श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 14 जून, 2017)
- तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्तीची संक्षिप्त तक्रार अशी आहे की, तक्रारकर्ती श्रीमती रुपाली विठ्ठल ईखार हिचे पती मृतक विठ्ठल वासुदेव ईखार हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा भेंडाळा, ता. पवनी जि. भंडारा येथे भूमापन क्र. 350 ही शेतजमीन होती. महाराष्ट्र शासनाने सन 2011-12 करिता शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत वि.प.क्र. 1 न्यु इंडिया अॅशुरंस कंपनी लिमिटेडकडे सर्व शेतक-यांचा अपघात विमा काढला होता व मृतक विठ्ठल ईखार हे शेतकरी असल्याने सदर विम्याचे लाभधारक होते. दि.23.08.2011 रोजी मृतक विठ्ठल ईखार भावाच्या मोटर सायकलवर मागे बसून जात असता ट्रकने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन मरण पावले.
शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत विमा दावा तक्रारकर्तीने आवश्यक दस्तऐवजांसह वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, पवनी यांच्याकडे दि.05.11.2011 रोजी मंजुरीस्तव पाठविण्यासाठी सादर केला. मात्र वि.प.क्र. 1 ने सदरचा विमा दाव्याबाबत काहीही कळविले नाही, म्हणून दि.29.10.2016 रोजी वि.प. क्र. 1 ते 3 यांना नोटीस पाठवूनही वि.प.क्र. 1 व 2 यांनी विमा दाव्याची रक्कम तक्रारकर्तीस दिली नाही. विमा कंपनीची सदर कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे, म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- अपघात विमा दाव्याची रक्कम रु.1,000/- दि.05.11.2011 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचा वि.प.ना आदेश व्हावा.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.30,000/- मिळावी.
- तक्रारीचा खर्च रु.15,000/- वि.प.कडून मिळावा.
तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्तीने शेतकरी जनता अपघात विमा योजना 2011-12 शासन निर्णय, वि.प.क्र. 3 कडे सादर केलेला दावा, शेताचा 7/12 व ईतर दस्तऐवज, अपघाताबाबतचा एफ आय आर व ईतर पोलिस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, म,त्यु प्रमाणपत्र, वि.प.क्र. 1 ते 3 ला पाठविलेली कायदेशीर नोटीस इ. दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2 वि.प.क्र. 1 व 2 विमा कंपनीने लेखी जवाब दाखल करुन तक्रारीस सक्त विरोध केला आहे. शेतकरी जनता अपघात विमा पॉलिसीप्रमाणे मृतक विठ्ठल वासुदेव ईखार विमीत शेतकरी होते व तक्रारकर्तीने वि.प.क्र. 3 मार्फत दि.05.11.2011 रोजी विमा विमा दावा मंजूरीसाठी वि.प.क्र. 1 कडे सादर केल्याचे नाकबूल केले आहे. तसेच तक्रारकर्तीने 29.10.2016 रोजी नोटीस पाठवून कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे नाकबूल केले आहे. त्यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारकर्तीने अपघातानंतर 90 दिवसांचे आंत संपूर्ण कागदपत्रांसह प्रकरणसादर न करताच मंचासमोर सरळ तक्रार दाखल केली असून तक्रारकर्तीने विमा दावा वि.प.क्र. 1 व 2 कडे कधीही सादर केला नाही व तो प्रलंबितही नाही. सदर तक्रार मुदतबाह्य असल्याने खारीज होण्यास पात्र आहे. वि.प.क्र. 1 व 2 कडून सेवेत कोणतही न्युनतापूर्ण व्यवहार झाला नाही. म्हणून तक्रारीस कारणच घडले नसल्याने ती खारीज करावी अशी वि.प.क्र. 1 ने विनंती केली आहे.
3 वि.प.क्र. 3 ला नोटीस मिळाल्यावर त्यांनी लेखी उत्तर दाखल करुन तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव त्यांना दि.05.11.2011 ला प्राप्त झाल्यावर त्यांनी तो पुढील कार्यवाहीस्तव वि.प.क्र. 1 कडे दि.09.11.2011 रोजी पाठविला. पुढे वि.प.क्र. 1 ने विमा दावा मृतकाकडे वाहन चालक परवाना नसल्याचे कारण दाखवून नामंजूर केला. सदर नामंजूरीशी वि.प.क्र. 3 संबंध नसल्याने वि.प.क्र. 3 चे नाव सदर प्रकरणातून वगळण्यात यावे अशी विनंती केली.
4 तक्रारकर्ती व वि.प. यांच्या परस्पर विरोधी कथनांवरुन तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारण खालीलप्रमाणे –
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | वि.प.क्र. 1 व 2 यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
- कारणमिमांसा –
5 मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदरच्या प्रकरणात महाराष्ट्र शासनाने वि.प.क्र. 1 व 2 दि न्यु इंडिया अॅशुरंस कंपनी लिमिटेड यांचेकडे दि.15.08.2011 ते 14.08.2012 या कालावधीसाठी भंडारा जिल्ह्यातील शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा’ उतरविला होता ही बाब उभय पक्षांना मान्य आहे.
