( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक :15 डिसेंबर 2010) प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदाराने त्यांचे विमाकृत व्हॉल्हो वाहन क्रमांक केवाय-01-ए-7034 गैरअर्जदार यांचेकडे रुपये 26,48,000/- या रक्कमेकरिता विमा काढलेला होता. त्या विमा पॉलीसीचा क्रमांक- 510100/31/05/08291 असे असुन विमा कालावधी दिनांक 4.12.2005 ते 3.12.2006 असा होता. तक्रारदाराने सदर पॉलीसी विमाकृत करुनही गैरअर्जदाराने सदर पॉलीसीच्या अटी व शर्तीची प्रत तक्रारदारास दिली नाही. सदर वाहनाचा दिनांक 3.5.2006 रोजी कोंढाळी, अमरावती रोड येथे अपघात झाला. वाहनाचे अपघाताचेवेळी चालकाजवळ वैध वाहन चालक परवाना होता. सदर अपघाताची माहिती पोलीस स्टेशन कोंढाळी येथे देण्यात आली. संबंधीत अधिका-यांनी एफआयआर दाखल करुन घटनास्थळ पंचानामा केला. गैरअर्जदार विमा कंपनीने सदर घटनास्थळाचे निरिक्षण करण्याकरिता सर्व्हेअरची नियुक्ती केली. सव्हेअरनी घटनास्थळाला भेट दिली व अपघातग्रस्त वाहनाचे सर्व बाजुंनी छायाचित्र घेतले व वाहनाच्या आवश्यक त्या दस्तऐवजाची तपासणी केल्यानंतर अपघातग्रस्त वाहनदुरुस्तीकरिता नेण्यास सांगीतले. म्हणुन तक्रारदाराने अपघातग्रस्त वाहन व्हाल्हो इंडीया लि.येथे नेले. सदर व्हाल्हो इंडीया लि.यांना वाहन दुरुस्तीकरिता अंदाजे रुपये 10,48,085/- व डेंटिंग/पेंटींग करीता रुपये 25,000/- चे अज्जु मेक्यानिकल वर्क्स, वडधामना, अमरावती रोड, नागपूर यांनी दिलेले अंदाजपत्रक,एफ.आय.आर वाहनाचे परमिट व फिटनेसबाबतचे दस्तावेज व वाहनाशी संबंधीत इतर दस्तावेजासोबत वाहन दावा प्रपत्रासह दिनाक 14.5.2006 रोजी गैरअर्जदार यांचेकडे विमा दावा दाखल केला. त्यानंतर तक्रारदाराचे वाहनाचा अंतीम अहवाल तयार करण्याकरिता गैरअर्जदारातर्फे श्री डि.एफ.विजयकर यांची नियुक्ति केली. त्यांनी व्होल्हो इंडीया लि.वर्धमाननगर, येथे जाऊन तक्रारदाराच्या वाहनाचीसंपुर्ण तपासणी केली. तक्रारदाराने सदर सर्व्हिस सेंटरमधे वाहन उघडल्यानंतर दुरुस्ती नंतर दुसरे खर्चाचे पुरवणी अंदाजपत्रक गैरअर्जदार यांचे नागपूर येथील रिजनल कार्यालयात, सादर केले. त्यानंतर श्री डि. एफ. विजयकर, यांनी वडधामना येथे अपघातग्रस्त वाहनाची पुन्हा संपुर्ण तपासणी केली व तक्रारदाराचे वाहनाचे दुरुस्तीकरिता परवानगी दिली. सदर वाहन दुरुस्त झाल्यानंतर तक्रारदाराने परत तपासणी करण्याकरिता सव्र्हेअरची नियुक्ती करण्याबाबत दिनांक 13.7.2006 रोजी पत्राद्वारे कळविले.तक्रारकर्त्याने त्याच्यापरीने जेवढे होईल तेवढे सोपस्कार पार पाडले. त्यांनतर वारंवार तोंडी व फोनवर विनंती केली. परंतु तरीही 48 महिने लोटुनही तक्रारदाराचा विमा दावा निकाली काढला नाही. वास्तविक सदर विमा दावा सर्व्हेअर अहवाल मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत किंवा अपघातझाल्यापासुन 3 महिन्याचे आत करणे बंधनकारक राहते. इंन्शुरन्स रेगुलॅरीटी अन्ड डेव्हलॅपमेंट अथोरीटी नूसार कागदपत्रे मिळाल्यापासुन 30 दिवसानंतर विमा दावा निकाली काढला तर 14.5 टक्के व्याज मिळावयास पाहिजे. त्यानंतर 30 दिवस विमा दावा उशिर केला तर प्रचलित व्याजदरापेक्षा दोन टक्के जास्त व्याज दर मिळावयास तक्रारदार पात्र आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराचा विमा दावा मागणी करुनही निकाली काढला नाही ही गैरअर्जदाराचे सेवेतील कमतरता आहे म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीकरिता आलेला खर्च रुपये 13,07,914/- मिळावे. वाहनाचे दुरुस्तीकरिता घेतेलेल्या कर्जावर व्याज तक्रारदारास भरावे लागत असल्यामुळे त्यांची प्रतीपुर्ती गैरअर्जदाराने करावी. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 25,000/-, इंशुरन्स रेगुलॅरीटी अन्ड डेव्हलपमेंट अथोरीटी नूसार तक्रारदार व्याज मिळण्यास पात्र आहे. इत्यादी मागण्या केल्यात. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्तऐवजयादी नुसार एकुण 13 कागदपत्रे दाखल केली. त्यात विमा पॉलीसी, गैरअर्जदारास माहिती, नोंदणीचे प्रमाणपत्र, एफआयआरची प्रत, रोड चालान, दुरुस्तीचे अंदाजपत्रक, अज्जु मॅकेनिकल वर्क्सचे देयक, माहिती रिजनल ऑफीस, नागपूर, गैरअर्जदाराचे पत्र, व इतर कागदपत्रांचा समावेश आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार आपले कथनात नमुद करतात की, तक्रारदार फर्मने गैरअर्जदार यांचेकडुन त्यांचेकडील व्हाल्हो वाहनाची विमा पॉलीसी काढलेली नाही. त्यामुळे सदर तक्रार दाखल करण्याचा त्यांना अधिकार नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने मेसर्स गरुड कॅरीअर्स अन्ड शिपींग लि. महेश कुंज, गांधीबाग, नागपूर यांचे व्हाल्हो कंपनीच्या माल वाहतुक वाहनाचा विमा काढलेला होता. त्या वाहनाचा क्रमांक के.ए.-01-ए-7034 असा होता. त्याचा कालावधी दि.4.12.2005 ते 3.12.3006 होता.सदर वाहन दिनांक 3.5.2006 रोजी अपघातग्रस्त झाले होते. तक्रारदाराने अपघाताआधी व अपघातानंतर कधीही आपले फर्मचे नाव बदलविण्यात आल्याची सुचना गैरअर्जदारास दिलेली नाही. सदर अपघातग्रस्त वाहनाचे मेसर्स गरुड कॅरीअर्स अन्ड शिपींग लि हेच विमा धारक होते. सदर वाहनाचा अपघात झाल्याचे कळविल्यानंतर गैरअर्जदार यांनी सहज चौकशी करण्याकरिता सर्व्हेअर नेमला. सर्व्हेअरने अपघात स्थळाचे व गाडीचा सर्व्हे करुन अहवाल पाठविला व त्यानुसार श्री डी.एफ. विजयकार सर्व्हेअर यांची अंतीम सर्व्हे रिपोर्ट तयार करण्याकरिता नियुक्ति केली. सदर वाहनाचा सर्व्हे करुन विमाधारकास कागदपत्रे सादर करण्यास सांगीतले. परंतु तक्रारदाराने अर्धवट कागदपत्रे सादर केलीत. व बाकीचे देण्याचे कबुल करुन दिली नाहीत. सर्व्हेअर विजयकार यांनी अंतिम सर्व्हे रिपोर्ट तयार करुन रिपेअरिंग खर्च रुपये 2,52,427.76 काढुन विमा कंपनीला दिनांक 14.7.2006 ला दिला व त्यामधुन पॉलीसी एक्सेस रुपये 1,01,500/- कमी करुन रुपये 1,50,927.76 देय होती. त्यात काही कागदपत्रे स्वतः कंपीनीने तपासुन घ्यावेत असे नमुद केले होते. त्यानुसार गैरअर्जदार गरुड कॅरीअर्स अन्ड शिपींग लि.महेश कुंज, गांधीबाग, नागपूर यांना वारंवार पत्र पाठवुन कागदपत्राची मागणी करुनही ते अर्धवट कागदपत्रांची पुर्तेता करीत होते. दिनांक 3.6.2008 रोजी पत्राद्वारे वाहन दुरुस्तीचे पैसे देवाणघेवाण बद्दल त्रुटी काढली. तसेच लोड चालान ची ओरीजनल प्रत मागीतली होती. परंतु त्याची पुर्तता केली नाही. म्हणुन दिनांक 19.6.2008 रोजी एक पत्र पाठवुन मुळ लोड चालानची तपासणीकरिता त्वरीत मागणी केली व त्यात 15 दिवसांची मुदत दिली होती व त्यात नमुद केली की 15 दिवसात लोड चालानची पुर्तता केली नाही, तर तुमचा नो क्लेम ठरविण्यात येईल. तक्रारदाराने काहीही कारवाई केली नाही म्हणुन ‘ नो–क्लेम ’ म्हणुन त्यांची फाईल बंद करण्यात आली. जुलै-2008 पासुन तक्रारदाराची काहीही तक्रार नसतांना व या तक्रारदाराला सदर तक्रार दाखल करण्याचा कसलाही अधिकार नसतांना तक्रार दाखल केली म्हणुन ती रुपये 20,000/- खर्चासहीत खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे. गैरअर्जदाराने आपल्या जवाबसोबत एकुण 4 कागदपत्रे दाखल केले. त्यात अंतीम सर्व्हे रिपोर्ट, गैरअर्जदाराने पाठविलेले पत्र, पोचपावती इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. -: कारणमिमांसा :- तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व दाखल कागदपत्रे व