तक्रारदार :वकील श्री.जे.एन.तिवारी यांचे मार्फत हजर.
सामनेवाले :गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1.सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे विमा कंपनीचे एजंट आहेत. तक्रारदारांनी सा.वाले विमा कंपनीकडून रु. 2 लाख येवढया किंमतीची केडीक्लेम विमा पॉलीसी वर्ष 2001 मध्ये घेतली होती, जी वर्ष 2008-09 मध्ये अस्तीत्वात होती.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार यांना आजारपणामुळे भाटीया जनरल हॉस्पीटलात दाखल होऊन इलाज करावा लागला. त्याकामी तक्रारदारांना वेग वेगळया तपासण्या करुन घ्याव्या लागल्या व एकंदर रु.77,156/- खर्च करावा लागला. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे आपल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीकामी मागणीपत्र सादर केल्यावर सा.वाले यांनी त्यांचे पत्र दिनांक 15.9.2009 प्रमाणे तक्रारदारांची मागणी फेटाळली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी रुग्णालयात काही इलाज करुन घेतलेले नाहीत व त्यानंतर कुठलाही उपचार झाला नव्हता. त्यावरुन प्रतिपुर्ती शक्य नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे पुन्हा मागणीपत्र पाठविले परंतु सा.वाले यांनी त्यास उत्तर दिले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले विमा कपनीने विमा पॉलीसीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप केला.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, विमा करारातील शर्ती व अटी प्रमाणे तक्रारदारांना रुग्णालयात दाखल होऊन इलाज करुन घ्यावा लागला तरच वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती देय होते. परंतु तक्रारदारांचे बाबतीत ते दाखल झाल्यानंतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. परंतु त्याचेवर कुठलाही इलाज केला नसल्याने तक्रारदार वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मागण्यास पात्र नाहीत.
4. दोन्ही बाजुंनी आपले पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्र, तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले वाले यांनी तक्रारदारांना विमा पॉलीसीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? |
होय. |
2 |
अंतीम आदेश |
तक्रार अशतः मंजूर |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत ज्या उपचारा संबंधात कागदपत्रे सादर केलेली आहेत त्यामध्ये निशाणी-ब येथे भाटीया रुग्णालयामध्ये तक्रारदार यांना दिनांक 10.6.2009 रोजी दाखल करण्यात आले होते अशी नोंद आहे. तक्रारदारांना त्यांचे पायावर सुज असल्याने व थकवा जाणवत असल्याने तसेच अशक्तपणा व लघविचे प्रमाण कमी होणे इ.कामी भाटीया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तक्रारदारांचे पोटामध्ये दुखत होते व त्यांना सारखी तहान लागत होती. भाटीया रुग्णालयातील कागदपत्रे निशाणी-ब असे दर्शवितात की, तेथील वैद्यकीय अधिका-यांनी तक्रारदारांच्या तपासण्या केल्या व तपासणीनंतर तक्रारदारांवर वेग वेगळे इलाज केले. तक्रारदारांच्या तपासण्या करण्यात आल्या या बाबतचा अहवाल देखील दाखल आहे. तक्रारदारांना भाभा रुग्णालयात दिनांक 11.6.2009 रोजी दाखल केले. व दिनांक 17.6.2009 रोजी रुग्णालय सोडण्याचे दरम्यान तक्रारदारांच्या केवळ तपासण्या करण्यात आलेल्या होत्या असे नसून तक्रारदारांवर वेग वेगळे इलाजही करण्यात आलेले होते. त्या बद्दलची नोंद भाभा रुग्णालयाचे डिस्सचार्ज कार्ड पृष्ट क्र.45 वर दाखल आहे. भाभा रुग्णालयाने तक्रारदारांना पुढील इलाजाकामी काही औषधे लिहून दिली होती. त्या नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांना रुग्णालयामधून सोडल्यानंतर भविष्यामध्ये इलाजाकामी देखील औषधे सुचविण्यात आलेली होती. या वरुन तक्रारदारावर भाभा रुग्णालयात केवळ तपासणी करण्यात आली या सा.वाले यांचे कथनात तथ्य नसून तक्रारदारांवर इलाजही करण्यात आले होते, असे दिसून येते.
7. तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना रुग्णालयात दाखल होणे आवश्यक नव्हते तसेच रुग्णालयात त्यांचेवर इलाज करण्यात आलेले नाहीत असा निष्कर्ष काढून तक्रारदारांची मागणी फेटाळली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन विशेषतः भाभा रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी भाभा रुग्णालयात त्यांचेवर करण्यात आलेल्या इलाजाकामी रु.77,176/- रुग्णालयास अदा केले व सा.वाले यांनी अयोग्य कारण दाखवून तक्रारदारांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीची मागणी फेटाळली. या वरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा पॉलीसीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
8. तक्रारदारांनी भाभा रुग्णालयात इलाजाकामी रु.77,176/- खर्च केले व देयकांच्या प्रती तक्रारीसोबत दाखल आहेत. तक्रारदारांचे विमा पॉलीसीमधील रक्कम ही रु.2 लाख होते व याप्रमाणे तक्रारदारांची मागणी देणे पॉलीसीच्यारक्कमेपेक्षा कमी रक्कमेची होती. तक्रारदारांनी भाभा रुग्णालयात इलाजाकामी रु.77,176.42 जमा केल्याबद्दल पावतीची प्रत तक्रारीच्या पृष्ट क्र.44 वर दाखल आहे. त्यावरुन तक्रारदारांना शस्त्रक्रियेकामी ( Operation ) नेण्यात आलेले होते तक्रारदारांवर तपासणी करुन इलाज करण्यात आले. सबब तक्रारदार सा.वाले यांचेकडून रु.77,176/- 9 टक्के व्याजासह वसुल करण्यास पात्र आहेत.
9. तक्रारदारांनी मुळ रक्कमेवर 18 टक्के दराने व्याजाची मागणी केलेली आहे. त्या व्यतिरिक्त रु.2 लाख नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. एकंदर व्यवहाराचा विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना मुळ रक्कम रु.77,176/- 9 टक्के व्याजासह अदा करावी असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 205/2010 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमा पॉलीसीचे संदर्भातसेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना रु.77,176/- व मागणी नाकारलेल्या
दिनांकापासून म्हणजे दिनांक 15.9.2009 पासून वरील रक्कमेवर
9 टक्के दराने व्याज अदा करावे असा आदेश सामनेवाले यांना
देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.