:: निकालपत्र ::
(पारीत व्दारा मा.सदस्या श्रीमती वृषाली गौ.जागीरदार)
(पारीत दिनांक–12 सप्टेंबर, 2018)
01. तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी आणि इतर विरुध्द नात्याने अनुक्रमे त्यांचे मृतक पिता व पतीच्या मृत्यू पःश्चात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्या संबधी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारदार हे उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून मृतक श्री श्रीराम उकाजी मानकर हा नात्याने अनुक्रमे त्यांचा पिता व पती होता आणि तो व्यवसायाने शेतकरी होता, त्याचे मालकीची मौजा चिचगाव(पिंपळगाव), तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-68/2 ही शेत जमीन होती व त्यावरच त्याचा व त्याचे कुटूंबियाचा उदरनिर्वाह होता. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-3) ही कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस नावाची नोडल एजन्सी आहे. विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी लाखांदुर, जिल्हा भंडारा आहेत. महाराष्ट्र शासनाचे वतीने विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे संबधित लाभार्थ्यां कडून स्विकारतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तक्रारदारांचे नात्याने अनुक्रमे पिता व पती असलेले श्रीराम उकाजी मानकर यांचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्यात आला होता आणि तक्रारदार हे सदर विमा योजने अंतर्गत वारसदार म्हणून “लाभार्थी” आहेत.
तक्रारदारानीं पुढे असे नमुद केले की, नात्याने अनुक्रमे त्यांचे पिता व पती असलेले श्री श्रीराम उकाजी मानकर यांचा मृत्यू दिनांक-22/05/2013 रोजी सायकलने जात असताना सायकल घसरुन पडल्याने जख्मी होऊन झाला. त्यानंतर तक्रारदारानीं दिनांक-14/10/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिका-यांकडे विमा दाव्या संबधी रितसर प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांच्या प्रतींसह सादर केला. वेळोवेळी विरुध्दपक्षांनी मागितलेल्या आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता केली. परंतु पुढे तीन वर्ष उलटून गेल्या नंतरही विमा दावा प्रस्तावा संबधाने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे काहीही कळविण्यात आले नाही, म्हणून तक्रारकर्तीने दिनांक-27/12/2016 रोजीची कायदेशीर नोटीस विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी व विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांना पाठविली परंतु त्यावरही विरुध्दपक्षां कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही वा उत्तरही देण्यात आले नाही, विरुध्दपक्षांच्या सेवेतील ही कमतरता आहे, या आरोपा वरुन तक्रारदारानीं या तक्रारीव्दारे विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-14/10/2013 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मागितली असून त्यांना झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-15,000/- मागितले आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर एकत्रित सादर केले. त्यांनी लेखी उत्तरात तक्रारदारानीं विरुध्दपक्ष क्रं-2) विमा कंपनी कडे विमा दावा अर्ज दिनांक-30/12/2013 व दिनांक-20/08/2014 रोजी प्राप्त झाल्याची बाब मान्य केली परंतु त्यांच्या मागणी प्रमाणे तक्रारदारानीं दस्तऐवज पुरविल्याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्तीला तिचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्या बाबत कळविले नसल्याची बाब नाकबुल केली आणि असे नमुद केले की, त्यांनी दिनांक-17.09.2014 व दिनांक-02.07.2015 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्तीला कळविले होते की, विमा दावा दाखल करण्यास झालेल्या उशिराचे कारण नमुद करावे तसेच वारसाची नोंदवही 6-क, फेरफारपत्रक व इतर वारसां कडून नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे विमा दावा बंद करण्यात येत आहे. दिनांक-30/12/2013 ला दाव्यात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगण्यात आले परंतु तक्रारकर्तीने तिच्या दुस-या मुलाचे नाव वारसां मध्ये दाखविले नाही किंवा त्याचे ना-हरकत-प्रमाणपत्र दाखल केले नाही. नमुना-6-क फेरफार पत्रका नुसार मृतकाचे 3 वारसान आहेत.विमा दाव्याची रक्कम देताना इतर वारसदारांचे ना-हरकत-प्रमाणपत्र देणे जरुरीचे असते. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नाकारुन त्यांच्या सेवेत कुठलीही कमतरता केली नाही. तक्रारदारांचा दावा कालबाहय आहे. तक्रारदार हे विरुध्दपक्षांची दिशाभूल करीत असून फसवणूक करीत आहेत. तक्रारीमध्ये सुध्दा सर्व वारसदारांची नावे दर्शविलेली नाहीत. तक्रारदारांची तक्रार खोटी असून त्यांनी सर्व वारसदार तक्रारीमध्ये दर्शविलेले नाहीत करीता त्यांची तक्रार रुपये-50,000/- खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांना मंचाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात पारीत करण्यात आला.
05. विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिका-यानीं आपल्या लेखी जबाबा मध्ये नमुद केले की, मृतक शेतकरी श्री श्रीराम उकाजी मानकर यांचे मालकीची मौजा चिचगाव (पिंपळगाव) तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-68/2 ही शेती होती व दिनांक-22/05/2013 रोजी सायकलने जात असताना सायकल वरुन घसरुन पडल्याने जख्मी होऊन अपघाती मृत्यू झाला होता ही बाब मान्य केली. तक्रारदारांनी विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-15/10/2013 रोजी दाखल केल्या नंतर त्यांनी तो विमा दावा त्यांचे कार्यालयीन पत्र जावक क्रं-1034 अन्वये दिनांक-17/10/2013 रोजी जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात दाखल केला होता.
विरुध्दपक्ष क्रं-4) यांनी पुढे असे नमुद केले की, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयीन पत्र क्रं-1742/14 दिनांक-31/10/2014 नुसार विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तक्रारकर्ता क्रं-1) यांनी सादर केलेला विमा दावा बंद करण्या बाबतचे पत्र त्यांचे कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते पत्र कार्यालयीन पत्र क्रं-ताकृअ/सां/अवियो/381/14, दिनांक-12/06/2014 अन्वये तक्रारकर्ता क्रं-1) यांचे कडे दिले असल्याचे नमुद करुन त्यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्याची विनंती केली.
06. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-09 नुसार एकूण-08 दस्तऐवज दाखल केले आहेत. पृष्ट क्रं-87 वर तक्रारकर्ती क्रं-2) हिने तिचे शपथपत्र दाखल केले असून, पृष्ट क्रं-90 नुसार तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
07. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी शपथपत्र दाखल केले नाही.विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांनी पृष्ट क्रं-95 वर लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
08. विरुध्दपक्ष क्रं-4) यांनी त्यांचे लेखी उत्तरा सोबत दिनांक-12/06/2014 रोजीचे तक्रारकर्ता क्रं-1) ला त्यांचा विमा दावा बंद करण्या बाबत दिलेल्या पत्राची प्रत दाखल केली. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांना पाठविलेल्या पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं-4) यांनी त्यांचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला नाही.
09. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर, विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्तर आणि उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशीने यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
10. मृतक शेतकरी श्री श्रीराम उकाजी मानकर यांचे मालकीची मौजा चिचगाव(पिंपळगाव), तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं-68/2 ही शेत जमीन होती ही बाब दाखल वर्ष-2012-13 चा गाव नमुना 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-8-अ, याचे प्रती वरुन सिध्द होते. मृतक श्री श्रीराम उकाजी मानकर यांचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी श्रीमती शांतबाई श्रीराम मानकर आणि त्यांची मुले क्रं-1) पंचम श्रीराम मानकर आणि क्रं-2) श्री गणेश श्रीराम मानकर यांचे नावाची फेरफार नोंद झाल्याची बाब दाखल फेरफार पत्रका वरुन सिध्द होते. मृतकाच्या दाखल मृत्यू प्रमाणपत्रावरुन मृत्यूचा दिनांक-22 मे, 2013 नमुद आहे. उपरोक्त नमुद दस्तऐवजांच्या प्रतीं वरुन अपघाताचे दिवशी मृतकाचे नावे शेती असून तो शेतकरी असल्याची बाब सिध्द होते. तसेच दाखल पोलीस दस्तऐवजा वरुन मृतकाचा तो सायकलने जात असताना सायकल घसरुन पडल्याने डोक्याला जबर दुखापत होऊन अपघात झाला होता आणि पुढे वैद्दकीय उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता ही बाब सुध्दा सिध्द होते. दाखल शवविच्छेदन अहवाला वरुन सुध्दा मृतकाचे अपघाती मृत्यूस पुष्टी मिळते. त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारदार हे लाभार्थी ठरतात. अशाप्रकारे मृतक हा अपघाताचे दिवशी शेतकरी होता, त्याचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्याचे मृत्यू नंतर त्याची पत्नी व दोन मुले हे त्याचे कायदेशीर वारसदार आहेत या बाबी सिध्द झालेल्या आहेत.
11. शेतकरी जनता अपघात विमा योजना-2012-13 चे दिनांक-09 ऑगस्ट, 2012 रोजीचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका वरुन ही योजना दिनांक-15 ऑगस्ट, 2012 ते दिनांक-14 ऑगस्ट, 2013 या कालावधीसाठी होती आणि योजने नुसार योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांच्या आत विमा दावा करणे आवश्यक आहे. त्यानुसार विमा योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसांचा कालावधी हा दिनांक-14 नोंव्हेंबर, 2013 येतो. मृतकाचा अपघाती मृत्यू हा दिनांक-22 मे, 2013 रोजी झालेला आहे आणि तक्रारदारांनी सर्वप्रथम विमा दावा हा विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-14/10/2013 रोजी दाखल केल्याची बाब तलाठी कार्यालयाने दिलेल्या स्वाक्षरीवरील पोच वरुन दिसून येते. या वरुन हे सिध्द होते की, तक्रारदारांनी विमा दावा हा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विहित मुदतीत सादर केला होता, त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने घेतलेला आक्षेप की, तक्रारदारांनी विमा दावा विहित मुदतीत दाखल केला नाही तो उशिराने दाखल केला यात काहीही तथ्य दिसून येत नाही.
12. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-26/03/2014 रोजी तक्रारकर्ता श्री गणेश श्रीराम मानकर याचे नावे विमा योजना दावा बंद करण्या बाबत दिलेल्या पत्राची प्रत विरुध्दपक्ष क्रं-4) तालुका कृषी अधिकारी यांनी अभिलेखावर दाखल केली. मंचा तर्फे सदर पत्राचे अवलोकन केले असता त्यामध्ये दिलेल्या कागदपत्र नुसार विमा दावा उशिराने का दिला याचे सबळ कारण नमुद न केल्यामुळे विमा दावा नामंजूर करण्यात येत असल्याचे नमुद केलेले आहे. याचाच अर्थ असा होतो की, विमा कंपनीने विमा दावा हा उशिराने सादर केल्याचे कारणा वरुन फेटाळला.
परंतु नंतर मागाहून विमा कंपनीने मंचा समोर दाखल केलेल्या लेखी उत्तरा मध्ये त्यांनी दिनांक-17.09.2014 व दिनांक-02.07.2015 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्तीला कळविले होते की, विमा दावा दाखल करण्यास झालेल्या उशिराचे कारण नमुद करावे तसेच वारसाची नोंदवही 6-क, फेरफारपत्रक व इतर वारसां कडून नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे विमा दावा बंद करण्यात येत आहे असा बचाव घेतलेला आहे परंतु आपल्या या लेखी उत्तराचे कथनार्थ विमा कंपनीने पुराव्या दाखल उपरोक्त नमुद एकाही पत्राची प्रत व ती पत्रे तक्रारदारांना मिळाल्या बाबतची पोच दाखल केलेली नाहीत.
13. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे उत्तरात असा आक्षेप घेण्यात आलेला आहे की, ही तक्रार तक्रारीचे कारण घडल्या पासून 02 वर्षा नंतर तक्रार दाखल केलेली असल्याने ती मुदतबाहय आहे.
विरुध्दपक्ष विमा कंपनीचे उत्तरा नुसार त्यांनी दिनांक-17.09.2014 व दिनांक-02.07.2015 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्तीला कळविले होते की, विमा दावा दाखल करण्यास झालेल्या उशिराचे कारण नमुद करावे तसेच वारसाची नोंदवही 6-क, फेरफारपत्रक व इतर वारसां कडून नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे विमा दावा बंद करण्यात येत आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीने वर उल्लेख केल्या प्रमाणे पुराव्यार्थ सदर पत्राच्या प्रती व पोच दाखल केलेल्या नाहीत. क्षणभरासाठी असे गृहीत धरले की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना विम्या दाव्या संबधी दस्तऐवजांची पुर्तता करण्यासाठी दिनांक-17.09.2014 रोजी पत्र पाठविले होते व त्यानंतर दिनांक-02/07/2015 रोजीचे पत्रान्वये तिचा विमा दावा फेटाळला असल्याचे सुचित केले. तक्रारकर्तीने ही तक्रार मंचा समक्ष दिनांक-18/01/2017 रोजी दाखल केलेली असल्याने ती ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार विहित मुदतीत दाखल केली असल्याचे दिसून येते.
14. तक्रारकर्ता क्रं-1) याचे नावे विमा दावा बंद केल्या बाबत दिनांक-26/03/2014 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने कळविल्या बाबत पत्राची प्रत अभिलेखावर दाखल आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारकर्ता क्रं-1) याला सदर विमा कंपनीचे पत्राची प्रत दिनांक-16/06/2014 रोजी दिल्याची बाब त्यावरील पोच दाखल तक्रारकर्ता क्रं-1) याचे स्वाक्षरी वरुन सिध्द होते. तक्रारदारांनी ही तक्रार मंचा समक्ष दिनांक-18/01/2017 रोजी दाखल केलेली आहे. म्हणजेच तक्रारदारांनी विमा दावा नामंजूरीचे पत्र मिळाल्या पासून ग्राहक मंचात दोन वर्षात तक्रार दाखल करणे आवश्यक होते परंतु त्यांनी सदर तक्रार मंचासमक्ष 06 महिने 17 दिवसानी उशिराने दाखल केली असल्याचे दिसून येते, परंतु सदरचा कालावधी हा अल्प स्वरुपाचा आहे.
या संदर्भात हे मंच खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निकालपत्रावर आपली भिस्त ठेवीत आहे.
“THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD.-VERSUS-SMT.VANITA PATIL”-FIRST APPEAL NO.-1559 OF 2008,ORDER DATED-17/12/2009
या प्रकरणात तक्रार दाखल करण्यास झालेला 04 वर्षाचा विलंब माफ करण्यात आला होता आणि त्यावर कारण देताना असे नमुद केले होते की, विमा योजनेचे लाभार्थी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे आणि त्यांना या विमा योजने संबधीची माहिती असण्याची शक्यता नसावी म्हणून ते मुदतीमध्ये तक्रार दाखल करु शकले नाही.
हातीतील प्रकरणा मध्ये तक्रारदार हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना तक्रार दाखल करण्यास थोडाफार उशिर झालेला असल्याने तक्रार मुदतबाहय आहे असे ठरविता येणार नाही.
15. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे वकीलानीं आपल्या युक्तीवादात तक्रारदारांनी मृतकाचे सर्व वारसदारांना प्रस्तुत तक्रारी मध्ये प्रतिपक्ष केले नसल्या बाबत किंवा इतर वारसदारांचे ना-हरकत-प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने त्यामुळे मृतकाचे योग्य त्या वारसदारांचे अभावी विमा दाव्याची रक्कम देता येत नाही या मुद्दावर जोर देऊन वारसदारांचे बाबतीत दिवाणी प्रक्रिया संहितेच्या तरतुदीं कडे मंचाचे लक्ष वेधून पुढे असे नमुद केले की, फेरफार नोंदी वरुन मृतक श्री श्रीराम उकाजी मानकर यांचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी श्रीमती शांताबाई श्रीराम मानकर आणि त्यांची मुले क्रं-1) पंचम श्रीराम मानकर आणि क्रं-2) श्री गणेश श्रीराम मानकर यांचे नावाची फेरफार नोंद झाल्याची बाब दाखल फेरफार पत्रका वरुन दिसून येते परंतु प्रस्तुत तक्रारी मध्ये मृतकाचा दुसरा मुलगा श्री पंचम श्रीराम मानकर याला तक्रारी मध्ये प्रतिपक्ष केलेले नाही व तो कायदेशीर वारसदार असताना त्याला तक्रारीमध्ये का समाविष्ट केले नाही हे समजून येत नसल्या बाबत युक्तीवाद केला. यावर तक्रारदारांचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी महाराष्ट्र शासनाचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे दिनांक-04 डिसेंबर, 2009 रोजीचे परिपत्रकाचा आधार घेऊन असा युक्तीवाद केला की, परिपत्रकातील अटी नुसार अपघाता मध्ये शेतक-याचे निधन झाल्यास त्याच्या कुटूंबियास दाव्याची रक्कम पुढील प्राथम्यक्रमानुसार अदा करावी- 1) मृत शेतक-याची पत्नी 2) मृत शेतक-याची अविवाहित मुलगी 3) मृत शेतक-याची आई 4) मृत शेतक-याची मुले 5) मृत शेतक-याची नातवंडे 6) मृत शेतक-याची विवाहित मुलगी.
मंचा तर्फे दाखल परिपत्रकाचे अवलोकन करण्यात आले, त्यामध्ये उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे मृत शेतक-याच्या वारसदारास प्राथम्य क्रमा नुसार विमा दावा रक्कम अदा करावी असे नमुद आहे.
16. उपरोक्त नमुद वस्तुस्थिती आणि पुराव्यांचा विचार करता तक्रारकर्ती क्रं-2 ही विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- तक्रार दाखल दिनांक-18/01/2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ती क्रं-2 हिला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) ती विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी तर्फे मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-(3) मे.कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, तालुका लाखांदुर, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
17. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीच्या पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) दिनांक-15/01/2014 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह तक्रारकर्ती क्रं-2 हिला अदा करावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी तर्फे तक्रारकर्ती क्रं-2 हिला देण्यात यावेत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-(3) आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) विमा कंपनी तर्फे संबधित विभागीय व्यवस्थापक/क्षेत्रीय व्यवस्थापकानीं निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.