय.आर.चे प्रतीवरुन मृतक श्री सावजी बगमारे याचा दिनांक-26/04/2012 रोजी मोटर सायकल क्रं-MH-36-D-3294 ने लाखांदुर वरुन बोथली गावाकडे येत असताना अज्ञात ट्रक चालकाने धडक दिल्याने तो जखमी झाला व त्याला सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आल्याचे नमुद आहे. शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर यांचे दिनांक-05/05/2012 रोजीचे शवविच्छेदन अहवाला मध्ये मृतकाचे मृत्यूचे कारण हे “Head injury” असे नमुद केलेले आहे. दाखल मृत्यू प्रमाणपत्रावरुन मृत्यूचा दिनांक-04 मे, 2012 नमुद आहे. तक्रारकर्तीने मृतकाचे वाहन परवान्याची प्रत दाखल केलेली असून त्यानुसार वाहन परवाना क्रं-MH-38/1642/2000 असून तो दिनांक-09.03.2000 रोजी जारी केला असल्याचे त्यावरुन दिसून येते. उपरोक्त नमुद दस्तऐवजांच्या प्रतीं वरुन अपघाताचे दिवशी मृतकाचे नावे शेती असून तो शेतकरी असल्याची बाब सिध्द होते. तसेच दाखल पोलीस दस्तऐवजा वरुन मृतकाचा तो मोटर सायकलने जात असताना अज्ञात ट्रक चालकाने धडक दिल्याने भंडारा जिल्हयाचे क्षेत्रात अपघाती मृत्यू झाला होता ही बाब सुध्दा सिध्द होते. दाखल शवविच्छेदन अहवाला वरुन सुध्दा मृतकाचे अपघाती मृत्यूस पुष्टी मिळते. अपघाताचे वेळी मृतका जवळ वैध वाहन चालविण्याचा परवाना होता ही बाब सुध्दा दाखल परवान्याच्या प्रती वरुन सिध्द होते. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने जरी तक्रारकर्त्याचे नावाने शेती होती तसेच तो शेतकरी होता या बाबी उत्तरात नाकबुल केलेल्या असल्या तरी त्यात काहीही तथ्य उरत नाही, त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ती ही लाभार्थी ठरते.
11. शेतकरी जनता अपघात विमा योजना-2011-12 चे दिनांक-08 ऑगस्ट, 2011 रोजीचे दाखल महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका वरुन ही योजना दिनांक-15 ऑगस्ट, 2011 ते दिनांक-14 ऑगस्ट, 2012 या कालावधीसाठी होती आणि योजने नुसार योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांच्या आत विमा दावा करणे आवश्यक आहे. त्यानुसार विमा योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांचा कालावधी हा दिनांक-14 नोंव्हेंबर, 2012 येतो. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यू हा दिनांक-04 मे, 2012 रोजी झालेला आहे आणि तिने सर्वप्रथम विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-25/07/2012 रोजी दाखल केल्याची बाब तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या स्वाक्षरीवरील पोच वरुन दिसून येते. या वरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्तीने विमा दावा हा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विहित मुदतीत सादर केला होता, त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने घेतलेला आक्षेप की, तिने विमा दावा विहित मुदतीत दाखल केला नाही यात काहीही तथ्य दिसून येत नाही.
12. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यू हा दिनांक-04 मे, 2012 रोजी झालेला आहे आणि तिने सर्वप्रथम विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-25/07/2012 रोजी दाखल केल्याची बाब तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या स्वाक्षरीवरील पोच वरुन दिसून येते. तक्रारकर्तीने ही तक्रार मंचा समक्ष दिनांक-18/01/2017 रोजी दाखल केलेली आहे.
विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे असा आक्षेप घेण्यात आलेला आहे की, ही तक्रार तक्रारीचे कारण घडल्या पासून म्हणजे तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिनांका पासून 02 वर्षा नंतर दाखल केलेली असल्याने ती मुदतबाहय आहे. या आक्षेपावर तक्रारकर्तीचे वकीलानीं प्रत्युत्तर देताना असे सांगितले की, तिच्या विमा दावा प्रस्तावावर काय निर्णय झाला या संबधी तिला आज पर्यंत काहीही कळविलेले नाही आणि जो पर्यंत तिचा विमा दावा प्रस्ताव खारीज झाला असल्याचे तिला लेखी कळविल्या जात नाही, तो पर्यंत तक्रार दाखल करण्यास सतत कारण घडत असते. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या शपथपत्रा मध्ये असे नमुद केलेले आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे दिलेल्या उत्तरात तक्रारकर्तीने दस्तऐवज न पुरविल्याने दिनांक-27/05/2013 रोजीचे पत्रान्वये तिचा विमा दावा फेटाळल्याचे नमुद केलेले आहे परंतु सदरचे पत्र तक्रारकर्तीला आज पर्यंत प्राप्त झालेले नाही. अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने सदर विमा दावा फेटाळल्या बाबतचे पत्र प्रस्तुत तक्रारी मध्ये पुराव्या दाखल सादर केलेले नाही तसेच ते पत्र तक्रारकर्तीला मिळाल्या बाबत पुराव्या दाखल पोच सादर केलेली नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा रद्द केला होता त्या बाबतचे पत्र प्राप्त झाले होते असे म्हणता येणार नाही, त्यामुळे तक्रारकर्तीला तिच्या विमा दाव्या संबधी कुठलीही माहिती न मिळाल्याने तक्रारीस कारण सतत घडत असल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार अर्ज उशिराने मंचा समक्ष दाखल केला असा विरुध्दपक्षाचा आक्षेप निरस्त ठरतो.
या संबधाने मंचा तर्फे खालील 02 मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांचा आधार घेण्यात येतो-
“PRAVEEN SHEKH-VERSUS-LIC & ANR.”—I (2006) CPJ-53 (NC)
या प्रकरणा मध्ये विमा दावा खारीज केल्याचे पत्र अभिलेखावर दाखल केलेले नव्हते तसेच त्या पत्राची प्रत तक्रारकर्तीला मिळाल्याचे पण सिध्द झाले नव्हते परंतु तरीही जिल्हा ग्राहक मंचाने ती तक्रार खारीज केली होती, जिल्हा मंचाचा तो निर्णय मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने रद्दबातल ठरविला आणि तक्रार ही मुदतीत असल्याचे नमुद केले.
हातातील प्रकरणात सुध्दा तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज केल्या संबधीचे पत्र तक्रारकर्तीला मिळाल्याचा कोणताही पुरावा अभिलेखावर नाही आणि म्हणून तक्रार दाखल करण्यास कारण हे सतत घडत असल्याने ही तक्रार मुदतबाहय होत नाही.
13. विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिका-यानीं आपल्या लेखी जबाबा मध्ये तक्रारकर्तीने विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-25/07/2012 रोजी दाखल केल्या नंतर त्यांनी तो विमा दावा त्यांचे कार्यालयीन पत्र जावक क्रं-935 अन्वये दिनांक-26/07/2012 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दाखल केला होता असे नमुद केले आहे. कृषी अधिकारी यांनी शेतकरी अपघात विमा योजने बाबत दिनांक-15/01/2014 रोजी भंडारा येथे विशेष शिबिराचे आयोजन केले होते व शिबिरामधील चर्चे नुसार तक्रारकर्तीने कागदपत्रांची पुर्तता केली असल्याने त्यांनी कार्यालयीन पत्र क्रं-ताकृअ/सां/शेअवियो/59/14, दिनांक-22/01/2014 अन्वये विरुध्दपक्ष कं-3) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचेकडे सदर कागदपत्रे पाठविली असल्याची बाब नमुद केली. तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचे लेखी जबाबा मध्ये केलेल्या विधानांवर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन दिसून येत नाही. शेतकरी अपघात विमा योजने संबधात विरुध्दपक्ष क्रं-4) यांनी विशेष शिबिराचे आयोजन केले होते व शिबिरा मधील चर्चे नुसार तक्रारकर्तीने कागदपत्रांची पुर्तता केली असल्याने त्यांनी कार्यालयीन पत्र क्रं-ताकृअ/सां/शेअवियो/59/14, दिनांक-22/01/2014 अन्वये फेरफार नोंद नमुना-6-ड, पासबुकची झेरॉक्स प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती विरुध्दपक्ष कं-3) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचेकडे पाठविलया बाबत तक्रारकर्तीने सदर पत्राची प्रत दाखल केलेली असून त्यावर सदर दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं-3) यांना दिनांक-25/01/2014 रोजी प्राप्त झाल्या बाबत पोच म्हणून सही व शिक्का आहे. वरील कारणास्तव मंचाचे मते तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव कायद्दा नुसार योग्य असल्यामुळे आणि तो मुदतीत असल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीने मंजूर करावयास हवा होता. तसेच त्या प्रस्तावावर झालेल्या निर्णयाची सुचना तक्रारकर्तीला न दिल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीने सेवेत कमतरता ठेवली असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
14. विमा योजनेच्या परिपत्रका विमा दावा विमा कंपनीकडे सादर केल्याचे दिनांका पासून 60 दिवसांच्या आत त्यावर कार्यवाही करणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे. या प्रकरणात तक्रारकर्तीने आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फतीने दिनांक-22/01/2014 रोजी केलेली आहे. त्यामुळे विमा कंपनीने विमा दाव्या संबधीचा निर्णय हा जास्तीत जास्त दिनांक-22/03/2014 पर्यंत घेणे बंधनकारक होते परंतु असे विरुध्दपक्ष विमा कंपनीने केले नाही म्हणून तक्रारकर्ती ही विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- दिनांक-22/03/2014 पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी तर्फे मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) मे.कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
15. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीच्या पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) दिनांक-22/03/2014 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्तीला अदा करावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीला देण्यात यावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(3) आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी तर्फे संबधित विभागीय व्यवस्थापक/क्षेत्रीय व्यवस्थापकानीं निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.