rdzkjdrhZps तक्रारकर्तीचे पती विठ्ठल वासुदेव ईखार हे दि.23.08.2011 रोजी मरण पावले. मृत्यु प्रमाणपत्र पृष्ठ क्र. 37 वर आहे. त्यांचे चुलत भाऊ रवि महादेव ईखार यांच्या मोटार सायकलवर मागे बसून जात असता टाटा 907 वाहन क्र. MH-34-AB-117 च्या चालकाने वाहन लापरवाहीने चालवून सदर मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मरण पावल्याचे प्रथम खबरी दस्तऐवज क्र. 4, गुन्ह्याचा तपशिलाचा नमुना, प्रेताचा पंचनामा, पोलिसांनी दिलेले प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल इ. दस्तऐवजांवरुन सिध्द होते. तसेच 7/12 चा उतारा दस्तऐवज क्र. 3 वरुन सन 2010-2011 मध्ये त्यांच्या नावाने मौजा भेंडाळा, त.सा.क्र. 19, ता.पवनी, जि.भंडारा येथे 1.20 हे.आर.शेतजमीन असल्याचे सिध्द होते.
वि.प.क्र. 1 च्या अधिवक्ता श्रीमती खटी यांचा युक्तीवाद असा की, तक्रारकर्तीने योजनेत नमूद केल्याप्रमाणे पतीच्या मृत्युनंतर 90 दिवसांचे आंत वि.प.क्र.1 कडे विमाप्रस्ताव सादर न करता 05.12.2016 रोजी म्हणजे पतीच्या अपघाती मृत्युनंतर साडे चार वर्षांनी सदर तक्रार दाखल केली असल्याने ती मुदतबाह्य आहे. तसेच तक्रारकर्तीने वि.प.कडे विमा दावाच दाखल केला नसल्याने तो मंजूर करण्याचाप्रश्नच निर्माण झाला नाही व म्हणून वि.प.क्र. 1 व 2 कडून सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार झालेला नाही.
वि.प.क्र. 3 तालुका कृषि अधिकारी यांनी लेखी जवाबात नमुद केले आहे की, तक्रारकर्तीचा विमा दावा त्यांना दि.05.11.2011 रोजी प्राप्त झाला होता. तो त्यांनी 09.11.2011 रोजी वि.प. विमा कंपनीकडे पाठविला असता मयताचा वाहन चालक परवाना सादर केल्या नसल्याचे कारण देऊन वि.प.ने नामंजूर केला. लेखी जवाबासोबत Farmer Data 2011=2012 जोडला आहे. त्यांत अ.क्र. 39 वर शेतकरी विठ्ठल वासुदेव ईखार यांच्या 23.08.2011 रोजीच्या अपघाती मृत्युचा दावा सादर केलेल्या पोलिस पेपर्सवरुन अपघाताचे वेळी कोण मोटार सायकल चालवित होता व कोण मागे बसला होता हे स्पष्ट होत नसल्याने नामंजूर केल्याचे नमूद आहे. मात्र सदर नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीला पाठविल्याचे वि.प.ने लेखी जवाबात नमूद केले नाही
आणि तसा पुरावाही दाखल केला नाही. जोपर्यंत विमा कंपनी तक्रारकर्तीला विमा दावा नामंजूरीबाबत कळवित नाही तोपर्यंत ग्राहक तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत असल्याने सदरची तक्रार जरी 2016 मध्ये दाखल केली असली तरी ग्रा.सं.अ.चे कलम 24 अ प्रमाणे ती मुदतीत आहे.
वि.प.क्र. 3 च्या लेखी जवाबाप्रमाणे दि.23.08.2011 रोजीच्या अपघाती मृत्युबाबतचा विमा दावा तक्रारकर्तीने वि.प.क्र. 3 कडे 05.11.2011 रोजी म्हणजे अपघाती मृत्युनंतर 90 दिवसांचे आंत दाखल केलेला होता. पोलिस पेपर्सवरुन तक्रारकर्तीचे पती मृतक विठ्ठल हे त्याचा चुलत भाऊ रवि याच्या मोटार सायकलवर मागे बसून जात असतांना अपघात होऊन सदर अपघातात मरण पावल्याचे स्पष्ट असतांना अपघाताचे वेळी मोटार सायकल कोण चालवित होता व कोण मागे बसला हे स्पष्ट होत नाही असे खोटे कारण देऊन तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूरीची व सदर नामंजूरीबाबत तक्रारकर्तीस न कळविण्याची वि.प.ची कृती विमा लाभार्थ्याप्रती निश्चित सेवेतील न्युनता ठरते, म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
6 मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.प.ने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकरण्याची कृती बेकायदेशीर असल्याने तक्रारकर्ती विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- दि.01.06.2012 पासून (दावा सादर केल्यानंतर मंजूरीसाठी लागणारा सहा महिन्यांचा वाजवी कालावधी सोडून) प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रार खर्च रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-आदेश-
1. तक्रारकर्तीचा ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
2. वि.प.क्र. 1 व 2 दि न्यु इंडिया अॅशुरंस कं.लि. यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारकर्तीस विठ्ठल वासुदेव इखार यांच्या मृत्युबाबत शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- दि.01.06.2012 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी.
3. वि.प. क्र. 1 व 2 ने तक्रारकर्तीस शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रार खर्च रु.5,000/- द्यावा.
4. वि.प. क्र. 1 व 2 ने संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. वि.प.क्र. 3 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य देण्यांत यावी.
7. प्रकरणाची ब व क फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.