निकालपत्र :- (दि.27/04/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला यांचा लेखी युक्तीवाद दाखल. उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार यांचे त्यांचे स्वत:चे मालकीचे M.H.-09-AB-2840 या टोयाटो क्वालीस गाडीचा सामनेवालाकडे विमा उतरविलेला असून त्याचा पॉलीसी क्र.151103/31/07/01/00004218 असा आहे व पॉलीसीचा कालावधी हा दि.07/12/07 ते 06/12/08 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.29/04/2008 रोजी तक्रारदार यहे त्यांचे मित्रांसोबत सदरच्या टोयाटो क्वालीस गाडीतून कोल्हापूर ते पुणे प्रवास करीत असताना अचानक अतित या गावानजिक तक्रारदाराच्या वाहनाच्या आडवे जनावर आलेने सदर गाडीचा अपघात झाला. सदर अपघातात तक्रारदाराची गाडी पलटी होऊन पडल्याने गाडीचे प्रचंड नुकसान झाले. तक्रारदाराने सदर अपघाताची त्वरीत सामनेवाला यांना कल्पना दिली असता सामनेवाला यांचे सर्व्हेअरनी गाडीचा सर्व्हे केला. तदनंतर तक्रारदार यांनी गाडी संपूर्ण दुरुस्त करुन घेतली व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे रक्कम रु.2,27,376/- इतक्या रक्कमेच्या गाडीच्या नुकसान भरपाईचा क्लेम केला असता सामनेवाला यांनी रक्कम रु.87,728/- इतकी रक्कम फुल अन्ड फायनल सेटलमेंट म्हणून तक्रारदारास देऊ केली. तक्रारदार यांनी सदरची रक्कम स्वत:च्या हक्कास बाधा न येता स्विकारलेली आहे. अदयापी सामनेवालांकडून उर्वरित रक्कम रु.1,39,648/- येणे आहे. वास्तविक सामनेवाला यांनी क्लेमप्रमाणे संपूर्ण नुकसान भरपाईची रक्कम देणे गरजेचे होते. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या न्याययोग्य क्लेम रक्कमेतील 25 टक्के रक्कम ही तक्रारदाराचे सदर वाहनात पॅसेंजर होते असा चुकीच्या कारणाने कपात केलेली आहे. वास्तविक तक्रारदाराचे सदर वाहनात कोणतेही पॅसेंजर नव्हते. अपघातावेळी तक्रारदारासोबत त्यांचे मित्र होते. तक्रारदार यांनी सदर वाहनाचा प्रवासी वाहतूकीसाठी केव्हाही वापर केलेला नाही. केवळ जबाबदारी टाळणेकरिता सामनेवाला यांनी चुकीचे कारण देऊन तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम संपूर्ण मंजूर न केलेने सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन सामनेवालांकडून नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम रु.1,39,648/- व्याजासह मिळावी. तसेच रक्कम रु.87,728/- क्लेम केलेनंतर 3 महिनेचे आत न दिलेने सदर रक्कमेवर देखील व्याज मिळावे. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या प्रित्यर्थ पॉलीसी, व रक्कम रु.87,728/- स्विकारलेची पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच रिजॉइन्डर दाखल केला आहे. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराचा क्लेम हा पॉलीसीच्या व्याप्तीबाहेरील, अतिशयोक्ती व कायदयाचे दृष्टीकोनातून न चालणारा असलेने तक्रारदाराची तक्रार मान्य व कबूल नाही. प्रस्तुतचे तक्रार चालवणेचे अधिकार प्रस्तुतचा मंचास नाही. सामनेवाला यांनी नुकसानी निश्चित करुन नुकसानीपोटी रक्कम रु.87,728/- चा दि.03/03/2009 रोजीचा चेक क्र.24631 बँक ऑफ बडोदा तक्रारदारास पाठवला होता व तो त्यांनी फुल अन्ड फायनल सॅटीसफॅक्शनपोटी स्विकारलेला आहे. प्रस्तुतची रक्कम तक्रारदाराने तडजोडीतून स्विकारलेली आहे. असे असतानाही प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारास नुकसानीपोटी निश्चित केलेली रक्कम आव्हान करणेबाबत लोकल स्टॅन्डी नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवालांना तक्रारदाराकडून रक्कम रु.5,000/- कॉम्पेसेंटरी कॉस्ट देणेबाबत हुकुम व्हावा अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत क्लेम सेटलमेंट झालेबाबत व पेमेंट रिलीजचे पत्र, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट व तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेली बिलाची यादी इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे व तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद व उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदाराचे स्वत:चे मालकीचा M.H.