वस्तुस्थिती यांचे अवलोकन केले असता असे निर्देशनास येते की, तक्रारदारानी त्यांचे कंपनीचे पुर्वीचे नाव मेसर्स गरुड कॅरीअर्स अन्ड शिपींग लि. या नावाने गैरअर्जदार यांचेकडे त्यांचे वाहनाचा रुपये 26,48,000/- एवढया रक्कमेचा विमा काढलेला होता. त्यांचा विमा पॉलीसीचा क्रमांक- 510100/31/05/08291 असा असुन विमा कालावधी दिनांक 4.12.2005 ते 3.12.2006 असा होता. (कागदपत्र क्रं.8) सदर पॉलीसी कालावधीमधे दिनांक 3.5.2006 रोजी कोंढाळी, अमरावती रोड येथे अपघात झाला होता. (कागदपत्र क्रं.14) ही बाबत गैरअर्जदार यांनी आपले जवाबात मान्य केलेली आहे. दिनाक 21.9.2008 रोजी तक्रारदाराने कंपनीचे जुने नाव मेसर्स गरुड कॅरीअर्स अन्ड शिपींग लि. हे बदलवुन संध्याचे मेसर्स केडन्स लॉजीस्टीक्स ली. हे नाव झालेले असले तरी सदर पॉलीसी जुन्या नावाने घेतलेली होती व सदर वाहनाचा अपघात देखील सदर नाव बदलविण्यापूर्वी झालेला असल्यामुळे विमा दाव्या संबंधीचे व्यवहार हे जुन्या नावाने झालेले दिसुन येतात. त्यामुळे तक्रारदार हा पॉलीसी धारक नव्हता हे गैरअर्जदार यांचे म्हणणे मंचाला मान्य करता येणार नाही. निर्वीवादपणे गैरअर्जदार यांनी अपघातग्रस्त वाहनाचा अंतीम सर्व्हे रिपोर्ट तयार करण्यासाठी सर्व्हेअर श्री. विजयकार यांनी नेमणुक केलेली होती. त्यांनी दिलेल्या (कागदपत्र क्रं.42) वरील अहवालाचे अवलोकन करता असे निर्देशनास येते की, सदर अहवालात अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीपोटी रुपये 2,52,427.76 एवढी रक्कम मान्य करण्यात आलेली होती व त्यात पॉलीसी एक्सेस रुपये 1,01,500/- वजा करुन एकुण देय रक्कम रुपये 1,59,927.76 काढण्यात आलेली होती. तक्रारदाराचे मते सदर अपघातग्रस्त वाहनाचे दुरुस्तीकरिता तक्रारदाराला रुपये 13,07,914/- एवढा खर्च आला व त्यापोटी संबंधीत कंपनीने दिलेले अंदाजपत्रक गैरअर्जदार यांनी विचारात घेतले नाही. परंतु तक्रारदाराने सदर वाहनाचे दुरुस्ती खर्चापोटी सदर खर्च झाल्याचा सुस्पष्ट पुरावा सादर केलेला नाही. त्यासंबंधात तक्रारदाराने सादर केलेल्या पावत्या सुसंगत व योग्य वाटत नाही. (कागदपत्र क्रं. 72,73 ) प्रकरणातील एकुण वस्तुस्थिती पाहता सर्व्हेअर ने दिलेला अहवाल या मंचाला योग्य वाटतो. गैरअर्जदार यांनी पॉलीसी एक्सीस पोटी रुपये 1,01,500/- वजा केले.गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलीसीमध्येइंपोज एक्सेस (Impose Excess) पुढे हस्ताक्षरात रुपये 1,00,000/- लिहीलेले दिसुन येते. परंतु तक्रारदाराने दाखल केलेले(कागदपत्र क्रं.78 वरील दुय्यम इन्श्युरन्स पॉलीसीमध्ये इंपोज एक्सेस (Impose Excess) पुढे ( Rs.0) दाखविलेले आहे.त्यामुळे दुरुस्ती खर्च रुपये 2,52,427.76 यातुन पॉलीसी एक्सीसपोटी रक्कम रुपये 1,01,500/- वजा करण्याची गैरअर्जदार याची कृती अयोग्य आहे असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे गैरअर्जदार हे तक्रारदाराचे नुकसान भरपाईस जबाबदार आहे. सबब आदेश. -//-//- आदेश -//-//- 1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर. 2. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास विमा दाव्यापोटी रुपये 2,52,427.76 द्यावेत. सदर रक्कमेवर दि.14.7.2006 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो 9टक्के द.सा.द.शे.दराने सरळ व्याज द्यावे. 3. गैरअर्जदाराने तक्रारदारास दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार केवळ) द्यावे. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. ( जयश्री यंगल ) (जयश्री येंडे ) ( विजयसिंह ना. राणे ) सदस्या सदस्या अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |