द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदार श्री.बद्रुउद्दीन मंडल हे मे.बी.ए.एम्.मंडल वॉशिंग पॉवडर प्रा.लि.,चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तक्रारदार कंपनी ही सोप व डिटर्जंन्टसचे उत्पादन त्यांच्या नुनिट सी-17, 144, अशोक मिल कंम्पाऊंड, सायन बांद्रा लिंक रोड, धारावी, मुंबई – 400 017 येथे करते. तक्रारदारांनी आपल्या व्यवसायासाठी सामनेवाला यांचेकडून विमा पॉलिसी क्र.11700/11/05/ 11/00000930 घेतली. सदर पॉलिसी ही दि.15/06/05 ते 14/06/06 या कालावधीसाठी होती. पॉलिसीमध्ये प्लांन्ट, मशिनरी व फॅक्टरीच्या आवारात असलेला स्टॉक इत्यादीसाठी विम्याचे संरक्षण देण्यात आले होते. तक्रारदारांनी स्टँण्डर्ड फायर अॅंण्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसीची छायांकित प्रत तक्रारअर्जासोबत नि.’ए’ ला दाखल केली आहे. सदर पॉलिसीमध्ये आश्वासित रक्कम रु.8,55,000/- तक्रारदारांना देण्यात आली आहे.
2) वरील पॉलिसीच्या कालावधीत दि.26/07/05 रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे तक्रारदारांच्या फॅक्टरीच्या आवारात पावसाचे पाणी 5-6 फूटापर्यंत 2 दिवस साठून राहिले होते व त्यामुळे तक्रारदारांच्या फॅक्टरीच्या आवारामधील स्टॉकचे (कच्च्या मालाचे), तसेच तयार मालाचे नुकसान झाले. अॅटोमेटीक तसेच सेमी अॅटोमेटीक मशिनचे सुध्दा नुकसान झाले. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे सुमारे 8 लाखाचे नुकसान झाले. सदर नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून तक्रारदारांनी वरील पॉलिसीखाली सामनेवाला यांचेकडे क्लेम सादर केला व त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे दाखल केली. सामनेवाला यांनी मे.एल्.टी.दफतरी यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली. सर्व्हेअरने तक्रारदारांच्या फॅक्टरीला भेट देवून पाहणी केली व सर्व्हे रिपोर्ट सामनेवाला यांना सादर केला. त्यानंतर दि.21/03/06 रोजीचे पत्राने सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला. सामनेवाला यांचे वरील निर्णयाने नाराज होवून तक्रारदारांनी सामनेवाला यांचे ग्राहक तक्रार निवारण कक्ष, नवी दिल्ली यांना पत्र पाठविले असता दि.06/05/08 रोजीचे पत्राने सामनेवाला याचे ग्राहक तक्रार निवारण कक्ष, नवी दिल्ली यांनी 'तक्रारदारांची क्लेम फाईल रि ओपन करता येणार नाही' असे तक्रारदारांना कळविले.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारांचा रास्त क्लेम नाकारल्यामुळे तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम मंजूर करावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. क्लेमच्या रकमेवर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून व्याजाची मागणी केली असून नुकसानभरपाई व या अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल, तसेच तक्रारअर्जाच्या पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे.
4) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारअर्जात नमूद केलेली स्टॅंण्डर्ड स्पेशल पेरिल्स पॉलिसी दिली होती ही बाब मान्य केली आहे. दि.26/07/2005 रोजीच्या अतिवृष्टीमुळे तक्रारदारांच्या फॅक्टरीमध्ये पावसाचे पाणी साठून त्यांच्या फॅक्टरीतील कच्च्या व तयार मालाचे, तसेच मशिनरी इत्यादींचे नुकसान झाल्याची माहिती सामनेवाला यांना तक्रारदारांनी देवून सामनेवालाकडे रु.6 लाखाचा क्लेम सादर केला. सामनवेाला यांनी सर्व्हेअरची नेमणूक केली व सदर सर्व्हेअरने तक्रारदारांच्या फॅक्टरीला प्रत्यक्ष भेट दिली व कागदपत्रांची मागणी केली. तथापि, तक्रारदारांनी आवश्यक ती कागदपत्रे सामनेवाला यांना किंवा त्यांच्या सर्व्हेअरला दिली नाहीत. तक्रारदारांनी त्यांच्या फॅक्टरीच्या लायसन्सची प्रत, स्टॉक रजिस्टरचा संबंधीत उतारा, फॅक्टरीच्या जागेसंबंधीच्या भाडे पावत्या किंवा करारपत्र, विद्युत देयके दिली नाहीत. म्हणून सामनेवाला यांचे सर्व्हेअरने तक्रारदारांचा क्लेम नामंजूर करावा असा अभिप्राय दिला. दि.21/03/2006 चे पत्राने सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांचा क्लेम नाकारल्यासंबंधी कळविले. तक्रारदारांनी त्यानंतर सामनेवाला यांचे ग्राहक तक्रार निवारण कक्ष, नवी दिल्ली यांचेकडे तक्रारअर्ज सादर केला. सदर ग्राहक तक्रार निवारण कक्षाने दि.06/05/2008 चे पत्राने तक्रारदारांचा क्लेम मंजूर करता येणार नाही असे कळविले.