-09-AB-2840 या टोयाटो क्वालीस गाडीचा सामनेवालाकडे विमा उतरविलेला असून त्याचा पॉलीसी क्र.151103/31/07/01/ 00004218 असा आहे व पॉलीसीचा कालावधी हा दि.07/12/07 ते 06/12/08 असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीतच दि.29/04/2008 रोजी तक्रारदार हे त्यांचे मित्रांसोबत सदरच्या टोयाटो क्वालीस गाडीतून कोल्हापूर ते पुणे प्रवास करीत असताना अचानक अतित या गावानजिक तक्रारदाराच्या वाहनाच्या आडवे जनावर आलेने सदर गाडीचा अपघात झाला आहे. तदनंतर तक्रारदाराने सामनेवालांकडे वाहनाच्या नुकसानीपोटी क्लेम दाखल केला व सदर क्लेम पोटी सामनेवाला विमा कंपनीने रक्कम रु.87,728/- फुल अन्ड फायनल सेटलमेंट म्हणून मंजूर केले आहे. सदरची रक्कम तक्रारदाराने हक्क राखून क्लेम स्विकारत आहे असे नमुद करुन स्विकारलेचे रिसीटची सत्यप्रत प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये प्रस्तुत नुकसानीची रक्कम सामनेवाला व तक्रारदार यांचे तडजोडीतून फुल अन्ड फायनल सेटलमेंटपोटी रक्कम अदा केलेचे प्रतिपादन केलेले आहे. मात्र तसे डिस्चार्ज व्हौचरची मूळ प्रत अथवा सत्यप्रत प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला यांनी दाखल केलेले नाही. सदर रक्कम तक्रारदारास मिळालेचे तक्रारदाराने हक्क राखून स्विकारलेचे मान्य केलेले आहे. तक्रारदाराने उर्वरित रक्कमेची मागणी केलेली आहे. सामनेवाला यांनी सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदर सर्व्हे रिपोर्टनुसार रु.1,24,637/- इतकी नुकसानीची रक्कम निश्चित केलेली आहे. प्रस्तुतचा सर्व्हे रिपोर्ट हा विश्वासार्ह पुरावा म्हणून ग्राहय धरणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला कंपनी तक्रारदारास अदा केलेली रक्कम रुपये ही नॉन स्टॅन्डर्ड बेसीसनुसार अदा केलेचे प्रतिपादन केले आहे. मात्र आपल्या म्हणणेमध्ये याबाबत त्यांनी उल्लेख केलेला नाही. तसेच सामनेवाला यांनी प्रस्तुत वाहनाचा अपघात झालेवेळी पोलीस रिपोर्ट व इन्व्हेस्टीगेशन प्रमाणे एकूण 11 लोक होते. पॉलीसी अटी व शर्तीचा भंग झालेने नॉन स्टॅर्न्डर्ड बेसीसवर सर्व्हेअरने निश्चित केलेल्या रक्कमेच्या 75 टक्के क्लेम कायदेशीर बाजू लक्षात घेऊन देऊ केला होता व तक्रारदाराने तो स्विकारलेला होता. तक्रारदाराने दाखलकेले अंडर प्रोटेस्ट शेरा असला तरी तशी वस्तुस्थिती नाही. अस्सल व्हौचर विमा कपंनीचे फाईलमधून गहाळ झाले आहे. प्रस्तुत व्हौचरची झेरॉक्स तक्रारदाराकडे कुणी दिली याचे स्पष्टीकरण तक्रारदाराने केलेले नाही. पश्चात बुध्दीने तक्रारदाराने मागणी केली आहे असा लेखी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवालांनी आपल्या म्हणणेच्या अथवा युक्तीवादाच्या पुष्टयर्थ पॉलीसीच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या नाहीत. तसेच आपल्या लेखी म्हणणेमध्ये तसा लेखी खुलासा वजा स्पष्टीकरण दिलेले नाही. वरील विस्तृत विवेचन व दाखल कागदपत्रांचा विचार करता विमा पॉलीसी होती. वाहनाचा अपघात झाला आहे. अपघातात नुकसानी झालेले आहे. याबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा आहे तो सर्व्हेअरने निश्चित केलेली रक्कम अदा केलेली नाही. याचा विचार करता सामनेवाला यांनी डिस्चार्ज व्हौचर गहाळ झालेचे युक्तीवादात मान्य केलेले आहे. तक्रारदाराने नुकसानीच्या खर्चाची रक्कम रु.2,27,376/- मधून मिळालेली रक्कम रु.87,728/- वजा जाता उर्वरित रक्कमेची मागणी केलेली आहे. तसेच नमुद दिलेली रक्कम ही तीन महिन्याचे आत दिलेली नसलेने व्याजाची मागणी केलेली आहे. याचा विचार करता प्रस्तुतचा वाहनाची बैठक क्षमता 9 आसनांची होती. तर अपघातावेळी सदर वाहनात 11 व्यक्ती होत्या. दोन व्यक्ती जास्तीच्या होत्या. त्याबबात तक्रारदाराने सदर दोन व्यक्ती या लहान मुले असलेचे प्रतिपादन केले आहे. प्रस्तुतचा अपघात हा वाहनात बसलेल्या व्यक्तीमुळे झालेला नसून ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटलेने रस्त्याकडील दगडाला गाडी धडकून गाडी पलटी झालेने सदर अपघात झाला आहे. सदर अपघातामध्ये 8 लोक 2 लहान मुले व ड्रायव्हर प्रवास करीत होते. अशी वस्तुस्थिती मोमीन सर्व्हेअर यांनी आपल्या रिपोर्ट नमुद केलेली