5) सामनवेाला यांचे सर्व्हेअर एल्.टी.दफतर यांनी तक्रारदारांना दि.05/09/2005 चे पत्राने आवश्यक ती कागदपत्रे द्यावेत अशी मागणी केली होती, परंतु तक्रारदारांनी फक्त काही कागदपत्रे दिली. सामनेवाला यांचे सर्व्हेअरने पुन्हा तक्रारदारांना दि.19/11/2005, 15/12/2005, 02/01/2006 व 01/02/2006 रोजी पत्र पाठवूनसुध्दा तक्रारदारांनी सर्व्हेअरना आवश्यक ती कागदपत्र व संबंधीत माहिती दिली नाही. तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेले सर्व आरोप सामनेवाला यांनी नाकारले आहेत. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार ग्राहक संरक्षण कागदयातील तरतूदीप्रमाणे 'ग्राहक' नाहीत त्यामुळे सदरचा तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे. सामनेवाला यांचे सेवेत कसलीही कमतरता नाही, उलट तक्रारदारांनी महत्वाच्या बाबी या मंचापासून लपवून ठेवल्यामुळे सदर तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करणेत यावा.
6) तक्रारदारांनी प्रतिउत्तर दाखल करुन सामनेवाला यांनी केलेले आरोप नाकारले आहेत. या कामी तक्रारदारांनी तसेच सामनेवाला यांनी आपापला स्वतंत्र लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तक्रारदारांचे वकील श्री.शानभाग तसेच सामनेवाला यांचे वकील श्रीमती कल्पना त्रिवेदी यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारदार वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी चुकीच्या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारल्यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम मंजूर करावा, तक्रारदारांनी मागणी केल्याप्रमाणे नुकसानभरपाईची रक्कम सामनेवाला यांनी व्याजासहित द्यावी असा आदेश सामनेवाला यांना करावा अशी विनंती तक्रारदारांच्या वकीलांनी केली. सामनेवाला यांचे वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार मुदतीत नसल्यामुळे तो खर्चासहित रद्द करणेत यावा. उभयपक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात येवून सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
7)निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 –तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24(A) प्रमाणे मुदतीत दाखल केला आहे काय ?
उत्तर -नाही.
मुद्दा क्र.2 –तक्रारदारांना तक्रारअर्जात मागितल्याप्रमाणे सामनेवाला यांचेकडून दाद मागता येईल काय ?
उत्तर - नाही.
कारणमिमांसा
स्पष्टीकरण मुद्दा क्र.1– तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज दि.22/04/09 रोजी दाखल केलेला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दिनांक 26/07/05 रोजी अतिवृष्टीमुळे त्यांच्या धारावीतील फॅक्टरीमधील कच्च्या व तयार मालाचे, तसेच मशिनरीचे अंदाजे रु.8 लाखाचे नुकसान झाले. त्यानंतर सामनेवाला यांनी नेमणूक केलेल्या सर्व्हेअरने तक्रारदारांच्या फॅक्टरीस प्रत्यक्ष भेट देवून फॅक्टरीची पाहणी केली. सर्व्हेअरचा रिपोर्ट मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी दि.21/03/06 रोजीचे पत्राने तक्रारदारांचा क्लेम नाकारला. तक्रारदारांच्या वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांचा क्लेम चुकीच्या कारणावरुन सामनेवाला यांनी नाकारल्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाला यांचे ग्राहक तक्रार निवारण कक्ष, नवी दिल्ली यांचेकडे तक्रार केली होती व नंतर सामनेवाला यांनी दि.06/05/08 रोजी तक्रारदारांना त्यांची फाईल रि ओपन करता येणार नाही असे कळविले. सामनेवाला यांनी दि.06/05/08 रोजी पाठविलेल्या पत्रापासून सदरचा तक्रारअर्ज मुदतीत आहे असे तक्रारदारांच्या वतीने सांगण्यात आले.
सामनेवाला यांचे वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांनी दि.21/03/06 चे पत्राने तक्रारदारांचा क्लेम स्पष्टपणे नाकारला असून क्लेम नाकारण्याचे कारण दि.21/03/06 चे पत्रात नमूद केले आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जास कारण घडले त्या तारखेपासून म्हणजेच दि.26/07/05 पासून 2 वर्षांत किंवा त्यांचा क्लेम दि.21/03/06 रोजी नाकारला त्या तारखेपासून 2 वर्षात सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज क्लेम नाकारला त्या तारखेपासून 2 वर्षात दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24(A)प्रमाणे मुदतीत दाखल केलेला नसल्यामुळे रद्द होणेस पात्र आहे.
या प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता दि.26/07/2005 रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली त्यावेळी तक्रारदारांचे फॅक्टरीतील कच्च्या व तयार मालाचे तसेच मशिनरीचे नुकसान झाले. त्यामुळे तक्रारअर्जास कारण प्रथमतः दि.26/07/05 रोजी घडले आहे. त्यानंतर सामनेवाला यांचेकडे दाखल केलेला क्लेम सामनेवाला यांनी दि.21/03/06 चे पत्राने स्पष्टपणे नाकारला. तक्रारदारांनी त्यानंतर सामनेवाला यांच्या ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागितली. परंतु दि.06/05/2008 चे पत्राने तक्रारदारांची फाईल रि ओपन करता येणार नाही असे तक्रारदारांना सामनेवाला यांनी कळविले. या अर्जातील वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारदारांनी त्यांचा क्लेम नाकारल्या तारखेपासून म्हणजेच दि.21/03/06 पासून 2 वर्षाच्या मुदतीत दाखल करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दि.22/04/2009 रोजी म्हणजेच तक्रारअर्जास कारण घडल्यापासून 3 वर्षाच्या कालावधीनंतर दाखल केला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेशी पत्र व्यवहार केला म्हणून कायदयाने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये वाढ होत नाही. मा.राज्य आयोगाने तक्रार क्र.36/2009 मधील किरकोळ अर्ज 1259/2009 Tricon Enterprises pvt.Ltd. V/s. The New India Assurance Co. Ltd. या खटल्यामध्ये असे म्हटले आहे की, “We need not go at this stage to the merits of the matter but fact remains that with specific reasons claim was repudiated by two letters though there are subsequent letters asking them to produce certain documents. That will not in any way extend the period of limitation. After all these are commercial transactions. Insurance companies to desire to maintain relationship with such customers and, therefore, they may sympathetically ask certain documents to be produced. However, that does not extend the period of limitation in law unless such letters fall within the purview of acknowledgement extending period of limitation and/or Section 25(3) of the Contract Act as stated above. Therefore, even if they say that they are reconsidering the case however that will not extend the period of limitation because reconsideration does not mean a contract under section 25(3) and/or acknowledgement of the claim under Limitation Act. Therefore, person who is desirous of exercising his rights has to look to the cause of action and shall file the complant within a period of two years.”
तक्रारदारांनी तक्रारअर्ज 2 वर्षाच्या मुदतीत दाखल केलेला नसल्यामुळे तो मुदतबाहय् आहे त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
स्पष्टीकरण मुद्दा क्र.2– तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(A) प्रमाणे तक्रारअर्जास कारण घडले त्या दिनांकापासून 2 वर्षाच्या मुदतीत दाखल केलेला नाही. सबब तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून कसलीही दाद मागता येणार नाही. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
वर नमूद केलेल्या कारणास्तव खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे-
अं ति म आ दे श
1. तक्रारअर्ज क्रमांक 131/2009 रद्द करणेत येत आहे.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. सदर आदेशाची प्रमाणित प्रत सर्व पक्षकारांना देणेत यावी.