आहे. याचा विचार करता 2003CCJ 540 NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION यांनी First Appeal 386/2001 New India Assurance Co. Vs Raj Karan Singh and Others – Consumer Protection Act, 1986, section 2(1) (g) and 14 (1) (d)-Deficiency in service-Compensation-Motor insurance-Non settlement of claim-Damage to truck in accident-Insurance company contended that truck was carrying 9 persons in violation of the terms of the policy-Whether the insurance company was deficient in its service in not settling the claim-Held: yes; violation of policy conditions not contributing to the accident; order of State Commission directing the insurance company to pay damages as assessed by surveyor upheld; however, rate of interest reduced to 12 per cent from 18 per cent.(1996 CCJ 743(SC) followed) 2000CCJ 444 NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION यांनी First Appeal 293/1997 United India Insurance Co. Ltd. Vs Surjit Singh Asai – Consumer Protection Act, 1986, section 2(1) (g))-Deficiency in service-Motor insurance-Repudiation of claim-Bus was damaged due to collapse of bridge-Insurance company contended that bus was carrying more passengers than the permitted capacity ast the time of accident-Nothing to show that cause of accident was attributable to excess passengers-Whether insurance company was deficient in its service in repudiating the claim-Held:yes. सदर पूर्वाधाराचा विचार करता सर्व्हेअर यांनी निश्चित केलेली रक्कम तक्रारदारास अदा करावयास हवी होती ती केलेली नाही. सबब सर्व्हेअर यांनी निश्चित केलेली नुकसानीची रक्कम रुपये तक्रारदार मिळणेस पात्र असतानाही तक्रारदारास ती अदा न करुन सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- तक्रारदाराने आपल्या तक्रारीमध्ये रक्कम रु.2,27,376/- इतक्या गाडीच्या नुकसान भरपाईच्या क्लेमची मागणी केलेली आहे. मात्र त्या संदर्भात बिल्लांच्या सत्यप्रती प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या नाहीत. सामनेवालांचे दुर्गाप्रसाद बसरुर या सर्व्हेअर यांनी दाखल केलेल्या सर्व्हे रिपोटमध्ये गाडीच्या नुकसानीची सविस्तर पार्टसच्या नोंदीसह रक्कमांच्या नोंदी केलेल्या आहेत. तसेच दि.13/11/2008 चे तक्रारदाराचे सामनेवालांना दिलेल्या पत्रामध्ये बिलांच्या नोंदी दिसून येतात. सदर बिलामध्ये बॉडीशेल रु.85,000/- ची नोंद दिसून येते. मात्र प्रत्यक्षात प्रस्तुतची बॉडी शेल ही नवीन न बसवता सेकंड हॅन्ड बसवलेचे सवर्हेअर यांनी आपल्या अहवालात स्पष्ट नमुद केले आहे. त्याप्रमाणे प्रत्यक्षात आलेल्या खर्चाची नोंद त्यांनी केलेली आहे. सबब सर्व्हेअर यांचा रिपोर्ट तक्रारदाराने स्पष्टपणे नाकारलेला नाही. तसेच त्यास स्पष्टपणे आव्हान दिलेले नाही. सबब प्रस्तुत सर्व्हे रिपोर्ट हा विश्वासाहार्य ग्राहय धरुन त्याप्रमाणे तक्रारदार रक्कम मिळणेस पात्र आहे. सदर रक्कमेपैकी रु.87,728/-यापूर्वी अदा केलेने उर्वरित रक्कम रु.36,909/- व्याजासहीत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सर्व्हे रिपोर्टनुसार रु.1,24,637/-इतकी नुकसानीची रक्कम निश्चित केलेली होती. सदरची रक्कम न देता सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.03/03/2009 रोजी रक्कम रु.87,728/-अदा केलेली आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम रु.36,909/- दि.04/03/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासहीत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेने तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम रु.1,24,637/-पैकी दि.03/03/2009 रोजी रु.87,728/-अदा केले असलेने उर्वरित रक्कम रु.36,909/-(रु.छत्तीस हजार नऊशे नऊ फक्त)अदा करावेत व सदर रक्कमेवर दि.04/03/2009पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज दयावे. 3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |